1991-1992 साली लोकसत्तेच्या संपादकपदी अरूण टिकेकर येणार अशा बातम्या कानावर पडत असतानाच एके दिवशी अरूण टिकेकर लोकसत्तेत येऊन दाखल झाले. पण संपादक म्हणून नव्हे तर डेप्युटी एडिटर म्हणून. तेव्हाचे संपादक माधव गडकरी ह्यांनी पहिल्याच दिवशी त्यांच्याकडे न्यूजची जबाबदारी सोपवली. न्यूज एडिटर म्हणून काम पाहायला मी नुकतीच सुरूवात केली होती. त्यामुळे गडक-यांनी मला बोलावून टिकेकरांची ओळख करून दिली. हस्तांदोलन, चहापानादि उपचार झाल्यावर मी लगेच बाहेर आलो. माझ्या खुर्चीत स्थानापन्न झालो. माझ्या मागोमाग टिकेकरही बाहेर आले. त्यांच्या खोलीत जाऊन बसण्याऐवजी ते माझ्याकडे आले. शेजारची खुर्ची ओढून बसले. त्या पहिल्या वहिल्या ‘खुल्या मिटिंग’मध्ये संपादक खात्याचा सिनॅरिओ मी टिकेकरांसमोर ठेवत असताना ‘साहेब’ असे संबोधन निघताच माझं वाक्य टिकेकरांनी तोडले.
‘अहो झवर, ते साहेबवगैरे कल्चर मला आवडत नाही. एकमेकांना नावाने संबोधलं तर जास्त बरं राहील.’
‘माझी ना नाही!’ असं सांगत मी लगेच स्टाफ सिनिआरोचा विषय पुढे सुरू ठेवला. त्या वेळी दुपारच्या शिफ्टची माणसं यायची होती. जी सकाळीच आलेली होती त्यांच्या परिचय करून देण्याच्या उद्देशाने मी जागेवरून उठलो. जे उपस्थित होते त्यांचा टिकेकरांशी औपचारिक परिचय करून दिला. खरा परिचय हळुहळू होईलच, असे सांगताच ते खळाळून हसले. त्याच वेळी माझ्या मनात त्यांच्याबद्दल कुठं तरी मित्रत्वाची भावना निर्माण झाली. तोपर्यंत एक विद्वान संशोधक, खुमासदार इंग्रजी लिहीणारा लेखक एवढीच माफक प्रतिमा त्यांची माझ्या मनात होती. अर्थात मुंबईच्या वर्तमानपत्रात कुठे काय आलंय् इकडे लक्ष्य देणे हा माझ्या रोजच्या कामाचा भाग असल्यामुळे महाराष्ट्र टाईम्समध्ये आलेल्या त्यांच्या लिखाणावर ओझरती नजर मी फिरवत असे. त्यापूर्वी इलस्ट्रेटेड विकलीच्या जन्मकहाणीचा त्यांनी घेतलेला वेध एका झपाट्यात वाचून संपवला होता. तो लेख वाचताना एकोणीसाव्या शतकाच्या इतिहासाचा स्कॉलर ही त्यांची प्रतिमा अधिकच ठसली. अर्थात त्यांना स्वतःलाही त्यांची हीच प्रतिमा हवी होती.
न्यूज एडिटर म्हणून सकाळच्या अंकाचा पोस्टमार्टेम मी प्रथम त्यांना सादर करायला सुरूवात केली. गडक-यांच्यात आणि माझ्यात टिकेकरांचा ‘बफर’ म्हणून मला चांगलाच फायदा झाला. कितीही खबरदारी घेतली तरी बहुतेक सर्व वर्तमानपत्रात एखादी बातमी मिस होत असते. लोकसत्तेत एखादी बातमी का मिस झाली ह्याची चौकशी करूनच मगच पोस्टमार्टेम रिपोर्ट सादर करण्याचा प्रघात मी सुरू केला. वार्ताहरावर किंवा रात्रपाळीच्या चीफसब एडिटरवर ठपका ठेवण्याचा सोपा मार्ग अवलंबण्यापेक्षा बातमी नेमकी का मिस झाली हे शोधून काढण्यीच कल्पना टिकेकरांना आवडली हे सांगायला नकोच. त्यानंतर गडकरींसमवेत मुख्य बैठक हा निव्वळ उपचार ठरला. मुख्य म्हणजे आधी संपादकांबरोबरच्या मिटिंगांमध्ये चालणा-या तणातणी पूर्णपणे थांबल्या इतकेच नव्हे तर मिटिंगला हसतखेळत बैठकीचे स्वरूप आले. त्याचे सारे श्रेय टिकेकरांना द्यायला हवे.
टिकेकर वाचनप्रेमी होते. वाचनाची हौस भागवत असतानाच वाचनावर आधारित सदर लिहीण्याचे गडकरींनी त्यांना सुचवले. त्यानुसार जनगणमन सदर सुरूही झाले. हे सदर नियमित वाचणारे अनेक जण मला भेटायचे. टिकेकरांची ओळख करून द्या अशी विनंती अनेक जण करायचे. त्यामागे ‘लेखक आहे कसा आननी’ एवढेच कुतूहल होते. टिकेकरांच्या जनमनगणआधी गडकरींचे चौफेर, विद्याधर गोखलेंचा रविवारचा अग्रलेख हेही लोकप्रिय होते. परंतु दोघांचाही लोकसंग्रह चांगला होता. निरनिराळ्या क्षेत्रातही त्यांचा वावर होता. त्यामुळे त्यांना कामानिमित्त भेटणारेच अधिक होते. केवळ लेखन आवडले हे प्रत्यक्ष भेटून सांगण्यासाठी टिकेकरांना भेटणारे मात्र अधिक होते. त्यामुळे टिकेकर मोकळे असले तर अभ्यागतास त्यांच्या केबिनपर्यंत घेऊन लगेच परत फिरण्याचा माझा शिरस्ता कधी सुरू झाला हे कळलेच नाही. दुपारी कामातून थोडी उसंत काढून टिकेकराचा फोन यायचा, झवर मोकळे असाल तर या चहा घेऊ. मीही ती संधी सोडली नाही. वाचन आणि जुनी पुस्तके हा माझाही छंद होता. एकदा टिळकांचे राजकारण असा विषय निघाला तेव्हा ते म्हणाले, ‘सरदारगृहाने पाहिलेले राजकारण’ हे पुस्तक मिळाले तर मला हवे आहे. दुस-या दिवशी मी त्यांना माझ्याकडची प्रत नेऊन दिली. माझ्याकडे पुस्तकाची प्रत मिळाली ह्याचं त्यांना कुतूहल वाटणे स्वाभाविक होते. ह्या पुस्तकाची प्रस्तावना कमी करायचे काम सरदारगृहाचे बापूसाहेब उपाध्येंनी मला सोपवले होते. प्रस्तावनेची दहाबारा पाने तरी क्मी करावी अशी बापूसाहेबांची इच्छा होती. मौजेचे छपाई बिल कमी करणे ह्यापलीकडे बापूसाहेबांचा अन्य हेतू नव्हता.
‘तरीच! कसाब हा तुमचा लोकसत्तेतला लौकिक उगाच नाही’ अशी कोपरखळी मारायला ते विसरले नाही.
‘माझा नाइलाज आहे. इतरांनी लिहीलेला मजकूर कापायला मला तरी कुठं आवडतं?’
मला जे म्हणायचे होते ते टिकेकरांच्या लगेच लक्षात आले. ह्या ना त्या वेळी बहुतेकांचा मजकूर कापण्याचे क्रूरकर्म मला करावे लागल्याने त्या त्या वेळी मी त्यांचा राग ओढवून घेतला. टिकेकरांंनी माझा खुलासा संमजसपणे ऐकून घेतल्यामुळे मी मनोमन सुखावलो. वर्तमानपत्राच्या मजकुराला कात्री लावण्याचे प्रसंग आले तरी अग्रलेख आणि दिवाळी अंकांत छापायच्या लेखांना मात्र मी कधीच कात्री लावली नाही. अग्रलेखातल्या दोनचार ओळी कापण्याचा प्रसंग ज्या ज्या वेळी आला त्या त्या वेळी त्या ओळी मी खुद्द संपादकांना कापालायला लावल्या हेही टिकेकरांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही.
पुढे टिकेकर संपादक झाल्यानंतर त्यांच्या माझ्या संबंधात मुळीच फऱक पडला नाही. दरम्यानच्या काळात मलाही सहसंपादकपद मिळाल्याने माझ्यात आणि त्यांच्यात उलट जास्तच जवळीक निर्माण झाली. प्रत्येक जिल्ह्याच्या ऐतिहासिकतेवर लेख लिहीण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला. त्यावेळी खानदेशवर ते काय लिहीणार ह्याची मला उत्सुकता होती. एके दिवशी मला राहवले नाही म्हणून मी त्यांना थेट विचारले, खानदेशवर तुम्ही लिहीणार आहात की नाही? भुवया उंचावून त्यांनी माझ्याकडे पाहिले. मी कोण त्यांना विचारणारा असा भाव त्यांच्या नजरेतला होता. अर्थात त्यांच्याही ते लक्षात आले.
खानदेशला लिहीण्यासारखा इतिहास नाही असाच सूर ते लावणार होते. मग मात्र मी बोलायला सुरूवात केली. खानदेश हा मराठ्यांकडे फारसा नव्हता हे मलाही मान्य. पण ह्याचा अर्थ त्याला इतिहासच नाही असा होत नाही. ब्रिटिश सत्तेपुढे 1857 चे बंड उभे झाले तसेच बंड तंट्या भिल्लानेही उभे केले. ब्रिटिशांनी ते मोडून काढले. माझे म्हणणे ते लक्षपूर्वक ऐकत होते. दुस-याच आठवड्यात त्यांनी खानदेशवर लेख लिहीला. आपले लेखन ते सहसा कुणाला वाचायला देत नसत. पण खानदेशावरला लेख त्याला अपवाद ठरला. लेख कंपोजला पाठवण्यापूर्वी त्यांनी तो मला वाचायला दिला. ती संधी साधून त्यांनी संदर्भासाठी आणलेला खानदेश गॅझेटियर मी वाचायला मागितला.
रात्रीत वाचून उद्या मी तुम्हाला परत करतो ही अट मीच सुचवली. ती अट मान्य करून त्यांनी ते पुस्तक मला वाचायला दिले. दुस-या दिवशी जेव्हा मी त्यांना ते परत केले त्यावेळी ते म्हणाले, आणखी चारपाच दिवस तुमच्याकडे ठेवला तरी चालेल. मात्र, मला परत मिळाला पाहिजे. पुस्तक परत करण्याचा त्यांच्याबरोबर केलेला करार मी अर्थात पूर्ण केला. तोच करार पुरा केला असं नाही. लोकसत्तेत वेळोवेळी त्यांच्याबरोबर माझे अनेक ‘सामंजस्य करार’ व्हायचे. त्या करारांचे कसोशीने पालन झाले. मग तो लोकसत्तेत नव्या उपसंपादकांची भरती करण्याचा प्रश्न असो वा लोकसभा निवडणुकीच्या कव्हरेजसाठी देशभर रिपोर्टर पाठवण्याचा प्रश्न असो. माझा कोणताही प्रस्ताव त्यांनी कधी अडवला नाही. मला दौ-यावर जायचे आहे म्हटल्याबरोबर त्यांनी लगेच संमती दिली. नरसिंह रावांबरोबर ओमान दौ-याला जाण्याचा विषय पुढे येताच मला त्यांनी सांगितले, तुमच्या नावाचा प्रस्ताव मी विवेक गोएंकांकडे पाठवला आहे. त्यांची मंजुरी आली तरच तुम्हाला जायला मिळेल. तेव्हा तुम्ही उद्या बॅगेज घेऊऩच ऑफिसला या. त्यांना पुण्याला जायचे असल्यामुळे त्यांनी इन अँटिसिपेशन भराभर माझ्या व्हाऊचर्सवर सह्या केल्या.
अलीकडे निवृत्तीनंतर पत्रकार संघाच्या निवडणुकीत त्यांची माझी भेट झाली तेव्हा कॉम्प्युटर सिस्टीम मराठी लेखनयोग्य करण्याच्या दृष्टीने मी त्यांना मदत करायचे ठरले होते. हा करार पूर्ण करण्यास त्यांना सवड मिळताच ते मला फोन करून बोलावणार होते. मध्यंतरीच्या काळात एकदोन वेळा त्यांचे माझे फोनवर बोलणे झाले. पण व्याख्याने, दौरे, लेखन शेड्युल वगैरे कारणांमुळे त्यांना वेळ मिळेनासा झाला. पुढच्या महिन्यात आपण नक्की दिवस ठरवू असे ते सांगत. तो दिवस नक्की करण्याचा महिना कधी आलाच नाही. लोकसत्तेचे राजीव कुळकर्णी ह्यांचा मला सोमवारी फोन आला, टिकेकर गेले! त्यांच्याबरोबर झालेल्या कराराचे पालन करण्यापूर्वीच ते हे जग सोडून गेले. त्यांच्याबरोबरचा माझा शेवटी करार मृत्यूनेच उधळून लावला!
रमेश झवर
www.rameshzawar.com

No comments:
Post a Comment