Saturday, December 21, 2013

देवयानी प्रकणाचा तिढा

अमेरिकेतल्या भारतीय दूतावासात डेप्युटी कॉन्सल जनरल पदावर असलेल्या देवयानी खोब्रागडे यांच्याविरूद्ध करण्यात आलेल्या कारवाईबद्दल माफी मागण्याची भारताची मागणी अमेरिकन परराष्ट्र खात्याने फेटाळली आहे; इतकेच नव्हे तर कारवाई मागे घेण्यासही साफ नकार दिला. मोलकरणीच्या व्हिसा प्रकरणी माहिती खोटी दिल्याचा देवयानी खोब्रागडे यांच्यावर आरोप आहे. अमेरिकन कायद्याने जेवढा पगार मोलकरणीस देणे बंधनकारक असते त्यापेक्षा कितीतरी कमी पगार देवयानी आपल्या मोलकरणीस देत असल्याचे अमेरिकन अधिका-यांचे म्हणणे होते. मोलकरणीस दिला जाणा-या पगाराच्या संदर्भात होणा-या गुन्ह्याबद्दल अमेरिकेत अतिशय कठोर शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात आहे. ह्या कायद्यानुसार अमेरिकन अधिका-यांनी देवयानी खोब्रागडे यांना सरळ अटक करून त्यांच्याविरूद्ध खटला दाखल केला आहे. त्यांना म्हणे अटक करताना त्यांची 'अंगझडती'ही घेण्यात आली होती. मोलकरणीच्या व्हिसा अर्जात देवयानीने दलेली माहिती खोटी असल्याचे अमेरिकेच म्हणणे आहे. त्यामुळे अमेरिकन कायद्यानुसार हे अफरातफरीचे प्रकरण मानले जाते. त्यामुळे देवयानीला सात वर्षांची शिक्षा होऊ शकते.
ह्या प्रकरणी राजनैतिक संकेत धाब्यावर बसवण्यात आल्याचा आरोप स्वतः देवयानीने केला असून भारत सरकारने तिने केलेले आरोप उचलून धरले आहेत. परराष्ट्र खात्याला मुळी संसदेने तसा आदेशच दिला म्हटले तरी चालेल. अमेरिकेच्या मुजोरीला सडेतोड उत्तर दिले पाहिजे असे परराष्ट्र मंत्र्यांना सुनावण्याच्या आधीच भारतातल्या अमेरिकन दूतावासात काम करणा-या अधिका-यांची ओळखपत्रे रद्द करण्याची कारवाई सरकारने केली; इतकेच नव्हे तर त्यांच्यासंबंधीचा अवांतर तपशीलसादर करण्याचाही हुकूम परराष्ट्र खात्याने अमेरिकन दूतावासाला दिला. देवयानी खोब्रागडे यांना देण्यात आलेल्या अपमानस्पद वागणुकीची पुरेशी शहानिशा करण्यापूर्वीच सरकारची चक्रे वेगाने फिरली. निदान ह्या बाबतीत तरी मेंगळटपणा परराष्ट्र खात्याने दाखवलेला नाही हे कौतुकास्पद आहे. अमेरिकन परराष्ट्र खात्याच्या सचिवांशीही परराष्ट्रृमंत्री सलमान खुर्शिद बोलले. परराष्ट्र सचिव केली ह्यांनी देवयानी खोब्रागडे प्रकरणी जे काही घडले त्याबद्दल म्हणे खेद प्रकट केला. त्यामुळे दोवयानी खोब्रागडे यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात येऊन अमेरिकेने भारताच्या मागणीप्रमाणे माफी मागितली की हे प्रकरण संपुष्टात येईल अशी आशा निर्माण झाली होती. पण देवयानी खोब्रागडे यांच्यावरील कारवाई मागे घेण्याचा प्रश्नच नाही; अमेरिकेत कायदा सगळ्यांना सारखा आहे, असा खुलास अमेरिकन परराष्ट्र खात्याने केला आहे.
जगभराचे राजकारण करण्यात पटाईत असलेली अमेरिका देवयानी खोब्रागडे प्रकरणात सहजासहजी माफी मागणार नाही. मुळात राजनैतिक शिष्टाचारानुसार ठरवण्यात आलेल्या संकेतांचे फायदे ज्या पदावर देवयानी खोब्रागडे काम करतात ते पदाला लागू आहेत का, असा प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर दोन्ही परराष्ट्र खात्यांचे अधिकारीच देऊ शकतील. पण ज्या अर्थी देवयानी खोब्रागडे यांचा कारवाईपासून बचाव करण्यासाठी त्यांना युनोतले मोठे पद देण्यात आले त्याअर्थी त्यांना सध्याच्या पदावर राहून राजनैतिक संकेतानुसार दिले जाणारे फायदे अर्थातच मिळू शकत नाहीत हे परराष्ट्र खाते आणि परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शिद जाणून आहेत.. पण तरीही अमेरिकेत त्यांच्याकडून कळत नकळत झालेल्या गुन्ह्यांबद्दल जेव्हा त्यांच्यावर कारवाई झाली तेव्हा त्यांना राजनैतिक संकेतामुळे मिळणा-या फायद्यांची आठवण झाली. देवयानी खोब्रागडे यांना त्यांचे पिताश्री उत्तम खोब्रागडे यांना झाली असेल तर हा शुद्ध बेरकीपणा आहे. परदेशी दूतावासात काम करणारे सगळेच जण बारीकसारीक कायदेभंग, विशेषतः घरगडी, मोलकरणी वगैरे नेमताना करत असतात; मग आपण एखादा बारीकसा गुन्हा केला तर त्यात आकाशपाताळ एक करण्यासारखे काय आहे, असाही युक्तिवाद देवयानी ह्यांनी स्वतःशी केलेला असू शकतो पण आता हा गुन्हा अंगाशी आल्यावर त्यांना राजनैतिक शिष्टाराच्या फायद्यांची आठवण झाली असेल तर हा त्यांचा बेरकीपणाच म्हणावा लागेल. हा बेरकीपणा लपवण्यासाठी त्यांनी मागासवर्गीय म्हणून आपल्यावर अन्याय वगैरे भाषा सुरू केली. वास्तविक अमेरिकेत भारतीय, पाकिस्तानी, बांगला देशीय अशी स्वतंत्र ओळख विचारात घेतली जात माही. तिथे ह्या सगळ्यांची एकच ओळख आणि ती म्हणजे आशियायी!
अमेरिकन प्रशासनाविरूद्ध दाद मागण्याचा, खटल्यात आपली बाजू मांडण्याचा देवयानी खोब्रागडे यांना पूर्ण अधिकार आहे. पण अमेरिकन कायद्याची पकड एवढी जबरदस्त आहे की त्यांचा बचाव फेटाळला जाण्याची शक्यता अधिक. म्हणूनच त्या आणि त्यांचे राजकारणी पाठिराखे राजकारणाच्या वाटेने निघाले. भारतातील अमेरिकेन दूतावासांचे एखादे प्रकरण उपस्थित करून भारताचे परराष्ट्र खात्याही ह्या राजकारण्यांच्या दिंडीत सामील झाले आहे. अमेरिकी परराष्ट्र खात्याबरोबर हा आटायापाट्या खेळण्याचा प्रकार आहे. त्यात यश कितपत मिळते ते तूर्त तरी सांगता येत नाही. नाहीतर कनवाळू अमेरिकन अध्यक्ष ओबामा ह्यांच्यापर्यंत हे प्रकरण नेऊन मिटवण्यावचा सोपा मार्ग पंतप्रधान मनमोहनसिंग ह्यांना पत्करावा लागणार हे उघड आहे. पण देवयानी खोब्रागडे यांच्या इभ्रतीसाठी भारत-अमेरिका संबंधांचा बळी देण्यापर्यंत दोन्ही देशांची मजल मुळीच जाणार नाही हे निश्चित! तूर्तास तरी अशुभस्य कालहरणम् हीच कूटनीती दोन्ही देशाकडून अवलंबली जाईल हे स्पष्ट आहे. दोन्ही देशांचा लोकशाही आणि कायद्याच्या राज्याचा चेहरा शाबूत राहून जगाला तो दिसला पाहिजे असा प्रयत्न दोन्ही बाजूंकडून होणार! म्हणून तर तिढा निर्माण झाला, नव्हे, करण्यात आला आहे!
रमेश झवर
भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता

No comments: