Saturday, February 22, 2020

दौरा कम् सहल!

पुढच्या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष भारतात येत आहेत. अध्यक्ष ट्रंप हे व्यवसायाने बिल्डर. अमेरिकेचे अध्यक्ष होण्यापूर्वी आपल्या व्यवसायाची सूत्रे त्यांनी चिंरजिवांच्या हातात सोपवल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर अडचणींचा प्रश्नच उपस्थित झाला नाही. पुणे आणि मुंबई शहरातल्या मोठाल्या बिल्डिंग प्रकल्पात ट्रंपनी अध्यक्ष होण्यापूर्वीच गुंतवणूक केली होती. त्यामुळे पुढच्या आठवड्यात होणा-या भारत दौ-याचे प्रयोजन काय असा प्रश्न जनतेला पडला असेल. पण राजकारण आणि बिझिनेस ह्या दोन्हीत एखादे का होईना प्रयोजन असतेच. तसे ते ट्रपं ह्यांच्या दौ-यालाही आहे. 
पंतप्रधानकी मिळाल्यावर मोदींनी अमेरिकेत स्थायिक झालेल्या गुर्जरबंधूंच्या मदतीने अमेरिकेत ठिकठिकाणी जाहीर सभा लावल्या होत्या. एका सभेत तर अध्यक्ष ट्रंपनाही सभेत भाषण करण्याचा मान अमेरिकन गुजरात्यांनी दिला. त्या सभेला ६० हजार माणसे जमली होती. अमेरिकन अध्यक्षांनी दिलेल्या मानाची परतफेड नको करायला? मानाची परतफेड करण्यासाठीच ट्रंपना भारताला येण्याचे निमंत्रण देण्यात आले. प्रजासत्ताक दिनाला येण्याचे निमंत्रण मोदींनी त्यांना दिले होते. कार्यबाहुल्याने त्यांनी तेव्हा ते स्वीकारले नव्हते. २०२१ सालच्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूक होणार असून दुस-यांदा अध्यक्षपद मिळवण्यास ट्रंपमहाशय उत्सुक आहेत. अमेरिकन भारतीयांच्या पाठिंब्याला नाही म्हटले तरी अध्यक्षीय निवडणुकीत महत्त्व आहेच. ट्रंपनी भारत भेटीचे निमंत्रण स्वीकारण्यामागे हेही एक कारण आहेच.
राजकारणी ह्या नात्याने ट्रंपदेखील गर्दीप्रेमी आहेत. बिझिनेसमन ह्या नात्याने झुंबडप्रेमीही आहेत.(प्रत्येक बिझिनेसमनला गि-हईकांची झुंबड आवडत असतेच.) त्यांच्या गर्दीप्रेमासाठी ग्रदीप्रेमी मोदींनी अहमदाबादला नव्याने बांधण्यात आलेल्या स्टेडियममध्ये ट्रंप ह्यांच्यासाठी जाहीर सभा आयोजित केली आहे. ह्या सभेला प्रचंड गर्दी उसळेल अशी योजनाही आखण्यात आली आहे. त्याखेरीज विमानतळापासून ते सभास्थळापर्यंत रस्त्याच्या रस्त्यावर दुतर्फा माणसे जमवण्याचेही संबंधितांनी ठरवून टाकले आहे. ह्या थाटमाटासाठी १०० कोटी रुपये उधळ्यात येत आहे. मुंबईत शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात येणा-या इंदिराजींच्या सभांसाठी ट्रकने माणसे आणली जातात अशी टीका विरोधक करत होते. त्या काळी इंदिराजींच्या विरोधकांत भाजपाही सामील होताच. अहमदाबादमध्ये सभा आणि रस्त्त्याच्या दुतर्फा मिळून १ कोटी लोक नक्कीच जमतील असे मोदींनी अध्यक्ष ट्रंप ह्यांना फोनवरून सांगितले. अहमदाबादची लोकसंख्या ५५ लाख. पण ट्रंपमहाशयांसाठी १ कोटी लोकांची गर्दी होणार. अर्थात गर्दी जमवणे कौनसी बडी बात! अहमदाबाद भेटीखेरीज ट्रंप आग्र्याला ताजमहाल पाहायला जाणार आहेत. त्यामुळे ताजमहालला पीओपी करण्याचे काम सुरू आहे. ट्रंपबरोबर शंभर पत्रकारांचा ताफाही असणार आहे. सोबत त्यांच्या पत्नी तर आहेतच; शिवाय मुलगी-जावईदेखील एक दिवस उशीरा येणार आहेत! अशा ह्या दौरा कम सहलीत तोंडी लावायला व्यापारी वाटाघाटी हव्याच!
ट्रंप ह्यांच्या भारतभेटीचे निमित्त साधून रीतीप्रमाणे दोन्ही देशाच्या व्यापारवृध्दीसाठी चर्चाही ठेवण्यात आली आहे. त्या चर्चेतून करारमदार वगैरे निष्पन्न होतील, न होतील! म्हणून करारांच्या  अमलबजावणीला मुदत न घालण्याचे ठरवण्यात आले आहे.  भारताची टॅरिफ अमेरिकेला परवणारी नाही असा सूर अध्यक्ष ट्रंपनी भारतात यायला निघण्यापूर्वीच लावला. अमेरिकेच्या व्यापाराचा भारताच्या बाजूने विचार करायचा तर अमेरिका फर्स्टहे ट्रंपमहाशयांचे धोरण भारताला पुष्कळ नडणारे आहे. भारताबरोबर कोणता नवा व्यापार सुरू करता येईल असा प्रश्न दोन्ही सरकारमधील अधिका-यांना पडला असेल. परंतु अमेरिकेचे आणि गुजरातचे व्यापारी महाधूर्त! आंध्रप्रदेशात उभारण्यात येणा-या अणु उर्जा प्रकल्पासाठी ६ रिअक्टर खरेदी करण्याची किरकोळ ऑर्डर त्यांनी शोधून काढली. नॅशनल थर्मल पॉवर क़र्पोरेशन ह्या सरकारी मालकीच्या कंपनीला त्यासाठी वेठीस धरण्यात येणार आहे. आणखी भारताकडून अमेरिकेला फार तर, जनरिक औषथे घेता येतील. पण ब्रँडनेमवर अमेरिकन जनतेचा कटाक्ष असल्यामुळे हीही शक्यता कमीच. मुळात अमेरिकन ब्रँडची औषधे भारतातील काही नामवंत कंपन्या बववून देतात. असो. शेवटी, एकमेकांच्या मालाचा विक्रा वाढण्याशी मतलब!
तूर्त तर समाधान  एकाच गोष्टीचे मानायला हवे. ती म्हणजे मोदींच्या अमेरिका दौ-यांप्रमाणे ट्रंप ह्यांचाही भारत दौरा कम सहल नक्कीच यशस्वी व्हावी ह्यासाठी खटपट करण्यात कुठेच कसुर ठेवम्यात आलेली नाही!
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार

No comments: