अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद देऊन स्थापन झालेले भाजपाचे सकाळी ६ वाजता स्थापन झालेले सरकार जितके अशोभनीय होते तितकेच महाराष्ट्रात होऊ घातलेले सत्तान्तरही अभोभनीयच! महाराष्ट्र विकास आघाडीतील शिवसेना हा प्रमुख पक्ष फोडून भाजपा आणि फुटिर पक्षाबरोबर नवे सरकार स्थापन करण्याच्या बाबतीत दिल्लीतील भाजपा नेत्यांना यश मिळाले असले तरी आगामी निवडणुकीपर्यत धनुष्यबाणाचा चिन्ह गोठवण्याचा प्रश्न शिल्लक राहतोच. ह्या प्रश्नात उध्दव ठाकरे हात घालतील तसा एकनाथ शिंदे ह्यांनाही हात घालावा लागणारच. धनुष्यबाणाच्या टणत्काराच्या भाजपासह शिंदे ह्यांनाही सामोरे जावेच लागेल! युध्दात आणि प्रेमात सर्व काही क्षम्य आहे. हे वचन राजकारणालाही लागू आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गोटातील आमदार फोडून भाजपाने सत्तान्तराची रणदुंदुभी फुंकली. सत्तान्तरही जवळ जवळ घडवून आणलेच आहे. उध्दव ठाकरे मुख्यख्यमंत्रीपदावरून स्वत:हून पायउतार झाले. इतकेच नव्हे तर, त्यांनी विधानपरिषदेच्या सभासदत्वाचाही राजिनामा दिला. एक प्रकारे त्यांनी बदलते राजकीय वास्तव लगेच स्वीकारले. ह्या राजकीय परिस्थितीत एक मात्र लक्षात घेतले पाहिजे की राजिनामा हे त्यांचे पहिले पाऊल आहे!
नवे सरकार स्थापन झाल्यानंतर
ठाकरे ह्यांची पावले कोणत्या दिशेने पडतील हे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी फुटीर आमदारांच्या घरांतील
बायकामुलांच्या संरक्षणात कोणताही उणीव राहू न देण्याची सावधगिरी बाळगली. शिवसेनेतच्या
दोन गटात अंतर्गत दंगली होणार नाही ह्याची काळजी घेतली. अर्थात बंडखोरीनंतर त्यांनी
जारी केलेल्या राजपत्रांची चौकशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ह्यांनी सुरू केली आहे.
अर्थात त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा नाही. कदाचित् त्यांच्याकडून काही राजपत्रे रद्दही
केली जातील. ह्यापूर्वीच राज्यपाल नियुक्त आमदारांची नेमणुकीची शिफारस त्यांनी दाबून
ठेवली. त्यात त्यांचा आडमुठेपणाही दिसून आला. त्या नेमणुका आजतागायत झाल्या नाहीत.
शिवसेनेची ताकद खच्ची करण्याचा त्यांच्या ‘उद्योग’ आजतागायत सुरू आहे.
उध्दव ठाकरे ह्यांनी राजिनामा दिला नसता तर विधानसभा अधिवेशन सुरू असतानाच्या काळातच
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट जारी करण्याची केंद्राला शिफारस करण्यापर्यंत त्यांची
मजल गेली असती. ठाकरे ह्यांचे सरकार पाडण्यासाठी बंडखोरी, सभागृहात अविश्वासाचा ठराव
वगैरे सर्व सूक्तसूक्त मार्गाचा अवलंब करायला दिल्लीस्थित भाजपाश्रेष्ठींनी मागेपुढे
पाहिले नाही. आजची वस्तुस्थिती हा उद्याचा इतिहास आहे!
निवडणुकीच्या मैदानात धनुष्यबाणाचा टणत्कार पुन्हा एकदा हाच एकमेव पर्याय ठाकरे ह्यांच्यापुढे आहे. अर्थात हा पर्याय निश्चितच अवघड आहे. मुळात धनुष्य पेलणे हे नेहमीच अवघड असते. कधी काळी मुंबई बंद करणा-या
शिवसेनेला रोज एकेक उपनगर बंद करण्याचा मार्ग शिवसेनेला अवलंबावा लागला होता. परंतु
त्यातूनही शिवसेनेचा सत्तेपर्यंतचा प्रवास यशस्वी झाल्याचे उदाहरण आहे. बाळासाहेबांच्या
पश्यात हे काम अवघड आहे हे खरे. पण ते काम करून दाखवण्याचे ‘शिवबंधन’ त्यांना हाती बांधावेच लागेल.
आज शिवसेनेची जरी थोडी पिच्छेहाट झालेली असली तरी ती उद्याच्या यशाकडे डोळे लावून ती
त्यांना सहन करावीच लागेल. किंबहुना तीच त्यांच्या राजकारण्याची कसोटीही ठरणार. देशाच्या
दृष्टीने विचार केल्यास ती लोकशाही राजकारणाचीही कसोटी ठरणार आहे. ममता बॅनर्जींना
भाजपाला टक्कर दिली. आता ती पाळी शिवसेनेवर आली आहे. ममता बॅनर्जी भाजपाला पुरून उरल्या.
उध्दव ठाकरे त्याला पुरून उरतात का एवढेच पाहायचे राहणार आहे.
रमेश झवर