Saturday, December 14, 2013

गोलमाल है भई गोलमाल है!

भाजपा आणि काँग्रेस ह् दोन्ही पक्षांचा दिल्लीत सफाया झाल्यानंतर 28 जागा मिळवणा-या दुस-या क्रमांकावरील आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल, कुमार विश्वास आणि मनीष सिसोदिया वगैरे नेत्यांच्या सात्विक अहंकाराला उधाण आले आहे. सत्ता भोगण्यात आम आदमी पार्टीला स्वारस्य नाही; असा सतत धोशा लावणा-या  अरविंद केजरीवालनी सत्तेचा दोर खेचण्यास सुरूवात केली आहे हे उघड आहे..
नायब राज्यपालांच्या निमंत्रणावरून त्यांची भेट घेतल्यानंतर केजरीवालनी 'आम आदमी'ला निव्वळ सत्तेवर येण्यात स्वारस्य नाही वगैरे आधी लावलेली रेकॉर्ड बदलून अठरा कलमांची नवी रेकॉर्ड लावली आहे. बहुधा नायब राज्यपालावर उपकार करण्यासाठीच केजरीवालनी शनिलारी त्यांची भेट घेतली असावी. सरकार स्थापन करण्यास नकार देणारे पत्र देण्याचे आम आदमीचे आधी ठरले होते.तसा इरादाही त्यांनी जाहीर केला होता. प्रत्यक्षात त्यांनी पत्र दिले की नाही माहीत नाही, पण भाजपा आणि काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना मात्र केजरीवालनी पत्र धाडले आहे. पाठिंब्याच्या अटी भले तुम्ही घालत नसाल, पण आम्ही घालतो ना, असाच त्यांच्या ह्या पत्राचा आशय आहे. ज्या गावाला जायचे नाही त्या गावचा रस्ता कोणी विचारत नाही पण अरविंद केजरीवाल पडले सत्यनिष्ट, भ्रष्टाचारमुक्त शुद्ध राजकारणवादी! सरकार बनविण्याचा रस्ता त्यांनी काँग्रेसलाच विचाराचे ठरवले. त्यांना बाहेरून वा अन्य प्रकारे काँग्रेसचा पाठिंबा मिळाला तर हवाच आहे. म्हणून त्यांनी काँग्रसला पाठवलेल्या पत्रात एक अठरा कलमी अंडरटेकिंगचा मसुदा पाठवला आहे. अमुक तमुक मुदद्यावर तुम्ही आम्हाला पाठिंबा देण्याची लेखी हमी देत असाल तर विचार करू असा केजरीवाला ह्यांच्या पत्राचा थोडक्यात आशय. चला, आधी सरकार स्थापन करण्यास तयार नसलेल्या केजरीवालनी पाठिंब्यासाठी टेंडर तर काढले!
अरविंद केजरीवाल राजकारणात कच्चे आहेत असा जरकोणी निष्कर्ष काढणार असेल तर तो मात्र बरोबर नाही. आपले अल्पमतातले सरकार जास्त काळ टिकणार नाही हे ते जाणून आहेत. काँग्रेसने हमीपत्र दिले तरी तो पोस्ट डेटेड चेक आहे. तो केजरीवाल ठेवून घेतील आणि सरकार स्थापन करणयाच्या उद्योगला लागणार. सरकार चालवता आले नाही तर काँग्रेसने पाठीत खंजीर खुपसला असा प्रचार करतील ते आपल्या सरकारचे विसर्जन करण्यास ते मोकळे आहेत. फक्त सरकार पडले ते भ्रष्टाचा-यांमुळे पडले, आम आदमी पार्टीमुळे नाही, असे सांगून स्वतःची सुटका करून घेतील हे उघड आहे. किंवा सरकार स्थापन करण्यापूर्वीच काँग्रेसने हमीपत्रावरून कटकट केली तरी आताच काँग्रेसला बदनाम करायला सुरूवात करायची असा वरवर डावपेच वाटणारा तिढा त्यांनी निर्माण केला आहे.
अरविंद केजरीवाल हे माजी सिलेक्शन ग्रेड आयकार अधिकारी होते. माजी सरकारी अधिकारी ह्या नात्याने केजरीवालना 'देखेंगे, जाचेंगे, फिर सलाहमशविरा करेंगे, साहब से बात करेंगे, इसके बाद आप को इतल्ला करेंगे' ह्या धर्तीच्या आट्यापाट्या खेळण्याचा उद्दंड अनुभव आहे. फरक एवढाच की सरकारी कार्यालयात चालणारा हा प्रयोग त्यांनी राजकारणाच्या रंगमंचावर सुरू केला आहे. पण त्यांच्या बरोबर काँग्रेससारखा सहकलाकार काही कच्चा नाही. वाजली तर पुंगी नाही तर मोडून खाल्ली असेच मुळी काँग्रेसच्या बिनशर्त पाठिंब्याचे स्वरूप आहे.
काँग्रेसने त्यांना हमीपत्र लिहून दिले तरी त्यचे पालन करण्याची शपथ कुठे घेतली आहे? एक दीडदमडीचा सबइन्सपेक्टर माझ्यावर 'नजर' ठेवतो ह्याचा अर्थ काय, असा सवाल करत राजीव गांधींनी चंद्रशेखरांचे सरकार पाडले होते. त्यापूर्वी इंदिरा गांधींच्या काळात बिचारे चरणसिंग पंतप्रधान झाले खरे, पण त्यांना संसदेत भाषण करण्याची एकही संधी काँग्रेसने मिळू दिली नाही. मोरारजी सरकारविरूद्ध आलेल्या अविश्वासाच्या ठरावावर भाषण ठोकून झाल्यानंतर जॉर्ज फर्नांडिसनी मंत्रीपदाचा राजिनामा दिला होता ह्याचा अनेकांना विसर पडलेला दिसतो. वाजपेयींचे सरकार विश्वास निदर्शक ठराव्याच्या वेळी 12 दिवसात पडले होते.
ह्या पार्श्वभूमीवर केजरीवालनी काँग्रेसला लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे, सैध्दान्तिक पाठिंबा वगैरे असली गोलमाल भाषा तुम्ही करणार असाल तर ती आम्हाला चालणार नाही! आधी सरकार स्थापन करणार नाही असे सांगायचे. नंतर नायब राज्यपालांची भेट घेऊन आल्यावर काँग्रेसला आणि भाजपालाही पत्रा लिहून बिनशर्त पाठिंब्याचा प्रस्ताव फेटाळून लावून स्वतःच्या 'शर्ती' पुढे करायाच्या आणि अग अग म्हशी मला कुठे नेशी म्हणत सरकार स्थापन टाकण्याच्या दिशेने पावले टाकायची ही केजरीवालांच्या आम आदमीची चाल लोकांच्या लक्षात आली आहे. पण त्याचबरोबर आतापर्यंत पडलेली काँग्रेस आणि भाजपाची पावले तितकीच सावध आहेत. म्हणून तर दिल्लीतल्या सगळ्यांची भाषा गोलमाल आहे. दिल्लीतल्या घडामोडी पाहता गोलमाल है भई गोलमाल है असेच म्हणावेसे वाटते.

रमेश झवर
भूतपूर्व सहसंपादक लोकसत्ता

No comments: