Thursday, March 5, 2015

‘आप’ ला स्वाईन फ्लू!

जिथे सत्ता तिथे स्वार्थ आणि हेवेदावे हा राजकारणाचा स्थायीभाव! दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळताच आम आदमी पार्टीचे सरकार स्थापन झाले. सरकार स्थापन होऊन  महिना उलटण्याच्या आत आपला हेव्यादाव्याच्या स्वाईन फ्लूने घेरले आहे. हा स्वाईन फ्लू अद्याप आप मंत्रिमंडळापर्यंत पोहोचला नाही हे नशिब. पण हा स्वाईन फ्लू रोखण्यासाठी अरविंद केजरीवालांनी कितीही उपाययोजना केली तरी तो दीर्घ काळ रोखला जाण्याची चिन्हे दिसत नाही. तूर्तास प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव ह्या दोघांची राजकीय समितीवरून हकालपट्टी करणारा ठराव संमत करण्यात आला. त्याचबरोबर केजरीवालनी देऊ केलेला निमंत्रकपदाचा राजिनामादेखील राष्ट्रीय कार्यकारिणीने फेटाळला. विशेष म्हणजे ह्या दोन्ही बैठकांना केजरीवाल हजर नव्हते.
यादव आणि भूषण ह्या दोघांची राजकीय समितीतून हकालपट्टी करण्यात आली असली तरी आम आदमीला मिळालेल्या देणग्या आणि विधानसभा निवडणुकीत एका उमेदवाराकडून करण्यात आलेला दारूचा मुक्त वापर ह्या दोन्ही आरोपांची चौकशी करण्याची मागणी मात्र केजरीवालांनी मान्य केली. ह्या दोन्ही मागण्यांसाठी प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव ह्यांनी जोर लावला होता. परंतु साधनशुचितेबद्दल दोघांना वाटणा-य़ा प्रेमाचे खरे कारण वेगळेच असावे. दिल्ली सरकार आणि पार्टी ह्या दोन्हीपैकी एकही पद त्यांच्या वाट्याला आले नाही ही वस्तुस्थिती पुरशी बोलकी आहे. मुख्यमंत्रीपद आणि पार्टीचे निमंत्रकपद ही दोन्ही उच्च पदे केजरीवालांनी बळकावलेली आहेत. ह्या दोन्ही पदांपैकी एखादे पद तरी आपल्याला मिळावे असे यादव आणि भूषण ह्यांना वाटले असेल तर ते चुकीचे ठरत नाही. भ्रष्टाचाराविरूद्धची लढाई हे जोपर्यंत आंदोलन होते तोपर्यंत सगळ्यांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवणे ठीक होते. परंतु आता सत्ता प्राप्त होताच एके काळी अण्णांभोवती गोळा झालेल्या ह्या मंडळीचे पितळ उघडे पडले आहे. तिकीट वाटपापर्यंत त्यांनी कसाबसा संयम टिकवून धरला होता. तो संयम आता संपला आहे. आम आदमी सत्तेवर येताच महिन्याच्या आत आरोपप्रत्यारोपाच्या खेळास जी ही सुरूवात झाली ती उगाच नाही. मुखी सामान्य माणसाचे नाम आणि खिशात नोटांची पुडकी हा खेळ भारतातल्याच बहुतेक पक्षात गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असलेला खेळ आम आदमी पार्टीतही सुरू झाला असेल का? हा खेळ काँग्रेसमध्ये तर सत्तेवर आल्यापासूनच सुरू होतो. भाजपाही ह्या आघाडीवर काँग्रेसपेक्षा कमी नाही. ज्या ज्या राज्यात भाजपाला सत्ता मिळाली तिथे तिथे काँग्रेसबरोबर स्वतःच्या पक्षातल्या मोह-यांनाही गारद करण्याचा पराक्रम भाजपा नेत्यांना करावा लागला आहे. अडवाणी, सुषमा स्वराज, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा इत्यादी अनेक नेत्यांचे वर्चस्व संघाच्या मदतीने नरेंद्र मोदी आणि राजनाथ ह्यांनी पद्धतशीररीत्या संपुष्टात आणून स्वतःचा मार्ग प्रशस्त केल्याचे ताजे उदाहरण लोकांच्या डोळ्यांपुढे आहेच.
आम आदमी पार्टीचा जन्म अलीकडचा असला तरी मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे आम आदमी पार्टीचे आणि पार्टीतल्या नवनेत्यांचे पाय पाळण्यात दिसले. फंड गोळा करण्याचा आरोप काय किंवा निवडणूक जिंकण्यासाठी दारूचा वापर काय हे दोन्ही आरोप केजरीवालांना चांगलेच भोवणारे आहेत. दिल्लीत झालेल्या आपच्या दोन्ही बैठकांना ते हजर नव्हते. केजरीवालांच्या गैरहजेरीने त्यांची हुषारी दिसून आली. बैठकीस हजार न राहताही यादव आणि भूषण ह्या दोघा शत्रूंवर त्यांनी मात केली. आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आपणच हे केजरीवालांनी अगदी सहज सिद्ध करून दाखवले. आम आदमी पार्टी स्थापन झाल्यापासून त्यांच्या नेतृत्वाविरूद्ध घोंघावलेले हे पहिलेवहिले वादळ त्यांनी यशस्वीरीत्या हाताळले ह्यात शंका नाही. त्यांनी दाखवलेली ही राजकीय हुषारी पहिलीच आहे हे खरे. परंतु आम आदमी पार्टीलादेखील अन्य पक्षांप्राणे राजकीय हेव्यादाव्याची लागण झाली हे सत्य मात्र लपून राहिलेले नाही. ह्या हेव्यादाव्यापायी आपच्या सत्तेला गंडान्तराचा धोका उत्पन्न व्हायला वेळ लागणार नाही हे केजरीवाल ओळखून आहेत. रक्तशर्करेचा त्रास सुरू झाल्यामुळे बंगळूर येथील जिंदल निसर्गोपचार केंद्रात केजरीवालना दाखल होणे भागच होते ही मात्र वस्तुस्थिती आहे. तरीही जिंदलची तारीख त्यांना मागेपुढे करता आली असती. स्वतःचे आजारपण राजकारणासाठी कसे उपयोगी पडले त्याचे उदाहरण खरे! कुठली हालचाल केव्हा आणि कशी करावी ह्याचे ज्ञान म्हणजेच राजकारण.
हकालपट्टीच्या ठरावानंतर यादव आणि भूषण ह्या दोघांची निवेदनेही राजकीय वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहेत. आम आदमी पार्टीत राहूनच केजरीवाल ह्यांच्या तानाशाहीला विरोध करण्याचा मनोदय प्रशांत भूषण ह्यांनी जाहीर केला. त्यांचे हे वक्तव्य फेसव्हॅल्यूवर घेण्याचे कारण नाही. दिल्लीच्या राजकारणात जे करायचे ते बोलायचे नसते. जे बोलायचे ते करायचे नसते! राजकारणाचा हा खाक्या आता सर्वांना चांगलाच माहीत आहे. भ्रष्टाचाराच्या विरूद्ध अण्णां हजारेंच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेले सर्व विचारवंत सध्या आम आदमी पार्टीत गोळा झाले आहेत. आम आदमी पार्टी स्थापन करून थेट राजकारणात उतरण्यास अण्णांनी विरोध केल्यामुळे ही बुद्धिवंत मंडळी तशी निराधार झालेली होतीच. अरविंद केजरीवालांनी अण्णांविना आम आदमी पार्टी स्थापन करून अनेकांना आधारकार्ड मिळवून दिला. परंतु ध्यानीमनी नसताना आरोपप्रत्यारोपांच्या स्वाईन फ्लूने आप पार्टीला घेरले. सुदैवाने सरकारला स्वाईन फ्लूच्या जंतूंचा उपसर्ग अद्याप झालेला नाही. स्वस्त वीज, फुकट पाणी ह्या घोषणांची औषधे केजरीवालांनी आधीच प्रीस्क्राईब केल्यामुळे संभाव्य धोका टळला आहे. शिवाय सरकारचा प्रामाणिकपणाचा मुखवटा अजून तरी कायम राहिला आहे. ताजेतवाने होऊन बंगळूरहून परतल्यावर जनतादरबारही केजरीवाल चालणारच!

रमेश झवर  
                                                                                                     

भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता

www.rameshzawar.com

No comments: