गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकीय क्षितीजावर एखाद्या
धूमकेतूसारखे उगवले असे अनेकांना वाटत असले तरी ते खरे नाही. एक मात्र खरे आहे की,
राजकीय क्षितीजावर आल्यानंतर ते अल्पावधीत सूर्याप्रमाणे तळपू लागले! परंतु नियतीला सूर्याचे हे तळपणे मान्य नसावे.
म्हणूनच मोटार अपघाताचे निमित्त करून क्रूर काळाने भाजपाच्या ह्या तरूण तडफदार नेत्यावर
घाला घातला. पाहता पाहता भारतीय क्षितीजावर चमकणणारा हा नेता काळाच्या पलीकडे
निघून गेला. त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी ऐकून त्यांच्या लाखो अनुयायांना भर
दुपारीच सूर्य मावळल्याचा आभास झाला असेल. आणीबाणीविरूद्ध जयप्रकाशजींच्या
नेतृत्वाखाली जो सर्वपक्षीय देशव्यापी लढा सुरू झाला त्या लढ्यात नुकतेच कुढे
मिसरूड फुटले आहे असे अनेक तरूण नेते पुढे आले. ह्या नेत्यांना त्या काळात तुरुंगाची
हवा खावी लागली. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे ह्या दोघांनाही तुरुंगवास भोगावा
लागला. उतरेत लालूप्रसाद यादव, शरद यादव हे दोघे नेते ज्याप्रमाणे पुढे आले
त्याप्रमाणे महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे नेते पुढे आले.
काँग्रेसशी झुंज देण्याचे बाळकडूच महाजन आणि मुंडे ह्यंना जनसंघात असतानाच मिळाले
होते. सत्ताधा-यांशी निकराची झुंज देत राहणे हे जणू त्यांचे जीवितध्येय होऊन गेले.
कोणापुढे वाकणार नाही, कोणापुढे झुकणार नाही ही वृत्ती बाळगून मुंडे सतत राजकारणात
वावरत राहिले. भाजपाला सत्ता नसतानाच्या त्या काळात हे फार अवघड होते.
युवा मोर्चाचे अध्यक्ष असलेले गोपीनाथ मुंडे हे कधी खचलेले दिसले नाहीत. हताश
झालेलेही त्यांना युवा मोर्चाच्या कोणी कार्यकर्त्यांने पाहिले नाही. कोणतेही काम जिद्दीने
करणे हा त्यांचा लहानपणापासूनचा स्वभाव! झाडाखाली भरणा-या प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेल्या ह्या बंजारा
समाजाच्या ह्या मुलाने शिक्षणाची एकही संधी वाया दवडली नाही. आंबेजोगाई
महाविद्यालयात पदवी प्राप्त केल्यानंतर ते पुण्यात लॉ कॉलेजमध्ये दाखल झाले.
पुण्यात त्यांच्या आयुष्याला राजकारणाचे धुमारे फुटले. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ
मुंडे ह्या दोघांचे विद्यार्थी परिषदेतले काम पाहून भाजपाचे बुजूर्ग नेते वसंतराव
भागवत त्यांच्यावर खूष झाले. जनसंघाचा अवतार समाप्त होऊन भाजपाचा नवा अवतार झाला
होता. त्यामुळे प्रथम युवा मोर्चा, त्यानंतर निवडणुकीचे तिकीट वगैरे राजकारणातल्या
वाटचालीचे टप्पे ओलांडत मुंडे लिधानसभेत पोहोचले तर महाजन हे लोकसभेत पोहोचले.
ह्या काळातच त्यांच्या अंगातली मूळची हुषारी ज्येष्ट भाजपा नेत्यांपासून
लपून राहिली नाही. त्यामुळेच प्रमोद महाजनांचा सत्तेच्या वर्तुळात शिरकाव झाला तर
मुंडेंना विरोधी पक्षनेत्याची लाल बत्तीची गाडी प्राप्त झाली. त्यानंतर जेव्हा देशात
राजकीय उलथापालथीचा काळ सुरू झाला तेव्हा ह्या दोघाही नेत्यांचे कर्तृत्व खुलू
लागले. काँग्रेस आणि शरद पवार हे राजकीय विरोधक असले तरी त्यांच्या राजकारणाचे
मार्मिक निरीक्षण करण्याचा मुंडेना छंद होता ह्याची कबुली द्यायला त्यांना कधी
संकोच वाटला नाही. हीच अंतर्दृष्टी त्यांना विधानसभा निवडणुकीत पवारांविरूद्ध तोफ
डागण्यास उपयोगी पडली. अर्थात स्वतः निवडून येणे एवढ्चे काही उद्दिष्ट त्यांनी
डोळ्यांपुढे ठेवले नाही. राज्यात भाजपाची सत्ता आणण्याचा व्यापक उद्देश महाजन-मुंडे
ह्यांच्या डोळ्यांसमोर होता. शिवसेनेशी युती करण्यासाठी वाजपेयी आणि आडवाणी ह्या
दोघा नेत्यांना गोपीनाथ मुंडे सतत ब्रीफ करत राहिले. त्यांचा पिंड ग्रामीण भागात
घडलेला असल्यामुळे राज्याच्या राजकारणाची नस त्यांना ओळखता आली. पवारांच्या
धर्तीवर आपल्या भागातला मुंडेंनी लोकसंग्रह वाढवला. साखर कारखाना सुरू केला.
शेतक-यांच्या प्रश्नात लक्ष घातले. नेता होण्यासाठी जे जे करणे आवश्यक होते ते ते
त्यांनी केले. शरद पवारांप्रमाणे मुंडेंचाही वाढदिवस 12 डिसेंबर हाच आहे.
पवारांच्या वाढदिवशी झळकणा-या जाहिराती, बातम्यांप्रमाणे मुंडेंच्या
वाढदिवसाच्याही जाहिराती, बातम्या झळकू लागल्या. शरद पवारांवर मुंडेंनी चढवलेल्या
हल्ल्याची तुलना सोनिया-राहूल ह्यांच्यावर नरेंद्र मोदींनी अलीकडे लोकसभा
निवडणुकीत केलेल्या हल्ल्याशी करता येईल. राज्याच्या निवडणुकीत स्वतः बाळासाहेब शिवसेनेचे
स्टार वक्ते तर महाजन-मुंडे हे भाजपाचे स्टार वक्ते होते. त्यामुळेच युतीची सत्ता
राज्यात येऊ शकली हे मान्य करावेच लागेल. पण भाजपाला शिवसेनेपेक्षा कमी जागा मिळाल्याने
युतीच्या धर्मानुसार मुंडेंचे मुख्यमंक्त्रीपद त्यावेळी हुकले.
ह्या लोकसभा निवडणुकीत देशातल्याप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपाला भरघोस यश
मिळाल्यामुळे मुंडे ह्यांचा भाव वधारला. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका येऊ
घातल्या आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर मुंडेंचा हक्क वादातीत आहे. त्या
संदर्भात सेना-भाजपा युतीत थोडी धुसफूसही सुरू झाली. परंतु 'पानीमां म्हस अन् बाम्हन बाम्हनीस मारस' ह्या म्हणीतला सत्य
लक्षात घेऊन मुंडेंनी तूर्तास केंद्रीय मंत्रीपद स्वीकारले. प्रश्न जेव्हा उपस्थित
होईल त्या वेळी पाहू हे त्यांचे राजकीय शहाणपण वादातीत आहे. दिल्लीच्या राजकारणात काम
करताना त्यांचा डोळा महाराष्ट्राच्या राजकारणावर होता. दिल्लीत भाजपाच्या
राजकारणाचे चटके मुंडेंना बसले नाहीत असे नाही. पण एरव्ही भडाभडा बोलून मन मोकळे
करणा-या मुंड्यांनी संयम सुटू दिला नाही. त्यांच्या कर्तृत्वाचा सूर्य तळपण्यास
सुरूवात झाली असतानाच त्यांचे आयुष्य काळाने खुडून टाकले! लोककल्याणासाठी
आतून सतत धुमसत असलेला हा तडफदार नेता प्रमोद महाजनांमागोमाग निघून गेला.
रमेश झवर
भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता
No comments:
Post a Comment