मराठी
साहित्य
संमेलनास –प्रतिगामींच्या वादातून सोडवण्याचे काम मराठी साहित्य समेलनाध्यक्ष डॉ.
श्रीपाल सबनीस ह्यांनी कळत नकळत का होईना केले असे त्यांचे भाषण वाचल्यानंतर मराठी
संमेलनप्रेमींना वाटले असेल. तसेच बहुजन-अभिजन, डावे-उजवे इत्यादि वादातील फोलपण
दाखवून दिले. दोन्ही पक्षात सुरू असलेला बेदरकार सत्यापलाप आणि जातीयतेला आलेल्या
उधाणावर सबनिसांनी नेमके बोट ठेवले. संमेलनाआधी वृत्तवाहिन्यांवरील मुलाखतवजा चर्चेत
बोलताना डॉ. सबनीस घसरले असतील. पण संमेलनाध्यक्ष ह्या नात्याने केलेल्या भाषणात
ते कुठेही घसरले नाहीत. उलट, ते एक जबाबदार समीक्षक असल्याचा प्रत्यय श्रोत्यांना पहिल्या
पाच मिनीटातच आला. अनेकांना वाटणारी भीती खोटी ठरली.महाराष्ट्र साहित्य गेल्या पंचवीस वर्षात देशातल्या
परिस्थितीचे स्वच्छ प्रतिबिंब न पडता जुन्या पिढीने सुरू केलेले डावे-उजवे आणि
प्रतिगामी-पुरोगामी ह्या झिजून गुळगुळीत झालेल्या परिभाषेभोवतीच पिंगा घालत आहे
अर्थात त्याला कारणेही आहेत. साठोत्तरीचे राजकारण बदलले. अर्थकारणही बदलले,
त्यामुळे समाजकारण बदलणे अपरिहार्य होऊन बसले होते. इंदिराजींच्या निधनानंतर
राजकारणात एक विलक्षण पोकळी झाली. ती निव्वळ व्यक्तीच्या जाण्यामुळे निर्माण झाली
असे नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेच्या रेट्यामुळेही झाली. सोव्हएत रशियाच्या
विघटनानंतर आणि चीनच्या बदललेल्या आर्थिक धोरणानंतर खरे तर पुरोगामी आणि प्रतिगामी
तसेच डावे-उजवे ह्या संज्ञा अर्थहीन झाल्या आणि दोन वेगवेगळ्या जिनसा एकाच तागडीत
येऊन पडल्या. नव विचारवंत आणि कवी-लेखक साहित्यिक कवी मात्र जुनीच वजनमापे वापरत
राहिले. त्यामुळे आपले संतुलन संपुष्टात आले
ह्याचे लेखक-कवींना भान राहिले. संगणकीकरण आणि संपर्क क्रांती ह्यामुळे
कला, साहित्य करमणूक रसिकापर्यत पोहचण्याचा वेगच इतका वाढला की मराठी कुठेतरी कमी
पडू लागली. त्याखेरीज डिलिव्हरी सिस्टीमच्या भौगोलिक मर्यादा आपोआप मोडून पडल्या.
टी. व्ही रेडियो आणि वर्तमानपत्रे तसेच ऑनलाईन माध्यमांना कंटेट पुरवण्याच्या
बाबतीत लेखक-कलावंत आणि पत्रकारच कमी पडताहेत अशी परिस्थिती निर्माण झाली. साहित्य
संमेलनासारख्या संस्थात ह्यावर विचार होणे अपेक्षित आहे. पण कितीतरी
साहित्यिक-पत्रकार, लेखक-कलावंत नव्या माध्यमात अजून रुळलेली नाही. दैनिके सोडली
तर अन्य प्रकाशन माध्यमेही अजून पूर्णंशी तंत्रज्ञानदृट्या सक्षम झालेली नाहीत.
ह्याचा अर्थ तंत्रज्ञान आत्मसात करण्याइतकी त्यांची कुवत नाही असा नाही. प्रश्न
आहेत तांत्रिक बदल करण्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर विकत घेण्यासाठी लागणा-या
वित्तपोषणाचा आहे. त्यातून मराठी विकास संस्थांना मार्ग काढता येईल. पण नेमके काय
करता येईल ह्याचा सरकारी संस्थानी अजूनही विचार केला नाही असे म्हणणे भाग आहे,
पिंपरी-चिंचवडला
भरलेल्या साहित्य संमलेनास महाराष्ट्राचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री ह्या
दोघांनीही उपस्थिती लावली, नुसतीच लावली असे नाही. साहित्य सत्तेच्या राजकारणात
म्हणजेच संमेलनाध्यक्षाच्यात निवडणुकीच्या सदोष प्रक्रियेवरही शरद पवारांनी बोट
ठेवले. राजकारण्यांना मते मागण्याचा अधिकार वेगळा आणि अध्यपदाच्या प्राप्तीसाठी
मते मागण्याचा अधिकार वेगळा हे शरद पवारांनी स्पष्ट केले हे फार बरे झाले. उठसूट
राजकारण्यांवर टीका करून त्यांना व्यासपीठ नाकारण्याचा उद्दाम पवित्रा साहित्य संमेलनात
अनेकदा घेण्यात आला होता ह्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी लगावलेली चपराक योग्यच
म्हटली पाहिजे.
बाकी साहित्य संमेलन पार
पडले. साहित्य संमेलनास हल्ली मोठ्या प्रमाणावर खेळ आणि खाऊ गल्लीचे स्वरूप आले
आहे. पिंपरी-चिंचवड साहित्य संमेलनात दिंड्यांच्या आणि भोजनांचा समावेश आता
अपरिहार्य होऊन बसला आहे. त्यात काही गैर नाही. उमर खय्यामसारख्या कवीने नुसतीच
कवितेची वही मागितली नाही तर खावया भाकरीही मागितली हे लक्षात घेतले पाहिजे.
भरल्या पोटी साहित्य स्फुरते की नाही हे माहित नाही, पण संस्कृती मात्र नक्की
स्फुरते. लिहून झाले की भूक ही लागणारच ! मराकरीचे लेखक-प्रकाशकांनी
भाकरीचे अर्थशास्त्र समजून घेतले पाहिजे. लेखकांनाही सर्वपर्थम सेलेबल लेखनावर
लक्ष
केंद्रित करावे लागणार हे उघड सत्य आहे. पण सत्य उघड असले तर ते सहजासहजी मान्य करत
नाही हा मनुष्य स्वभाव आहे. जोपर्यंत हे सत्य लेखक मान्य करणार नाही तोपर्यंत
साहित्याची प्रगती तर लांबच राहिली, लेखनकला अस्तित्वात राहील की नाही हा खरा
प्रश्न आहे, झापडबंद प्रवृत्ती सोडून देऊन सडेतोड समीक्षण-परीक्षणाची बूज राखली
तरच मराठी साहित्याला आणि मराठीला अच्छे दिन येतील हे लक्षात घेण्याची गरज आहे.
श्रीपाल सबनीस ह्यांनी साहित्य क्षेत्रात धुमाकूळ घालणा-या निरनिराळ्या
वादविवादातील सत्यावर बोट ठेवले म्हणून हे
सबनिसांचे संमेलन आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही, अध्यक्षीय कारकीर्दीत
तरी आत्ममग्न लेखककवींचे आणि वादनिपुण साहित्यिकांचे डोळे उघडतील अशी आशा आहे.
रमेश झवर
www.rameshzawar.com
No comments:
Post a Comment