जैसी पूर्व दिशेचां
राऊळी। उदयाचि सूर्से होये दिवाळी।
किं ए-ही हीं
दिशाची तियें चि। काळी काळिमा नाहिं।।
दिवाळीनिमित्त जगभरातल्या माझे वाचक, सुह्रुद, निकटवर्ती मित्र ह्या
सगळ्यांना शुभेच्छा! पूर्वेच्या अनंत आकाशात
सूर्य उगवतो अन् विश्वाची दिवाळी सुरू होते. ही दिवाळी रोजच सुरू असते. पण देशातील
असंख्य लोकांना सायंकाळी साधा दिवा लावण्याचे भाग्य अजूनही मिळालेले नाही. ‘स्नेह सूत्र वन्हि
तै दिपु होए’ हे दिवा प्रज्वलित ठेवण्याचे सूत्रच
ज्ञानोबामाऊलींनी सातशे वर्षांपूर्वीच सांगून ठेवले. आज अनेकांकडे वात नाही. वात
असली तर तेलतुपासारखा स्निग्ध पदार्थ नाही. हे दोन्ही असले तर दिवा पेटवायला ‘वन्हि’ नाही. ज्यांच्या
पोटात सकाळी दुपारी आणि संध्याकाळी दोन घास पडणे मुष्किल तिथे त्यांच्या आयुष्यात अमावास्येच्या
अंधाराखेरीज काय असणार!
भारतात पहिले विद्युत केंद्र ब्रिटिश काळात सुरू झाले. दार्जिलिंगपासून
अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर सिद्रपाँग येथे एका 3600 फूट उंचीवरील चहा मळ्यात पहिले
जलविद्युत केंद्र सुरू झाले. 11 फेब्रुवारी 1896 साली दार्जिलिंग पालिकेच्या
कमिश्नरांनी वीजनिर्मिती केंद्र सुरू करण्याची कल्पना मांडली. त्यासाठी सरकारकडून एक
लाख रुपयांचे कर्ज घ्यायचेही त्यांनी ठरवले. वीज निर्मिती केंद्रासाठी
महाराजाधिराज सर बिजयचंद्र महाताब बहादूर ह्यांनी जागा दिली आणि 10 नोव्हेंबर 1897
रोजी वीजकेंद्र सुरू झालेदेखील. सांगण्याचा मुद्दा हा की एखादे काम सुचले की ते
करण्यासाठी स्नेह, सूत्र वन्हि आवश्यकच!
आज सव्वाशे कोटी भारतीयांचे आयुष्य उजळून निघावे म्हणून 14-15 लाख कोटी
रुपयांचे बजेट सरकार फेब्रुवारी महिन्यात सादर करते. पण भारताचे दारिद्र्य मिटलेले
नाही. अर्थमंत्र्यांना काळजी पडते ती
देशाच्या जीडीपीची! ना जीडीपी वाढला,
ना माणसांचे जीवनमान सुधारले!! ग्रामीण भाग आणि शहरी भाग असा काही फरक करण्याचे
कारण नाही. शहरी भागात शेपन्नास वर्षांपूर्वी रहायला आलेले मध्यमवर्गीय लोक गरीब
होत चालले आहेत तर ग्रामीण भागातले गरीब लोक आहे तिथेच आहेत. राज्यकर्ते मात्र गबर
होत चालले आहेत. पूर्वाकाशात सूर्योदय होताच काळोख नाहिसा होऊन दिवाळी पहाट उगवते.
त्याचप्रमाणे राज्यकर्त्यांच्या अंतःकरणातही व्यापक ज्ञानसूर्याचा उदय होऊन प्रकाशाची
लख्ख पहाट फुटल्यास लाखो लोकांचे आयुष्य उजळून निघेल!
माझ्याकडून सर्वांना दिवाळी शुभेच्छा!
रमेश झवर
www.rameshzawar.com
No comments:
Post a Comment