Friday, April 3, 2015

घुमानचा आवाज!

फेडूनी अविवेकाची काजळी। विवेकदीपु उजळी। तई योगिया पाहे। दिवाळी निरंतर।।          -ज्ञानेश्वरमहाराज
ह्या ब्लॉगलेखाच्या शीर्षभागी ज्ञानेश्वरमहाराजांची ओवी दिल्याचे पाहून अनेकांना आश्चर्य वाटेल!  परंतु उत्तरेत तीर्थयात्रा करत असताना ज्ञानेश्वरांनी नामदेवांना मुद्दाम बरोबर घेतले होते. ह्या यात्रेत घडलेल्या सहवासात भक्तीतत्त्व काय आहे हे मला शिकवा अशी विनंती ज्ञानोबांनी नामदेवमहाराजांना केली तर मला योगतत्त्व समजावून सांगा अशी विनंती नामदेवमहाराजांनी ज्ञानोबांना केली होती. आज महाराष्ट्राला जे ज्ञानेश्वरांचे चरित्र माहीत झाले ते नामदेवगाथेमुळेच! इतकेच नव्हे तर एक तरी ओवी अनुभवावीहे अधुनमधून उद्धृत केले जाणारे अभंगाचे चरण   नामदेवमहाराजांचेच! काही काळ नामदेवांची कर्मभूमी असलेल्या घुमान येथे भरलेल्या साहित्य संमेलनात ज्ञानोबांचा विवेकाचा मुद्दाच संमेलनाध्यक्ष सदानंद मोरे ह्यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणात पकडला. नुसताच तो मुद्दा पकडला नाही तर मोरेंनी त्यावर आपल्या भाषणात भर दिला. विवेकाची कास धरल्यास केवळ साहित्यप्रांतातल्या समस्येलावरच उत्तर सापडेल असे नाही तर आधुनिक जगापुढील अनेक समस्यांचे उत्तर शोधण्यास शेवटी विवेकबुद्धीच उपयोगी पडणारी आहे. ह्या अर्थाने पाहिल्यास सदानंद मोरे म्हणतात त्याप्रमाणे संतसाहित्य हा निश्चितपणे  मराठी साहित्यातला मुख्य प्रवाह ठरतो. संतांच्या विवेकवाणीने ऐतिहासिक काळात महाराष्ट्राला तारले; आधुनिक जागतिकीकरणाने उभ्या केलेल्या आव्हानालाही तोंड देण्याचे सामर्थ्य ह्या विवेकवाणीत आहे हा सदानंद मोरेंनी केलेला दावा सहज पटण्यासारखा आहे.      
अनेक सुशिक्षित मराठी वाचकांना अभंग पाठ असले तरी विवेकबुद्धीवर संतांनी दिलेला भर त्यांना उमगलेला नाही. सदानंद मोरेंनी तो संमलेनाला जमलेल्या साहित्यरसिकांच्या लक्षात आणून दिला ह्याबद्दल सदानंद मोरेंलारख्या लो प्रोफाईल साहित्यिकाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. सदानंद मोरे हे तुकोबांचे वंशज. तरी सुरूवातीच्या काळात साहित्यक्षेत्रात त्यांची खूपच हेटाळणी झाली. संतसाहित्यावर मोरेंनी अनेक पुस्तके लिहीली. त्यांची पुस्तके कदाचित् पुस्तकपरीक्षांनी लावलेल्या पांडित्याच्या कसोटीवर खरी उतरली नसतील!  परंतु संतसाहित्याचा नेमका गाभा सदानंद मोरेंना गवसला. त्याचीच मार्मिक मांडणी त्यांनी अध्यक्षीय भाषणात केली.
संमेलनाचे वृत्तांकन करण्यासाठी घुमानला पोहचताना झालेल्या त्रासावरच पत्रकारांनी झोड उठवली. हे पत्रकार सदासर्वकाळ इंटेलेक्चुअल म्हणून वावरतात. त्यामुळे रेल्वेने दिलेल्या त्रासाबद्दल त्यांनी बातम्या लिहील्या हे ठीकच आहे. अर्थात चाळीस तासांचा प्रवास करून संमेलनास गेलेल्यांना लोकांना रेल्वेने भरपूर त्रास दिला हेही खोटे नाही. आयोजकांनी झालेल्या त्रासाबद्दल खेद व्यक्त करायला हवा होता असेही काही जणांनी लिहीले आहे. परंतु विवेकबुद्धीने विचार केल्यास संमेलन आयोजकांवर ठपका ठेवण्यापेक्षा सुरेश प्रभूंकडे रेल्वेच्या सिग्नल कर्मचा-यांची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी लगेच करायला हवी होती. सुरेश प्रभुंची प्रतिक्रिया मिळवून तीही प्रसिद्ध करायला हवी होती.
अलीकडे संमेलन भरवणे हा प्रकार वाटतो तितका सोपा राहिलेला नाही. मराठी साहित्य संमेलनाची स्थिती बाप भीक मागू देत नाही आणि आई जेवू घालत नाही अशी आहे! काळ्या व्यवहारात गुंतलेल्यांकडून देणग्या आणि महाराष्ट्र सरकारकडून मिनतवा-या करून मिळवलेले अनुदान ह्यावर संमेलन कसेबसे भरवले जाते. साहित्य व्यवहार आम्हाला परवडत नाही अशी टीका प्रकाशक मंडळी सतत करत असतात. तशी ती करत असताना वाचकांच्या नावाने बोटे मोडण्यास ही मंडळी विसरत नाहीत! पुरेसे मानधन मिळत नाही ही लेखक-कवींची सार्वत्रिक तक्रार एकविसाच्या शतकातही कायम आहे. अजून तरी ह्या तक्रारींचे समाधानकारक निराकरण झालेले नाही. निराकरण करण्याच्या दृष्टीने कोणत्याही साहित्य संमेलनात विचार झालेला नाही. त्यामुळे आरती फिरवल्यानंतर मिळेल त्या दक्षिणेवर गुजराण करण्याची पाळी लेखकांवर येते. बहुतेक लेखक हे चांगल्या पगाराच्या नोक-या करतात. मराठीतले बहुतेक साहित्यिक हे पार्टटाईम लेखक आहेत हे मराठीतले वास्तव बदलले नाही. बदलण्याचा सुतराम संभव नाही. लेखकाचे मानधन बुडवून प्रकाशन व्यवसाय करणारी मंडळी खरे तर ह्या व्यवसायात राहता नये! तसेच वाट्टेल त्या प्रकारचे लेखन करून पुस्तक गाजवण्याचा धंदा करणारे लेखक जोपर्यंत आहेत तोपर्यंत मराठी साहित्य वांझोटेच राहील. खरे तर हेच दूरिताचे तिमीर. सज्जन मंडळी सोयरे झाल्याखेरीज हे दूरिताचे तिमीर संपणार नाही. ह्या मुद्द्यांवर ह्यापूर्वी साहित्य संमेलनात अनेकदा चर्चा-परिसंवाद झडले आहेत. तरीही ना साहित्यक्षेत्र पियूषाचे अर्णव झाले ना साहित्य व्यवहारातली मरगळ संपली! ह्या विषयाचा विचार करतानादेखील विवेकबुद्धी उपयोगी होण्यासारखा आहे असा विश्वास वाटतो.
भालचंद्र नेमाडे वगैरेंसारख्या लेखकांना वादग्रस्त बोलण्यातच धन्यता वाटते तर सदानंद मोरेंसारख्यांनी संमेलनाचे निमित्त करून वाद कसा तुटेला याचा उपाय सुचवला. संमेलनात भाषण करताना समतोलपणावरील त्यांची नजर कुठेही विचलित झाली नाही हे विशेष! गीतेचा भावानुवाद करताना नाथ परंपरेने प्राप्त झालेले समाधीधन ज्ञानेश्वरांनी ज्याप्रमाणे श्रोत्यांसमोर खुले केले त्याचप्रमाणे बालपणापासून केलेला संतसाहित्याचा व्यासंग सदानंद मोरेंनीही श्रोत्यांसमोर खुला केला. म्हणूनच घुमानमध्ये घुमलेला त्यांचा आवाज रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील.

रमेश झवर

भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता
htt//bhetigathi-spotbasedinterviews.rameshzawar.com/wordpress/

No comments: