Thursday, September 9, 2021

देवा तूचि गणेशु…

जे तुजाविषी मूढु। तेयांलागी तूं वक्रतुंडु। ज्ञानियां तरि। उजू चि अससि॥

 गणपतीचे खरे  स्वरूप मूर्खांना कळलेलेच नाही. मूर्खांना गणपती वाकड्या तोंडाचा वाटतो. परंतु ज्ञानी माणसांना तो तसा वाटत नाही. त्यांना त्याचे स्वरूप उजळच वाटते, असे सतराव्या अध्यायात गणेशाला वंदन करताना ज्ञानेश्वर म्हणतात. ज्ञानेश्वर सहसा कठोर शब्द वापरत नाहीत. परंतु गणपतीचे खरे स्वरूप ज्यांना कळले नाही त्यांची त्यांनी मूर्ख अशी संभावना केली आहे. सतराव्या अध्यायाच्या सुरूवातीलाच ही ओवी आली आहे. गणपती ही बुध्दीची देवता आहे  हे शास्त्रांचे, पुराणांचे म्हणणे ज्ञानेश्वरांना पूर्णतः मान्य आहे. पण त्यांच्या प्रज्ञेने आणि प्रतिभेने वेगळा अर्थ लावला.  बुध्दीची देवता ही गोंडस, नीटस असली पाहिजे असा अनेकांचा समज आहे, तो समज गणपतीने खोटा ठरवला आहे. चांगला दिसणारा मनुष्य हा बुध्दिमान असेलच असा नियम नाही. प्रत्यक्षात जसा तो असतो तसा तो दिसेलच असे नाही. दिसण्याचा आणि खरोखरच तसा असण्याचा काही संबंध नाही असाच सार्वत्रिक अनुभव आहे. अनेक माणसे गबाळी दिसतात. परंतु  ती बोलायला लागली की त्यांच्या बुध्दीमत्तेचे दर्शन घडते. ते अत्यंत तीक्ष्ण बुध्दीचे आहेत असे ऐकणा-यांना वाटू लागते.

इतर देवांप्रमाणे गणपतीचे धड माणसाचे असले तरी त्याचे मुख मात्र मानव प्राण्याचे नाही. त्याला हत्तीचे तोंड बसवले आहे. ते कां बसवावे लागले ह्याची कथा पुराणात आली आहे. पुराणातल्या गोष्टी इथे सांगत नाही. कारण त्या सगळ्यांना माहित आहेत. गणेशाला हत्तीचे तोंड कां बसवण्यात आले ह्याची कथा इतकी प्रचलित आहे की ती सांगण्याचे कारण  नाही! गणपतीचे कान सुपासारखे आहेत. हत्तीप्रमाणे त्याचेही सुळे बाहेर आलेले आहेत. त्याला चार हात आहेत. एका हातात परशु तर दुस-या हातात अंकुश. अन्य दोन हातांपैकी एका हातात मोदक तर अन्य हात आशिर्वाद देणारा !  बुध्दीचा देव म्हणवल्या गेलेल्या गणपतीचे हे विचित्रध्यानका, असा प्रश्न अनेकांना पडतो. पुराणातल्या गोष्टी बुध्दीला पटणा-या नाहीत. पुराणातल्या गोष्टींचा भर चमत्कारावर अधिक. अतिशयोक्तीपूर्ण आधुनिक विचारांवर पोसलेल्या माणसांना त्या पसंत पटत नाही.

गणेशाच्या हातातला परशु हा जणू तर्कबुध्दीच तर अंकुश हा शत्रूंचा नीतीभेद करून टाकणारा. हातातला मोदक जणू काही वेदान्ताचा महारसच वगैरे उपमादृष्टान्तांनी ज्ञानेश्वरांनी गणपतीचे बहारदार वर्णन केले आहे. त्याखेरीज काव्यनाटकांचे स्थान तर क्षुद्रघंटिकाच, असे ज्ञानेश्वर म्हणतात. ज्ञानेश्वरांनी केलेले गणपतीचे हे वर्णन  उपमा-उत्प्रेक्षादींचा विचार केला तर मनोहर आहे. परंतु ह्या वर्णनात बालगणेशाचा गोंडसपणा मात्र अजिबात नाही. किंबहुना ज्ञानेश्वरांनी गणपतीच्या दृश्य रुपाला मह्त्त्वच दिले नाही. प्रमाणबध्द अवयव, गोंडसपणा, गुटुगुटित शरीरयष्टी वगैरे मुळगावकरी चित्रशैलीचा अभाव असलेली गणपती ही एकच देवता असावी. रविवर्म्यानेही गणपतीचे चित्र असेच काढले आहे. बिचारे रवीवर्मा. त्यांचा  नाईलाज झाला असावा. पुराणात जसे गणपतीचे वर्णन करण्यात आले आहे. अगदी त्याबरहुकूम चित्र रविवर्म्याला काढणे भाग पडले असावे !

अथर्वशिर्षात गणपतीच्या स्वरूपात आध्यात्मिक दृष्टीकोणातून प्रकाश टाकला आहे. विशेष म्हणजे अथर्वशिर्षात अध्यात्मातील चारी महावाक्ये आली आहेत. प्रज्ञानम्‌ ब्रह्म, अहं ब्रह्मस्मि, तत्त्वमसि, अयं आत्मा ब्रह्म  ह्या  चार वाक्यांत आध्यात्य विद्येचा सारांश आला आहे. ही चार महावाक्ये मूळ उपनिषदातील असून सगळे अध्यात्मशास्त्र ह्या महावाक्यांभोवती गुंफलेले आहे. १६ श्लोकांच्या अथर्वशिर्षात ही चारी महावाक्ये आलेली आहेत. गणपतीच्या स्वरूपात अ‍वघे अध्यात्मशास्त्र आलेले असे म्हटले तरी चालेल. बुध्दीच्या देवतेचे हे स्वरूप गणेशोत्सवात दिसावे अशी अपेक्षा बाळगण्यात अर्थ नाहीगणेशोत्वाचे जे चित्र महाराष्ट्रात सर्वत्र दिसते त्याचा अध्यात्माचा काही संबंध नाही. देवाचे सगुण, साकार स्वरूप तर सगळ्यांना माहित आहे. पण देवाचे स्वरूप निर्गुण, निराकारही आहे. भजनपूजनाची सुरूवात गणेशाच्या वंदनाने करण्याचा प्रघात आहे. बुध्दि विकसित झाली की कार्यसिध्दी होणारच असे पूजाविधीच्या जाणकारांना अभिप्रेत आहे. पूजेमुळे कार्यसिध्दी झाल्याचा अनुभव अनेकांना आला आहे. कोणत्याही उत्सवासाठी सामान्यतः  देवाचे सगुण साकार रूपच निवडावे लागते. त्यामागचा हेतू हा की बुध्दीच्या देवतेची आराधना करता करता बुध्दि जागृत व्हावी! जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची कल्पना लोकमान्य टिळकांची. त्यांनी सुरू केलेला गणेशोत्सव महाराष्ट्रात अजूनही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तो सुरूच राहील असे वाटते.

रमेश झवर

No comments: