Monday, September 20, 2021

पुरूषोत्तम दारव्हेकर

गाजलेले नाटककार पुरूषोत्तम दारव्हेकर ह्यांचा आज स्मृति दिन. महाराष्ट्राच्या ह्या मोठ्या नाटककराच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची माझ्यासारख्या श्रमिक पत्रकाराला संधी मिळेल असं वाटलं नव्हतं. योगायोगाला आयुष्यात फार महत्त्व स्थान असतं हे कुणी मान्य करो वा करो, मला मात्र ते मान्य आहे. मी कामगार सभेचे मास्तर गणपाहा सुप्रसिध्द संवाद लिहणारा नाव नसलेला लेखक. कामगारक्षेत्रातल्या बातम्यांवर पंधरा मिनटांचा संवाद लिहण्याचे तंत्र मला चांगल्या प्रकारे अवगत झाले होते. मास्तर गणपासंवाद लिहण्याचे फोनवरून हेमंत कारंडे ह्यांचे निमंत्रण मला मिळाले. माझी सकाळपाळी संपवून मी दुपारी अडीच वाजता कारंड्यांकडे गेलो. या बसा झाल्यावर बाजूच्या केबिनमधून पुरूषोत्तम दार्व्हेकर कारंड्यांच्या केबिनमध्ये आले. उपचाराचा भाग म्हणून कारंड्यांनी माझी दारव्हेकरांना ओळख करून दिली.

बरं झालं, तुमची ओळख झाली. तुम्ही कारंड्यांचे काम आटोपल्यावर जाताना  माझ्याकडे डोकवा’, असं सांगून दारव्हेकर निघून गेले. करारपत्रावर माझी सही घेण्याचे काम होताच मी मोकळा झालो. आणि लगेच बाजूच्याच दारव्हेकरांच्या केबिनचा दरवाजा किंचित उघडून विचारलं, येऊ का?

या या!’

दारव्हेकरांच्या पुढ्यातील खु्र्ची ओढत मी बसलो. दारव्हेकर म्हणाले, मराठी बोलपटाला ५० वर्षें होत आहे. त्यानिमित्त एका कार्यक्रम करायचाय्. स्क्रीप्ट लिहण्याचे काम मी सुधीर नांदगावकरांना दिले आहे. त्या कार्यक्रमात मान्यवरांच्या मुलाखती वाजवण्याची कल्पना आहे. त्या मुलाखती तुम्ही आणायच्या आहे.

मी सिनेपत्रकार नाही, असं मी सांगताच ते म्हणाले, मला सिनेपत्रकार नकोच आहेत मुळी!  सिनेपत्रकारमुलाखत घेताना लांबण लावतात. मला लांबण लावणारा पत्रकार नको आहे. नेमक्या मुद्द्यावर नेमका प्रश्न विचारणारा पत्रकार हवा आहे. तुम्ही ते काम करू शकाल!’

एखाद्याला स्टुडियोत बोलावून त्याची मुलाखत घेण्याची आकाशवाणीत चालत आलेली पूर्वापार पध्दत बंद करून त्याला प्रत्यक्ष भेटून त्याची मुलाखत पत्रकाराने स्वतःच्या टेपरेकॉर्डवर रेकॉर्ड करून आणण्याची पध्दत प्रसारभारतीने नुकतीच सुरू केली होती. त्यापूर्वी प्रत्यक्ष अवजड रेकॉर्डिंग मशीन घेऊन आकाशवाणीची टीम पाठवण्याची पध्दत होती. आकाशवाणीच्या सेट अपमध्ये ती वेळखाऊ होत चालली होती. ती पध्दत बंद करून पत्रकारालाचबाईटस्‌’ आणण्याचे काम सोपवण्याचा फतवा बहुधा प्रसारभारतीने काढला होता.

दारव्हेकरांनीच सुधीर नांदगावकरांना फोन केला आणि कोणाचे बाईटस्आणायचे हे सगळं तुमच्याशी बोलून ठरवण्यास मी झवरना सांगितलंय्. माझ्या हातात नांदगावकरांचा फोन दिला. नांदगावकर मला म्हणाले. असं कर ना आपण प्रत्यक्ष भेटून ठरवू. ज्यांच्या मुलाखती आणायच्या त्यांचे फोन नंबर, पत्ते वगैरेही तुला मला देता येतील.

नांदगावकरांना भेटण्यापूर्वी मी व्ही शांताराम,  सुधीर फडके, शशिकला, भारतमाताचे मालक अशी नावे काढून ठेवली होती. ती त्यांना लगेच पसंत पडली. मला पत्ते आणि फोन नंबर तर त्यांवी दिलेच. शिवाय व्ही. शांताराम ह्यांच्याकडे जाताना मी तुझ्याबरोबर येईन असंही सांगितलं. शशिकला वगैरेंकडे मात्र मी येणार नाही असं त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं. मी त्यांना विचारण्यापूर्वीच त्यांनी मला तसं सांगून टाकलं. मला वेळ काढणं शक्य होणार नाही. दुस-या दिवशी मी शशिकला आणि व्ही शांताराम ह्यांना फोन केला. अर्थात नांदगावकरांचे नाव घेताच व्ही. शांतारामांनी मला लगेच वेळ दिली. ठरल्याप्रमाणे आम्ही दोघं व्ही. शांतारामांकडे हजर झालो. व्ही. शांतारामांचे चिरंजीव प्रभातकुमारांनी आम्हाला त्यांच्या खोलीत नेले. भल्या मोठ्या टेबलाच्या समोरच्या बाजूला ते आणि आम्ही त्यांच्यासमोर. माझा  प्रश्न ऐकताच त्यांनी सविस्तर उत्तर दिलं. मात्र ते पुटपुटल्यासारखे बोलत होते!  रेकॉर्डिंग वाजवून पाहिले तेव्हा ते कोणालाही ऐकू आले नाही. पुन्हा रेकॉर्डिंग. आधीपेक्षा बरं. त्यात मुद्दाही छान आला होता. स्टुडियोवाले आवाज मोठा करून घेतील असं म्हणून मी रेकॉर्डिंग सेशन आटोपलं.

सुधीर फडकेंकडे आणखी वेगळाच अनुभव आला. मी केलेलं  रेकॉर्डिंग  त्यांना पसंत पडेना. त्यात थोडी खरखर, पंख्याचा आवाज वगैरे सगळं नको असलेलं सगळं होतं. फडक्यांना ते मुळीच पसंत पडलं नाही. पुन्हा रेकॉर्डिंग करू या, असा आदेश होताच. मी पुन्हा रेकॉर्डिंग केलं. तेही त्यांना पसंत पडेना. मी त्यांना सांगितलं, हे  बीबीसीच्या धर्तीवर स्पॉटबेस्ड रेकॉर्डिंगआहे. त्यात आवाजाच्या क्वालिटीपेक्षा तुमच्या म्हणण्याला जास्त महत्त्व आहे तेव्हा कुठं त्यांची समजूत पटली. म्हणजे समजूत पटल्यासारखं त्यांनी दाखवलं.

शशिकला, रणजीत बुधकर, भारतमाताचे मालक ह्यांच्या मुलाखती घेण्यासाठी खूप दिवस गेले. शेवटी मला दारव्हेकरांनी मला पत्र लिहून कळवलं, तुम्हाला जमत नसेल तर तसं सांगा! मी संवाद लिहवून घेईन आणि आकाशवाणीच्या कलावंतांकडून वाचून घेईन. अशी तंबी देणारं पत्र पाहताच मी हादरलो. त्यांचं पत्र येताच मी आकाशवाणीत धावत गेलो. बरंसं काम झालं आहे. परवापर्यंत तुम्हाला रेकॉर्डिंग देतो. ठीक आहे, असं म्हणत मला त्यांनी जाण्याचा सिग्नल दिला.

कबूल केल्याप्रमाणे मी माझ्याडच्या कॅसेट त्यांना दिल्या. त्यांनी लगेच टेक्निशियनला बोलावलं आणि त्याच्याबरोबर जायला सांगितले. टेक्निशियननं अजिबात वेळ दवडता माझ्या कॅसेट आकाशवाणीच्या टेपवर कॉपी केल्या. थोडं ऐकल्यावर तो म्हणाला, नो प्रॉब्लेम!

हिंदी सिनेमाला ७५ वर्षें झाली तेव्हाचे अनुभव आणखी केव्हा तरी!

रमेश झवर


No comments: