Friday, September 22, 2017

हा खेळ सावल्यांचा!

एकदाची का मुख्यमंत्रीपदाची लागलेली चटक लागली की ती सहसा सुटत नाही. अशी चटक लागलेला नेता राजकारणाच्या कड्यावरून घरंगळत जाऊन केव्हा खाली पडेल ह्याचे भान त्याला  नसते. गुजरातमध्ये शंकरसिंग वाघेला ह्यांची जशी गत झाली तशीच गत स्वयंघोषित नेते नारायण राणे ह्यांची झाली आहे. काँग्रेसमध्ये आपले मुख्यमंत्रीपद चार वेळा हुकले असे सांगत राणे ह्यांनी काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजिनामा दिला. कोठे जायचे, कसे जायचे हे त्यांनी जाहीर केले नाही. भाजपात प्रवेश करण्यासाठी गेले चारपाच महिने नारायण राणे दिल्लीला खेटे घालत होते. भाजपाच्या अमित शहांनी त्यांना भाजपाचे दरवाजे किलकिले केले तरी ते सताड उघडले नाहीच. शिवसेनेत प्रवेश करा असा उध्दव ठाकरे ह्यांचे स्वीय सहाय्य्क मिलिंद नार्वेकर ह्यांचा फोन आल्याची 'पुडी'ही नारायण राणे ह्यांच्या गोटातून सोडण्यात आली. त्यानंतर आमदारकीचा राजिनामा ही शेवटची कुदळ त्यांनी मारली हे. त्यांनी मारलेली कुदळ ही त्यांच्याच पायावर बसून त्यांना दुखापत होते की जमिनीवर लागून थोडीफार माती उकरली जाणार हे लौकरच स्पष्ट होईल.
नारायण राणे ह्यांच्या राजकारणाचा प्रवास हा निव्वळ सावल्यांचा खेळ आहे! वेळोवेळी आत्मपरीक्षण करण्याऐवजी आपल्या स्वतःच्याच मोठमोठाल्या सावल्यांकडेकडे बघत राहून राजकारण करण्याची सवय त्यांनी स्वतःला लावून घेतली आहे. विधानसभेत प्रवेश केल्यानंतर अगदी सुरूवातीला प्रश्नोत्तराचा तास असो वा अन्य विषयावरील चर्चा असो, विरोधी बाकांवरील सभासदांना चोख उत्तर देणे हा एकच गुण त्यांच्याकडे होता. त्या गुणाबद्दल नारायण राणेंचे कौतुक होत असे. परंतु मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्यामुळे ते समाधानी नव्हते. दुग्धाविकास आणि पशुपालन खात्यातून त्यांनी महसूल खात्यात मजल मारल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्याकडे रोज सायंकाळी त्यांच्या फे-या वाढत चालल्या.
येणकेण प्रकारेण बाळासाहेबांची मर्जी संपादन करण्याचा जोरदार धंदा त्यांनी सुरू केला. किंबहुना बाळासाहेबांची मर्जी राखली की मुख्यमंत्रीपदाची माळ आपल्याच गळ्यात पडणार अशी त्यंची अटकळ होती. कदाचित् ही अटकळ बेस्टचे चेअरमनपद प्राप्त करू घेताना त्यांना आलेल्या अनुभवावर आधारलेली असावी. मुख्यमंत्री मनोबर जोशी ह्यांच्या कारभारासंबंधांतली 'बित्तमबातमी' रोज पुरवण्याचा धंदा नारायण राणेंनी पत्करला होता. एक ना एक दिवस मनोहर जोशी ह्यांना पायउतार व्हावेच लागेल ही त्यांची अटकळ खरीही ठरली. त्यांच्या सुदैवाने त्यांना मुख्यमत्रीपद मिळालेही! 'मराठा कार्ड' वापरल्यास आगामी निवडणुकीत राज्याची संपूर्ण सत्ता शिवसेनेलाचा मिळेल हे बाळासाहेबांच्या मनावर सतत बिंबवत राहणा-या नारायण राण्यांना बाळासाहेबांनी त्यांना मुख्यमंत्रीपद दिलेदेखील. परंतु त्यांच्या दुर्दैवाने ते अल्पकालच टिकले.
शिवसेनेने राजकारणात पदार्पण केले तेव्हापासूनच क्षुद्र जातीयवादी राजकारणाला आणि सर्वत्र बोकाळलेल्या भाईभतिजावादाल तिलांजली दिली होती! जातीयवाद तर बाळासाहेबांच्या मनाला स्पर्शसुध्दा करू शकला नाही. काही का असेना, सत्ताप्राप्तीनंतर मनोहर जोशी बाळासाहेबांच्या मनातून उतरले हे मात्र खरे आहे. मनोहर जोशींना दिल्लीच्या राजकारणात सभापतीपद मिळाले तरी बाळासाहेबांच्या मनातले गमावलेले स्थान त्यांना पुन्हा कधीच मिळाले नाही. 2004 नंतर देशभरातल्या राजकारणाच्या वा-याची दिशाच बदलली. निवडणकीच्या 'विपरीत' निकालामुळे सेना-भाजपाला देशातली आणि राज्यातली सत्ता गमावावी लागली. तरीही बाळासाहेबांनी नारायण राणे ह्यांना विरोधी नेतेपद--जे शॅडो कॅबिनेटचे मुख्यमंत्रीपद-- म्हणून ओळखले जाते ते दिलेच. परंतु बाळासाहेबांची मर्जी संपादन करण्यात ते जसे यशस्वी झाले तसे उध्दव ठाकरे ह्यांची मर्जी संपादन करण्याच्या बाबतीत मात्र अयशस्वी झाले.  
शिवसेनेतल्या त्यांच्या राजकारणात फारसे स्थान न राहिल्याने छगन भुजळांप्रमाणे त्यांनाही  काँग्रेस प्रवेश कारवा लागला. छगन भुजबळांनी निदान शरद पवारांबरोबर राहून उपमुख्यमंत्रीपद तरी मिळवले. ह्याउलट, काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून आपले जंगी स्वागत होईल असा चिव्वट आशावाद बाळगणा-या नारायण राण्यांचे नव्याचे नऊ दिवस म्हणून सुरू असलेले कौतुक संपले. दरम्यानच्या काळात देशात राजकारणाचे वारे पुन्हा पालटले आणि सेनाभाजपा सत्तेवर आली. ह्याच बदलत्या वा-यामुळे नारायण राणे ह्यांना त्यांच्याच मूळ मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. त्यानंतर बांद्र्यातही पोटनिवडणुकीत पराभव पत्करावा लागला. थेट निवडणुकीत निभाव लागणार नाही हे लक्षात आल्यावर स्वतःला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार समजणा-या नारायण राणे ह्यांना विधानपरिषदेत निवडून यावे लागले. तरीही त्यांचा भ्रमनिरास व्हायला जर जास्तच वेळ लागला.
काँग्रेस पक्षात मुख्यमंत्रीपदाच्या रांगेत अनेक जण उभे असून मुख्यमंत्रीपदासाठी आपला नंबर लागणे कठीण राहील हे काही त्यांना शेवटपर्यंत उमगले नाही. राष्ट्रीय पक्षात वरवर कितीही गोंधळ दिसत असला तरी नेते निवडीची एक प्रक्रिया ठरलेली असते. त्यात सहजासहजी बदल करता येत नाही. भाजपाही त्याल अपवाद नाही. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद नाही म्हणजे नाही अशी कठोर भूमिका घेणारा भाजपा नारायण राणे ह्यांना पक्षप्रवेश देण्याचा विचारही तयार करायला तयार झाला नाही हे सत्यच नारायण राणेंच्या राजिनाम्याने स्पष्ट झाले. जे नारायण राणे स्वतःच्या मतदारसंघातूनही विजयी होऊ शकत नाहीत त्यांना भाजपात प्रवेश देऊन डोक्दुखी कशाला घ्या, असाही विचार भाजपाने केला असेल. किंवा तुम्ही आधी काँग्रेसचा आणि आमदारकीचा राजिनामा तर द्या; मग बघू, असेही भाजपा नेतृत्वाकडून नारायण राणेंना सांगण्यात आले असावे. ते काहीही असो, ह्या प्रकरणी खुल्लमखुल्ला कोणीही काही बोलणार नाही. ज्याप्रमाणे काँग्रेसमध्ये नारायण राणे ह्यांना भवितव्य नव्हते त्याप्रमाणे भाजपातही त्यांना फारसे भवितव्य नसण्याची दाट शक्यता आहेच. ह्या नव्या परिस्थितीत शंकरभाई वाघेलांप्रमाणे नारायण राणे हे स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन करण्याचीही शक्यता आहे. आपल्याच लांब लांब सावल्यांकडे पाहात राहून राजकारण करण्याची एकदा का सवय झाल्यावर तोच सावल्यांचा खेळ खेळत बसण्याखेरीज पर्याय नसतो. नारायण राणेंसमोर तरी वेगळा पर्याय कुठे आहे?

रमेश झवर  
www.rameshzawar.com

No comments: