Wednesday, February 21, 2018

मुलाखत नव्हे, स्वगत!

राजकारणाच्या प्रवासात नेत्यांना अनेकदा पत्रकारांशी बोलण्याचा प्रसंग येतो. काही वेळा पत्रकारांना टाळण्याचाही प्रसंग येतो! प्रसंग प्रेसशी बोलण्याचा असो वा प्रेसला टाळण्याचा असो, अनेकदा नेत्यांना 'स्वगत' बोलता येत नाही! स्वगत म्हणजे मनातल आणि खरे! बहुधा म्हणूनच आपली मुलाखत राज ठाकरे ह्यांनी घेण्यास ज्येष्ठ नेते शरद पवार ह्यांनी संमती दिली असावी. राजकारण करणा-यांना सकाळी लौकर उठावे लागते, असा जाहीर सल्ला शरद पवारांनी राज ठाकरे ह्यांना मागे एकदा दिला होता. हा सल्ला देताना शरद पवारांनी राज ठाकरे ह्यांच्या सवयीवर बोट ठेवले होते. ह्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची जाहीर मुलाखत घेण्यास राज ठाकरे ह्यांनीही संमती दिली होती ह्याचा अर्थ ते मनातून शरद पवारांना मानतात! मोदींना आपली करंगळी सापडली नाही, असे एका प्रश्नास शरद पवारांनी उत्ता दिले. राज ठाकरे ह्यांना ठाकरे ह्यांची करंगळी नक्कीच सापडली असे ह्या जाहीर मुलाखतीचा रोख पाहिल्यावर म्हणता येईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पडता काळ सुरू आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या हयातीतच शिवसेना सोडून राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली
आणि त्यानंतरच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ब-यापैकी खिंडार पाडले होते. परंतु मनसेने शिवसेनेला पाडलेले खिंडार म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील 'शिवसेना' प्रकरणातल्या तूर्त तरी दोन ओळीच ठरल्या आहेत! शिवसेनेला उध्दव ठाकरे ह्यांच्या नेतृत्वाखाली यश मिळाले आणि सत्तेत भागीदारी मिळाली तरी भाजपा आणि शिवसेना ह्यांच्यात खणाखणी सुरूच असते. सत्तेत राहूनही लोकांची कामे करण्याच्या सुखापासून शिवसेना वंचित राहिली आहे हे राज्यातील जनतेपासून लपून राहिलेले नाही.
राज्य चालवणे म्हणजे देश चालवणे नव्हे असे जेव्हा शरद पवारांनी सांगितले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या यशापेक्षा अपपयशावरच बोट ठेवले. मोदींकडे देश चालवण्याच्या दृष्टीने टीम नाही. त्याखेरीज संसदीय कामकाजाच्या वेळी प्रथापरंपरांचे पालन करणे आवश्यक असते हेही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निदर्शनास आणून दिले. राहूल गांधींबद्दलही शरद पवारांनी मनमोकळेपणाने मतप्रदर्शन केले. जाणकारांकडून अनेक विषय समजावून घेण्याचा प्रयत्न राहूल गांधी करत आहेत ह्याची शरद पवारांनी दखल घेतली. ससा आणि कासव ह्या गोष्टीतल्याप्रमाणे हळुहळू चालणारा कासव पुढे निघून जाऊ शकतो असा निष्कर्ष भले शरद पवारांनी काढला नसेल; परंतु उपस्थिती श्रोत्यांनी तसा निष्कर्ष काढला तर तो चुकीचा ठरणार नाही. ह्याउलट नेहरू कुटुंबियांबद्दल सतत बाळगलेल्या व्देषभावनेचा दृष्टीकोन सोडायला पंतप्रधान नरेंद्र मोदी अजून तयार नाहीत. संधी मिळेल तेव्हा राहूल गांधींची ते खिल्ली उडवत असतात ह्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे निरीक्षण वेधक नाही असे कोण म्हणेल? ह्याच वेधक निरीक्षणामुळे शरद पवारांचे राजकारण जागरूक राहिले हे नाकारता येणार नाही.
केंद्रातली सत्ता भाजपा आणि काँग्रेस ह्या दोन पक्षांकडे राहू शकते हेही राजकीय सत्य त्यांनी निर्भीडपणे मांडले. जेव्हा प्रथमच शिवसेनेचे 6 खासदार निवडून आले तेव्हा नाही म्हटले तरी काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष आहे हे विसरून चालणार नाही, असे मत बाळासाहेब ठाकरे ह्यांनी ओबेराय हॉटेलमध्ये काही निवडक पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले होते. ( त्या निवडक पत्रकारात मीही एक होतो. ) राजकीय वास्तव लगेच स्वीकारण्याची बाळासाहेब ठाकरे ह्यांची तयारी होती हेच त्यावेळी दिसून आले. शरद पवारांचीही राजकीय वास्तव स्वीकारण्याची तयारी त्यांच्या मुलाखतीत दिसून आली. ह्या निमित्त आणखी एका मुद्द्याकडे पवारांनी जाता जाता श्रोत्यांचे लक्ष वेधले. तृणमूल काँग्रेस, बिजू जनता दल, नितिशकुमारांचा संयुक्त जनता दल, शिवसेना, दक्षिणेतले दोन्ही द्रमुक, आंध्रातले दोन्ही तेलगू देशम् किंवा त्यांचे विरोधक ह्या पक्षांपैकी कोणालाही केंद्राच्या राजकारणात मध्यवर्ती स्थान मिळू शकणार नाही हा एक मुद्दा आणि नितिशकुमार, चंद्रबाबू नायडू, उध्दव ठाकरे ह्यांना मोदी-शहांच्या नेतृवाखालील भारतीय जनतेच्या कक्षेत फिरत राहण्यावाचून अन्य पर्याय नाही हा दुसरा मुद्दा! हे सगळे काँग्रेस पक्षाच्या आसाभोवती फिरायला तयार झाले तर सत्तापालट लांब नाही. दोन वेळा काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर शरद पवारांचे हे मत बनले आहे. दोन्ही वेळच्या अनुभवांचाच निष्कर्ष शरद पवारांच्या मुलाखतीत निःसंकोचपणे व्यक्त झाला.
आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी व्यक्त केलेले मत तर त्यांनी मारलेली सिक्सरच आहे! आर्थिक मागासलेपण हाच आरक्षणाचा निकष असला पाहिजे हे शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितले. विशेष म्हणजे हे सांगताना त्यांनी शिवाजी, शाहू-फुले, आंबेडकर ह्यांच्या विचारांची कास आपण मुळीच सोडलेली नाही हे त्यांनी स्पष्ट केले आहे. सामाजिक आणि जातीय ऐक्यासाठी जात, धर्म, भाषा ह्यावरून एकमेकांमध्ये निर्माण झालेले विव्देषाचे वातावरण दूर सारण्यासाठी राजकीय पक्षांना एकत्र काम करावे लागेल असे सांगून भाजपाला पराभूत करण्यासाठी राजकारण करण्याचा संकेत दिला आहे. किंबहुना भाजापाला सत्तेवरून बाजूस सारण्याचा हा एकमेव मार्ग असल्याचा बोध ज्यांना घ्यायचा असेल त्यांना तो खुशाल घेता येईल.
अनेकदा बाष्कळ आरोपांना उत्तर देणे आपणास आवश्यक वाटत नाही, असे शरद पवारांनी सांगितले. कमी बोलणे हा राजकारणात गुण ठरतो हे शरद पवारांचे अनुभवसिध्द मत आहे. वस्तुतः दिल्लीत बहुतेक नेत्यांकडे हा गुण असतोच. परंतु बोलघेवड्यांना तो कधीच लक्षात येत नाही. नरसिंह रावदेखील काही मह्त्वाच्या विषयांवर मौन पाळत असत. त्याचे साधे कारण त्यांना जे घडवून आणायचे त्याबद्दल वाच्यता केल्यास कार्यनाश होण्याचा धोका त्यांना वाटत असे. म्हणून उगाच वाचाळ वक्तव्ये करण्याचे ते टाळत आले.राज ठाकरे हे शरद पवारांची मुलाखत घेणार हे जेव्हा जाहीर झाले तेव्हा त्यांच्या मुलाखतीत ऐकण्यासारखे नक्कीच काही मिळेल अशी श्रोत्यांची अटकळ होती. ती खरी ठरली. शरद पवारांची जाहीर मुलाखत घेताना राज ठाकरेंनाही एक वेगळे समाधान मिळाले असेल. पवारांच्या जाहीर मुलाखतीवरून कोणी काय बोध घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मुळात हा प्रश्न राजकीय आकलनशक्तीचा आहे!...

रमेश झवर
www.rameshzawar.com

No comments: