देशभरातील 21 कोटी दलितांची एकजूट घडवून आणण्याचे आणि त्या एकजुटीच्या बळावर देशाच्या मुख्य जीवनप्रवाहात बरोबरीच्या नात्याने सहभागी होण्याचे ध्येय दलित नेत्यांनी कधीच बाजूला सारले आहे. स्वतःची तुंबडी भरण्याचा धंदा मात्र दलित नेत्यांनी सोडून दिलेला नाही! मुंबईतील बुध्दभूषण प्रेस ज्या इमारतीत आहे ती गेल्या काही वर्षांपासून मोडकळीला आली आहे. आंबेडकर भवनाची ही इमारत ज्या त-हेने पाडण्यात आली आणि त्यावरून सुरू झालेली कोर्टबाजी पाहता दलित नेतृत्वाची कीव करावीशी वाटते. हरघडी बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष आणि अक्कलशून्य राजकारण ह्याखेरीज दलित नेत्यांकडे कुठलेच भांडवल नाही हे चित्र बदलले नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर काही काळ त्यांच्या नावाचे दलित नेत्यांनी भांडवल केले असेल तर ते क्षम्य ठरते. सुरूवातीच्या काळात दलित समाजात अस्मितेची भावना निर्माण करण्यासाठी कदाचित ती त्यांची गरजही असेल. दलितांची एकगठ्ठा मते कांग्रेसच्या झोळीत टाकून काँग्रेसबरोबर सौदेबाजीचे राजकारण करण्याखेरीज दलित नेत्यांनी काय केले असा प्रश्न विचारणा-याला, तो दलित असला तरी त्याला दलित नेता क्षणभरही उभा करणार नाही. आता बाबासाहेबांच्या सव्वाशेव्या स्मृतिवर्षातही त्यांच्या नावाचा जयघोष करत दलित नेत्यांचा तोच धंदा चालू आहे जो ते पूर्वापार करत आले आहेत! सध्या काँग्रेसला कष्टदशा आली आहे. त्यामुळे दलित नेत्यांच्या धोरणात काय फरक झाला असेल तर तो एवढाच की दलितांची मते काँग्रेसऐवजी भाजपा अथवा शिवसेनेच्या झोळीत टाकून मंत्रीपदे मिळवणे!
उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि तामिळानाडू ह्या चार राज्यात दलितांची संख्या अधिक आहे. एक पंजाब सोडल्यास दलित उद्योजक एकाही राज्यात सापडणार नाही. उत्तरप्रदेश सोडल्यास एकाही राज्यात दलितांना सत्ता मिळालेली नाही. देशभरात असंख्य दलितांना कसायला स्वतःची अशी जमीन नाही. दलितांवर अत्याचार झाला नाही असे एकही गाव दाखवता येणार नाही. दलित मुलींवर अत्याचाराचे तर शेकडो प्रकरणे रोज कुठे ना कुठे तरी घडत असतातच! अशा घटनांच्या बातम्या वर्तमानपत्रात झळकतात तेव्हा झाडून सर्व दलित नेते घटनेचा जळजळीत निषेध करणारी स्वतःची पत्रके प्रसृत करतात. त्यांच्या वक्तव्यांना पूर येतो. इतर पुरोगामी पक्षांची मंडळी त्यांच्या वतीने संसदेत अथवा राज्यांच्या विधानमंडळात आवाज उठवतात! दलितांसाठी कायदे वाकवण्यात आणि नोकरीत आरक्षण ठेवायला भाग पाडण्यात जरी दलित नेत्यांनी यश मिळवले असले तरी त्यांनी मिळवलेल्या फायद्यांपासून बहुसंख्य दलित जनता वंचित आहे.
बुध्दभूषण प्रेस आंबेडकरांच्या ज्या वास्तूत आहे त्या वास्तूसाठी दलितांकडून बाबासाहेबांनी एक एक रुपया वर्गणी गोळा करून भूखंड खरेदी केला होता. तेथे बांधण्यात आलेल्या इमारतीची देखभाल करण्यासाठी बाँबे शेड्युल्ड क्लास इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचीही स्थापना करण्यात आली. कालान्तराने त्या ट्रस्टचे नाव पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट असे बदलण्यात आले. खुद्द बाबासाहेबांच्या चिरंजीवांनीच ह्या वास्तूवर हक्क सांगण्याचा दावा केला आणि हे प्रकरण कोर्टात गेले. तेव्हा बाबासाहेबांनी चिरंजीवांना मुळीच दाद दिली नाही हा ह्या वास्तूचा इतिहास आहे. बाबासाहेबांच्या पश्च्यात् मात्र ट्रस्टी मंडळीत आपापसात भांडणे सुरू झाली. ती भांडणे नव्या नव्या स्वरुपात सुरूच राहिली. अजूनही ती मिटलेली नाहीत. दलित चळवळीचे संघटन करण्याचे, ह्या चळवळीला दिशा दाखवण्याचा मूळ उद्देश कधीच शिथील पडला. विशेष म्हणजे वास्तूची साधी देखभाल करण्याचेही काम ह्या मंडळींना करता आले नाही! ही इमारत का पाडण्यात येऊ नये अशी नोटिस महापालिकेने बजावली तेव्हा ट्रस्टी मंडळींची झोपमोड बिल्कूल झाली नाही. कारण, ती मंडऴी झोपलेलीच नव्हती, ती सतत भांडत होती!
बुध्दभूषण प्रेसची इमारत महापालिकेने पाडली की ट्रस्टवरील एका गटाच्या विरुध्द असलेल्या दुस-या गटाने रात्रीचा फायदा घेऊन पाडली असा क्रिमिनल मुद्दा आता उपस्थित झाला आहे. इमारत पाडण्याच्या बाबतीत पुढाकार घेणा-यात ज्यांचा समावेश आहे त्यात माजी मुख्यसचिव रत्नाकर गायकवाड ह्यांचेही नाव असल्याचा आरोप करण्यात आल्यामुळे ह्या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. पीपल्स ट्रस्टशी आपला संबंध फक्त सल्ला देण्यापुरताच असल्याचा खुलासा गायकवाडांनी केला आहे. ह्यासंबंधीची नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे आता न्यायालयातच स्पष्ट होईल. परंतु ह्या जागेवर सतरा मजली टॉवर उभारण्याचा प्रस्ताव होता आणि ट्रस्ट्रमधील काही मंडळींचा प्रस्तावाला विरोध होता ही पार्श्वभूमी लक्षात घेता हे प्रकरण वाटते तितके साधे नाही. वास्तविक रत्नाकर गायकवाड हे बाबासाहेबांनी ज्या अकरा दलित तरुणांना शिक्षणासाठी परदेशात पाठवले त्यापैकी यशवंत गायकवाड ह्यांचे चिरंजीव. परदेशातून शिकून आलेल्या तरूणांनी दलितोध्दाराचे कार्य करावे असा उदात्त हेतू बाबासाहेबांचा होता. त्यावेळचे ते तरूण आज कोठे आहेत? त्या तरूणांनी दलितांसाठी काय काम केले?
रत्नाकर गायकवाड हे वडिलांच्या पाठिंब्यावर आय. ए. एस झाले. त्यांची योग्यता वादातीत आहे. त्यशिवाय ते मुख्य सचिवाच्या पदापर्यंत पोहचूच शकले नसते. मात्र, दलित बांधवांसाठी त्यांनी स्वत:ला का झोकून दिले नाही हा प्रश्न शिल्लक उरतोच. दलितांचे पुढारी म्हणून घेणारे नेते जे करत आहेत तेच त्यांनीही केले. स्वतःच्या खुर्चीपलीकडे त्यांनी कशातही लक्ष घातले नाही. मुख्य सचिवासारख्या महत्पदावरून निवृत्त झाल्यावर ते माहिती अयुक्त झाले. नामान्तर चळवळीनंतर रामदास आठवले ह्यांची आजपर्यंतची वाटचाल सत्ताधा-यांबरोबर सुरू आहे. काँग्रेस जाऊन भाजपाचे सरकार आले तरी त्यांच्या वाटचालीत खंड पडलेला नाही. प्रकाश आंबेडकर ह्यांना सत्तेची फळे चाखायाला मिळाली नाही हे खरे; पण बाबासाहेबांचे नातू म्हणून त्यांना मिळत असलेल्या मानपानाच्या मोहातून ते कधीच बाहेर पडलेले नाहीत. केवळ बाबासाहेबांच्या आदराखातर दलित जनता त्यांना भरभरून प्रेम देत आली आहे. त्यांनी दलित जनतेला काय दिले? त्यांनी बुध्दभूषण प्रेसची वास्तू जतन करण्याचे आणि बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून दलित जनतेला प्रबुध्द करण्यासाठी आयुष्य वेचले असते तर त्यांच्या हातून मोठे कार्य झाले असते.
रिपब्लिक पक्षांतील गटबाजी आणि उथळ नेतृत्व ह्यामुळे आज प्रामाणिक दलित जनता मात्र हतबुध्द झाली आहे. सामाजिक, राजकीय आणि आर्थिक भवितव्यासाठी त्यांना अजूनही चाचपडतच वाटचाल करावी लागते असेच एकूण वातावरण आहे. बुध्दभूषण प्रेसच्या वास्तु प्रकरणाने ते वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
रमेश झवर
No comments:
Post a Comment