विधानसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा
व्हायला अवकाश असताना सूक्ष्म तपशीलावर आधारलेली प्रचार यंत्रणा सज्ज करण्याचे काम
भाजपाने चुपचाप सुरू केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्वतःचे बहुमत मिळवण्याचे
धोरणतंत्र भाजपने अवलंबले होते. शक्यतो युतीतल्या भागीदारांना न दुखवता लोकसभा
निवडणुकीत ते भाजपाने यशस्वी करून दाखवले होते. आगामी विधानसभा निवडणुकीतही हेच
तंत्र अवलंबण्याचा भाजपाचा निर्धार दिसतो. त्यांचा हा निर्धार शिवसेना नेत्यांना
खुपणारा आहे. त्यातूनच दोन्ही पक्षात जागावाटपाचा तंटा सुरू झाल्याची चिन्हे दिसत
आहेत. मुख्यमंत्री भाजपाचाच अशी भाषा भाजपा नेत्यांनी सुरू केली. समसमान जागा
मिळाल्या पाहिजेत, असेही ते सांगू लागले. गेल्या वेळी 117 जागांवर समाधान मानणा-या
भाजपाने महाराष्ट्र विधानसभेच्या वेळी 117
अधिक 60 जास्त जागा मागितल्या आहेत. दोन्ही पक्षातला जागांचा हा तंटा नाही. खरा तंटा
आहे तो मुख्यमंत्री पदासाठी आहे, असे म्हणणे सुसंगत ठरेल. नरेंद्र मोदी-अमित शहा
आणि फडणवीस-विनोद तावडे ह्या राज्य्च्या नेत्यांच्या बोलण्यात फरक असला तरी तो
जाणूनबुजून केलेला फरक आहे.
राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ह्यांच्या
आघाडीची स्थितीदेखील सेना-भाजपापेक्षा वेगळी नाही. त्यांची ही स्थिती आज निर्माण
झाली आहे असे नाही. आघाडी स्थापन झाल्यापासून ही स्थिती आहे. सत्तेच्या गुळाखेरीज
मुंगळे एकत्र येऊ शकत नाही हा काँग्रेसवाल्यांचा स्वभाव आहे. सत्ता मिळणार असेल तर
त्यांची युती-आघाडी झाली काय आणि न झाली काय! लोकसभा निवडणुकीत झालेल्या दणदणीत पराभवामुळे
काँग्रेस आणि काँग्रेस संस्कृतीत मुरलेल्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामळे कटकटीत
भर पडली आहे. पृथ्वीराज चव्हाणांवर ठपका फोडण्याचा खेळ खेळून झाल्यावर काँग्रेसमध्ये
राहण्याची पाळी नारायण राणेवर आली त्यामागे पक्षातली साठमारी हेच कारण आहे.
साठमारीचा हा खेळ खेळणारे नारायण राणे हे काही पहिलेच नाही. ह्यापूर्वी विलासराव
देशमुख, सुशीलकुमार शिंदे, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, शरद पवार ह्या
सगळ्यांनी हा खेळ केला होता. वेळप्रसंग पाहून त्यांनी योग्य वेळी माघारही घेतली.
कारण 'बंडोबांना थंडोबा' करण्याच्या बाबतीत
दिल्लीतल्या काँग्रेस श्रेष्ठींची म्हणून स्वतःची अशी 'मोडस ऑपरेंडी'देखील ठरलेली आहे. त्यानुसार
बंडातच्या शिडातील हवा काढून घेण्यात आतापर्यंत काँग्रेसला यश मिळत गेले. देशात
प्रभावी पक्ष म्हणून उभे करण्याची ताकद नेतृत्वाकडे नसतानाही नारायण राणेंचे बंड
मोडले गेले ह्याचे कारण नारायण राणे स्वतःची फारशी ताकद नाही हे ओळखून आहेत!
हाच प्रकार सेना-भाजपा युतीतही आहे. युती टिकली, पण एकमेकांवर कुरघोडी
करण्याचा प्रकारही सुरू राहिले. फरक इतकाच की ह्या वेळी मात्र कुरघोडी करण्याच्या
राजकारणात भाजपाचे पारडे जड आहे. भाजपाला येताजाता चिमटा काढण्याचा उद्योग शिवसेना
नेते करत होते. परंतु आता दिवस बदलले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्वतःचे
पूर्ण बहुमत मिळताच शिवसेना नेत्यांना 'जागा' दाखवण्याचे सत्र भाजपा नेत्याने सुरू केले आहे.
केंद्रात मंत्रीपद देण्याच्या प्रश्नावरून भाजपाची मिजासखोरी प्रथम दिसून आली. विशेष
म्हणजे गुरगुरणा-या शिवसेनेच्या वाघाला आळोखेपिळोखे देण्यापलीकडे काही करता आले
नाही. शपधविधीलाच हजर राहिले नाही तर अशी काही कृती करून दाखवण्याचा उद्धव ठाकरे ह्यांनी
विचार केला. पण प्रत्यक्षात नरेंद्र मोदींच्या करिष्म्याकडे पाहून मुकाट्याने दिलेले
खाते स्वीकारण्याचा निर्णय उद्धवजींनी रातोरात घेतला.
भाजपाला 'कमळाबाई' म्हणून हिणवण्याची
हिंमत बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेत होती. ती उद्धवजींकडे नाही. दिल्लीला जाऊन
सरकार स्थापनेच्या सोहळ्याची सर्व औपचारिकता त्यांनी यथास्थित पार पाडली. बाळासाहेब
शेवटपर्यंत दिल्लीला गेले नाहीत. दिल्लीत गेले असते तर निव्वळ उपचार म्हणून का
होईना वाजपेयी-आडवाणींची भेट घेण्याची पाळी बाळासाहेबांवर आली असती. 'मला भेटायचे असेल तर तुम्ही मुंबईला या', असेच बाळासाहेबांना
सुचवायचे होते. म्हणूनच त्यांनी आपल्या वागण्याचा खाक्या बदलला नाही. कोण कोणाला
भेटायला गेला ह्यावरूनच दिल्लीत नेत्यांचा वकूब ठरतो, पक्षाची 'गरज' किती आणि कशी हे
ठरते! बाळासाहेब हे
ओळखून असल्यामुळेच गरजू असा शिक्का बाळासाहेब ठाकरे ह्यांनी स्वतःवर कधी मारून घेतला
नाही.
शिवसेनेचे विद्याधर गोखले, मोहन रावले, नारायण आठवले, सावे इत्यादि 5
खासदार लोकसभेत जेव्हा पहिल्यांदा निवडून आले तेव्हा राजकीय पक्ष म्हणून यापुढची
वाटचाल कशी करावी हा शिवसेनेसमोर प्रश्न होता. अर्थात भावी वाटचालीबद्दल बाळासाहेबांच्या
मनात संभ्रम कधीच नव्हता, परंतु वास्तवाचे भान त्यांनी सुटू दिले नाही. 'काँग्रेस पक्ष हा
नाही म्हटले तरी मोठा पक्ष आहे, असे सूचक उद्गार त्यांनी काढले होते. वेळ पडली तर
काँग्रेसबरोबर युती, मैत्री आघाडी करण्याचे
बाळासाहेबांच्या मनात असावे. पुढे त्यांना तशी गरज भासली नाही हा भाग
निराळा. परंतु त्यांच्या डोळ्यांपुढे तामिऴनाडूच्या जुळ्या द्रमुकच्या
काँग्रेसबरोबरच्या वर्तणुकीचा आदर्श असावा. म्हणूनच निवडणुकीच्या निकालानंतर लगेच
ओबेरायमध्ये काही निवडक पत्रकारांशी गप्पा मारताना शरद पवारांच्या स्टाईलनुसार 'वेगळा विचार' मांडला. कुठेही
शब्दात न सापडता!
युतीत भाजपाने 60 जास्त जागांची मागणी केली तर राष्ट्रवादी-काँग्रेस
आघाडीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्वबळावर सर्वच्या सर्व 288 जागा लढवण्याचा
वल्गना केल्या आहेत. श्रेष्ठींनी त्यांचे शेपूट पिरगाळेपर्यंत दोघांच्या वल्गना सुरूच
राहतील हे उघड आहे. स्वबळावर बहुमत मिळवून दाखवण्याची आशाआकांक्षा चुकीची आहे असे नाही.
परंतु त्यासाठी निरलसपणे जिद्दीने प्रचार करण्याची आणि वातावरण पालटवण्याची धमक
लागते. मोदींनी हायटेक प्रचार करून लोकसभा निवडुकीत काँग्रेसला झटका दिला तसा झटका
देण्याची ताकद दोन्ही काँग्रेसच्या किती नेत्यात आहे? मुलामुलींना तिकीट
दिले की राज्यातल्या सगळ्या नेत्यांच्या डरकाळ्या थांबतात असा आजवरचा अनुभव आहे.
ह्यावेळीदेखील तेच होणार. पण अशा 'एक एक जागा करत' बहुमताचे तळे भरत नसते.
तूर्तास महाराष्ट्र शासनाच्या जाहिराती प्रसारमाध्यामातून सुरू करण्यात
आल्या आहेत. त्यामुळे आघाडीचे काम लोकांच्या नजरेत भरेल असे आघाडीला वाटते. लोकसभा
निवडणुकीच्या वेळी सोनियाजींची आणि राहूल गांधींचीदेखील अशीच अपेक्षा होती. परंतु
त्यांचा प्रयत्न केविलवाणा ठरला. ह्याउलट काँग्रेस कारभाराची प्रतिमा मलीन करण्यात
नरेंद्र मोदींना मात्र भरघोस यश मिळाले! आताही राज्याच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या
कारभाराचे चित्र खराब करण्यात भाजपाला यश
मिळण्याचा पुरेपूर संभव आहे. पैसा, केंद्रातली सत्ता, सामाजिक माध्यमांचा वापर
ह्या सगळ्याचा वापर युतीला अनुकूल आहे. शिवसेनेने समाजातल्या खालच्या स्तर ढवळून
काढावा तर मुळातच काँग्रेसविरोधक असलेल्या मध्यमवर्गाला अनुकूल करण्याचा भाजपाने
जोरदार प्रयत्न करावा असे काही जुळून आले तरच युतीला राज्यात भवितव्य राहील. दोन्ही
आघाड्यात अंतर्गत संकट समान आहे. एकत्रित निवडणुका तर लढवायच्या परंतु
एकमेकांपासून सतत सावधगिरी बाळगायची! शिवसेना--भाजपा
युतीत मनमुटाव कायम तर मनोमीलनाचा अभाव हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा स्थायीभाव कायम!
रमेश झवर
भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता
No comments:
Post a Comment