"There is a little bit of the whore in all
of us, gentlemen. What is your price?” -Kerry Packer
‘आपल्या प्रत्येकात थोडीशी बाजारबसवी दडलेली आहे. तुमची किंमत बोला!’ असा खुल्लमखुल्ला युक्तिवाद ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या बैठकीत केरी पॅकर ह्या ऑस्ट्रेलियांच्या बड्या मिडिया सम्राटाने 1976 साली केला होता. त्याला क्रिकेट सामने दूरचित्रवाहनीवरून दाखवण्याचे हक्क विकत घ्यायचे होते. भारताच्या ‘आयपीलएल’ फ्रँचायसीधारकांत अगदीच बाजारबसव्यांनी ठाण मांडले नसले तरी त्यांच्यात जुगारी मनोवृत्ती मात्र दडून बसली आहे असे म्हटले पाहिजे. गुरुनाथ मयप्पन आणि राज कुंद्रा ह्यांच्या सट्टेबाजीमुळे क्रिकेटला बट्टा लागला अशी स्पष्टोक्ती न्या. लोढा ह्यांनी केली आहे.
न्या. लोढा ह्यांनी मयप्पन आणि कुंद्रा ह्या दोघा सट्टेबाजांना क्रिकटमधून कायमचे हद्दपार करण्याचा
निर्णय दिला आहे. मयप्प्नच्या बाबतीत तर न्या. लोढा ह्यांनी फारच महत्त्वाचा
मुद्दा उपस्थित केला. सट्टेबाज मयप्पनविरूद्ध पोलिस कारवाई होऊनही चेन्नई सुपर
किंगचे मूळ मालक असलेल्या इंडिया सिमेंट कंपनीने ह्या प्रशासकमहाशयांविरूद्ध मुळीच
कारवाई केली नाही. कारवाई करणार तरी कशी? मयप्पन हा इंडिया सुपरकिंगच्या मूळ कंपनीचे अध्यक्ष श्रीनिवासन् ह्यांचा जावई! ‘सन इन लॉ’पुढे ‘कंपनी लॉ’ची काय किंमत?
राज कुंद्रा आणि मयप्पन ह्या दोघांना फर्मावण्यात
आलेली शिक्षा कमी की जास्त हा मुद्दा हितसंबंधित मंडळीकडून चर्चिला जात असतानाच
बीसीसीआयपुढे आता नवाच व्यावहारिक पेच उभा राहिला आहे. 2016 साली होणा-या आयपीएल
सामन्यांना अजून 8 महिन्यांचा अवकाश असला तरी फ्रॅंचायसी प्रकरणी बीसीसीआयने योग्य
निर्णय घेतला नाही तर 6 संघावर सामने खेळवले जाण्याचा प्रसंग आयपीएलवर येईल. ह्याचा
अर्थ चाळीसेक सामनेच खेळवता येतील. परिणामी स्टार टी व्ही. बरोबर केलेल्या करारानुसार
60 सामन्यांची संख्या पुरी करता येणार नाही.
आता बीसीसीआयपुढे एकच प्रश्न उभा आहेः राजस्थान
रॉयल आणि चेन्नई किंग ह्या कंपन्यांच्या नावावर असलेल्या फ्रँचायसीचे काय करायचे? त्या कंपन्या विकण्याची सरळ सरळ परवानगी देऊन नव्या मालकांना मंजुरी द्यायची
की ह्या दोन्ही कंपन्या दोन वर्षांसाठी बडतर्फ ठेऊन नव्याने स्थापन होणा-या कंपन्यांना
आयपीएल फ्रँचायसी देऊन टाकावे. तसे केल्यास दोन्ही संघाच्या मिळून एकूण 45 क्रिकेटपटुंना
लिलावाच्या रिंगणात उभे राहावे लागेल. मयप्प्न आणि राज कुंद्रा ह्यांच्याविरूद्ध
कारवाई केली ते ठीक आहे; पण ज्या क्रिकेटपटुंबद्दल संशय व्यक्त करण्यात
आला आहे त्यांच्याविरूद्ध अजून चौकशी सुरू झालेली नाही. अजून त्यांची नावे बंद
लिफाफ्यातच आहेत. तो लिफाफा उघडून मॅचफिक्सिंगमध्ये सामील झालेल्या अप्रामाणिक खेळाडूंना
शिक्षा दिल्य जात नाहीत तोपर्यंत क्रिकेट स्वच्छ व्हायला सुरूवात झाली आहे असे
मानता येणार नाही. खेरीज बंदीच्या विरोधात चेन्नई सुपर किंग उच्च न्यायालयात दाद
मागणार असे इंडिया सिमेंटने सूचित केले आहे. ह्याचा अर्थ हे सट्टा प्रकरण एकदाचे संपले
असा नाही. फरारी क्रिकेट कमिश्नर ललित मोदी आणि श्रीनिवासन् ह्यांना आंतरराष्ट्रीय
क्रिकेट बोर्डवर देण्यात आलेली प्रतिनिधित्व ही दोन्ही बांडगुळे अजून शिल्लक आहे. ती
जोपर्यंत काढून फेकण्यात येत नाही तोपर्यंत न्याय सफल संपूर्ण झाला असे म्हणता
येणार नाही.
आयपीएलमधल्या दोन रिक्त कंपन्यांची जागा भरून काढता
येतील, क्रिकेटपटुंचाही प्रश्न आज ना उद्या मार्गी लावता येईल, परंतु राजस्थान
रॉयल आणि चेन्नई सुपरकिंग ह्यांच्यामुळे क्रिकेटला लागलेला बट्टा कसा पुसून टाकणार? क्रिकेट म्हणजे सट्ट्याचा धंदा ही प्रतिमा भारताला दीर्घ काळ छळत राहणार हे
नक्की. धोनीसारख्या चांगल्या क्रिकेटपटुला चेन्नई सुपर किंगसारख्या कंपनीने 15
लक्ष डॉलर्स मोजून खरेदी करावे आणि शान मिरवावी हे क्रिकेटप्रेमींना मनोमन खटकत राहणारच.
बरे झाले, हा भ्रष्टाचाराचा धुरळा
उडण्यापूर्वी सचिन तेंडुलकरला भारतरत्न मिळाले आणि त्याने क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली! एकूण हा प्रकार बदनामीकारक आहे. तरीही ह्या बदनामीमुळे आयपीएलचे नुकसान
होण्यापेक्षा झाल तर फायदाच होईल अशी प्रतिक्रिया स्वतःला ब्रँडतज्ज्ञ म्हणवणा-या
हरीश बिजूरनी व्यक्त केली आहे. सगळे काही पैशाच्या दृष्टीकोनातून पाहायची सवय
लागल्यावर वेगळी प्रतिक्रिया अपेक्षित नाही. कारण, त्यांच्या मते क्रिकेट सामने हा
चार अब्ज डॉलर्सचा व्यवसाय आहे. कुठल्याही प्रकारचा वाद हा बिजिनेसला पोषक असतो
म्हणे! चार अब्ज डॉलर्सची उलाढाल पाच अब्ज डॉलर्सवर कशी
जाईल ह्याचीच त्यांना चिंता अधिक.
क्रिकेट इज जंटलमनस् गेम अशी प्रतिमा बहुसंख्य
भारतीय लोकांच्या मनावर ठसलेली आहे. ह्या पार्शवभूमीवर क्रिकेटच्या प्रतिमेला सट्टेबाजी
आणि मॅचफिक्सिंग प्रकरणामुळे निश्चित धक्का लागला आहे. असे असले तरी भारतात
क्रिकेटची लोकप्रियता कमी होणार नाही. परंतु क्रिकेटप्रेमी मात्र मनाशी म्हणत
राहणार, बूंदसे गईं सो हौदोंसे नहीं आएगी!
रमेश झवर
WWW.rameshzawar.com
No comments:
Post a Comment