Friday, January 3, 2014

बिनचेह-याचे पंतप्रधान!

गेल्या आठवड्यापासून गाजावाजा करण्यात येत असलेली पंतप्रधान मनमोहनसिंग ह्यांची प्रेस कॉन्फरन्स पार पडली. पार पडली म्हणण्यापेक्षा उरकली म्हणणे जास्त योग्य ठरेल. पंतप्रधान ह्या नात्याने मनमोहनसिंग ह्यांनी घेतलेली ही पहिली आणि बहुधा अखेरची प्रेस कॉन्फरन्स मुळीच गाजली नाही. 'मोदी पंतप्रधान झाल्यास देशाचा सर्वनाश ओढवेल!', 'अहमदाबादमध्ये रस्त्यावर दंगली उसळाव्यात हे काही खंबीर नेत्याचे लक्षण नव्हे.' ही जबरदस्त विधाने करून त्यांनी नरेंद्र मोदींच्या दिशेने ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये भाला फेकला; तरी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांची शब्दांची फेक वरिष्ठ सनदी अधिका-यांपेक्षाही अर्थहीन वाटावी अशीच होती. मनमोहनसिंगांनी एकदाही संसदीय अधिवेशन गाजवले नाही. नेहमीच तोलूनमापून आणि काटेकोर बोलण्यामुळे त्यांचे संसदेतले एकही भाषण गाजले नाही की सरकारचा बचाव झाल्याचे चित्र दिसले नाही. परिणामी 'कॉर्पोरेट पॉलिटी'पुढे एखाद्या सेमिनारमध्ये केलेले की नोट अड्रेस वा सीइओपुढे केलेले प्रेझंटेशन यापलीकडे त्यांची प्रेसकॉन्फरन्य गेलीच नाही. नरसिंह रावांच्या चेहे-याचे वर्णन 'इकॉनॉमिस्ट'ने 'डेड फिश' चेह-याचा माणूस असे केले होते. ते विशेषण हीन अभिरूचीचे द्योतक आहे ह्यात शंका नाही. मनमोहनसिंगांचे वर्णन बिनचेह-याचा पंतप्रधान असेच करावे लागेल.
त्यांच्या मते, काँग्रेसप्रणित आघाडी सरकारची कामगिरी चांगली झाली असून तिस-यांदाही काँग्रेसप्रणित आघाडीचे सरकार सत्तेवर येईल. राहूल गांधी हे पंतप्रधानपदासाठी सर्वथा लायक असले तरी त्यांना पंतप्रधान करण्याचा काँग्रेस पक्ष योग्य वेळी निर्णय घेईल. 'मी मात्र पंतप्रधानापदाच्या शर्यतीत नाही', हे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये भ्रष्ट्राचाराच्या आरोपावरून प्रश्नांचा भडिमार केला जाणार हे उघड होते. त्या वेळी आपल्यावर प्रसारमाध्यामातून केले जाणा-य आरोपांमागे छुपे हितसंबंध असल्याचेही विधान त्यांनी केले. पण आपल्या विधानाचा रोख कोणावर आहे हे काही त्यांनी सूचित केले नाही. वास्तविक ते काही संसदेत बोलत नव्हते. 1991 सालापासून राजकारणात आलेल्या मनमोहनसिंगांना राजकारण समजले नाही असे म्हणता येत नाही. सौम्यप्रकृती मनमोहनसिंगांना राजकारण करता आले नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी जोरदार बॅटिंग केली असती तर विरोधकांपैकी कोणीतरी गारद होऊ शकला असता. आपले रागलोभ स्पष्टपणे व्यक्त करण्याची संधी त्यांना घेता आली असती. पण मोजके आणि बिनचूक बोलण्याची त्यांची सवय. एखादी तरी स्मितरेषा त्यांच्या चेह-यावर कधीच दिसली नाही. पाण्यात पडल्यावर आपोआप पोहता येते असे म्हणतात. पण राजकारणाच्या पाण्यात पडूनही त्यांना पोहता आले नाही ते नाहीच! सद्यकालीन माध्यमांपेक्षा भावी इतिहासाचे आपल्याबद्दलचे मत भिन्न असेल, एवढेच माफक विधान त्यांनी केले. ही मनमोहनसिंगांची विनम्रता की त्यांचा सावधपणा? राजकारणात भाषा ही स्वतःचा बचाव करण्यासाठी असते. रक्षण करण्यासाठी असते. हल्ला करण्यासाठी असते. कधी कधी तर कोणताच तपशील न देणारीही असते. मनमोहनसिंग ज्या भाषेत बोलत आले आहेत ती सनदी नोकराचीच भाषा होती. प्रेस कॉन्फरन्समध्येही ती बदलली नाही.
टू जी स्पेक्ट्रम आणि कोळसा भ्रष्टाचारच्या आरोपाबद्दलही उत्तर देतांना मनमोहनसिंगांच्या उत्तरांनी बाउंडरी ओलांडली नाही ती नाहीच. भ्रष्टाचाराची प्रकरणे ही आधीच्या सरकारच्या काळातली होती. 2009 पूर्वीच्या काळातली ही प्रकरणे आहेत असे विधान करून त्यांनी काँग्रेसप्रणित आघाडीवरील किटाळ झटकण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्नच ! महागाईची समस्या त्यांनी मान्य केली पण त्याचे नेहमीचे कारण दिले. गरीबांना स्वस्त धान्य देण्याच्या योजना ह्या महगाईच्याविरूद्ध कवच सिद्ध होतील वगैरे सांगत त्यांनी वेळ मारून नेली. अर्थव्यवस्थेला गती देण्याचा त्यांचा प्रयत्न जारी राहील असे सांगत पाच महिन्यांच्या वेळेचाही उपयोग करून घेऊ असे त्यांनी सांगितले खरे पण त्यांच्या बोलण्यात दम नव्हता. एकदाही मला कोणी राजीनाम देण्यास सांगितले नाही, मी इमाने इतबारे काम केले वगैरे उत्तरे त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये दिली खरी; पण त्यांच्यावर व्यक्तिशः कोणी नाकर्तेपणाचा आरोप केलेला नाही. जे काही आरोप करण्यात आले ते त्यांच्या सरकारवर. संसदेतले कामकाज ठप्प राहिले तरी आपल्या सरकारच्या कार्य़काळात जास्तीत जास्त बिले मंजूर झाली वगैरे रटाळ तपशील एखाद्या खात्याचा अधिकारीवर्ग देतात तसा मनमोहनसिंगांनी दिला. पत्रकारांनी विचारलेले प्रश्न मोठे होते. प्रश्नांपेक्षा मनमोहनसिंगांनी दिलेली उत्तरे लहान होती! अर्थात विरोधकांवर मनमोहनसिंगांचा तोफखाना धडाडणार अशी कोणाची अपेक्षा नव्हतीच. खुद्द काँग्रेसमधील नेत्यांचीही नसणार. राहूल गांधींच्या नेतृत्वात नरेंद्र मोदींसारख्या नेत्याचा रगेलपणा आला तरच काँग्रेसला वातावरण अनुकूल होणार. नाही तर अन्य पक्षांतर्फे सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरूद्धच्या लढ्याला पाठिंबा देण्याशिवाय काँग्रेसकडे पर्याय तरी कुठे आहे?

रमेश झवर
भूतपूर्व सहसंपादक लोकसत्ता

No comments: