Monday, July 27, 2015

लोकप्रिय राष्ट्रपती!

भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती अब्दुल जे कलाम गेले. पंचमहाभूतांवर विजय मिळवणारा त्यांचा देह पंचमहाभूतात विलीन झाला. भारताचा हा मिसाईल मॅन निघून गेला. भारतीय लोकशाही वृक्षावर फुललेले सुंदर फूल अचानक गळून पडले! त्यांच्या निधनाने देश हळहळला. विसाव्या शतकात तिशीच्या दशकात जन्मलेल्या, वाढलेल्या ह्या रामेश्वरपुत्राच्या डोक्यात ना कधी भोंगळ समाजवादाचे वारे शिरले ना राजकारणाने त्याला मोहात पाडले. साध्या नावाड्याचा मुलगा. शाळेत असताना सकाळी वर्तमानपत्रे विकून वडिलांना मदत करणा-या अब्दुलला लहानपणापासून गणिताची आवड! म्हणून शालेय शिक्षण आटोपताच चेन्नईला तंत्रमहाविद्यालयात एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा घेतला आणि त्याहून उच्च शिक्षण घेण्यासाठी ते अमेरिकेला गेले. अमेरिकेतून भारतात परतल्यावर 1958 साली ते इस्रोमध्ये दाखल झाले. बालपणी त्यांनी पाहिलेले स्वप्न साकार झाले. त्यांच्यातल्या साहसी वृत्तीनेच त्यांचे स्वप्न साकार केले. म्हणूनच त्यांनी तरूणांना संदेश दिला, “My message, especially to young people is to have courage to think differently, courage to invent, to travel the unexplored path, courage to discover the impossible and to conquer the problems and succeed."
विशेष म्हणजे ए पी जे कलामनी पाहिलेले स्वप्न आणि देशाने पाहिलेले स्वप्न तंतोतंत जुळत गेले. स्पेस टेक्नालॉजी, अणुसंशोधन आणि आण्विक शस्त्रास्त्रांच्या संशोधनातली त्यांची मती आणि गति पाहूनच विक्रम साराभाईंनी त्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत निवड केली नसती तरच नवल ठरले असते. साराभाईंची निवड किती सार्थ होती हेच पुढील काळात जेव्हा एका पाठोपाठ एक भारताने अंतराळात उपग्रह सोडले ते दिसून आले. जेव्हा संरक्षण संशोधन संस्थेच्या प्रमुखपदाची जागा रिक्त झाली तेव्हा त्या संस्थेच्या प्रमुखपदासाठी ए पी जे कलाम ह्यांची निवड होणे स्वाभाविक होते. पण हा काळा त्यांच्या आयुष्यात कसोटीचा ठरला! अण्वस्त्रात आणि अवकाश प्रक्षेपणात वापरले जाणारे तंत्र एकच असते. आकाशात उपग्रह पाठवण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरले जाते तेच तंत्रज्ञान जमिनीवरून लांब पल्ल्याचे अण्वस्त्र प्रक्षेपित करण्यासाठीही वापरले जाते जगभर दुहेरी तंत्रज्ञान म्हणून ओळखल्या जाणा-या ह्या तंत्रज्ञानावर भारताने प्रभुत्व मिळवल्यास बड्या देशांच्या पंक्तीला भारत येऊन बसणार हे सूर्याप्रकाशाइतके स्वच्छ दिसू लागले. म्हणूनच भारताला हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी लागणारी साधनसामुग्री पुरवण्यावर स्वतः अण्वस्त्रसज्ज असलेल्या अमेरिकेच्या पुढाकाराने बंदी घालण्यात आली. पण ह्या बंदीमुळे शस्त्रास्त्र संशोधन संस्थेचे प्रमुख कलाम आणि त्यांचे सहकारी शास्त्रज्ञ हातपाय गाळून स्वस्थ बसले नाही. उलट, त्यांचे संशोधन दुप्पट जोमाने सुरूच राहिले.
रॉकेट जेव्हा पृथ्वीची कक्षा ओलांडते तेव्हा ते अति उष्णतेमुळे जळून जाण्याची भीती असते. ते जळू नये म्हणून आवश्यक असलेले क्रायोजेनिक टेक्नॉलॉजी भारताकडे नव्हती. ती देशात विकसित करावी तर त्याला लागणारी साधनसामुग्री नाही. रशिया त्यावेळी भारताच्या मदतीला धावून आला. रशियाने भारताला क्रायोजेनिक इंजिन तर दिलेच; खेरीज शून्याखाली 400 अंश तपमान कसे राखावे ह्याचे क्रायोजेनिक तंत्रज्ञानही भारताला दिले. हे एक तंत्रज्ञान सोडले तर अन्य छोटेमोठे तंत्रज्ञान देशातच विकसित करण्याचा निर्णय संरक्षण संशोधन संस्थेने घेतला. सामान्यतः राज्यकर्ते संरक्षणादि खात्यात चालणा-या संशोधनास बळ देतात. ह्या संदर्भातली वस्तुस्थिती मात्र नेमकी उलट आहे. इथे संशोधकांनी राज्यकर्त्यांना बळ दिले. लांब पल्ल्याची प्रत्क्षेपणास्त्रे आणि पृथ्वीची कक्षा सहज ओलांडू शकेल अशा रॉकेटची निर्मिती ह्या दोन्ही बाबतीत भारताला यश मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारताची इभ्रत वाढली!
रणाविण स्वातंत्र्य मिळवून देणा-या महात्मा गांधींमुळे भारताचे नाव जगात दुमदुमले तर मिसाईल मॅन म्हणून ए पी जे कलाम ह्यांचे नाव दुमदुमले ते स्वसंरक्षण करण्यासाठी भारताला अग्नीपंख दिले म्हणून!   एके काळी शांततेचे प्रतीक म्हणून आकाशात कबुतरे सोडणा-या शांतिदूत पंडित जवाहरलालजींचे नाव दुमदुमले होते. त्यांचे राजकीय वारस इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी ह्यांचे नाव दुमदुमले ते पृथ्वी, त्रिशूल, आकाश, नाग आणि अग्नी ह्या प्रक्षेपणास्त्रांमुळे! ही प्रक्षेपणास्त्रे विकसित करण्यासाठी ए पी जे कलाम ह्यांनी जिवाचे रान केले. जगाला शांततेच्या मार्गाने जाण्याचे आवाहन करणा-या भारताची अहिंसा ही दुर्बळाची अहिंसा नसून अण्वस्त्रसज्ज भारताची अहिंसा आहे हे जगाला दिसले ते ए पी जे कलाम ह्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे.
भारतीय राजकारणात काही वेळा इतके मोहक चमत्कार पाहायला मिळाले आहेत की त्यांना जगाच्या इतिहासात तोड नाही! राष्ट्रपतीपदासाठी ए पी जे कलाम ह्याचे नाव सुचवले जाते काय, त्यांच्या निवडीला कोणाचीच हरकत नसणे काय आणि कलाम हे राष्ट्रपतीपदावर विराजमान होतात काय! हा सगळा चमत्कार विसावे शतक संपता संपता नव्या पिढीला पाहायला मिळाला. हे नव्या पिढीच्या देशवासियांचे भाग्यच म्हटले पाहिजे. राष्ट्रपतीपदावर विराजमान झालेली व्यक्ति राज्यकर्त्यांना आवडतेच असे नाही. कलाम मात्र त्याला अपवाद ठरले. क्षुद्र मानापामानाच्या वादात हा तंत्रज्ञानमहर्षी कधी सापडलाच नाही. उलट, राज्यकर्त्यांत ते जेवढे लोकप्रिय झाले तितकेच, किंबहुना त्याहीपेक्षा अधिकच ते जनसामान्यातही लोकप्रिय झाले. ख-या अर्थाने ते लोकांचे राष्ट्रपती झाले. खुर्चीच्या मोहाने त्यांची मती कधीच भ्रमित झाली नाही. राष्ट्रपतीपदावर आरूढ झाल्यानंतर त्यांनी रामेश्र्वरवासियांना मुद्दाम राष्ट्रपतीभवनात बोलावले. राष्ट्रभवनास भेट देण्यासाठी ज्या रामेश्र्वरवासियांना त्यांनी निमंत्रण दिले त्यात रामेश्र्वर मंदिराचे मुख्य पुजारी सुब्रह्मण्यम रानडे ह्यांचाही समावेश करण्यास कलाम विसरले नाही. राष्ट्रपतीपदावरून पायउतार होताच त्यांनी विद्यार्थांना उत्तेजन देण्यासाठी भाषणे देण्याचा सर्वतंत्रस्वतंत्र कार्यक्रम आखला. तारूण्याला लाजवणा-या उत्साहाने त्यांनी तो अमलातही आणला! जगभर त्यांनी विद्यार्थ्यांसमोर व्याख्याने दिली. त्यांनी जे विहित कर्तव्य मानले ते कर्तव्य बजावत असतानाच त्यांना मृत्यू यावा हा विलक्षण नव्वळ योगायोग नाही! नैष्कर्म्य सिद्धीपासून मिळणारे फळ ह्यापेक्षा वेगळे असूच शकत नाही. राष्ट्रपतीपदावर बसवण्यासाठी राजकारण्यांनी भले मुस्लीम व्यक्ती शोधून आणली असेल; पण कलाम ह्यांचा एकच धर्म होता, ज्ञानविज्ञान धर्म! ‘आचारप्रभवो धर्मा म्हणतात तोच हा धर्म!!

रमेश झवर
www.rameshzawar.com

No comments: