Saturday, September 7, 2019

स्तब्धतेचा हुंकार!


चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा वेध घेण्यासाठी चंद्राच्या दिशेने झेपावलेले चांद्रयान-२ चंद्रापासून अवघ्या दोनसव्वादोन किलोमीटर अंतरावर पोहचले असतानाच चांद्रयानाचा संपर्क तुटला! संपर्क तुटल्यानंतर निर्माण झाल्याने इस्रोमधील अंतरराळ प्रक्षेपण केंद्रावर शास्त्रज्ञात काही काळ स्तब्धता पसरली. ही स्तब्धता आता संपणार नाही हेही स्पष्ट झाले. इस्रोचे प्रमुख त्याक्षणी काहीसे भावविवश झालेले असू शकतात. सुरूवातीची स्तब्धता संपेल असे शास्त्रज्ञांना क्षणभर वाटले असेल. त्यावेळची दोन तासांची स्तबधता खूप काही सांगून जाणारी ठरू शकते. चांद्रयान—मोहिमेची ९५ टक्के कामगिरी नष्ट झालेली नाही हा स्तब्धतेचा पहिला हुंकार! शास्त्रज्ञांच्या मुखातून तो व्यक्त झाला. कारण त्यावेळी घडले एवढेच होते की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम अलगद उतरणार होता तो उतरला की नाही हे कळेनासे झाले. विक्रम आणखी कुठे भरकटला तर नसेल? ते ह्या घडीला तरी ते कळू शकले नाही.
एकूण चांद्रयान-२ मोहिमेचा विचार करता ह्या अपघाती बदलामुळे विक्रमकडून अपेक्षित असलेली कामगिरी पार पडणार नाही इतकेच. मात्र चंद्राभोवती प्रदक्षिणा घालण्याचे आणि चंद्राचे शेकडो फोटो पाठवण्याचे काम मुख्य चांद्रयानाकडून वर्षभर सुरूच राहणार आहे! कदाचित् चंद्रभूमीवरच भरकटलेल्या स्थितीतली विक्रमची चंद्रभूमीवरील छायाचित्रे इस्रोला प्राप्त होण्याची शक्यताही आहे! विक्रम सुस्थितीत असण्यावर ते अवलंबून राहील. विक्रम छिन्नविछिन्न झाला की त्याचे काय झाले आहे हे कळण्यास मार्ग नाही. विक्रम जर थोडाफार सुस्थितीत असेल तर आवश्यक ती दुरूस्ती करण्याचा प्रयत्न केल्याशिवाय शास्त्रज्ञ स्वस्थ बसणार नाही हे निश्चित!
शास्त्रीय सत्य आणि मानवी मनाची तुलना करणे अशक्य आहे. नव्हे ती तशी करणे गल्लत ठरेल. मन चिंती ते वैरी न चिंती असा मानवी स्वभाव आहे. त्याचा अनुभव शास्त्रज्ञांना आला असेल तर त्यात काही चुकले असेल असे नाही. शेवटी इस्रोचे हे सगळे शास्त्रज्ञ हे मानवाचे पुत्र आहेत! तरीही हे शास्त्रज्ञ आणि योगी ह्यांची तुलना तरण्याचा मोह रिकामटेकड्या लोकांना होणारच. योगसाधनेमुळे समाधी प्राप्त होते. हाती घेतलेल्या संशोधन कार्यात चित्तवृत्तींचा न्यास करणे हीदेखील शास्त्रज्ञांची एक प्रकारची समाधीच आहे. संशोधनोत्तर कार्यसिध्दी हा शास्त्रज्ञांच्या समाधीचा अत्त्युच्च बिदू म्हणायला हरकत नाही. मोक्षप्राप्तीसाठी योगसाधना करणा-या योग्यांपेक्षा इस्रोमधील चांद्रमोहिमेच्या कामात अहोरात्र गुंतलेले शास्त्रज्ञ शास्त्रज्ञ काकणभर सरसच ठरतात. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्टभूमीवर पाणी आहे का, तेथल्या भूगर्भात खनिजे आहेत का, असली तर कोणती खनिजे आहेत इत्यादि प्रकारची माहिती मिळवण्यासाठी चांद्रयान मोहिम-२ आखण्यात आली. आखणीबरहुकूम ती राबवण्यात आली. ह्या मोहिमेत सहभागी झालेला इस्रोमधील प्रत्येक शास्त्रज्ञ-तंत्रज्ञ आपापल्या विषयात निष्णात आहे. चांद्रयान-२ मोहिम फत्ते करण्यासाठी सगळ्यांनी अहोरात्र परिश्रम केले. अजूनही करत आहेत.  त्यांच्या प्रयत्नात जराही कसूर राहिती नाही. राहणारही नाही.
अंतराळ संशोधन मोहिमांचा इतिहास तपासला तर जगभरातील अंतराळ संशोधन संस्थांना अनेकदा अपयश आल्याची उदाहरणेही आहेत. उपग्रहाततून अंतराळात जाणा-या काही अंतराळवीरांना तर त्यांचे जीवित वेचावे लागले आहे. तरीही अपयशाचा धसका घेऊन एकाही देशांनी अंतराळ संशोधन मोहिमा सोडून दिल्या नाही. भारतीय अंतराळ संशोधनाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. अंतराळात उपग्रहाचे ओझे पाठलणा-या राकेट निर्मितीसाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान आणि अण्वस्त्र प्रक्षेपणासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान हे एकाच प्रकारचे असते. हे दुहेरी तंत्रज्ञान वापरण्यासाठी आवश्य त्या उपकरणांचा पुरवठा भारताला होऊ नये म्हणून ते भारताला विकण्यावर अमेरिकेने स्वतः तर बंदी घातलीच, इतर अण्वस्त्रसज्ज देशांनाही घालायला लावली. ती बंदी मोडून रशियाने भारताला क्रायोजेनिक इंजिन दिले आणि ते तयार करण्याचे तंत्रज्ञानही हस्तांतरित केले. त्याचा भारतीय शास्त्रज्ञांनी पुरेपूर फायदा करून घेतला. म्हणूनच ऱॉकेट प्रक्षेपण तंत्रज्ञानात भारताची असामान्य प्रगती झाली; इतकेच नव्हे तर भाडे आकारून उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्याचा व्यवसाय इस्रोने हाती घेतला आहे. अनेक देशांचे उपग्रह ह्या केंद्राने अंतराळात प्रक्षेपित करण्याचे काम पत्करले.
अंतराळ संसोधन क्षेत्रात प्रगती करण्याचे सारे श्रेय आपल्या शास्त्रज्ञांना दिले पाहिजे. चांद्रयान मोहिम-२ चे  प्रमुख शिवन् ह्यांनी मोहिम सुरू करण्यापूर्वी उडपीच्या कृष्णमंदिरात श्रीकृष्णाची यथासांग पूजा केली. ह्यापूर्वीही इस्रो प्रमुख राधाकृष्ण ह्यांनीदेखील तिरूपतीला व्यंकटेशाची पूजा केली होती. संशोधन मोहिमात यश मिळावे मिळावे यास्तव इस्रो प्रमुखांनी इष्ट देवतांची पूजा केली म्हणून त्यांच्यावर टीका होत आहे. देवाची पूजा केल्याने त्यांच्या शास्त्रीय मनोवृत्तीला बाधा येते असे मुळीच नाही. आपल्या इष्टदेवतेची पूजा करणे हा ज्याच्या त्याच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा प्रश्न आहे. त्यांच्या ख-याखु-या श्रध्देवर टीका करण्याचा स्वयंघोषित पुरोगामी मंडळींना मुळीच अधिकार नाही.  
अंतराळ संशोधन क्षेत्रात अलीकडे स्पर्धेचे युग संपुष्टात आले असून सहकार्याचे नवे पर्व सुरू झाले आहे. तेव्हा एखाद्या मोहिमेच्या यशापयशाचे निमित्त करून गत इतिहास उगाळण्यालाही अर्थ उरला नाही. अंतराळ संशोधनात एकमेकांना साह्य आणि सहकार्य करण्याचे पर्व सुरू झाले. आज अंतराळ संशोधनासाठी सारे देश एक झाले आहेत! अंतराळ क्षेत्रात काही प्रयोग संयुक्तरीत्या राबवण्यासही सुरूवात झाली आहे. अमेरिकेने तर चांद्रभूमीचवळ अंतराळ स्टेशन उभारण्याचा मनोदय जाहीर केला आहे. त्या अंतराळ स्टेशनावर वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा सेवा विकसित करण्यासाठी खासगी कंपन्यांकडून नासाने देकार मागावला आहे. त्यासाठी नासाचे अधिकारी स्वतः नॅस्डॅकची पायरी चढले. आपल्याकडेही अंतराळात उपग्रह सोडण्यासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अंतराळ संशोधनात मिळालेले यश कोण्या एका देशाचे नसून ते सबंध मानवजातीला मिळालेले यश आहे. ह्या नित्यनूतन वैज्ञानिक प्रगतीमुळे अंतराळ पर्यटनाचे नवे क्षेत्र लौकरच खुले झालेले दिसेल. अंतराळ पर्यटन क्षेत्र कुणा एका देशाची मक्तेदारी नाही. म्हणूनच चंद्र वा मंगळ प्रवासासाठी व्हिसाची गरज नाही. तसे जाहीर करण्याची संधी अमेरिकेने घेतली. चंद्रभूमीवर पाऊल ठेवण्यासाठी सिक्युरिटी चेक नाही की इमिग्रेशन स्टँपमारण्याची गरज नाही! चांद्रमोहिम-२ यशस्वी झाली की नाही ह्याची चर्चा करण्यापेक्षा ह्या क्षेत्रात काय काय सुरू आहे हे प्रत्येक भारतीयाने समजून घेणे उचित ठरेल.  
रमेश झवर
rameshzawar.com

No comments: