Sunday, July 24, 2022

थँक्यू मिलॉर्ड

 न्यासत्यव्रत सिन्हा ह्यांच्या  स्मृत्यर्थ रांची येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत स्वतःच खटला चालवत असल्याचा आव आणणा-या प्रसारमाध्यमांना  सरन्यायाधीश एन व्ही रमण ह्यांनी खडे बोल सुनावले हे योग्यच आहे… थँक्यू मिलॉर्ड! अलीकडे न्यायालयासमोर सुरू असलेल्या खटल्याच्या संदर्भात वार्ताहरअँकर वगैरे मंडळी स्वतःचे मत दडपून लिहीत असतात, बोलत असतातवस्तुतप्रसारमाध्यमांत कायद्याचे पदवीधर असलेल्या पत्रकारांची संख्या कमी आहे. ज्यांच्याकडे कायद्याची पदवी असते त्यांनीदेखील चालू न्यायालयीन सुनावणीच्या काळात मतप्रदर्शन करणे शहाणपणाचे ठरणार नाहीह्याचे भान अनेकांना नाही. मुळात पत्रकारांना अभिव्यक्त स्वातंत्र्य असले पाहिजे हे मान्य केले तरी त्यांना मिळालेले स्वातंत्र्य  क्वालिफाईड’ स्वरूपाचे आहेदुस-या शब्दात सांगायचे तर पत्रकारांच्या अधिकारांचे संहिताकरण झालेले नाहीह्याचाच अर्थ पत्रकारांच्या तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्यात्या संदर्भात संबंधित न्यायाधीशाचे मत अंतिम मानले जाते.  अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चर्चा अधुनमधून सुरू आहे ह्याचे कारणही हेच आहे. लोकसत्तेतले माझे सहकारी अजित गोगटे हे सेशन्स कोर्टातील महत्त्वाच्या खटल्यांचे  आणि मुंबई हायकोर्टातील  अपिलांच्या सुनावणीचे रिपोर्टिंग करत असत. गोगटे ह्यांनी दिलेल्या बातम्यांवद्दल सेशन्स अवा हायकोर्टाच्या न्यायनूर्तींनी एकदाही व्यक्तिश: त्यांच्यावर किंवा लोकसत्तेवर ठपका ठेवला नाही!

पत्रकारांकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तलवार आहे हे वादातीत आहेक्त  लढाई करताना त्याने ती मोडून घ्यायची नसते खूप वर्षांपूर्वी जळगाव येथे पत्रकारसंघाच्या परिसंवादात भाग घेताना मी माझे मत व्यक्त केले होतेकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई सकाळचे त्यावेळचे संपादक माधव गडकरी होतेत्यांनी मला प्रतिप्रश्न केला, ’तलवार मोडली तर काय होईल?’

तलवार मोडली तर पत्रकार लढाईत पराभूत होणार त्याला दुसरी तलवार मिळेपर्यंत त्याचा कदाचित् मुडदाही पडू शकेल!’

माझ्या उत्तरावर गडकरी खळाळून हसले.

रमेश झवर



Friday, July 15, 2022

शब्द बिचारे बापुडवाणे

संसदेचे अध्यक्ष ओम बिर्ला  ह्यांनी असंसदीय शब्दांची यादी जाहीर केली. त्या यादीतील शब्द संसद सभासदांनी वापरले तर त्यााच्या भाषणाची संसदीय कामकाजात नोंद केली जाणार नाही. ओम बिर्ला ह्यांचा हा निर्णय सरकारविरोधी होणा-या टिकेची धार बोथट करण्याचा प्रयत्न आहे ! संसदेत भाजपा खासदारांची संख्या मोठी असली तरी बहुतेक सभासदांचे भाषाज्ञान मुळातच सामान्य आहे. ह्याचे कारण बहुसंख्य  भाजपा सभासद हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या मातृसंघटनेतून  आले आहेत. संघात गुरूजींच्या प्रवचनानंतर प्रश्न विचारण्याची पध्दत नाही. बहुतेक स्वयंसेवक श्रोता व्हावे सावधान आता सांगतो उत्तम गुण’  ह्या दासबोधातील श्लोकाच्या मुशीत तयार झालेले आहेत. विषय कितीही गहन असला तरी गुरूजींना प्रश्न विचारायचा नाही असा दंडक आहे. बहुसंख्य  स्वयंसेवक कालान्तराने भाजपाच्या लाटेत निवडून आले आहेत. त्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासाला प्रश्न त्यांनी विचारले नाही. फार काय, कोणत्याही ठरावावरील चर्चेत भाग घेतला तरी अडचणीचा मुद्दा उपस्थित करायचा नाही असेही त्यांनी ठरवलेले असावे.

इंदिराजी जेव्हा पंतप्रधान होत्या तेव्हा काँग्रेसचे अनेक ढ उमेदवार निवडून आले होते. महाराष्ट्र विधानपरिषदेत अनेक काँग्रेस सभासद फक्त कँटीनमध्ये काय ते तोंड उघडत असत!  विधानसभेतील स्थितीही फारशी वेगळी नव्हती. नेहरूंच्या काळात लोकसभेत वक्तृत्व गाजवणारे अनेक खासदार होते. त्यांची भाषणे म्हणजे वक्तृत्व कलेचा नमुना म्हणून आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. नेहरूंच्या काळातले स्वतंत्र पक्षाचे पिलू मोदी, जनसंघाचे वाजपेयी, प्रजासमाजवादी पक्षाचे नाथ पै हे चांगले वक्ते होते. त्या काळात अनेक मंत्रीही हजरजबाबी होते. २०१४ पासून मात्र संसद सभासदांना लिहून दिलेला मजकूर वाचण्याचे कष्ट घ्यावे लागतात. तेव्हा बिर्ला ह्यांनी तयार केलेली असंसदीय शब्दांची यादी, खरे तर, विरोधी खासदारांना उद्देशून आहे हे उघड आहे. वास्तविक लोकसभेत सा-या राज्यांचे प्रतिनधी निवडून आले आहेत. बहुतेक खासदारांना दाक्षिणात्य नावांचा उच्चारही धड करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. दाक्षिणात्य खासदारांना काही अपवाद वगळत हिंदीत संभाषण करता येत नाही! नावांचा उच्चार त्यांच्या भाषेत जसा करतात तसाच उच्चार करण्याचा  प्रयत्नही हिंदीभाषक करताना दिसत नाही. भाजपा राजवटीतही ह्या परिस्थितीत विशेष फरक पडला नाही. लोकसभा अध्यक्षांच्या आडनावाचा उच्चार बिर्लानसून बिडलाआहे!  इंग्रजांच्या काळात ऐवजी हे अक्षर वापरण्याचा प्रघात पडला. बिर्लांचे बिडला झाले.  बिडला नाव हे मूळ राजस्थानी लोकांना ठाऊक आहे. अन्य प्रांतातल्या लोकांना ते माहितसुध्दा नाही. निर्वाचन अर्ज कोणत्याही भाषेत असला तरी त्यात अर्जदाराला स्वतःचे नाव देवनागरीतही लिहावे लागते. बिर्लांनी असंसदीय शब्दांची ज्याप्रमाणे यादी केली तशी खासदारांच्या नावांचीही एखादी ध्वनीफीत तयार करवून घ्यायला हरकत नाही.

आक्षेपार्ह शब्दांची संसदीय यादी तयार करण्याचे काम हाती घेऊन संसदेपुरते का होईना भाषाशुध्दीच्या दिशेने ओम बिडला ह्यांनी टाकलेले पहिले पाऊल स्वागतार्ह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी बिडलांप्रमाणे पावले टाकणे आवश्यक आहे. लोकसभा अध्यक्षांना त्पायांनी संपूर्ण पाठिंबा द्यावा. असा पाठिंबा अनेक प्रकारे देता येणे शक्य आहे. सर्वप्रथम मोदींनी आपल्या सहकारी मंत्र्यांना चांगले हिंदी बोलण्यास शिकवावे. त्यांना उत्तेजन द्यावे. सध्याच्या राजकारणात शब्द बिचारे बापुडवाणे झाले आहेत !  सगळ्यांना चांगले हिंदी बोलता यायला लागले तर शब्दांचे बापुडवाणेपण थोडे तरी कमी होईल.

रमेश झवर

Wednesday, July 13, 2022

सद्गुरू अटकमहाराज

गुरू अडक्याला तीन !...देशात स्वत:ला गुरू म्हणव-यांची संख्या अफाट आहे. त्यांच्यामुळे गुरूसंस्था बदनाम झाली. अजूनही ह्या परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. विशेष म्हणजे दुस-या गुरूंचा आणि त्यांच्या शिष्यांचा उपहास करणारेच अधिक! माझे सुदैव असे की अशा गुरूंच्या भानगडीत मी पडलो नाही. असे गुरूही माझ्या भानगडीत पडले नाहीत! माझे गुरू गजाननमहाराज अटक हे टेलिफोन खात्यात नोकरीला होते. ऑफिस बॉय म्हणून लागले. हेडक्लार्क म्हणून रिटायर झाले. माझी जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा ते ४२ वर्षांचे होते. मी ३५-३६ वर्षांचा होतो. माझे मित्र हेमंत कारंडे ह्यांनी  नायगाव टेलिफोन कार्यालयात त्यांची भेट घालून दिली. ऑफिस सुटल्यावर आम्ही तिघे चालत दादर स्टेशनला चालत आलो. अटकमहाराजांना कर्जत लोकल पकडायची होती म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही दोघेही त्या प्लॅटफॉर्मवर गेलो. गाडीत चढण्यापूर्वी मला उद्देशून अटकमहाराज मला म्हणाले, या कर्जतला एकदा. माझ्या मित्रमंडळींची तुम्हाला ओळख करून देतो.

योगायोगाने लोकसत्तेत माझ्या कंपनीने टाळेबंदी घोषित केलेली होती. मला भरपूर सुटी होती. नोव्हेबरमध्ये मला कर्जतला पौर्णिमेच्या रात्री जाण्याचा योग आला. मी आणि कारंडे  'स्लो लोकल' पकडून कर्जतला गेलो. सहा वाजता त्यांच्या घरी पोहोचलो. चहापाणी झाल्यावर मी आणि कारंडे महाराजांसह दहीवलीहून शिरसे येथे जायला निघालो. शिरसे गावात अप्पा कांबळे ह्यांच्या घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा चहापाणी वगैरे नित्याचा कार्यक्रम झाला. अप्पा कांबळेंबरोबर आम्ही तमनाथाच्या दर्शनाला गेलो. तमनाथाचे दर्शन घेऊन झाल्यावर थोडं उल्हास नदीच्या काठी गप्पा मारत बसलो. अंधार पडायला सुरूवात झाली. आम्ही  माघारी फिरलो. हातपाय धवून पुन्हा गप्पांचा फड रंगला. आणखी एकेक जण येत राहिला. १५-२० जण जमल्यावर अप्पा म्हणाले, 'चला, मंडळी पानं लावली आहेत. दोन घास खाऊन घ्या अशी माझी विनंती आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन सारे जण आतल्या खोलीत जेवायला बसलो. पत्रावळीवर भात आणि द्रोणात जहाल तिखट वरण एवढाच काय तो मेनू. माझी जरा पंचाईत झाली. मी खानदेशाचा. नुसता भात हे माझं जेवण कधीच नव्हतं.  अप्पांच्या ते लगेच ध्यानात आले. त्यांनी मुलीला तांदळाच्या भाकरी करायला सांगतले. त्यांची मुलगी मंगला हिने पाच मिनटात तांदळाची भाकरी माझ्या ताटात वाढली. माझा एकूण आहारच कमी होता हे बिचा-यांना काय माहित!

जेवल्यानंतर पुन्हा गप्पांचा फड. रात्रीचे बारा वाजायला ५ मिनटं कमी असताना अप्पांनी त्यांच्या पडवीत बारदानाची बिछायत केली. समोर पाटावर दत्ताची तसबीर, तसबिरीसमोर ज्ञानेश्वरीची प्रत बाजूला समई. दानवेमहाराजही आतल्या खोलीतून मुकटा नेसून आले. अटकमहाराजांचे दर्शन घेऊन ते स्थानापन्न झाले. दुस-या बाजूला अटकमहाराज बसले.  ज्ञानेश्वरीच्या पहिल्या दोन ओव्या आणि तुका आला लोटांगणीतुकारामाचा एक अभंग अशी प्रार्थना झाली. दानवे महाराजांनी आता तुम्ही बोलाअसं म्हणत प्रत्येकाला बोलायला लावलं. मला म्हणाले, झवरसाहेब, आता तुम्ही बोला!

माझ्यापुढे प्रश्न पडला, काय बोलावं ! मी मराठातल्या १-२ आठवणी सांगून वर्तमानपत्र कसं निघतं हे सविस्तर सांगितलं. जाता जाता ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय कॉलेजमध्ये अभ्यासाला होता हेही सांगितलं. 'मी कोणाच्या अध्यात नाही मध्यात नाहीअसं सांगितलं तेव्हा हंशा पिकला. माझी उत्सुकता ताणली होती, आता पुढे काय? पुन्हा एकदा चहा आला. मात्र, कोरा! तो चहा कसाबसा प्राशन केला. चारच्या सुमारास दानवेमहाराज म्हणाले, झवरसाहेब पुढे या.

हा प्रसंग माझ्या दृष्टीने कसोटीचा होता. मनाशी विचार केला, एवीतेवी कर्जतला येण्यासाठी आपण एवढा वेळ घालवलाच आहे तर आणखी ते काय म्हणू इच्छितात ते ऐकून घ्यायला हरकत नाही. मी पुढे सरकलो. अतिशय हळू आवाजात ते म्हणालेमी जो मंत्र म्हणतोय्‌ त्याचा जसाचा तसा उच्चार करा. त्यांनी उच्चारेल्या षडाक्षरी मंत्राचा मी बरोबर उच्चार केला. त्यावेळी प्रसन्नतेने त्यांचा चेहरा उजळून निघाला. आणखी एक गुह्य तुम्हाला मी समजावून सांगतो. ते म्हणजे ला जोडून असलेल्या अर्धा आणि मिळू जो उच्चार होतो तो करू नका. चुकून झालाच तर आवंढा गिळून मघाशी दिलेल्या मनातल्या मनात मंत्राचा पुनरुच्चार करा. बस्स. तुम्हाला जे दिलंय्‌ ते सांभाळत कामधंदा करा. घरसंसार करा. तुम्ही पत्रकार आहात. तुम्हाला मी अधिक सांगण्याची गरज नाही. नंतर त्यांना नमस्कार करून मी बाजूला होणार तोच त्यांनी मला थांबवले. दर्शन घेण्याची विशिष्ट पध्दत त्यांनी माझे प्रत्यक्ष दर्शन घेऊन दाखवली.  दर्शन घेणा-याला जास्त काळ थांबवायचे नसते. आदेशअसा उच्चार करून त्याला तत्काळ मोकळे करायचे असते. वस्तुत: दर्शनसुख हीच खरी सुखानैव समाधी. दर्शन हीच गुरूला खरी दक्षिणा. पत्नी आणि मुलाबाळांनी घरातल्या कर्त्यांसह सगळ्यांचे दर्शन घ्यायचे असते.  वस्तुतः हात जोडून कर्ता पुरूषही तुमचे दर्शन घेत असतो. त्यावेळी तो मनातल्या मनात गुरुब्रह्मा गुरुर्विष्णूहा श्लोक म्हणत असतो. दर्शन घेणाराही मनातल्या मनात मिळालेल्या बीजमंत्राचा उच्चार करत असतो. अशा ह्या दर्शनविधीला आत्यंतिक महत्त्व आहे.

 भारावलेल्या अवस्थेत मी जागेवर बसलो. त्यांनी दिलेले गुह्य पत्रकारितेत सांभाळणे अवघड जाईल ह्याची जाणीव मला लगेच झाली.  सकाळी साडेपाच-पावणेसहा वाजता कार्यक्रम संपला. प्रार्थना झाली. प्रार्थनेत ज्ञानेश्वरीतील पसायदान १० ओव्या आणि नामदेवांच्या अभंगाचा ( कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो माझिया विष्णूदासा भाविकांसी ) समावेश होता. लहानथोर वगैरे भेद बाजूला सारून प्रत्येक जणाने एकमेकांचे दर्शन घेतले. मीही बाकींच्या अनुकरण केले. मला दर्शनमात्रे कामनापूर्ती ह्या अभंगाचा अर्थ मला त्या दिवशी समजला !

ज्ञानेश्वरांना त्यांचे बंधू निवृत्तानाथ. निवृत्तीनाथांना गहिनीनाथांनाकडून अशी ही गुरूंची पूर्वपरंपरा थेट आदिनाथापर्यंत जाऊऩ भिडते. हीच नाथपरंपरा आहे. आधुनिक काळात संसारी जनांसाठी दीक्षा देण्याच्या पध्दतीत बदल होत गेला तरी मूळ मंत्र आणि गुह्य ह्यात अजिबात बदला झालेला नाही. गजाननमहाराज अटक  ह्यांना मामासाहेब दांडेकरांकडून दीक्षा मिळाली होती. खुद्द मामांना जोगमहाराजांकडून ! आधुनिक काळात रामकृष्ण परमहंस, विवेकानंदापर्यंतची पूर्वसूरींची नावे सांगितली जातात. परंतु ऐतिहासिक काळातली ह्याहून अधिक नावे सांगितली जात नाहीत. एखाद्या कुळात बेचाळीस पिढ्यांची नावे कुणालाच माहित नसतात. जास्तीत जास्त आधीच्या सात पिढ्यांपर्यंत नाव सांगितली जातात. कर्तबगार पुरूषांच्या चरित्रात वा आत्मचरित्रात  वंशवेलीचा विस्तार कसा झाला ह्याचा आकृतीबंध देण्याची एके काळी पध्दत होती. तीही आता राहिलेली नाही.

प्रत्येक गुरू परंपरेचे म्हणून स्वत:चे असे काही वैशिष्ट्य असते. मला ज्या पध्दतीने अनुग्रह मिळाला असेल त्याच पध्दतीने तो इतरांना मिळाला असेल असे खात्रीपूर्वक सांगता येणार नाही. इत्यलम्‌ !

रमेश झवर

Wednesday, July 6, 2022

सत्तान्तराचे महाभारत

 गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडून राज्यात भाजपाची सत्ता आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचे उजवे हात गृहमंत्री अमित  शहा ह्यांचा प्रयत्न यशस्वी झाला. आधी देवेंद्र फडणवीस ह्यांना हाताशी धरून त्यांनी प्रथम शिवसेना फोडली. नंतर फुटलेल्या शिवसेनेबरोबर युती करून राज्यात युतीचे सरकार  सरकार स्थापन करण्यात यश मिळवले, ह्या फाटाफुटीमुळे एकप्रकारे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत आयाराम-गयाराम’ संस्कृती दृढमूल होच चालल्याचे चित्र निर्माण झाले. आयाराम-गयाराम संस्कृती महाराष्ट्रात प्रथमच अवतरली असे मुळीच नाही. इतिहासावर नजर टाकली तर असे सहज लक्षात येईल की, महाराष्ट्राला दुफळीचा शाप आहे. दिल्लीचे राजकीय वर्चस्व महाराष्ट्राला मान्य करायला लावणे हाच ह्या सत्तान्तरामागे भाजपा  सरकारचा राजकीय उद्देश आहे.

महाराष्ट्रावर आणि त्यातही किमान मुंबईवर वर्चस्व स्थापन करण्याच्या प्रयत्नांमागे राजकारणाखेरीज अन्य अनेक हेतू आहेत. मोदींना रिलायन्ससाठी इथनेल हवे होते. त्यासाठी त्यांनी बारामतीला जाऊन शरद पवारांची भेटही घेतली होती.  पण शरद पवारांनी दाद दिली नाही. रिझर्व्ह बँकेच्या राखीव निधीवरही मोदी सरकारने डल्ला मारला. एकनाथ शिंदेना तूर्त मुख्यमंत्रीपद देऊन आधी मुंबईवर आणि नंतर सावकाश महाराष्ट्रावर पकड घट्ट करण्याचा हा प्रयत्न आहे. ठाकरे ह्यांचे सरकार पाडल्यामागे सहाराष्ट्राच्या राजकारणावरील शरद पवारांची पकड ढिली करण्याचाही हा प्रयत्न होता. तो आज घडीला यशस्वी झालेला दिसतो.   

देशाच्या राजकारणाची सूत्रे दोघा गुजराती राजकारणाच्या हातात आहेत. उत्तरेत योगीजींच्या मदतीने भाजपाची सत्ता कायम राहिली. नितीश कुमारांच्या मदतीने बिहारवर मोदी भाजपाने थोडेफार वर्चस्व ठेवले आहे. राजस्थन, पंजाब आणि खुद्द दिल्लीववर वर्चस्व स्थापित करण्याच्या बाबतीत मात्र दोघांनाही यश मिळाले नाही. मध्यप्रदेश अफू आणि गांजासाठी प्रसिध्द आहे. तेथे भाजपाचे वर्चस्व पूर्वीपासून आहे. परंतु ह्या सगळ्या राज्यांवरील वर्चस्वाला मुंबईवरील वर्चस्वाची सर येत नाही. मुंबईवर वर्चस्व म्हणजे तरी काय ? रिलायन्स आणि अदानी समूहाची मुख्य प्रशासन महाराष्ट्रातून चालवले जाते. अदानींना जमेल त्याप्रकारे मध्य रेल्वे हवी आहे. ह्यापूर्वी कांडला बंदराला लागून असलेली शेकडो एकर जमीन देऊनही अदानी तेथे काही करू शकले नाही. हळुहळू त्यांनी गुजरातमध्न काढता पाय घेतला आणि महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले. हातात असलेल्या होलसेल रिटेलखेरीज रिलायन्सला देशात येऊ घातलेल्या  डाटा व्यवसायावर वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. दोघांच्याही हिताला महाराष्ट्राकडून कळत न कळत धक्का बसू शकतो हे मोदी-शहा ओळखून आहेत. ह्या परिस्थितीत मोदी- शहा राज्यातल्या विरोधी सरकारचा धोका पत्करू इच्छित नाही. ह्यापूर्वी  मोरारजी देसाईंचा प्रयत्न संयुक्त महाराष्ट्राचा चळवळीने उधळला गेला. तो यशस्वी झाला असता तर मुंबई कधीच केंद्रशासित झाली असती.

अलीकडच्या काळात महाराष्ट्राची अस्मिता किती तकलादू आहे हे मोदी-शहांच्या लक्षात आले आहे. म्हणूनच शिवसेनेत फूट पाडून त्यांनी एकनाथ शिंदे ह्यांना मुख्यमंत्रीपदावर बसवले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांना उपमुख्यमंत्रीपदावर बसवले अणि तेही चूपचाप बसले. एकनाथ शिंदे हे किती काळ मुख्यमंत्री राहतील ? ते जास्तीत जास्त २०२४ पर्यंत राहू शकतात, हे मोदी-शहांनी गृहित धरलेले असू शकते. किंबहुना शिंदे ह्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होऊ देण्यासही मोदी-शहांची ना नसावी. काहीही करून उध्दव ठाकरे ह्यांचे नेतृत्व संपुष्टात आणण्याची जबाबदारी भाजपाने शिंदेंवर टाकली आहे. त्यात त्यांना यश आले तर उत्तमच. अन्यथा यथावकाश शिंदे ह्यांचीही गच्छन्ती अटळ आहे.

हे सत्तान्तराचे महाभारत महाराष्ट्रात का घडवून आणण्यात आले हे नीट समजून घेण्याची गरज आहे.

रमेश झवर

Friday, July 1, 2022

अजब न्याय वर्तुळाचा !

 शिवसेनेतून फुटून महाराष्ट्रातले मविका आघाडी सरकार पाडल्याबद्दल एकनाथ शिंदे ह्यांना जेमेतेम उरलेल्या कालावधीत मुख्यमंत्रीपद देण्यात आले तर देवेंद्र फडणवीस ह्यांना त्यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले हा केंद्रीय नेते अमित शहांनी दिलेला हुकूम हा वर्तुळाचा अजब न्याय आहे !  अडीच वर्षांपूर्वी भाजपाला बहुमत मिळूनही राज्यात भाजपाची देवेंद्र फडणविसांना  आणता आले नव्हते. त्या वेळी रा।ट्रवादीचे नेते अजितदादा पवारांना राष्ट्रवादीतून खेचून आणले होते. राष्ट्रवादीचे नेते शगद पवार ह्यांच्या सल्लामसलतीने उध्दव ठाकरे ह्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले होते. ते सरकार पाडण्याची खेळी करून ज्येष्ठ नेते शरद पवारांवरही ह्यांच्यावरही भाजपाने काहीशी मात केल्याचे चित्र दिसत आहे. सत्तान्तराच्या ह्या राजकारणाला आणखीही कंगोरे आहेत.

मुंबईवर गुजरातचा पूर्वीपासूनल डोळा आहे. मुंबईतल्या रिझर्व बँकेसारख्या संस्था, रिलायन्स आणि आयुर्विमा महामंडळासारख्या संस्थांवर येणकेण प्राकरेण वचक ठेवण्याचा छुपा प्रयत्नही आहे. ’मराठी माणसाला राजकारणाखेरीज व्यापारधंद्यात काय कळतं ?’ असा प्रश्न गुजरातमध्ये रोजच्या साध्सुध्या संभाषणातही विचारला जातो ! एके काळी गायकवाडांचे गुजरातेते बडोदा संस्थानचे राज्य होते. त्या काळी बडोदा संस्थातातील अनेक गुजराती मंडळींना सयाजीमहाराजांचे राज्य सहन होते नव्हते असा उल्लेख बडोद्याची ज्यांना माहिती आहे त्यांना हे माहित आहे. मोरारजी देसाई ह्यांना मुंबई शहर गुजरात राज्यात हवे होते. देशभरभाषावार प्रांतरचना अस्तित्तवात येऊनही महाराष्ट्र आणि गुजरात असे जोड व्दिभाषिक राज्य होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली नसती तर मुंबई महाराष्टाला मिळाली नसती. मोरारजी देसाईंनंतर अनेक पिढ्या बदलल्या ! परंतु गुजराती नेत्यांची मनोवृत्ती मात्र बदललेली नाही. भाजपा नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघेही भाजपाचे नेते असले तरी दोघेही संघाच्या मुशीतले आहेत. भाजपादेखील स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवतो. शिवसेना स्वतःलाही हिंदुत्ववादी समजते. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री असलेले शिवसेनेचे राज्य खालसा करणे मोदी-शहांच्या दृष्टीने गैर नाहीच. तसेही लोकशाही राज्याच्या तत्त्वाशीही नव्या भाजपाला काहीच घेणेदेणे नाही !

राज्यात सहकारी कारखान्यांचे वर्चस्व आहे. अर्बन सहकारी बँकांचे तर महाराष्ट्रात जाळे पसरलेले आहे. सहकारी क्षेत्रावर वर्चस्व स्थापित करमण्यासाठी अमित शहांनी केंद्रात सहकार खाते स्थापन केले होते. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांकडून अंबानींच्या पेट्रोलियम प्रकल्पाला इथनेल मिळवण्यासाठी नोदींनी बारामतीलाही फेरी मारली होती. परंतु शरद पवारांनी त्यांना दाद दिली नाही. मुंबई ही अंबानींची राजधानी ! एकेकाळी  मोदींचा अंबानींकडे राबता होता. देशात ५जी स्पेक्ट्रम येऊ घातले. ते अंबानी समूहाला मिळावे म्हणून तर जिओ प्लॅटफॉर्म तयार ठेवण्यात आला आहे.

अमित शहा हे मोदींचे उजवे हात आहेत. मोदींना हवे ते घडवून आणणे हेच त्यांचे काम !  ही वस्तुस्थिती असली  तरी त्यांना ’उपपंतप्रधान’ पदाची अजिबात लालसा नाही. केंद्र सरकारला फडणविसांनी तोंडघशी पाडले होते. शहांनी त्यांना उपमुख्यमंत्रीपद घेण्यास भाग पाडले. वास्तविक फडणविसांना राष्ट्रीय राजकारणात घेऊन त्यांना अखिल भारतीय जनता पक्षाचे चिटणीसपद देता आले असते. ते त्यांनी दिले नाही. पुण्याचे प्रकाश जावडेकर मोदींनी ह्यांना राजकारणातून जवळ जवळ बाद केले. मोदी  शहांच्या नजरेत त्यांचे एखादे काम अपराध ढरले असावे. मात्र, नितिन गडकरी ह्यांच्या वाटेला मोदी सरकार गेले नाही. कारण, त्यांच्या वाटेला जाणे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निष्कारण खोड काढण्यासारखे ठरू शकले असते. त्यांच्याकडील खाते बदलण्याच्या फंदात मोदी-शहा पडले नाहीत ! महाराष्ट्राबद्दल मराठी नेत्यांबद्दल आकस हे गुजरातच्या राजकारण्यांचे जाऊ शकत नाही. ह्या परिस्थितीत शिवसेनेचे सरकार पाडणे हाच पर्याय मोदी-शहांपुढे होता. तो त्यांनी सामदामदंडभेद नीतीचा अवलंब करून पाडले.

उध्दव ठाकरे नको, देवेंद्र फडणवीस नको. फार काय, एकनाथ शिंदे हेही त्यांना नको. त्यांच्या मदतीने भाजपा तूर्त तरी राज्यात सत्तेवर आला आहे. २०२४ पर्यंतच्या कालावधीत देशात जास्तीत जास्त राज्यात भाजपाची सत्ता हवी आह एवढाच ह्या सत्तान्तराचा अर्थ आहे.

रमेश झवर