Sunday, November 8, 2015

‘मोदीविरोधा’चा विजय

गुजरात मार्गे अखिल भारतीय राजकारणात घुसलेल्या नरेंद्र मोदींचा श्यामकर्ण अश्व अखेर बिहारी भय्यांनी अडवला. बिहार गरीब आहे. जनतेच्या गरिबीला तर सीमाच नाही. पण ही जनता गरीब असली तरी राजकीयदृष्ट्या संवेदनक्षम आहे असे निवडणुकीच्या निकालाकडे सहज नजर टाकली तरी लक्षात येते. लोकसभा निवडणुकीत जेपींच्या दोघा प्रमुख बिहारी चेल्यांना बाजूला सारून नरेंद्र मोदींना ज्या जनतेने निवडून दिले होते त्याच जनतेने विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना झिडकारले. विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणित लोकशाही आघाडीचा पराभव म्हणजे भाजपाप्रणित लोकशाही आघाडीविरूद्ध सार्वमत नाही. बिहार विधानसभेच्या निकालामुळे केंद्र सरकारची एकही विट सरकणार नाही हे खरे आहे. 2014 मध्ये केंद्रात सत्ता मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे उजवे हात भाजपा अध्यक्ष अमित शहा ह्या दोघांच्या महत्त्वाकांक्षा शिगेस पोहचल्या होत्या. परंतु हे दोन्ही नेते आतून न्यूनगंडाने पछाडलेले असावेत. म्हणूनच हरियाणा, जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि महाराष्ट्र ह्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काळजीपूर्वक व्यूहरचवना केली. पण त्याचा उपयोग झाला नाही. राज्यांच्या निवडणुकात भरघोस यश मिळेपर्यंत भाजपा सत्तेची ताकद ख-या अर्थाने वाढणार नाही हा ह्या दोघांचा हिशेब अगदीच चुकीचा नव्हता. पण त्यांना जे कळले ते त्यांच्या सोम्यागोम्या सहका-यांना आणि त्यांच्या मातृसंघटनेला कळलेले दिसत नाही. म्हणूच अकलेचे तारे तोडण्यात त्यांनी एक वर्ष खर्च केले.
गाय, गोमांस आणि संस्कृती हे विषय काढण्याची काही गरज होती का? पण रोज सुचेल ते बोलण्याचा त्यांनी सपाटा लावला. धार्मिक कल्पनांची मुक्तफळे ते उधळत राहिले. गेली साठ वर्षे वासनात बांधून ठेवलेली मते ठासून मांडण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. कोणी क्रमिक पुस्तकातले धडेच बदलायला निघाला तर कोणी साहित्यिक-विचारवंत म्हणून वावरणा-या मंडऴींच्या बुद्धीमत्तेचे माप काढायला लागला. ऐन बिहार निवडणुकीच्या वेळी संघप्रमुख मोहन भागवतांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले. धोरणात्मक बाबींवर वक्तव्य करताना संयम बाळगायचा असतो हे त्यांच्या गावीदेखील नाही. इतरांशी विशेषतः विरोधकांशी बोलताना मुत्सद्देगिरीने बोलायचे असते, वागताना वादाचे मुद्दे टाळायचे असतात ह्याचेही भान कोणालाच राहिले नाही. सामान्यतः सर्वच राजकीय पक्षातले मुरब्बी नेते प्रशासनाला एक ‘नॉलेजेबल मतदारसंघ’ समजतात. पण नियोजन मंडळ आणि रिझर्व्ह बँकेच्या प्रमुखांशी नरेंद्र मोदी आणि अरूण जेटली जसे वागले ते पाहता भाजपा आमदार-खासदार प्रशसकीय अधिका-यांशी कसे वागले असतील याची कल्पना केलेलीच बरी. भाजपा संस्कृतीत मुरलेल्यांच्या जन्मजात असहिष्णुतेचा अनुभव घेतल्यानंतर अनेक लेखक, कलावंत, शास्त्रज्ञांनी मोदी सरकारविरूद्ध पुरस्कारवापसीचे शस्त्र उपसले. पुरस्कारवापसीच्या शस्त्राने घायाळ झालेल्या भाजाप नेत्यांना परिस्थिती कशी सावरायची असते हे कळेनासे झाले. त्यात भर म्हणून की काय मूडीज् सारख्या पतमापन संस्थांनी सध्याची परिस्थिती आर्थिक विकासाला अडथळा ठरू शकते असा इशारा दिला. हा इशारा प्रसिद्ध होताच रिझर्व्ह बँकेचे गव्हरर्नर रघुराम राजन ह्यांनीही मूडीचे अनुकरण केले. दिल्ली आयआयटीच्या विद्यार्थ्यांपुढे सणसणीत भाषण करून अरूण जेटलींनी वेळोवेळी दिलेल्या सल्ल्याची त्यांनी परतफेड केली.
ह्या वातावरणात नरेंद्र मोदींच्या विकासपुरूष ह्या प्रतिमेला काळे बोट केव्हा लागले हे भाजपामधील अनेकांच्या ध्यानात आले नाही. असहिष्णुतेच्या मुद्द्यावर काही कारण नसताना ऐन मोक्याच्या क्षणी नरेंद्र मोदी मौनात गेले. परदेशात भारतीयांच्या मेळाव्यात फुलणारी त्यांची रसवंती देशातल्या विचारवंतांनी उपस्थित केलेल्या असहिष्णुतेच्या मुद्द्याला उत्तर देण्याची वेळ आली तेव्हा गोंधळून गेली असेल का? अमित शहा तर ‘बेपारी माणस’! पुरस्कारवापसीच्या प्रश्नावर अचूक भाष्य करून मार्ग काढण्याची कुवतच त्यांच्याकडे नाही. दरम्यानच्या काळात बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार ह्यांचीही बिहारचे विकासपुरूष अशी प्रतिमा उभी झाली होती हे भाजपा नेत्यांच्या ध्यानात आले नाही! बहुतेकांना हे माहित नाही की लालूप्रसादना सत्तेवरून हटवल्यानंतर नीतीशकुमारांनी बिहारमध्ये रेंगाळलेल्या वीजनिर्मिती आणि वीजवहन प्रकल्पांना अग्रक्रम दिला. ते पुरे करवून घेतले. विजेनंतर आता ते रस्त्यांचे प्रकल्प हाती घेणार आहेत. मात्र जाहिरातबाजीत नरेंद्र मोदींच्या तुलनेने नीतीशकुमार खूपच कमी पडले.
जम्मू-काश्मीर आणि नंतर महाराष्ट्रात यश मिळाल्यानंतर बिहारमध्ये आपल्याला सहज यश मिळेल असे मोदी-शहा जोडगोळीला वाटलेले असू शकते. परंतु त्यांचा विकासाचा मुद्दा बिहारी जनतेने उडवून लावला असे दिसते. शिवराळ भाषा, जातपात, गुन्हेगारी इत्यादि बिहारचे गुणविशेष आहेत. बिहारी जनता अल्पशिक्षित, अडाणी असली तरी कष्टाळूपणाच्या बाबतीत ती तसूभरही कमी नाही. परंतु बनियावृत्तीच्या बाबतीत तर गुजरातींच्या तुलनेने बिहारी कुठेच नाही. फार पूर्वीच्या काळापासून बिहारी जनेतची नाळ समाजवादी विचारधारेशी जुळलेली आहे. कर्पूरी ठाकूर, जयप्रकाशजी ह्यासारख्या नेत्यांमुळे आणि सतत घडणा-या अन्याय-अत्याचारांमुळे तर बिहारी जनतेच्या मनातली समाजवादाची धार अधिकच तीव्र झाली आहे. राजद नेते लालूप्रसाद यादव आणि जदयू नेते नीतीशकुमार हे जयप्रकाश नारायणांच्या विचारांचा वारसा घेतलेले नेते. दोघांच्या व्यक्तिमत्त्वात बिलकूल साम्य नाही. पण विचारात मात्र पुरेपूर साम्य आहे. त्यामुळेच काही काळ हे दोघे नेते एकमेकांविरूद्ध उभे राहिले होते. ह्या निवडणुकीत त्यांना एकत्र येण्याची बुद्धी झाली. नरेंद्र मोदींसह भाजपाप्रणित आघाडीचा पत्ता काटण्यासाठी दोघे एकत्र आले. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला यश मिळाल्यास नरेंद्र मोदींच्या राजकीय ताकदीवर शिक्कामोर्तब झाल्यासारखेच ठरेल हे राजकीय ज्ञान दोघांकडे निश्चितपणे आहे. त्या ज्ञानाचाच फायदा राजद आणि जदयूला बिहार निवडणुकीत झाला आहे हे उघड आहे.
विकासाबद्दल सरकारकडून जनतेच्या मुळात फारशा अपेक्षा नसतात. कारण राज्यकर्ते जेव्हा विकासाची भाषा बोलतात तेव्हा त्यांना विशिष्ट उद्योगपतीचा विकास अभिप्रेत असतो. त्यामुळे मोदींच्या विकासाच्या भाषेला बिहारने किंमत दिली नाही. बिहार विधानसभा निवडणुकीत जातीय समीकरणे, तळागाळातल्या लोकांच्या दुःखावर फुंकर घालणारी भाषणे, शिवराळ भाषा हे सगळे बिहारच्या निवडणुकीत अपेक्षितच होते. घडलेही तसेच. गुन्हेगारांना उमेदवारी ही समस्या सर्वच राज्यात आहे. असोशिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफ़ॉर्मने दिलेल्या एका अहवालात म्हटले आहे की गेल्या दहा वर्षांत काँग्रेसने उभ्या केलेल्या उमेदवारात 41 टक्के उमेदवारांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे तर भाजपाने उभ्या केलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची टक्केवारी 54 टक्के आहे. बिहार राज्यदेखील त्याला अपवाद नाही. मतदानाच्या दिवशी मुस्लिम आणि यादव-कुर्मी मतदारांच्या संख्येपेक्षा मध्यमवर्ग, दलित आणि वरच्या जातीच्या मतदारांना जास्त संख्येने बाहेर काढले तर निवडणुकीत यश नक्कीच मिळेल असा भाजपा धुरिणांचा होरा होता. एरव्ही तो खराही ठरला असता. मात्र, ह्या निवडणुकीत अडाणी, जातीयवादी मतदारांनी भाजपाचे गणित उलटेपालटे करून टाकले!
नरेंद्र मोदी, अमित शहा, रामबिलास पासवान, जीतनराम माँझी ह्यांच्यावर भरवसा न ठेवता बिहारी जनतेने नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव ह्यांच्यावर जास्त भरवंसा ठेवला. शिवराळ भाषणे न करण्याची प्रतिज्ञा नरेंद्र मोदींना मोडायला लावली. नरेंद्र मोदींचा हाच मोठा पराभव! प्रत्यक्ष निवडणूक प्रचारात उतरल्यावर विकासाच्या मुद्द्याचा मोदी-शहांना साफ विसर पडला. भाजपाची सगळी व्यूहरचना उधळली गेली. नीतीशकुमार जोपर्यंत भाजपाबरोबर होते तेवढ्या काळापुरताच भाजपावर बिहारने भरवसा ठेवला. असाच भरवसा 1951 पासून ते 1967 पर्यंत बिहारी जनतेने काँग्रेससवर ठेवला होता. 1972 ते 1977 आणि नंतर 1980 ते 1985 वगळता बिहारी जनतेने काँग्रेसला आजतागायत सत्तेच्या खुर्चीवर बसू दिले नाही. नीतीशकुमारांच्या विजयात लालूप्रसादांची बरोबरीची भागीदारी आहे. अर्थात नरेंद्र मोदींना विरोध हा एकच दुवा त्या दोधांच्या संबंधात आहे! बिहारचा त्यांचा विजय! हा मोदीविरोधाचा विजय आहे.
रमेश झवर
www.rameshzawar.com

No comments: