Friday, April 17, 2015

बेगडी भूमीपूजन

14 एप्रिल 2015 हा दिवस म्हणजे महामानव बाबासाहेब आंबेडकरांची 124 वी जयंती. म्हणजेच शतकोत्तर रजत जयंती वर्षाची सुरूवात! ह्या दिवशी इंदू मिलमध्ये बाबासाहेबांच्या स्मारकाचा जो प्रतिकात्मक भूमीपूजन सोहळा साजरा करण्यात आला तो एक लाजिरवाणा प्रकार म्हटला पाहिजे. आंबेडकर जयंतीच्या दिवशी त्यांच्या स्मारकाच्या भूमीपूजनास उपस्थित राहायचे सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात कुठे तरी भारतीय संस्कृतीचे गोडवे गात बसले होते! पंतप्रधानांचा परदेश दौरा आखणा-या पंतप्रधान कार्यालयास बाबासाहेबांच्या जयंतीचा दिवस लक्षात नाही हे समजण्यासारखे आहे. परंतु मोदींसाठी रात्रंदिवस राजकारणाचा धंदा करणा-यांना हा दिवस लक्षात कसा राहिला नाही ह्याचे मात्र आश्चर्य वाटते. 14 एप्रिलची तारीख चैत्यभूमीसाठी राखून ठेवण्याची विनंती करण्यासाठी रामदास आठवले ह्यांना पंतप्रधानांची भेट घेणे शक्य होते. सत्ताधा-यांपुढे शरणागती पत्करून आरक्षणाच्या मागण्या करण्यापलीकडे कुठल्याही प्रकारचे राजकारण दलित नेत्यांना जमलेले नाही. हे ह्या निमित्ताने स्पष्ट झाले. 14 एप्रिल रोजी दरवर्षी मुंबईत चैत्यभूमीवर जनसागर उसळतो. त्यावेळी पंतप्रधानांनी हजेरी लावली असती तर दलितांबद्दलची कणव त्यांच्याकडे आहे असे सगळ्यांना दिसले असते. त्यासाठी प्रयत्न करणे ही रामदास आठवले ह्यांची जबाबदारी होती आणि आहे. परंतु ही जबाबदारी पार पाडण्याचा साधा शिष्टाचार त्यांनी पाळला नाही.
बाबासाहेबांच्या नावाने राजकारण करणा-या देशभरातल्या दलित नेत्यांची गेल्या पन्नास वर्षांच्या काळात एक जबरदस्त फळी निर्माण व्हायला हवी होती. पण तशी ती निर्माण करण्याचा कोणाचा वकूब नाही हेच खरे. अखिल भारतीय राजकारण करणे सोपे नाही. परंतु बाबासाहेबांचे स्मारक करण्याच्या मुद्दा घेऊन दलित नेत्यांना एकत्र यायला काय हरकत होती? तसे ते एकत्र आले असते तर बाबासाहेबांचा कार्यक्रम सोडून परदेश दौरा आखण्याची हिंमत पंतप्रधान कार्यालयास झाली नसती. काँग्रेसच्या सत्ता काळात काँग्रेसची सावलीसारखी सोबत करण्यासाठी आठवलेंनी जिवाचे रान केले आहे. भाजपाच्या सत्ता काळात मात्र त्यांचा करिष्मा सुंष्टात आला आहे. एके काळी प्रस्थापित दलित नेत्यांविरूद्ध बंड करण्याच्या उद्देशाने जे तरूण पुढे आले होते त्यात रामदास आठवले हे प्रमुख होते. परंतु त्यावेळचे सगळे पँथर आता माणसाळले आहेत. सगळ्यांना सत्तेची चटक लागली आहे. सगळे जण प्रस्थापित होऊन बसले आहेत! आरक्षणाखेरीज त्यांना काही सुचत नाही. कारण त्यांची जागृती संपलेली आहे! सेना-भाजपा युतीबरोबर त्यांनी वाटचाल सुरू केली. त्यांच्या पदरात काय पडले?  बाबासाहेबांच्या स्मारकासाठी काँग्रेस राजवटीत मंजूर झालेली इंदू मिलची जमीन त्यांनी पदरात पाडून घेतली ह्यात विशेष असे काही नाही. ती जागा त्यांना मिळणारच होती. ह्यातच ते धन्यता मानत असतील तर बोलणेच संपले. सत्ताधा-यांना विरोध करून प्रसंगी त्यांच्या हातातली सत्ता हिसकावून घेणारे कांशीराम-मायावती कुठे आणि आंबेडकरांचे नाव सांगून राजकारण करणारे महाराष्ट्रातले दलित नेते कुठे!  ना घरका ना घाटका अशी बहुतेकांची स्थिती आहे! 
रामदास आठवले राज्यसभेत गेले खरे; पण दिल्लीच्या वजनकाट्यावर त्यांचे वजन शून्य! त्याचप्रमाणे भाजपाचे नेते आणि शिवसेनेचे नेते ह्यांचेही दिल्लीत फारसे वजन नाही. तसे त्यांचे वजन असते तर एप्रिलमध्ये परदेश दौरा आखण्याची पीएमओला हिंमतच झाली नसती. फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा ह्या देशांचा दौरा आखताना बाबासाहेबांच्या जयंतीची तारीख विचारात घेण्यास पीएमओला ह्या नेत्यांना भाग पाडता आले नाही. मुंबईच्या कार्यक्रमात भाग घेण्याचे निमंत्रण नरेंद्र मोदींना खूप आधी देण्याची चपळाई त्यांनी दाखवली असती आणि फ़डणविसांनीही नरेंद्र मोदींना गळ घातली असती तर राज्यातल्या दलित जनतेशी ह्रत्संवाद साधण्यासाठी ते नक्की मुंबईला आले असते. नेमका ह्याचाच फायदा काँग्रेसच्या किरकोळ नेत्यांनी घेतला. इंदू मिलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे त्यांनी प्रतिकात्मक भूमीपूजन केले.  
मरणोत्तर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमी पूजनास प्रतिकात्मक म्हणायचे ह्यासारखा विनोद नाही. असा विनोद काँग्रेसवालेच करू शकतातशतकोत्तर रजत जयंती वर्षाच्या सुरूवातीच्या दिवशी भूमीपूजनच करायचे होते तर त्यांना नरेंद्र मोदींच्या नाकावर टिच्चून सोनिया गांधींना मुंबईत आणता आले असते. पण असा भव्य समारंभ करायचे काँग्रेसला सुचले नाही. सुचणारही नाही. कारण त्यांचा हा खटाटोप केवळ बातमी छापून आणण्यापुरताच होता!. ह्या बेगडी भूमीपूजनामुळे काँग्रेसची तर अब्रू गेलीच. परंतु भारतरत्न बाबासाहेबांचीही अब्रू गेली.
भारतीय घटनेचे शिल्पकार असलेले बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जीवितकार्यावर ओझरती नजर जरी टाकली तरी त्यांचे मोठेपण लक्षात आल्याखेरीज राहात नाही. अर्थकारण, राजकारण, समाजकारण, धर्मकारण, कायदा इत्यादींचा बाबासाहेबांइतका प्रचंड व्यासंग करणारा एकही नेता भारतात झाला नाही. विशेष म्हणजे त्यांच्या व्यासंगाला कृतीशीलतेची जोडही लाभली होती. अस्पृश्यता निवारणासाठी बाबासाहेबांनी सतत आठ वर्षे लढा दिला. प्रत्येक वेळी त्यांनी सत्याग्रहाचे शस्त्र उपसले. बाबासाहेबांची योग्यता महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांपेक्षा बिल्कूल कमी नव्हती. त्यांची लोकप्रियता आणि लोकमान्यता टिळकाइतकीच बावन्नकशी होती. ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांवर आणि महात्मा गांधींवर देशवासियांच्या आशा-आकांक्षा केंद्रित झाल्या होत्या त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांवरदेखील पीडित, दलित जनतेच्या आशाआकांक्षा केंद्रित झाल्या होत्या.
अशा ह्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या नेत्याचे स्मारक भव्योदात्तच व्हायला हवे. साडेबारा एकर जमिनीवर व्हायवयाच्या ह्या स्मारकाविषयी दलित नेत्यांच्या कल्पना स्पष्ट आहेत की नाही कुणास ठाऊक! म्हणूनच बाबासाहेबांच्या स्मारकासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना फारसा जोर आलाच नाही. बाबासाहेबा आंबेडकरांसारखे युगपुरूष वारंवार जन्माला येत नाहीत. सखोल व्यासंग आणि सक्रीय राजकारण ह्यास निर्भीडतेची जोड मिळालेले नेते तर इतिहासात अत्यंत दुर्मिळ आहेत. त्यांचे स्मारक हे त्यांच्याप्रमाणे व्यासंग करणा-यांचे केंद्र व्हायला हवे. बाबासाहेबांप्रमाणे समग्र जागतिक राजकारण समजून घेणारांचे हे स्मारक आवडते केंद्र झाले पाहिजे. धर्मान्तर केल्यानंतर बाबासाहेबांनी बौध्द धर्माची भूमिका नव्याने मांडली होती. ह्याची आठवण ठेवून धर्मकारणाची नव्याने मांडणी करू इच्छिणा-यांचेही हे स्मारक केंद्र व्हायला हवे.
नुसती टोलेजंग बिल्डिंग आणि दलित राजकाणाचा अड्डा म्हणजे स्मारक नव्हे. आंबेडकर हे जगभरातल्या चळवळींना मार्गदर्शन करणारे केंद्र व्हायला हवे अशी अपेक्षा आहे. भारतातल्या दुःस्थितीला ब्रिटिश शासनास जबाबदार धरून बाबासाहेबांनी सडेतोड प्रबंध सादर केला होता. त्यांच्या सडेतोड प्रबंधामुळे हेराल्ड लास्कीसारख्या समाजवादाचा पुरस्कार करणा-या विचारवंतालाही धडकी भरली होती. बाबासाहेबांचे स्मारक जगभरातल्या बंडखोर विचारवंताना हवे हवेसे वाटणारे केंद्र झाले तरच ते त्यांचे खरे स्मारक ठरेल. बाबासाहेबांचे स्मारक ही केवळ दलित पुढा-यांच्या मालकीची गादी होता कामा नये. बाबासाहेबांच्या स्मारकाची योजना आखण्यासाठी सगळ्या विचारवंतानी एकत्र आले पाहिजे.  काऱण भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते नाहीत. ते सर्वांचे आहेत. सगळ्या भारताचे नेते आहेत!

रमेश झवर


भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता

www.rameshzawar.com

No comments: