Thursday, March 7, 2013

पंतप्रधानपदाची निरर्थक चर्चा

  भारतीय राजकारणात उदयमान नेतृत्वाबद्दल राजकीय विश्लेषक जेव्हा लिहीतात तेव्हा माझी करमणूक होते. अनेक पत्राचे प्रवक्ते ह्या विषयावर बोलतात तेव्हा हसू आल्याशिवाय राहत नाही. त्यांची गृहितके पाहिल्यावर मला नेहमीच अचंबा वाटत आला आहे. राहूल गांधी आणि नरेंद्र मोदी हे दोघेच काय ते पंतप्रधानपदासाठी देशात लायक उमेदवार आहेत असे गृहित धरून सगळी चर्चा सुरू झाली आहे. त्या चर्चेचा परिणाम विशेषत: कोणावर होत असेल तर पक्षीय राजकारणात नशीब अजमावण्यासाठी आलेले लहानमोठे कार्यकर्ते आणि पत्रकारितेत ठराविक मजकुराचा घाणा घालणारे पत्रकार ह्यांच्यावर! राहूल गांधी हे काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी झाले आणि नरेंद्र मोदी हे गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावर दुस-यांदा आले तेव्हापासून पंतप्रधानपदावर कोण येईल ह्याची चर्चा सुरू झाली आणि दोघांच्याही पाठिराख्या मंडळींनी राहूल आणि मोदी ह्यांच्याभोवती फेर धरून नाचायचेच तेवढे बाकी ठेवले आहे.


सध्या प्रसारमाध्यमात भावी पंतप्राधानाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल ह्याविषयी चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेत भावी अध्यक्षीय उमेदवारात चुरस सुरू होते आणि वर्तमानपत्रे आणि न्यूजचॅनेलमध्ये त्या चुरशीचे प्रतिबिंबही पडत असते हे खरे आहे. परंतु अमेरिकेन लोकशाही आणि भारतीय लोकशाही ह्यात जमीनअस्मानचा फरक आहे. मुळात अमेरिकेन लोकशाही ही अध्यक्षीय लोकशाही असून तेथे अध्यक्ष थेट मतदारांकडून निवडला जातो. ह्याउलट, भारतात संसदीय लोकशाही असून लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवणा-या पक्षाच्या नेत्याची निवड खासदार करत असतात!

खुद्द काँग्रेस पक्षात संसदीय पक्षाच्या बैठकीपूर्वी पक्षश्रेष्ठीच्या बैठकी झडत असतात. आपापसात प्रदीर्घ वाटाघाटी सुरू असतात. काँग्रेस अध्यक्षपदी कोणाला निवडून द्यावे ह्याही बाबतीत करावे ह्या संदर्भातही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वाटाघाची चालू राहतात हे राजकीय घटनांचे वृत्तांकन करणा-या पत्रकारांनही माहीत नसते तर मग सामान्य माणसांना दोष कसा देता येईल. अधिवेशन जसजसे जवळ येते तसतसा राजकारणाला वेग येतो हा आजवरचा अनुभव आहे. पण ह्य अनुभवाकडे डोळेझाक करून अमक्यातमक्याची फक्त औपचारिक निवड व्हायचे काय ते बाकी राहिले आहे, अशा बातम्या झळकत राहतात.

नेहरू-गांधी कुटुंबांबद्दल टीकेचा गदारोळ उठत असते. काँग्रेसविरोधक नेहमीच अशा बातम्या वर्मानपक्षात पेरत आले आहेत. त्या बातम्यांवर आधारित ठोकताळेबाज मंडळीचे अंदाज-आडाखे सपशेल चुकतात हे सांगायला ज्योतिष्याची गरज नाही. राहूल गांधी आणि नरेंद्र मोदी ह्या दोघांना पंतप्रधानपदाच्या खुर्चीत केव्हा एकदा बसवतो असे सध्या अनेक मंडळींना झाले आहे. पण अग्रलेख लिहीतो म्हणजे जवळ जवळ सरकारच चालवतो आहे असे ह्या मंडळींना वाटत असते. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते काय बोलतात ह्यापेक्षा त्यांनी काय बोलले पाहिजे अशी अपेक्षा बाळगणारे पत्रकार काय हवे ते लिहीत सुटतात. म्हणून पक्षप्रवक्त्यांच्या वार्तालापाच्या वेळी प्रवक्त्यांना हेतूपूर्वक ‘क्रॉस क्वेश्चन’ विचारून बातमीचा रोख बदलण्याचा प्रयत्न पत्रकार करत असतात. क्वचित त्यांना यश येतेही. पण अनेकदा त्यांचे हसे होते. परिणामी त्यांच्या वर्तमानपत्रांचे वजन संपुष्टात येते. ह्या बाबतीत भारतातल्या एके काळच्या वजनदार बड्या वर्तमानपत्रांची सध्याची अवस्था केविलवाणी झाली आहे.

पक्षाच्या खासदारांशी संवाद साधण्यासाठी उपाध्यक्ष ह्या नात्याने बोलावलेल्या बैठकीत राहूल गांधी ह्यांनी छोटेमोठे राजकीय कार्यकर्ते आणि सामान्य पत्रकारांच्या अलीकडे दिसून येणा-या मानसिकतेवर वोट ठेवले. ‘तुम्ही पंतप्रधान होणार का?’ ‘ तुम्ही लग्न केव्हा करणार? तुम्ही कोणती वधू निवडली आहे?’ असले पर्श्नच मुळी चुकीचे आहेत, असे राहूल गांधी ह्यांनी त्या बैठकीत सांगितले. मला राष्ट्रउभारणी करायचीय्... ज्या माणसाचा आवाज देशाच्या पातळीवर आज पोचत नाही त्या माणसाचा आवाज संसदेपर्यंत पोचला पाहिजे, अशी माझी धारणा आहे, असे त्यांनी ह्या बैठकीत अगदी सहजपणे सांगितले.

राहूल गांधी ह्यांच्या ह्या उद्गारांचा लगेच अन्वयअर्थ लावण्यासाठी अनेकांचे कॉम्प्युटर एव्हाना लॉगऑन झाले असतील. ही मंडळी एक विसरतात, अजून निवडणुकांना बरोबर एक वर्षांचा अवधी आहे. त्याखेरीज कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील ह्यांचा अंदाज कोणालाच नाही. एखाद्या पक्षाला सत्ता मिळण्यासाठी १७० जागा मिळणे आवश्यक आहे हेदेखील विश्लेषक मंडळींना माहीत आहे की नाही ह्याबद्दल मला शंका आहे.

जे काँग्रेसच्या गोटात सुरू आहे तेच भाजपा ह्या एकमेव पक्षाच्या गोटातही सुरू आहे. मोदींना भाजपाच्या संसदीय बोर्डावर आणण्यात आले असून भावी पंतप्रधान म्हणून त्यांच्या नावाच्या चर्चेला ऊत येईल अशी तजवीच भाजपने केली आहे. पण भाजपा आघाडीची अवस्था ‘पानीमां म्हस बाम्हन बाम्हनीला मारस’ ह्या अहिराणी भाषेतल्या म्हणीसारखी आहे. म्हैस पाण्यातून बाहेर आल्यावर तिचे दूध कोणी काढावे ह्यावरून ब्राह्मण ब्राह्मणीस मारू लागला तसे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले असे समजून राष्ट्रीय आघाडीचे एक ज्येष्ठ नेते नितिशकुमार ह्यांनी आपल्यालाच पंतप्रधान व्हायचेय्, असे सांगून नरेद्र मोदींना विरोध सुरू केला.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीची ही त-र्हा तर काँग्रेसची त-र्हाही वेगळी नाही. राहूल गांधी पंतप्रधान होतील का, हा प्रश्न तूर्तास तरी काँग्रेसच्या दृष्टीने अनाठायी आहे हे निश्चित. सोनिया गांधींनी काँग्रेस पक्षाला विजय मिळवून दिला त्यामुळे पंतप्रधानपदासाठी अन्य कोणाचे नाव घेतले जाणे शक्यच नव्हते असे सगळ्यांना वाटत असताना अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी मनमोहन सिंग ह्यांची पंतप्रधानपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. राष्ट्रवादी पक्ष स्थापन करण्याची शरद पवारांची खेळी पार फुकट गेली असे म्हणणे भाग आहे. शरद पवार एवढे मुरब्बी नेते; पण काँग्रेस अध्यक्ष ह्या नात्याने सोनियाजींच्या मनात काय चालले आहे ह्याचा पत्ता भल्याभल्यांना लागला नाही, तसा त्यांनाही लागला नाही. तसेच काहीसे आगामी लोकसभा निवडणुकीनंतर घडेल काय? म्हणूनच पंतप्रधानपदाबाबतची चर्चा आज घडीला तरी निरर्थक आहे.

रमेश झवर

भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता

No comments: