तरूण तेजपाल हा तेजस्वी पत्रकार असल्याचा साक्षात्कार अनेकांना त्या वेळी झाला. इंडिया टुडेमध्ये यकश्चित सबएडिटर असलेल्या तेजपालला स्वतःलाही आपण मोठे पत्रकार असल्याचा साक्षात्कार झाला. काळे धंदे करणारे भारतात अनेक लोक आहेत. तेजपालसारख्या तरूण पत्रकाराला हे लोक नेहमीच हाताशी धरतात. काळे धंदे करणा-यांच्या जगात भानगडीच्या फाईलींची 'खरेदीविक्री' चाललेली असते. फाईल देणारा कधीच समोर येत नाही. हे पत्रकार आणि त्यांना फाईली आणि पैसा पुरवणारे मध्यस्थदेखील नेहमीच 'समाज स्वच्छ' करण्याची भाषा बोलतात. ह्या पत्रकारितेला सोने समजून पत्रव्यवसायात आलेल्या अनेकांपैकी तरूण तेजपाल हा एक असाच तरूण. त्यामुळे पैशाच्या मोहाने तो घडला. बिघडला. शेवटी आपल्या मूळ वाटेकडे वळला. त्याची सहकारी असलेल्या तरूण महिला पत्रकाराशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याचे पाऊल त्याने टाकले. गोव्याच्या हॉटेलात मुक्कामास असताना त्याने बरोबर असलेल्या महिला पत्रकारावर लिफ्टमध्ये बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. हा आरोप येताच त्याला तहलका साप्ताहिकाचे संपादकपद सोडावे लागले; इतकेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून त्याच्याविरूद्ध गोवा पोलिसांनी गुन्हा दाखलही केला आहे. त्या गुन्ह्याचा तपास त्वरेने पार पडणार ह्यात शंका नाही.
ह्या प्रकरणाचा अत्यंत आक्षेपार्ह भाग म्हणजे त्याचा बचाव करण्याचा छुपा प्रयत्न व्यवस्थापकीय संचालक शौमा चौधरींनी चालवला आहे. तरूण तेजपालवरील बलात्काराच्या आरोपप्रकरणी चौकशी करण्यासाठी तिने आपल्याच कार्यालयाची समिती नेमली असून त्या समितीची प्रमुख तेजपालची मैत्रीण आहे. बलात्कारविषयक कायद्यात अलीकडे ज्या सुधारणा करण्यात आल्या त्या पाहता गुन्हेगाराला शिक्षा करणे अलीकडे सोपे झाले आहे. त्यामुळे तरूण तेजपालवरील संकटाने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
अलीकडे लब्धप्रतिष्ठितांच्या बलात्कारांची मालिका सुरू असून आसाराम बापू, त्यांचे चिरंजीव नारायण सांई ह्यांच्याविरूद्ध ह्यापूर्वीच गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. आता त्यात तरूण तेजपाल ह्या प्रतिष्ठित बलात्का-याची भर पडली आहे. विशेष म्हणजे हा आरोपी समाज स्वच्छ करायला निघाला होता. तो पोहोचला तुरूंगाच्या दारात! आसारामबापू आणि तरूण तेजपाल ह्या दोघांना वाचवण्यासाठी निष्णात कायदेतज्ज्ञांची फौज उभी राहणार हे निश्चित. बलात्काराची ही प्रकरणे हे न्यायसंस्थेसमोर एक आव्हान ठरावे.
रमेश झवर
भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता
No comments:
Post a Comment