संसदेचे
अध्यक्ष ओम
बिर्ला ह्यांनी असंसदीय शब्दांची यादी
जाहीर केली. त्या यादीतील शब्द संसद सभासदांनी वापरले तर त्यााच्या भाषणाची संसदीय
कामकाजात नोंद केली जाणार नाही. ओम बिर्ला ह्यांचा हा निर्णय सरकारविरोधी होणा-या
टिकेची धार बोथट करण्याचा प्रयत्न आहे ! संसदेत भाजपा खासदारांची संख्या मोठी असली
तरी बहुतेक सभासदांचे भाषाज्ञान मुळातच सामान्य आहे. ह्याचे कारण बहुसंख्य भाजपा सभासद हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या
मातृसंघटनेतून आले आहेत. संघात
गुरूजींच्या प्रवचनानंतर प्रश्न विचारण्याची पध्दत नाही. बहुतेक स्वयंसेवक ‘श्रोता व्हावे सावधान आता सांगतो उत्तम गुण’ ह्या दासबोधातील श्लोकाच्या मुशीत तयार झालेले आहेत. विषय कितीही गहन असला तरी
गुरूजींना प्रश्न विचारायचा नाही असा दंडक आहे. बहुसंख्य स्वयंसेवक कालान्तराने भाजपाच्या लाटेत निवडून
आले आहेत. त्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासाला प्रश्न त्यांनी विचारले नाही. फार काय,
कोणत्याही ठरावावरील चर्चेत भाग घेतला तरी अडचणीचा मुद्दा
उपस्थित करायचा नाही असेही त्यांनी ठरवलेले असावे.
इंदिराजी
जेव्हा पंतप्रधान होत्या तेव्हा काँग्रेसचे अनेक ढ उमेदवार निवडून आले होते.
महाराष्ट्र विधानपरिषदेत अनेक काँग्रेस सभासद फक्त कँटीनमध्ये काय ते तोंड उघडत असत! विधानसभेतील स्थितीही फारशी वेगळी नव्हती.
नेहरूंच्या काळात लोकसभेत वक्तृत्व गाजवणारे अनेक खासदार होते. त्यांची भाषणे
म्हणजे वक्तृत्व कलेचा नमुना म्हणून आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. नेहरूंच्या
काळातले स्वतंत्र पक्षाचे पिलू मोदी, जनसंघाचे वाजपेयी, प्रजासमाजवादी पक्षाचे नाथ पै हे चांगले वक्ते होते. त्या
काळात अनेक मंत्रीही हजरजबाबी होते. २०१४ पासून मात्र संसद सभासदांना लिहून दिलेला
मजकूर वाचण्याचे कष्ट घ्यावे लागतात. तेव्हा बिर्ला ह्यांनी तयार केलेली असंसदीय
शब्दांची यादी, खरे तर, विरोधी खासदारांना उद्देशून आहे हे उघड आहे. वास्तविक लोकसभेत सा-या राज्यांचे
प्रतिनधी निवडून आले आहेत. बहुतेक खासदारांना दाक्षिणात्य नावांचा उच्चारही धड
करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. दाक्षिणात्य खासदारांना काही अपवाद वगळत हिंदीत
संभाषण करता येत नाही! नावांचा उच्चार त्यांच्या भाषेत जसा करतात तसाच उच्चार
करण्याचा प्रयत्नही हिंदीभाषक करताना दिसत
नाही. भाजपा राजवटीतही ह्या परिस्थितीत विशेष फरक पडला नाही. लोकसभा अध्यक्षांच्या
आडनावाचा उच्चार ‘बिर्ला’ नसून ‘बिडला’ आहे! इंग्रजांच्या
काळात ‘ड’ ऐवजी ‘र’ हे अक्षर वापरण्याचा प्रघात पडला. बिर्लांचे बिडला
झाले. बिडला नाव हे मूळ राजस्थानी लोकांना
ठाऊक आहे. अन्य प्रांतातल्या लोकांना ते माहितसुध्दा नाही. निर्वाचन अर्ज
कोणत्याही भाषेत असला तरी त्यात अर्जदाराला स्वतःचे नाव देवनागरीतही लिहावे लागते.
बिर्लांनी असंसदीय शब्दांची ज्याप्रमाणे यादी केली तशी खासदारांच्या नावांचीही
एखादी ध्वनीफीत तयार करवून घ्यायला हरकत नाही.
आक्षेपार्ह
शब्दांची संसदीय यादी तयार करण्याचे काम हाती घेऊन संसदेपुरते का होईना
भाषाशुध्दीच्या दिशेने ओम बिडला ह्यांनी टाकलेले पहिले पाऊल स्वागतार्ह आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी बिडलांप्रमाणे पावले टाकणे आवश्यक आहे. लोकसभा
अध्यक्षांना त्पायांनी संपूर्ण पाठिंबा द्यावा. असा पाठिंबा अनेक प्रकारे देता
येणे शक्य आहे. सर्वप्रथम मोदींनी आपल्या सहकारी मंत्र्यांना चांगले हिंदी
बोलण्यास शिकवावे. त्यांना उत्तेजन द्यावे. सध्याच्या राजकारणात शब्द बिचारे
बापुडवाणे झाले आहेत ! सगळ्यांना चांगले
हिंदी बोलता यायला लागले तर शब्दांचे बापुडवाणेपण थोडे तरी कमी होईल.
रमेश झवर
No comments:
Post a Comment