282 जागा जिकून भाजपाने संसदेवर विजयाचा झेंडा फडकावला! विशेष म्हणजे आजवर
भाजपाला सांप्रदायिक म्हणून शिव्या हासडणा-या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मिळून
महाराष्ट्रातल्या 25 पैकी एकूण 20
खासदारांना जनतेने घरी बसवले. येत्या चार महिन्यांनी होणा-या विधानसभा
निवडणुकीत ह्याच निकालाची
पुनरावृत्ती झाल्यास सेना-भाजपाला 240
विधानसभा मतदारसंघात बहुमत मिळणार! काँग्रेसला गैरकारभाराबद्दल धडा शिकवण्याची गरज
आहे असे जनतेला वाटू लागले असल्याचा हा पुरावा आहे. जनतेचा राग काँग्रेसवर नसून
काँग्रेसच्या गैरकारभारावर आहे असे म्हणणे म्हणजे केवळ शब्दच्छल! वस्तुस्थितीत
त्यामुळे फारसा फरक पडत नाही. लोकसभा निवडणुकीत व्यक्त झालेला राग राज्याच्या
विधानसभा निवडणुकीतही पुन्हा एकदा व्यक्त झाल्यास एकूणच देशात काँग्रेसचे काही खरे
नाही.
महाराष्ट्रात आणि उत्तरप्रदेशातली सत्ता
हिसकावता आली की केंद्रातली सत्ता हिसकावता येते, असा
अडाखा राजकारणात नेहमीच मांडला जातो. उत्तरप्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा ह्या राज्यातल्या
बहुसंख्य जागा जिंकता आल्या की दिल्लीवर झेंडा फडकवता येतो. असा हिशेब भाजपा नेते
वीस वर्षांपूर्वीपासून मांडत आले आहेत. यंदा हा हिशेब भाजपाने खरा करून दाखवलाच;
खेरीज उत्तरप्रदेशातही भरपूर जागा जिंकल्या. गेल्या अनेक वर्षांपासून
उत्तरप्रदेशातून काँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही पक्ष नेस्तनाबूत झालेलेच होते.
राजस्थान कधी काँग्रेकडे तर कधी भाजपाकडे अशी 'सी
सॉ' स्थिती होती. गुजरात मात्र बव्हंशी भाजपाकडे होता.
कर्नाटकमध्ये भाजपाला यश मिळाले तरी तेथे अंतर्गत गटबाजीने भाजपा त्रस्त होता.
महाराष्ट्रात काँग्रेस तग धरून होती, पण गटातटात. ह्या
निवडणुकीत महाराष्ट्र भाजपाकडे झुकला आणि देशातले युत्याआघाड्यांचे राजकारण
संपुष्टात आले. हे एक प्रकारे राजकीय मन्वंतर म्हणावे लागेल.
1978 साली इंदिरा गांधींच्या एकतंत्री
कारभाराला विरोध करण्यासाठी जयप्रकाशजींनी देश ढवळून काढला होता. इंदिराजींना
हटवण्याच्या बाबतीत जयप्रकाशजींना यश मिळाले होते. तरीही काँग्रेसला पर्याय म्हणून
जनता पार्टीला उभे राहता आले नाही. जेपींच्य प्रयत्नाने स्तापन झालेला जनता पक्ष
दोन वर्षांच्या आत विसर्जित झाला. मात्र, त्याचा एक
अनपेक्षित फायदा झाला. जनता पार्टीत सामील झालेल्या जनसंघाला सत्तेची चव
पहिल्यांदाच कळली. त्यातूनच जनसंघाने कात टाकली आणि नवी प्रतिमा असलेला भाजपा हा
पक्ष उभा राहिला. सत्तेचे राजकारण करण्यासाठी वाट्टेल ते करूनही भाजपाला खंडित
जनादेशच प्राप्त होत राहिला. पूर्ण जनादेश न मिळाल्याने पश्चिम बंगालमध्ये,
ममता, बिहारमध्ये जॉर्ज फर्नांडिस, तामिळनाडूत जयललिता, ओडिशात नवीन पटनायक
आणि महाराष्ट्रात शिवसेना ह्यांच्याबरोबर भाजपाला अनेकदा अपमानजनक वाटचाल करावी
लागली. अयोध्याच्या रामाने साथ दिली पण त्याचाही फारसा उपयोग झाला नाहीच. 2004 साली सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने त्यांच्या हातातली
सत्ता हिसकावून घेतली. 2009 मध्येही सोनिया
गांधी त्यांना विरोधी बाकावर बसवण्यात यशस्वी झाल्या. कदाचित पाच वर्षे कमी पडतात
म्हणून जनतेने काँग्रेसला 10 वर्षे सत्ता दिली
असावी. परंतु भ्रष्ट कारभारामुळे दशकपूर्तीनंतर ह्या निवडणुकीत काँग्रेसला घरचा
रस्ता दाखवण्यात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा यशस्वी झाला. मोदींच्या
साडेचारशे सभांनी भाजपाला पूर्ण जनादेश मिळवून दिला. ह्या सगळ्या निकालाचा अर्थ
एकच, जनता परिपक्व झाली आहे. 10
कोटी नवमतदार जागृक आहेत!
महाराष्ट्रदेखील ह्या परिवर्तन पर्वात
सामील झाला हे विशेष! ह्या परिवर्तन पर्वात जे काँग्रेसविरोधी मतदान झाले ते
आधीच्या जनता पर्वातही झाले नव्हते. शरद पवार, पीकेअण्णा
पाटील वगैरे काँग्रेसमधल्या बड्या धेंडांनी महाराष्ट्रात जनता पर्वात पुलोदचे
सरकार आणले. परंतु जनता पर्वाचा महाराष्ट्रातला इतिहास कोणत्याच अर्थाने संस्मरणीय
नाही. त्यापूर्वी 1956 साली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही
काँग्रेसविरोधी मतदान झाले होते. पण काँग्रेसला सत्तेवरून हुसकावून लावण्याएवढी
ताकद संयुक्त समितीला संपादन करता आली नाही. 102-103
पेक्षा अधिक जागा न मिळू शकल्यामुळे समितीला सत्ता कधीच मिळवता आली नाही! त्या
काळात देशात 'नेहरू बोले काँग्रेस चाले' अशी स्थिती. चव्हाणांनी महाराष्ट्रातल्या काँग्रेसला नेहरूंच्या दावणीला
बांधलेले! इंदिरा गांधींनी महाराष्ट्राला मुंबईसह महाराष्ट्र राज्य स्थापन
करण्याची शिफारस नेहरूंकडे केली नसती तर कदाचित मुंबईसह महाराष्ट्र राज्य स्थापन
झालेच नसते. दिल्लीपदस्थ काँग्रेस नेत्यांना विरोध करून राज्यात स्वबळावर सत्ता
स्थापन करण्याचे धारिष्ट्य महाराष्ट्राला कधी दाखवता आले नाही. भाषेच्या
प्रश्नावरून दाक्षिणात्य राज्यांनी नेहरूंना आव्हान दिले. हिंदीविरोधी चळवळीने
काँग्रेसपुढे उभ्या केलेल्या आव्हानातूनच द्रविड अस्मिता उदयास आली.
तामिळनाडूपुरती तरी काँग्रेस सत्ता ह्या द्रविड अस्मितेने संपुष्टात आणली. तिकडे
केरळात डाव्यांनी काँग्रेसच्या हातातली सत्ता हिसकावून घेतली तर अजूनही काँग्रेस
तेथे कशीबशी तग धरून राहिली. ह्या निवडणुकीत मात्र काँग्रेसला इतर कोणत्याही
राज्यांपेक्षा केरळमध्ये अधिक जागा मिळाल्या आहेत.
महाराष्ट्रातली स्थिती महाराष्ट्राला
अभिमान वाटावा अशी मुळीच नाही. अठराव्या शतकात काबूल कंदहारपासून थेट खाली
तंजावरपर्यंत राजकीय सत्ता ताब्यात घेरणा-या पेशव्यांच्या महाराष्ट्राला देशाचे
पंतप्रधानपद मिळावे असे वाटले तरी तेवढी कुवत नसल्याचे वारंवार सिद्ध झाले.
केंद्रात मोठी पदे मिळाली नाहीत असा ह्याच अर्थ नाही. मंत्रिपदे मिळाली.
राष्ट्रपतीपदही मिळाले. चव्हाण, पवार ह्यांची
दिल्लीत कोंडी होत गेली. ती काही त्यांना फोडता आली नाही. अर्थात त्यांत त्यांचा
दोष नाही. त्यांना अन्य प्रांतातल्या पुढा-यांनी साथ दिली नाही. महाराष्ट्रातल्या
काँग्रेस नेत्यांचे ना हिंदीवर प्रभुत्व, ना त्यांच्याकडे
इतर राज्यांतल्या नेत्यांशी जवळीक साधण्याचे कौशल्य! अलीकडे तर देशव्यापी
नेतृत्वाची आशाआकांक्षादेखील मावळून गेली आहे. पंतप्रधानपदावर हक्क सांगून सत्तेची
गुढी उभारावी असे एकाही काँग्रेस नेत्यांना वाटले असले तरी त्याचा उपयोग नाही हे
त्यांच्या लक्षात आले आहे. सोनिया गांधी ह्या मूळच्या अभारतीय. पण ह्या एकाच
मुद्द्यावरून त्यांना विरोध करणयासाठी पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली.
पण संसदेत अवघ्या नऊ जागा मिळवणा-या पक्षाला राष्ट्रवादीचे प्रादेशिकत्व लपून
राहिले नाही. काँग्रेसत्वही अधिकाधिक स्पष्ट होत गेले.
बाळासाहेब ठाकरे ह्यांनी 1967 साली शिवसेना स्थापन केली. त्यांनी मराठी अस्मितेची गुढी उभारली. पण
गरीब लुंगीवाल्यांना विरोध करण्यापुरती ही अस्मिता मर्यादित राहिली! मुंबई आणि
ठाणे ह्या दोन पालिकेतल्या सत्तेवरच शिवसेना संतुष्ट राहिली. शिवसेनेच्या
अस्मितेला पंख फुटले, पण ते खूप नंतर. तामिळनाडूप्रमाणे किंवा ओडिशा-पश्चिम
बंगालप्रमाणे प्रबळ प्रादेशिक पक्षाची स्थापना करून केंद्रातल्या प्रबळ सत्तेशी
दोन हात करण्याचा विचारही शिवसेनेच्या मनात पेटून उठला नाही. पण भाजपाची साथ
मिळाल्यानंतर मात्र थोडासा स्फुल्लिंग शिवसेनेत दिसू लागला. तरीही ताकदवान राजकीय
पक्ष म्हणून शिवसेनेला महाराष्ट्राच्या राजकारणात मजबूत उभे राहता आले नाहीच.
महाराष्ट्राच्या ह्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी, नवीन
पटनायक, जयललिता हे अजूनही स्वतःच्या ताकदीने देशाच्या
राजकारणात नसले तरी स्वतःच्या राज्यातील त्यांचे पक्ष राजकारणात पाय रोवून उभे
आहेत. शिवसेनेच्या तुलनेने त्यांची ताकद कितीतरी मोठी आहे. ह्या निवडणुकीत
शिवसेनेची ताकद वाढली पण भाजपापेक्षा शिवसेनेची ताकद ह्या वेळी कमी झालेली दिसली.
ह्याचे कारण काय? महाराष्ट्रातली जनता गुजरातमधील
जनतेपेक्षा नक्कीच लेचीपेची झाली आहे! पंधरा वर्षांपूर्वी राजकारणात आलेले नरेंद्र
मोदी एके दिवशी उठतात. आणि भाजपातल्या आडवाणी-मुरीलमनोहर जोशींसारख्यांना आव्हान
देतात, नेतेपदावर हक्क सांगतात! राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
महाराष्ट्रात! पंतप्रधानपदासाठी गुजरातच्या प्रचारकाचे नाव पुढे करतो. नुसतेच पुढे
करतो असे नाही तर त्यासाठी उत्तरेत राजकारणही घडवून आणतो. यशस्वीही होतो.
फ्रॅक्चर्ड मँडेट नको, आता पूर्ण मँडेट हे मिशन ठेवले जाते. महाराष्ट्र
मात्र ढिम्म बसला आहे जुन्या आठवणी घोळवत! शिवाजींच्या, पहिल्या
बाजीरावाच्या, टिळकांच्या. आणि यशवंतरावांच्या!
रमेश झवर
भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता
No comments:
Post a Comment