मुंबईचे सीबीआय जज
बृजगोपाल लोया ह्यांच्या मृत्यूबद्दल निरंजन टकले ह्यांनी कारवान साप्ताहिकात
उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजे. जज लोया ह्यांचा मृत्यू
संशयास्पद परिस्थितीत झाला हे निरंजन टकले ह्यांनी सज्जड पुराव्यावाशी दाखवून
दिले. एनडीटीव्ही वगळता अन्य प्रसारमाध्यांनी ह्या प्रकरणाची फारशी दखल घेतली
नाही. अन्य माध्यमात प्रसिध्द झालेल्या खळबळजनक वृत्तांताची मोठी राष्ट्रीय वृत्तपत्रे
सहसा दखल घेत नाही हे समजण्यासारखे आहे. परंतु हे धोरण सरसकट अवलंबण्यात येत असले
तरी फॉलोअप बातम्या देऊन न्यूज कव्हरेजमध्ये कारवानवर मात करता आली असती ह्याचा
त्यांना विसर पडला. लोया मृत्यू प्रकरणी अशा प्रकारचा फॉलोअप न करण्यात आल्यामुळे
महाराष्ट्रातील मुद्रण माध्यमांच्या विश्वासार्हतेबद्दल विनाकारण प्रश्नचिन्ह
उपस्थित होतात.इंडियन एक्स्प्रेस आणि लोकसत्ता
ह्या दैनिकांनी उशीरा का होईना ह्या प्रकरणातील वस्तुस्थिती तपासून
पाहण्याचा प्रयत्न केला; त्यापैकी काही मुद्दे टकले ह्यांचे म्हणणे हाणून
पाडणारे आहेत. म्हणूनच ह्या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी आवश्यक होऊन बसते.
जज लोया ह्यांची जन्मभूमी
आणि कर्मभूमी ही महाराष्ट्र आहे. त्यांचा मृत्यू नागपूरमधील रवि भवन ह्या सरकारी
अतिथीगृहात झाला, लोयांचे मूळ गाव गातेगाव हे लातूर जिल्ह्यात आहे आणि मुख्य म्हणजे
लोया हे मुंबई सीबीआय कोर्टाचे जज होते! ह्या तीन मुद्द्यांचा विचार करता त्यांच्या मृत्यूसंबंधाने
उपस्थित झालेल्या संशयाचे निराकरण होणे महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीनेही गरजेचे
आहे. विशेषतः हार्ट अटक आल्यानंत जज लोया ह्यांना वैद्यकीय उपचारासाठी रिक्षातून
नेण्यात आले, लोयांना हार्टअटक आला ह्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांना का कळवण्यात
आले नाही, अतिथीगृहाच्या ड्युटीवर असलेल्या अधिका-यांनी त्यांची जबाबदारी योग्यरीत्या
पार पाडली की नाही, इत्यादि प्रश्नांची उत्तरे मिळाली नाही तर केवळ भाजपाचीच नव्हे
तर महाराष्ट्र सरकारचीही प्रतिमा मलीन होण्याचा संभव आहे. प्रतिमा मलीन होणे
महाराष्ट्र सरकारला परवडणारे नाही.
विशेषतः सीबीआय जज बृजगोपाल
लोया ह्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी महाराष्ट्र आहे. जज लोया हे लातूरपासून 20
किलोमीटरवर असलेल्या गातेगाव ह्या खेड्यातून आलेले आहेत. त्यांचे वडिल हरिमोहन
लोया हे 85 वर्षांचे असून गेली अनेक वर्षे ते पायवारी केली आहे. त्यांच्या
बहिणीपैकी एक बहीण जळगावला असून दुसरी बहीण धुळ्याला आहे. धुळ्याच्या त्यांच्या
बहिणीने कारवानचे प्रतिनिधी निरंजन टकले ह्यांना दिलेल्या मुलाखतीत ज्या
परिस्थितीत आपल्या भावाचा मृत्यू आणि पोस्टमार्टेम झाला त्या परिस्थितीबद्दल संशय
व्यक्त केला आहे. ही बहीण स्वतः शासनाच्या सेवेत असल्यामुळे पोस्टमार्टेमसंबंधीची
त्यांना स्वतःला तपशीलवार माहिती आहे. बृजमोहन लोयांचा मृत्यू कसा झाला, मृत्यू झाल्याची
माहिती त्यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आली नाही, त्यांचा मृत देह अँब्युलन्सने
गातेगावला पाठवण्यात आला तेव्हा शवाबरोबर कोणालाच पाठवण्यात आले नाही किंवा
त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सहकारी जज लोयांच्या वडिलांच्या सांत्वनासाठी गेले
नाहीत वगैरे माहितीत सकृतदर्शनी अनेक विसंगती असल्याचे त्यांच्या बहिणीने दाखवून दिले
आहे.
लोया मृत्यू प्रकरणी किमान
खातेनिहाय चौकशीचा आदेश दिला तरी राजकीयदृष्ट्या ह्या प्रकरणाची विरोधकांच्या
हातात असलेली सूत्रे फडणवीस सरकारच्या हातात येऊ शकतात. लोकसभा अधिवेशन पुढे
ढकलण्यात आले असले तरी ह्या ना त्या स्वरूपात हे प्रकरण लोकसभेत उपस्थित झाल्याशिवाय
राहणार नाही. त्यावेळी चौकशीत राज्य सरकारला आपला सहभाग नोंदवावाच लागेल. ह्या
परिस्थितीत आपणहून चौकशी करणे योग्य ठरते. अनेक नेत्यांनी ह्या प्रकरणावर भाष्य
केले असले तरी ते रोखठोक नाही. सीताराम येचुरी ह्यांचे भाष्य मात्र रोखठोक आहे. संसदेत
विरोधकांकडून कुठला पवित्रा घेतला जातो हे अद्याप स्पष्ट नाही. सरकारने स्वतःहून
चौकशी केली नाही तर मात्र न्यायालयीन आदेशानंतर चौकशी करण्याची पाळी राज्य शासनावर
येण्याचा पुरेपूर संभव आहे!
रमेश झवर
www.rameshzawar.com
No comments:
Post a Comment