Tuesday, October 15, 2013

दुसरे ते राजकारण!

समर्थ रामदासांनी हरिकथेला पहिले स्थान दिले असून राजकारणाला दुसरे स्थान दिले आहे. समर्थ रामदासांनी सुचवलेल्या ह्या युक्तीचा महराष्ट्रातले तमाम नेते उपयोग करत आले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार हे तर ह्या युक्तीचा अवलंब करण्याच्या बाबतीत माहीर आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी केलेल्या निवडणूकपूर्व राजकारणाच्या खेळीला विजया दशमीच्या दिवशी शिवसेना मेळाव्यातच फळ आले. मनोहर जोशींना शिवसैनिकांनी व्यासपीठावरून हाकलून लावल्यामुऴे मनोहर जोशी चीत न होता शिवसेनाच चीत झाली. दसरा मेळाव्याच्या दिवशी मनोहर जोशी ह्यांना भर सभेत शिवसैनिकांनी 'चले जाव'च्या घोषणा देऊन व्यासपीठ सोडण्यास भाग पाडले. हा काही शिवसैनिकांचा उत्स्फूर्त संताप नव्हता. उद्धव ठाकरे ह्यांच्या नेतृत्वाबद्दल सनोहर जोशींनी शिवसेना खासदार भारतकुमार राऊत ह्यांच्या उपस्थितीत तोफ डागली तेव्हाच हे स्पष्ट झाले होते की, मनोहर जोशींची शिवसेनेतून हकालपट्टी अटळ आहे. फक्त ती कशा प्रकारे केली जाणार हेच फक्त गुलदस्त्यात होते.
गेल्या लोकसभा निवडणुकीत मनोहर जोशी हरले तेव्हापासूनच ते अडगळीत पडले होते. खरे तर, युतीच्या सत्तेची सुरूवात झाली तेव्हापासूनच मनोहर जोशींवर 'मातोश्री'ची खप्पा मर्जी व्हायला सुरूवात झाली होती. त्या खप्पा मर्जीला शरद पवारांबरोबर असलेल्या मनोहर जोशींच्या घसटीची पार्श्वभूमी होती हे सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु व्यापक राजकारणाचा विचार करून मनोहर जोशींचे काँग्रेस स्टईल 'ऑपरेशन' करण्याच्या भानगडीत बाळासाहेब पडले नाही. राजकीयदृष्ट्या त्यांना ते परवडणारेही नव्हते. परंतु युतीच्या सत्तेच्या शेवटच्या वर्षांत नारायण राणेंना मुख्यमंत्रीपद देऊन त्यांनी मनोहर जोशींचे ऑपरेशन केलेच. अर्थात त्याला कारणे होती.  
मुख्यमंत्री झाल्यानंतर मनोहर जोशी महापौर असतानाच्या काळातले मनोहर जोशी राहिले नाही! महापालिकेचा गाडा हाकणे वेगळे आणि राज्याचा गाडा हाकणे वेगळे ह्याचे भान मनोहर जोशींनी विधान परिषदेवर निवडून आल्यानंतर पहिल्या सहा महिन्यातच झाले. खुद्द बाळासाहेबांना मात्र ते भान आले नाही. ह्या उलट इतर पक्षांशी सौदेबाजी करताना पक्षप्रमुखांचा 'अपर हँड' राहिलाच पाहिजे ह्याची बाळासाहेबांना जशी जाण होती तितकी जाण मनोहर जोशींना मात्र राहिली नाही. त्यामुळेच सुरेश प्रभू, मोहन रावले, मोरेश्र्वर सावे, अडसूळ, मनोहर जोशी ह्या सगळ्यांना मातोश्रीने एकाच मापाने मोजले. त्याचा स्पष्ट परिणाम युतीच्या कारभारावर तर झालाच; पण शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणावरही झाला. काँग्रसबरोबर सम अंतर ठेवून चालायचे, की अधुनमधून अंतर कमजास्त करत राहायचे ह्याचा निर्णय बाळासाहेबच घेणार हे उघड होते. मनोहर जोशींना हे माहित नव्हते अशातला भाग नाही. पण बाळासाहेबांच्या नाकाखाली वावरत असताना शरद पवारांबरोबरची घसट कमी करणे काही मनोहर जोशींना जमले नाही ते नाहीच. राज्याच्या राजकारणात याचाच फायदा घेत मनोहर जोशी दिल्लीच्या राजकारणात गेले. गोड गोड संभाषण आणि संबंध राखण्याच्या कलेत निष्णात असलेल्या दिल्लीतही मनोहर जोशींच्या यशाचा मार्ग मोकळा झाला.
त्यांच्या गोड गोड संभाषण चातुर्याचाच फायदा घेऊन त्यांनी राष्ट्रवादीच सर्वेसर्वा शरदराव पवार ह्यांची भेट घेतली. अर्थात पवारांकडे जाण्याचा त्यांचा मार्ग आधीपासूनच प्रशस्त असल्यामुळे त्यांच्या दृष्टने अडचण काहीच नव्हती. पवारांनी मनोहर जोशींची भेट घेतली तशी नितिन गडकरींच्या पूर्ती ग्रुपच्या कार्यक्रमात व्यासपीठावर  हजेरी लावली. मनोहर जोशींची भेट आणि नितिन गडक-यांच्या कार्यक्रमाला हजेरी हे म्हटलं तर शरद पवारांचे राजकारण, म्हटलं तर त्यातून काहीही अर्थ न निघता फक्त पोलिटिकल नायसिटीज् हा अर्थ तर निश्चितच निघणार! ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांच्या स्मारकांचे निमित्त करून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबद्दल अनुदार उद्गार काढण्याचे धाडस मनोहर जोशींनी केले असेल तर तीही त्यांची खेळीच म्हटली पाहिजे. अर्थात ह्या पार्श्वभूमीला जोड मिळाली ती मनोहर जोशींच्या विरूद्ध होर्डिंग्ज लावण्यास महापालिकेच्या यःकश्चित नगरसेवकाला उध्दवजींनी दिलेल्या परवानगीची! मुळात येत्या लोकसभा निवडणुकीत मनोहर जोशींना घरी बसवायचे तर त्यांच्याविरूद्ध कोणाला तरी फूस देणे शिवसेनेला गरजेचे होऊन बसले होतेच. मनोहर जोशींना शिवसैनिकांचा जोरदार पाठिंबा तसा कमीच. त्यांची सगळी भीस्त ही राजकारणावर. त्यामुळे मनोहर जोशींना आपले स्थान टिकवण्यासाठी काहीतरी करणे भागच होते. शरद पवारांबरोबरच्या हार्दिक संवादामुळे त्यांना बंडाचा झेंडा फडकवण्यास बळ मिळाले ह्यात शंका नाही. अर्थात झेंडा फडकवण्याचे कौशल्य मात्र मनोहर जोशींचे स्वत:चे!
मनोहर जोशींच्या बंडाच्या झेंड्याचा ठाकरी स्टाईलने निषेध करण्याची कामगिरी शिवसैनिकांवर सोपवून उद्धव ठाकरे मोकळे झाले. आता पुढे काय, असा प्रश्न निश्र्चितपणे विचारला जाईल. पण ह्या प्रश्नाचे खरे उत्तर आहे, पुढे काही नाही किंवा खूप काही ! राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ह्यांच्यात समेट घडवून आणून दोन्ही सेना एक कराव्या असा पर्याय सुचवणा-यात मनोहर जोशीदेखील होते. पण ते जमणे शक्य नाही असे लक्षात येताच हा विषय बाजूला पडला. आता शिवसेना सोडण्याचा नवा विषय सुरू झाता असून उपनेत्यांसह अनेक शिवसैनिकांनी मनसेचा रस्ता धरला आहे. मनोहर जोशींना 'चले जाव' म्हणणा-यांना मनोहर जोशींच्या पंथातल्या शिवसैनिकांनीच परभारे उत्तर दिले आहे. अर्थात् हे उत्तर किती चपखल ठरते ते आता बघायचे. मनसे मोठी होणार का? की राष्ट्रवादीची ताकद वाढणार? सेना-भाजपा युतीची ताकद कितपत कमी होणार? का एखादी नवीच युती अस्तित्वात येणार? राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची ताकद खच्ची करण्याचा जणू पृथ्वीराज चव्हाणांनी विडाच उचलला आहे. त्यांनाही चपराक लगावणे ही राष्ट्रवादीची गरज! मुद्दा फक्त एवढाच आहेः हे सगळे जे घडणार आहे ते निवडणुकीपूर्वी की निवडणुकीनंतर?
रमेश झवर
भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता

No comments: