वर्तमानपत्रकाराने एखाद्या नेत्याची
मुलाखत कशी घ्यावी ह्याबद्दलचा काही नियम नाही. नव्हे तो असूही नये. जगभरातल्या वृत्तपत्रीय
स्वातंक्त्र्याच्या विचारारापुढे अशा प्रकारचे नियम टिकणारेही नाहीत. परंतु
नेत्यांच्या मुलाखतीबद्दलचे सार्वकीन संकेत जरूर आहेत. कोणत्याही मुलाखतीत निर्भय प्रश्न
आणि तितकेच निर्भय उत्तर मात्र निश्चितपणे अपेक्षित आहे. मुलाखतकाराने नेत्याला
हवे ते प्रश्न विचारायचे आणि त्यानेही दिलखुलास उत्तरे द्यावीत असा संकेत मात्र
जरूर आहे. नेत्याला आरोपीच्या पिंज-यात उभे करून त्याची उलटतपासणी घेणे म्हणजेच
सडेतोड पत्रकारिता असा समज मात्र अलीकडे रूढ झाला आहे. सोमवारी रात्री 'टाईम्स नाऊ' वाहिनीवर काँग्रेस
नेते गांधी ह्यांची अर्णब गोस्वामी ह्यांनी घेतलेली मुलाखत हा हे ह्या रूढ समजाचे ताजे
उदाहरण आहे. ही मुलाखत आधीच आखून घेतलेल्या चौकटीतील बसवण्याचा प्रयत्न अर्णब
गोस्वामींनी केला. गेल्या सहा महिन्यांपासून राहूल गांधींवर करण्यात आलेल्या
आरोपांच्या आरोपांचा पुनरूच्चार त्या आरोपांबाबत राहूल गांधींकडून अपेक्षित खुलासा
ह्यापलीकडे ह्या मुलाखतीत काहीच नव्हते. राहूल गांधींना मात्र प्रत्येक प्रश्नाचे
वेगवेगळे पैलू मुलाखतकर्त्याच्या निदर्शनास आणून द्यायचे होते. त्यासाठी मुलाखतीची
चौकट मोडण्याचा त्यांनी अनेकदा प्रयत्न केला! परंतु त्यांच्या दुर्दैवाने भाजपाचे ब्रीफ घेल्यासारखेच प्रश्न अर्णब
गोस्वामी विचारत राहिले. त्यामुळे मुठभर लोकांच्या हातात सापडलेले भारतातले
राजकारण मुक्त करण्याचा, त्यासाठी जनतेतलीच ताकद वाढवण्याचा राहूल गांधींचा संकल्प
मात्र देशभरातल्या लोकासमोर स्पष्टपणे येऊ शकला नाही.
वास्तिवक राहूल गांधी ह्यांची ही पहिलीच
मुलाखत होती. अर्थात हा टाईम्स चॅनेलचा दावा आहे. तो कितपत खरा आहे हे माहीत नाही.
तसे असेल तर मुलाखत देणा-याला त्याचा stance-- त्याची स्वतःची म्हणून जी भूमिका असते ती-- स्पष्ट
करण्याची संधी दिली गेली पाहिजे. मुळात हा बौध्दिक सभ्यतेचा नियम आहे. परंतु हा
नियम अर्णब गोस्वामींनी पाळला नाही. नव्हे, मी specific question विचारणार आहे त्या
प्रश्नांची तुम्ही specific उत्तरे दिली
पाहिजे असा जरा दम भरल्याच्या थाटात त्यांनी राहूल गांधींना सांगितले. खरे तर
एखाद्याला बौद्धिक कोंडीत पकडण्याचा हा प्रकार आहे. अधुनमधून 'मिस्टर राहूल गांधी' संबोधत राहिले
म्हणजे ती मुलाखतीचे स्वरूप फॉर्मल--औपचारिक-- होते हे अर्णब गोस्वामींना कोणी
सांगितले? अमेरिकन
पत्रकारितेत मिस्टर बरॅक असे संबोधणे गैर मानले जात नाही हे खरे. पण मिस्टर बरॅक
ह्या संबोधनातला स्वर निश्चित वेगळा असतो. तो अधिक affable असतो. उच्चारणा-याला आणि प्रतिसाद देणा-यालाच
नव्हे तर प्रेक्षकांच्याही तो ध्यानात येत असतो. आपल्याकडे सर किंवा राहूलजी,
इंदिराजी, शरदरावजी वगैरे प्रकारची संबोधने ही नेहमीच लांगूलचालन करणारी असतात असे
मुळीच नाही. शब्द तेच, स्वर मात्र प्रत्येक वेळी वेगळा हे भाषेचे मनोहर स्वरूप
जगातल्या सर्व भाषांना लागू आहे! उलट समाज जितका सुसंस्कृत तितका त्याचा प्रत्यय येत असतो.
राहूल गांधींची आणि काँग्रेसची नरेंद्र
मोदी आपल्या भाषणात यथेच्छ खिल्ली उडवत आले आहेत. पण काँग्रेस नेत्यांची सतत खिल्ली
उडवण्याचे तंत्र मध्यमवर्गातून उदयास आलेल्या विरोधी नेत्यांनी गेल्या साठ
वर्षांपासून अवलंबले आहे. नेहरूंचा वारस कोण अशी चर्चा नेहरूंच्या हयातीतच
वर्तमानपत्रांनी सुरू केली होती. त्यांच्यानंतर लालबहादूर शास्त्रींकडे
पंतप्रधानपद गेले. ते जास्त काळ हयात राहिले नाही. त्यामुळे पंतप्रधानपद
इंदिराजींकडे आले हे खरे;
पण नेतेपदाच्या
निवडणुकीत इंदिराजींना मोरारजींविरूध द्यावी लागली होती. त्या लढतीत मोरारजी पराभूत
झाले. तरीही मन मोठे करून इंदिराजींनी मोरारजींना उपपंतप्रधानपद दिले. बंगलोर
अधिवेशनापूर्वी इंदिराजींनी काँग्रेस
पक्षाचीही साफसफाई केली. अगदी थेट बंड उभारून! इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी अनपेक्षितपणे पंतप्रधान झाले. त्यांच्या
हत्त्येनंतर नरसिंह रावांना सोनिया गांधींनी आडकाठी केली नव्हती. इतकेच नव्हे तर पक्षाध्यक्षपदही
नरसिंह रावांकडे गेले. सांगण्याचा मुद्दा इतकाच की देशाच्या नेतृत्वाच्या ह्या
इतिहासाकडे जाणूबुजून दुर्लक्ष करण्याची इतकेच नव्हे तर, काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप
करण्याची एक रीतसर परंपराच विरोधकांनी निर्माण केली. नरेंद्र मोदीही ह्या परंपरेचा
बळी ठरले असतील तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. त्यांना देश काँग्रेसमुक्त
करायचाय्! का? काँग्रेसने देशाचे
वाटोळे केले म्हणून? की लोकसभा निवडणुकीनंतर
भाजपा आणि काँग्रेस ह्या दोन्ही पक्षांना समसमान जागा मिळाल्यास काँग्रेसपुढे भाचपाच्या
राजकारणाची डाळ शिजणार नाही म्हणून? वास्तविक दोन्ही पक्षाचा हा लढा कार्यक्रमावरून असायला हवा होता. पण तसा
तो व्हावा असे कोणालाच वाटत नाही. म्हणून ह्याही वेळी उखाळा-पाखाळ्यांच्या पलीकडे
भारतातले राजकारण जाऊ शकलेले नाही.
आपली ऐतिहासिक ताकद काँग्रेस गमावून बसला
आहे ह्याची राहूल गांधींनाच नव्हे तर काँग्रेसमधल्या प्रत्येकाला होऊन बसली आहे.
म्हणूनच काँग्रेसमध्ये संजीवनी भरण्याचे कार्य राहूल गांधींनी सर्वप्रथम हातात
घेतले आहे. थेट गावातल्या सरपंचाला मोठे केले तरच काँग्रेस सरकारच्या योजना यशस्वी
होतील अशी जाणीव काँग्रेसमधील 'थिंकटँक'ला झाली आहे. गावातला
सरपंच मोठा झाल्यास ते अनेक काँग्रेस नेत्यांच्या मुळावर येऊ शकते. पण राहूल गांधी
त्याची फिकीर करण्याच्या मनःस्थितीत नाही. मतदाराची वयोमर्यादा 21 वरून 18 करण्याचा
आणि पक्षान्तरविरोधी कायदा करण्याचा निर्णय राजीव गांधींच्या काळात झाला होता.
त्या निर्णयांचा पहिला फटका काँग्रेसलाच बसला! गरीब माणसाला
स्वस्त धान्य देण्याचा कायदा करणे, त्यांना मिळणारी सबसिडी त्यांच्या बँक खात्यात
थेट जमा करणे, ग्रामीण रोजगार योजना बळकट करणे इत्यादि योजनांमुळे कोणाच्या
हितसंबंधांना धक्का बसणार हे पडताऴून पाहण्याचा प्रतिप्रश्न करण्याची संधी अर्णब
गोस्नवामींनी राहूल गांधींना द्यायला काय हरकत होती? पण मी विचारतो त्या प्रशानाची उत्तरे द्या असेच
जणू त्यांनी ठरवून टाकल्यामुळे राहूल गांधींना संधीच मिळाली नाही! वृत्तपत्रीय नीतीत
हे बसणारे नाही. राहूल गांधींना मुक्त चिंतन करू देण्याचे, त्यातून देशापुढील
प्रश्न सोडवण्यासंबंधीचा त्यांचा दृष्टीकोन देशासमोर ठेवण्याचे आणि मोदींचा
दृष्टीकोन आणि त्यांचा दृष्टीकोन ह्यावर तुलनात्मक प्रश्नोपप्रश्न उपस्थित
करण्याचा संकेत केब्रिजरिटर्न्ड पत्रकार अर्णब गोस्वामींना कुठून माहित होणार? कारण आपला वैयक्तिक
परफॉर्मन्स कसा दिसेल अशीच मुलाखतीची चौकट त्यांनी आखून ठेवली. नव्हे ती हेकटपणे
अमलात आणली. ती तोडताना राहूल गांधींची पंचाईत झाली खरी; पण ती त्यांनी काही
अंशी तोडलीच!
रमेश झवर
भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता
No comments:
Post a Comment