नरेंद्र मोदी
ह्यांच्या नावाची घोषणा करून 2014च्या लोकसभा निवडणुकीचा माहौल तयार केला होता.
युद्धापूर्वीच रणदुंदुभी फुंकून राहूल गांधी ह्या प्रतिस्पर्ध्याला शक्यतो
त्याच्याच छावणीत गारद करण्याचा भाजपाचा हेतू होता. पण तो सफल झाला नाही. पंतप्रधानपदासाठी
राहूल गांधी सर्वथा लायक असून त्यांच्यासाठी आम्ही सगळे जण काम करायला तयार आहोत
असा संदेश देण्यासाठीच बहुधा पंतप्रधान मनमोहनसिंगांनी नव्या वर्षाच्या
सुरूवातीलाच प्रेसकॉन्फरन्स घेतली होती. तसेच नरेंद्र मोदी हेच खरे राहूल गांधींचे
प्रतिस्पर्धी उमेदवार असल्याने मनमोहनसिंगांनी त्यांच्यावर तोफेचे गोळे सोडले.
परंतु मनमोहनसिंग हे कसलेले राजकारणी नसल्याने त्यांची गोळाफेक फुकट गेल्यासारखीच
होती. तालकटोरा मैदानात मात्र भाजपाविरोधी प्रचाराच्या अनेकांच्या तोफा धडाडल्या. भाजपा
खोटारडे आहेत हे सरळ सांगण्याऐवजी टक्कल पडलेल्यांना ही मंडळी कंगवेसुद्धा विकतील,
अशा शब्दात त्यांनी खिल्ली उडवली. आता काँग्रेसच्या तोफा निवडणुकीपर्यंत धडाडत
राहतील हे ह्या अधिवेशनात स्पष्ट झाले.
राहूलच्या नावाची पंतप्रधानपदासाठी घोषणा
करण्याची हिंमत काँग्रेसमध्ये नाही अशी चर्चा आता प्रसार माध्यमात सुरू झाली आहे.
किंबहुना अशी चर्चा सुरू व्हावी अशीच भाजपाची रणनीती होती. पण काँग्रेस त्या
रणनीतीला बळी पडली नाही. राहूल गांधींना पंतप्रधानपद तर द्यायचेच पण आताच त्याच्या
नावाची घोषणा करण्याची गरज नाही असा युक्तिवाद करून काँग्रेसने हा विषय संपवून
टाकला. राहूल गांधींच्या
उत्फूर्त भाषणाने ते औपचारिकरीत्या अघोषित असले तरी पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांचा उल्लेख करताना 'युवराज' वगैरे शेलकी विशेषणे लावली जात होती. पण 'युवराजपद' हे काँग्रेस कार्यकारिणीच्या ठरावाने प्राप्त
होत नाही तर राजकीय शौर्य दाखवल्याखेरीज मिळत नाही ह्याचे भान राहूल गांधींना
प्रथमच झाले असावे. म्हणून स्वतःचा उल्लेख त्यांनी 'सैनिक'
असा केला. त्यांचे हे वाक्य भाषणात फेकण्याचे नाही. राजकीय वस्तुस्थितीच
मुळात अशी आहे की, आपल्या विचाराचे जास्तीत जास्त खासदार-आमदार त्यांनी निवडून
आणले तरच काँग्रेसने दिलेले त्यांचे सेनापतीपद शाबूत राहील. पंतप्रधानपदाची माळ
त्यांच्या गळ्यात पडेल! यासाठीच त्यांनी ताकद गमावून बसलेल्या जनतेला
तिची ताकद बहाल करण्याचा संकल्प केला. राहूल गांधींच्या भाषणापूर्वी पी चिदंबरम्
ह्यांनीही लोकसभेच्या निम्म्या जागा पस्तीशी आत वय असलेल्या तरूणांना दिल्या
पाहिजेत अशी एक अफलातून कल्पना मांडली. त्यांची कल्पना राहूल गांधींच्या विचाराला
साजेशी आहे हे उघड आहे.
राहूल गांधींचे नाव काँग्रेसने आताच निवडणुकीपूर्वी
जाहीर केले असते तर काँग्रेसविरूद्ध करण्यात येणा-या अनेक आरोपात घराणेशाहीच्या जुन्या आरोपाची भर
टाकण्यासाठी काँग्रेसविरोधक पुढे सरसावले असते. त्याखेरीज गेल्या वर्षात झालेल्या
विधानसभा निवडणुकीत झालेल्या काँग्रेसच्या पराभवास राहूल गांधींचे अपेशी नेतृत्वच
कारणीभूत ठरले, असा प्रचार त्यांच्या विरोधात विरोधी पक्षांकडून चालवला जात होता. प्रसारमाध्यमांनी हा निकष उचलून धरला.
भारतात प्रत्येक निवडणूक स्वतंत्र असते आणि ती निवडणूक जिंकण्याची गणिते वेगवेगळी
असतात हे प्रसारमाध्यमांना माहित नाही असे नाही. इंदिरा गांधींना 'गूंगी गुडिया' तर राजीव गांधींना 'डून बॉय' संबोधण्याचा जुनाच वारसा प्रसाराध्यमांननी आणि
विरोधी पक्षांनी पुढे चालवला आहे इतकाच त्याचा अर्थ! 'आम्ही पूर्वी प्रचंड विजय पाहिले आहेत आणि पराभनही झेलले आहेत', असे सांगताना सोनिया गांधी स्पष्ट ते बोलून गेल्या. सांप्रदायिक
ताकदीविरूद्ध लढण्याचा जुनाच निर्धार त्यांनी व्यक्त केला. ह्याचे कारण
भाजपाविरूद्धची लढाई जिंकण्याच्या दृष्टीने हाच एक राजकीय मुद्दा काँग्रेसकडे आहे.
शिरस्त्याप्रमाणे त्यांनी दिलेले भाषण वाचून दाखवले खरे, पण ह्यावेळी ते वाचून
दाखवताना त्यांच्या भाषणाला हातवा-याची जोड प्रथमच मिळाली.
जनतेची ताकद वाढवण्यासाठी माहितीचा अधिकार
काँग्रेसने कोणाच्या सांगण्यावरून बहाल केला नाही, असे विधान करताना लोकपाल
कायद्याच्या बाबतीतले श्रेय त्यांनी नकळतपणे अण्णा हजारेंना दिले असे म्हटले
पाहिजे. भ्रष्टाचाराची लढाई लढण्यासाठी आधार कार्डाचा प्लॅटफॉर्म म्हणून उपयोग
होणार, असे सांगून त्यांनी जिल्हा स्तरावर चालणा-या लाचलुचपतीकडे लक्ष वेधले.
भ्रष्टाचाराविरूद्ध अस्त्रासारखा वापर करण्यासाठी आणखी सहा विधेयके संमत होणे
गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षाकडून रेटला जाणारा
भ्रष्टाचाराचा मुद्दा त्यांच्यावर उलटवण्याचा हा प्रकार कितपत यशस्वी होईल हे
सांगता येत नाही. पण राहूल गांधींचा नवा अवतार ह्या अधिवेशनात दिसून आला. आता
प्रश्न आहे त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रस पक्ष कात टाकेल का?
रमेश झवर
भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता
No comments:
Post a Comment