Thursday, November 16, 2017

इंदिरा गांधींबरोबर दोन वेळा झालेली भेट!

जळगाव येथील नूतन मराठा विद्यालयाच्या पटांगणावरील शामियाना. जातीय दंगलीनं जळगाव जळत होतं. इंदिरा गांधी आल्या होत्या.पत्रकारांच्या तुकडीतून जाण्याचा आणि तोही पंतप्रधानाचा दौरा ' कव्हर' करण्याचा माझा आयुष्यातला पहिलाच प्रसंग. तो पहिला प्रसंग 'पहिला' होता म्हणून स्मरणात राहिला ह्यात काही आश्चर्य नाही. परंतु अत्यंत घाईगर्दीच्या दौ-यात श्रीमती इंदिरा गांधी यांच्याशी बातचीत करण्याची संधी मिळण्यासाठी मी केलेला प्रयत्न यशस्वी ठरला. त्यामुळे त्या प्रसंगाचे महत्त्व माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आणखी वाढले.
सकाळी जळगावमध्ये दाखल झाल्यानंतर मोटारींचा ताफ्यात पत्रकारांची गाडी सामील झाली होती. दंगलग्रस्त भागात इंदिरा गांधींच्या मोडारीमागोमाग अधिकारी, पोलिस नि पत्रकारांच्या गाड्या निघाल्या होत्या. शनि पेठेच्या नाक्यावर पंतप्रधानांच्या सुरक्षा रक्षकांनी सर्वच मोटारींना रोखले. मुंबईहून गेलेली पत्रकार मंडळी त्यामुळे अस्वस्थ झाली. काही व्हॅन्सच्या चालकांनी हुज्जत न घालता मोटारी मागे फिरवल्या. माझ्या व्हॅनमध्ये नाना मोने व जळगावचे शंभू फडणीस. नाना मोने यांनी पोलिसांचा रट्टा खाऊ पण मागे फिरणार नाही अशी भूमिका घेतली. काही वेळ आम्ही हतबुध्द होऊन जीपमध्ये बसून राहिलो अचानक नानांना कल्पना सुचली. त्यांनी यशवंतराव चव्हाणांना चिठ्ठी खरडली, ' इंदिराजींचा दौरा 'कव्हर' करण्यासाठी आम्ही मुंबईहून आलो आहोत. अधिकारी आम्हाला अडवत आहेत. तुम्ही काही तरी करा!'
ती चिठ्ठी हवालदाराच्या हातात देऊन त्याला श्री. चव्हाणसाहेबांना देण्याची मी विनंती केली. आणि काय आश्र्चर्य! पाच मिनीटांनी इंदिराजींच्या सुरक्षा अधिका-यांनी आमच्या गाडीला मज्जाव न करण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या. यशवंतराव चव्हाणांनी आमच्या चिठ्ठीतला मजकूर बाईंच्या कानावर घातला असावा. कारण पंतप्रधानांच्या सुरक्षा पथकावर खुद्द पंतप्रधानांखेरीज कोणाची हुकमत चालली असेल असे वाटत नाही.
शनि पेठेच्या नाक्यावरून गाड्या पुढे सरकल्या नि मशिदीजवळ पुन्हा थबकल्या. 'आता काय झालं' अशा त्रासिक मुद्रेने नाना मोने माझ्याकडे पाहू लागले! काही झालेलं नव्हतं. मोटारीतून पाउतार होण्याची ही जागा आहे हे मी जळगावकर असल्यामुळे मात्र जाणवलं नि मी मोटारीतून उतरलो.
इंदिराजी, बाबू जगजीवनराम. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब चौधरी, भय्यासाहेब देवकीनंदन नारायण आणि आणि चारपाच मुस्लिम पुढारी गाडीतून उतरून एका बोळात शिरले. मला तो बोळ परिचित असल्यामुळे मी नानांची साथ केव्हा सोडली हे माझं मलाच कळलं नाही.
मशिदीमागील त्या बोळात इंदिराजी गेल्या तेव्हा एवढ्या घोळक्यास तिथवर पोहोचणं मुष्किल झालं. सर्वच जण तिथं थांबले. कोणालाही धक्का न मारता देता पुढे कसे सरकावे ह्या विवंचनेत मी होतो. बहुधा मशिदीतल्या अल्लामियानं माझी हाक ऐकली असावी. ( ह्या मशिदीत वास्तव्य करणा-या पिराकडून पानसुपारी स्वीकारण्यासाठी अप्पामाहाराजांचा रथ तिथे थोडा वेळ थांबतो नि मग पुढे प्रस्थान ठेवतो. ) ' रमेशss ' म्हणून मला कुणीतरी हाक मारली. मी चमकून पाहिले. त्या गल्लीत मला
2
ओळखणारा कोण असेल?
मला हाक मारणारा माझ्याबरोबर शाळेत असलेला मेहबूब सैय्यद होता! गोंडेदार टोपी नि विजार ह्या वेषात त्याला पाहून मला गंमत वाटली.
'ए पत्रकार है भई! आओ इधर आओ!' असं म्हणत त्यानं जमावाला जरा मागे रेटतच मला वाट करून दिली.
' हां भई देखो, आप पत्रकारोंने इनके आसूं पोंछने चाहिये ये कैसा जुलूम हो रहा है इनपर!...' इंदिराजी थेट मलाच उद्देशूनच म्हणाल्या. क्षणभरात मी इंदिराजींशेजारी खाटेवर बसलेला होतो. इंदिराजी एका मुस्लीम म्हातारीला बोलत होत्या, ' अम्माजान, आपका बेटा नहीं, हमारा बेटा खो गया है! मैं सरकार की ओरसे खोई हुई जान तो वापस नहीं दिला सकूंगी, पर मदद दिलाने की कोशीस करूंगी...'
इंदिराजी बरंच ऐकत होत्या. मधूनच उर्दूमधून एखादे बोलत होत्या. पाच मिनीटातच इंदिराजी उठून उभ्या राहिल्या. मला उद्देशून त्या म्हणाल्या, 'ऐसी खबरे छपनी चाहिए जिससे देश की एकता को बढावा मिले. न जाने क्यों तोडफोड की घटनाओं को ही अखबारों में लंबीचौडी जगह दे दी जाती है!'
'मॅडम आप तो जानती है...'
माझे वाक्य पुरे व्हायच्या आत त्या म्हणाल्या, हां हां मैं जानती हूं आप क्या कहने जा रहे हो...फीरभी मेरा रिक्वेस्ट है... प्रेससे वे गैरजिम्मेदाराना खबरों को न छापें...'
इंदिराजींबरोबर त्या बोळातून चालताना त्यांना जवळून पाहण्याची माझी मनापासूनची इच्छा पूर्ण झाली. मला वाटले, मी कोण माझा पेपर कोणता हे इंदिराजींना सांगावे. परंतु मध्येच विषय काढण्याचं ते स्थळ नव्हते. परंतु मोठ्या पुढा-याच्या एका वेगऴ्या पैलूची प्रचिती मला यायची होती! बोळातून थोडं पुढं चाललता चालता त्यांनीच मला विचारले, 'वुईच पेपर यू रिप्रेंझेट?'
' मराठा!...आय अॅम रमेश झवर! '
' जव्हर? ' झवरचा त्यांनी केलेला उर्दू धाटणीचा उच्चार माझ्या आयुष्यात मी प्रथमच ऐकला! मला मोठी गंमत वाटली. अनेक पुढा-यांना माझे नाव पहिल्याच दमात उच्चारता आलेले नाही. इंदिराजींनी ते खास युपीच्या उर्दू ढंगात उच्चारले.
' क्या हो गया इस बस्ती को? मैं ने तो सुना है की यहां हिंदू और मुस्लीम इन दोनों कौमों में शांतिपूर्ण और सौहार्दपूर्ण वातावरण रहा है!...' इंदिराजी एखाद्या परिचित व्यक्तीशी बोलाव्या तितक्याच परिचित सूरांत माझ्याशी बोलत होत्या.
' मॅडम, जलगांव में तो कभी जातीय दंगा नहीं हुआ है. इस मसजीद के पास तो यहां के रथ को सम्मान दिया जाता है.'
'यह बात अवश्य लिखो'
त्या बोळात इंदाजींनी एका लहान मुलाच्या चेह-यावरून हात फिरवला. मेहबूब मला उद्देशून सांगत होता...आप के अखबार में यह सब खबरें निकालो. ताकि हमारी हालत बदल सके. ऑफिसर लोग हमारी सुनते नही. त्या बोळाच्या तोंडाशी आल्यावर अडकलेला घोळका पुन्हा इंदिराजींबरोबर चालू लागला नि

3
मी मागे पडलो.

दुसरा प्रसंग

1970 सालानंतर पुन्हा इंदिराजींना भेटण्याचा, बोलण्याचा मौका मला मिळाला तो चौदा वर्षांनी रवींद्र म्हात्रे यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी त्या कन्नमवार नगरमध्ये आल्या तेव्हा. सकाळी पावणेआठच्या सुमारास मी म्हात्रे यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यांच्या शेजारी श्री. चौधरी यांच्या घरी जाऊन बसलो. माझ्या आधी पोहोचणा-यांमध्ये एक साध्या वेषातील पोलीस अधिकारी तेथे उपस्थित होता. मी चौधरी यांच्या घराचा दरवाजा सताडा उघडा होता. मी आत जाऊन सोफ्यावर बसलो. त्या पोलीस अधिका-यासही मी खुणेने बसण्याची विनंती केली.
'नो थँक्स...कोणालाही त्रास न देण्याच्या आम्हाला सूचना आहेत.' तो म्हणाला.
आठच्या सुमारास युनिफार्ममधील आणखी एक ज्येष्ठ पोलीस अधिकारी व्हॅनमधून उतरला आणि त्याने जिन्याची पाहणी केली. थोड्याच वेळात पीएम मॅडम येणार असल्याची वर्दी त्यांनी दुस-या अधिका-यास दिली. तेवढ्यात तिथे टीव्हीचा कॅमेरामन व इतर फोटोग्राफर दाखल झाले. सव्वानऊच्या सुमारास इंदिराजींची गाडी 'कृष्णपिंगाक्षय' इमारतीसमोर थांबली त्या मोटारीतून उतरल्या. मुरली देवरा त्यांच्यासमवेत होते. कृष्णमूर्ती नावाचे कोणी सुरक्षा अधिकारी ( त्यांच्या छातीवरील बॅजमुळे त्यांच नाव कळलं.) जिन्याकडे धावले. आणि ते प्रथम वरती आले... ' ऑल प्रेसवालाज प्लीज गो! धीस इज नो पब्लिक इंगेजमेंट....प्लीज गो. '
टीव्ही कॅमेरामनना तर त्यांनी दम देऊन हाकलून दिले. क्षणभर माझ्यापुढे प्रश्न पडला. सुदैवाने मी पत्रकार आहे हे तिथे कोणालाच माहित नव्हते. मीही ती माहिती आपणहून कोणाला पुरवली नव्हतीच. चौधरींकडे बसलेली व्यक्ती म्हणून साध्या वेषातील पोलिस अधिका-याने मला पाहिलेले होते. मला तिथून घालवण्याचा प्रश्नच उपस्थित झाला नाही.
इंदिराजी अत्यंत गंभीर आवाजात रवींद्र म्हात्रे यांच्या आईवडिलांशी बोलत होत्या. आत कोणालाही प्रवेश नव्हता. मी बाहेरच उभा होतो. सुमारे वीस मिनीटांनी इंदिराजी उठल्या नि दरवाजा उघडला गेला! दरवाजा उघडला जात असताना त्यांनी उच्चारलेले एक वाक्य माझ्या कानावर पडले... आय अॅम प्राऊड ऑफ म्हात्रे फॅमिली. नो डाऊट ओल्ड मॅन हॅज टु सफर सच अ टेरिबल अॅगॉनी...नेशन ओज टु देम अ लॉट !'
तेवढ्यात कुणीतरी माझा त्यांना परिचय करून दिला. ' ही इज जर्नालिस्ट...'
' झवर... लोकसत्ता!' मी पुढे होऊन अभिवादन केले.
इंदिराजींनी हात जळवून मला प्रतिअभिवादन केले. जिना उतरत असताना इंदिराजी मुरली देवरांना म्हणाल्या, ' इन लोगों को धीरज दिलाना चाहिए...'
इमारतीच्या बाहेर पडल्यावर गॅल-यातून डोकावून पाहणा-या 'पब्लीक'कडे पाहून इंदिराजींनी हात वर केला. माझ्याकडे वळून त्या म्हणाल्या, ' मिस्टर जव्हर!.. वुई शाल मीट! '
' आय वांट टु हॅव यूवर स्पेशल इंटरव्ह्यू...!'
' शुअर!... समय ले लीजिएगा और मुलाकात हो जायेगी '

इंदिराजींनी मला दिलेले ते खरोखर तद्दन खोटं आश्वासन होतं! ती मुलाखत कधीच होणार नव्हती. उर्दू ढंगातला ' जव्हर' हा माझ्या नावाचा मला कधीच ऐकू येणार नव्हता.
रमेश झवर
www.rameshzawar.com


( हा लेख दैनिक लोकसत्तेत प्रकाशित झाला होता. माधव गडकरींनी मला फार कमी वेळा लिहण्याची संधी दिली. इंदिराजींच्या आठवणींवरील ह्या लेखाचा त्यांनी अपवाद केला. )

No comments: