आगामी लोकसभा निवडणुकीला दिलेली राजसूयज्ञाची उपमा अलीकडच्या राजकीय विश्लेषकांना चमत्कारिक वाटेल! परंतु पाच हजार वर्षांपूर्वीच्या महाभारतातले 'राजकारण' समजण्यासाठी भारतचार्य चिंतामणराव वैद्य वगैरे इतिहासकारांनी संशोधित केलेल्या प्रतींचा अभ्यास करावा लागेल. आताच्या लोकशाही युगात ज्या पक्षाच्या पारड्यात स्पष्ट बहुमत (273) त्या पक्षाचे सरकार येणार. आगामी निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळेल की नाही ह्याचा फारसा विचार न करता भाजपाने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या नावाची भावी पंतप्रधान म्हणून घोषणा केली आहे. परंतु त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता दिसू लागताच नितिशकुमार ह्यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त जनता दल भाजपाप्रणित आघाडीतून बाहेर पडला. बीजेडी आणि तृणमूल काँग्रेस ह्या दोन्ही पक्षांचादेखील भाजपा आघाडीत सामील होण्यास तूर्त तरी नकार आहे. इतकेच नव्हे तर तिसरी आघाडी स्थापन करण्याचा उद्योग त्यांनी सुरू केला असला तरी त्यात त्यांना कितपत यश मिळते हे अजून स्पष्ट नाही. ते इतक्या लौकर स्पष्ट होणारही नाही.
पंतप्रधानपदासाठी भाजपामध्ये नरेंद्र मोदींच्या नावाचा बोलबोला सुरू होताच त्यांना जोरदार पक्षातल्या स्वकियांचा आणि आघाडीतील मोठ्या पक्षाचा विरोध सुरू झाला. सुषमा स्वराज ह्यांनी आता मोदींच्या नावाला अनुकूलता दर्शवली तरी त्या कुंपणावर होत्या हे विसरता येत नाही. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वजन मोदींच्या पारड्यात पडले ह्याची कल्पना आल्यावर सुषमा स्वराज लगेच मोदींच्या जवळ सरकल्या. त्यांना स्वतःलाच पंतप्रधान व्हायचे होते. पण मोदींमुळे त्यांचा पत्ता काटला गेला. अडवाणी खरे तर मोदींचे गुरु! त्यांनीच मोदींच्या नावास सुरुवातीपासून विरोध केला. बैठकीला गैरहजर राहून त्यांचा विरोध शेवटच्या क्षणापर्यंत कायम आहे हे त्यांनी दाखवून दिले. यशवंत सिन्हा ह्यांनीही अगदी सुरूवातीपासून मोदींच्या नावास विरोध केला. वा-याची दिशा ओळखण्यात पटाईत असलेल्या अरूण जेटलींनी मात्र सुरूवातीपासून मोदींना पाठिंबा मिळवून देण्याची मोहिम हाती घेतली. अनंतकुमार ह्यांचा कर्नाटकमधला गड पडल्यामुळे त्यांनी स्वतःहून मोदींशी घसट वाढवली नाही. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान ह्यंनी तर अडवाणीजींच्या इशा-यावरून मोदींच्या विरोधात मोहिम उघडली. रमणसिंग सुरुवातीपासून मोदींबरोबर संबंध राखून आहेत. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हयांनी मात्र पहिल्यापासून मोदींना पाठिंबा दिला. त्यांच्या इवलाशा राज्यातून फक्त 2 कासदार लोकसभेवर जातात!
मोदी पूर्वाश्रमिचे संघाचे प्रचारक. अहमदाबाद महापालिकेत त्यांनी भाजपाला प्रवेश मिळवून दिला. अटलबिहारी 1978 साली इंदिराजींना हटवण्यासाठी जयप्रकाशजींनी घडवून आणलेल्या विरोधी पक्षांचे ऐक्य वगळता राजीव गांधींनंतर काँग्रेस सरकार अल्पमतात गेले होते. नरसिंह रावांनी पक्षान्तर घडवून आणून कसेबसे काँग्रेस सरकार टिकवले. पण त्यानंतर जनमताचा संपूर्ण कौल भाजपाला न मिळाल्यामुळे आघाड्यांचे राजकारण भारतात जे सुरू झाले ते आजपर्यंत सुरू आहे. आपल्या लोकशाहीमध्ये ख-या अर्थाने पर्यायी पक्षच नाही. भाजपा काँग्रेसला पर्यायी पक्ष नाही. काँग्रेसही भाजपाला पर्यायी पक्ष नाही. म्हणूनच 1998 पासून भारतात संमिश्र सरकारांचे चित्र दिसू लागले. दरम्यानच्या काळात 2004मध्ये भाजपाप्रणित आघाडीची सत्ता जाऊन काँग्रेसप्रणित आघाडीची सत्ता सुरू झाली. पण तरीही संमिश्र सरकार हे भारताचे प्राक्तन कोणीही बदलू शकले नाही.
भावी पंतप्रधान म्हणून मोदींच्या नावाच्या घोषणेला तसा राजकीय आधार आहे. नरसिंह राव सरकारनंतर होणा-या निवडणुकीत भाजपाची सत्ता आल्यास पंतप्रधान कोण? अटलबिहारी वाजपेयी की अडवाणी? ह्या प्रश्नाची जेव्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली तेव्हा खुद्द अडवणींनीच आपणहून वाजपेयी ह्यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्याचे नाव पंतप्रधाननपदासाठी जाहीर केले. देशातला संशयकल्लोळ संपुष्टात आणला. अडवाणी आणि वाजपेयी हे दोन्ही संघाचे. वाजपेयी हे 'प्रागतिक' तर अडवाणी कर्मठ संघनिष्ठ. वाजपेयींच्या लोकप्रियतेचा भाजपाला फायदा झाला. लोकसभेत भाजपाच्या जागा वाढल्या. इतकेच नव्हे तर एरवी काठावर असलेल्या शिवसेना आणि बिजू पटनायक जनता दल ह्यासारख्या पक्षांनी भाजपाला पाठिंबा दिला. वस्तुतः महाराष्ट्त शिवसेनेची ताकद भाजपापेक्षा अधिक. ओडिशातदेखील बीजेडीची ताकद मोठी. त्याखेरीज काठावर असलेली तृणमूल काँग्रेस, जयललितांचा द्रमुक आणि नितिशकुमारांचा संयुक्त जनता दलानेही काँग्रेसला विरोध म्हणून भाजपाला पाठिंबा दिला. हे सगळे राजकारण घडवून आणण्यात वाजपेयींचा करिष्मा आणि अडवाणींची मेहनत उपयोगी पडली. पण भाजपा हा खरोखरच दुर्दैवी म्हणावा लागेल. सत्तेतली प्रमुख भागीदारी आणि अटलबिहारींची लोकप्रियता लाभूनही नंतरच्या निवडणुकीत भाजपाला संपूर्ण 'जनादेश' कधीच प्राप्त होऊ शकला नाही. 2004 साली तर भाजपाला काँग्रेसपेक्षा कमी जागा मिळाल्या. सत्तेमुळे भाजपाला मिळालेली झळाळीही फिकी पडली.
ह्या सगळ्या इतिहासाची आठवण करून देण्याचे काऱण असे की नरेंद्र मोदी ह्यांच्या नावाच्या घोषणेमुळे भाजपाची राजकीय कोंडी फुटू शकेल काय़? मोदी हे कुशल नेते आहेत. गुजरातची प्रगती करून त्यांनी उद्योग जगतात नाव चांगले मिळवले आहे. रत्न टाटा, अंबानी बंधू ह्यांचा पाठिंबाही त्यांना सहज मिळू शकतो. अर्थात भारतातील बहुतेक उद्योगपतींचा कल दोन्ही बोटावर थुंकी लावण्याचा आहे. त्यामुळे जिकडे सरशी तिकडे हे पारशी केव्हाही झुकू शकतात! भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या नावाची घोषणा करून भाजपाने निवडणुकीच्या राजकारणाचा मुहूर्त केला असला तरी असले तरी आघाड्याबिघाड्यांचे राजकारण संपुष्टात आणण्यात नरेंद्र मोदी यशस्वी होतील का हा खरा प्रश्न आहे. ह्या बाबतीत मोदींची अवस्था 'प्रथमग्रासे मक्षिकापाता'सारखी आहे. उत्कृष्ट वक्तृत्वकलेची देणगी त्यांना लाभली आहे हे त्यांनी दाखवून दिले. अर्थात त्यांचे वक्तृत्व वाजेयींच्यापुढे फिकेच आहे. त्यामुळे बहुमत खेचण्यासाठी वक्तृत्वाचा भाजपाला कितपत उपयोग होईल ह्याबद्दल शंका वाटते. वाजपेयींना होता तसा एक घटक त्यांना अनुकूल आहे. तो म्हणजे भाजपाच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या सर्व स्वयंसेवकांना कामाला जुंपले होते मोदींसाठीदेखील ही फौज अर्थातच तयार आहे. वाजपेयींच्या काळात संघ कार्यकर्त्यांच्या मदतीवाचून भाजपा सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष राहिलाच नसता. त्याखेरीज डाव्या कम्युनिस्टांनी केलेले काँग्रेसव्देषाचे राजकारणही भाजपा आघाडीच्या पथ्यावर पडले.
अन्न सुरक्षा कायदा, थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याची योजना, भूसंपादन कायदा इत्यादि काँग्रेसच्या जमेच्या बाजू लक्षात घेतल्यास भाजपाकडे एकही जमेची बाजू नाही. भ्रष्ट्राचार ही काँग्रेस आघाडी सरकारची उणी बाजू हीच भाजपाची जमेची बाजू! ह्या नकारात्मक मुद्द्यावर निव़डणूक मोहिम भाजपा कशी काय रेटणार हा प्रश्नच आहे. 'ये तो सिर्फ झाकी है, काशी-मथुरा बाकी है' ह्या घोषणेचा खुद्द भाजपालाच विसर पडला आहे. ह्या पार्श्वभूमीवर मोदीच्या रूपात श्यामकर्ण अश्व भाजपाला सापडला आहे. आता त्याला राज्याराज्यातून फिरवून निवडणूक जिकंणे कितपत जमते ते हे पाहायचे. बहुमत मिळाल्यानंतर सगळ्या विरोधकांना अंगावर घेत सरकार यशस्वीरीत्या चालवणे ही मोदींबरोबर भाजपाचीदेखील कसोटी ठरणार ह्यात शंका नाही.
रमेश झवर
भूतपूर्व सहसंपादक लोकसत्ता
No comments:
Post a Comment