अमित शहा ह्यांची भाजपाच्या
अध्यक्षपदी झालेल्या फेरनियुक्तीनंतरच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत
भाजपाने राममंदिरास रामराम केला असून ‘भारत माता की जय’ आणि भाजपाशी अभिन्न असलेला राष्ट्रवाद हा नवा
अजेंडा स्वीकारला असे दिसते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी
भाजपाला हा नवा अजेंडा मिळवून दिला आहे. ह्या नव्या अजेंड्यापुढे नरेंद्र मोदींची
सबका साथ सबका विकास ही घोषणा फिकी पडली. नव्हे, ती फिकी पडत असल्याचे लक्षात आल्यामुळे
की काय, भाजपाला दुसरा आधीचा उग्र हिंदुत्वाचा मुद्दा सोडून देऊन हिंदूत्वाचे नाव
बदललेला नवा सौम्य मुद्दा स्वीकारणे भाग पडले असावे. विकासाचा अग्रक्रम निश्चित
करण्यासाठी नेहरूंच्या काळापासून अस्तित्वात असलेले नियोजन मंडळ दोन वर्षांपूर्वी सत्तेवर
येताच भाजपाने सर्वप्रथम गुंडाळून ठेवला. एवढा एक बदल सोडला तर बाकी काँग्रेसचे
एकूण एक कार्यक्रम राबवण्याचा भाजपाने सपाटा लावला. पहिल्या वर्षी सरकारला नवे
काही करणे शक्य नव्हते हे समजण्यासारखे होते. पण दुस-या वर्षातही भाजपाला
काँग्रेसचेच कार्यक्रम राबवण्याची पाळी आली ही भाजपाची दिवाळखोरीच म्हणायला हवी. भाजपात
‘थिंक टँक’ नाही. कदाचित राष्ट्रीय
स्वयंसेवक संघ स्वतःला भाजपाची ‘थिंक टँक’ समजत असावा. पण संघाचा युनिफॉर्म बदलण्यापलीकडे
ह्या तथाकथित ‘थिंक टँक’ला सरकारमार्फत
राबवण्यासाठी एकही नवा कार्यक्रम शोधून काढता आला नाही! मात्र, नेहरू
घराण्याचा व्देष हा एकमेव राजकीय विचार संघाने भाजपाला दिला असावा. नेहरूंपेक्षा
पटेल कसे मोठे हा संघाचा सिद्धान्त जनतेला पटवून देण्यातही मोदी सरकारने बराच वेळ
घालवला.
वास्तविक राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक ही आयती संधी भाजपाकडे चालत आली
होती. पक्षाचा नवा कार्यक्रम रूजवण्याच्या दृष्टीने उपयोग भाजपाला करता आला असता.
प्रत्यक्षात राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हा निव्वळ राष्ट्रीयतेच्या नावाने चांग भले
पध्दतीचा फार्स करण्यात आला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कन्हैय्या प्रकरणाला गृहखात्याने
केलेल्या कारवाईला राष्ट्रीयतेचा मुलामा फासण्यात आला. कन्हैया प्रकरणाच्या जोडीने
भारतमाता की जय म्हणण्यास मुस्लिम नेता ओवायसी ह्याने नमूद केलेल्या आक्षेपाचाही राष्ट्रीयतेच्या
अजेंड्यात रंग भरण्यास उपयोग झाला. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सरकारने
आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेऊन पंतप्रधानांचे हात बळकट करण्याच्या दृष्टीने
ठराव संमत करण्याचा प्रघात असतो. पण ह्या दृष्टीने पाहिले तर कार्यकारिणीची बैठक
फुकट गेली. वास्तविक ‘सबका साथ सबका विकास’ ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ह्यापूर्वीच
केली आहे. ती घोषणा साकार करण्याच्या दृष्टीने भाजपातला प्रत्येक जण कटिबध्द झाला
आहे असे चित्र बैठकीत दिसायला हवे होते. काँग्रेस
आणि डाव्या पक्षांकडून केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यापलीकडे बैठकीत
कुणालाच काही सुचले नाही.
कार्यकारिणीची बैठक फुकट जाण्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक हे संघाचे
अलीकडचे विचारमंथनच कारणीभूत आहे. संघाचे विचार अजूनही जुन्याच वळणात अडकले आहेत. कुठे
आरक्षणाचा फेरविचार करा तर कुठे विद्यापीठीय शिक्षणक्रमात इतिहासाचा अभ्यासक्रम
बदला असले कटकटीचे विषय काढून मोदी सरकारची पंचाईत करण्याचेच उद्योग कधी थेट तर चेल्या-चपाट्यांमार्फत
संघाच्या मंडळींनी सुरू केले. तोच कार्यक्रम राष्ट्रीयतेच्या नावाने ह्याही बैठकीत
पुढे ताणण्यात आला.
काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी आणि मुस्लिम नेते ओवायसी ह्यांची दखल
घेण्यात बहुतेक नेत्यांनी वेळ घालवला तर वेंकय्या नायडूंनी तर मोदी ही ‘देवाची देणगी’ असल्याचे सांगून
सिक्सर मारली तेव्हा जनतेला काँग्रेस राजवटीची आठवण झाली असेल! काँग्रेस राजवटीत ‘इंदिरा इज इंडिया’ असे आसामचे नेते
हेमकांत बारूआंनी एका भाषणात सांगितले होते. तेच चमचेगिरीचे वळण आता भाजपानेही अधिकृतरीत्या
स्वीकारलेले दिसते. खरे तर मोदींनीच ते झिडकारायला हवे होते. पण त्यांनी ते
झिडकारले नाही. मुळात ‘मोदी इज गॉडगिफ्ट टु इंडिया’ हे उद्गार मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह
सिंह चौहान ह्यांनी वृंदावन येथे युवा मोर्चाच्या मेळाव्यात काढले होते म्हणे! म्हणजे मोदी नेतृत्वाच्या गौरवाचे श्रेय वेंकय्या
नायडूंना द्यायचे की शिवराजसिंह चौहानांना? श्रेय
कोणालाही मिळेना, सर्वसामान्य जनतेला त्याच्याशी काही देणेघेणे नाही. पण अशा
प्रकारातून मोदी ब्रिगेड वगैरेसारख्या संघटना जन्मास येऊन भाजपाचे राजकारण काँग्रेसच्या
व्यक्तीवादी राजकीय वळणाने जाण्याचा धोका नाकारता येणार नाही.
ह्या बैठकीला सुषमा स्वराज, राजनाथसिंग किंवा अन्य मान्यवर भाजपा नेते
तसेच भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री इत्यादी शंभरएक कार्यकारिणी सभासदांची उपस्थिती
असते. मात्र, सबका साथ सबका विकास ह्या घोषणेत बारकावे भरणारी भाषणे व्हावी अशी अपेक्षा
बाळगणे गैर ठरले नसते. निदान वेगळे मुद्दे बैठीत मांडण्यात आल्याचे पत्रकारांना
सांगण्यात आले नाही. राहूल गांधी हे विरोधी पक्ष नेते म्हणून प्रभावशाली नसतील तर
त्यांची भाजपा कार्यकारिणीला दखल घेण्याचे कारण नव्हते. तेच ओवायसींबद्दलही म्हणता
येईल. ओवायसींचा युक्तिवाद तर्कशुद्ध असतो. त्यांच्या युक्तिवादपटुत्वाचा भाजपाने
धसका घेतला असावा. अन्यथा त्यांची कार्यकारिणीला फारशी दखल घेण्याचे कारण नव्हते.
पण तरीही त्यांची दखल घेतली गेली ह्याचा अर्थ ‘सबका साथ सबका विकास’ ह्या
मोदींच्या घोषणेने अद्याप मूळ धरलेले
नाही.
विदेशी गुंतवणूक आणण्यासाठी परदेश दौ-यांवर भरपूर खर्च मोदी सरकारने
केला. परंतु त्याच्या फलनिष्पत्तीबद्दल सरकारला आणि भाजपा कार्यकारिणीला अद्याप अंदाज
आलेला दिसत नाही. अन्यथा त्यासंबंधी एखादा ठराव कार्यकारिणीला संमत करता आला असता.
मोदींची पाठराखण करण्याची ही संधी कार्यकारिणीने गमावली आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित
शहा ह्यांचे बोलविते धनी हे नरेंद्र मोदी आहेत हे आता भाजपा कार्यकारिणीसह देशाला
ठाऊक झाले आहे. काँग्रेसला पर्यायी पक्ष भाजपा सत्तेवर आला असून देशाचा विकास
घडवून आणण्याची भाजपाची कुवत काँग्रेसच्या तोडीस तोड आहे असे चित्र निर्माण होणे आवश्यक
होते. पण सध्याचे चित्र असे आहेः काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचून दाखवले की नाही? भ्रष्ट कारभार
करणा-या काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचणे आवश्यकच होते. ती कामगिरी मोदींच्या
नेतृत्त्वाखाली भाजपाने करून दाखवली हा सगळा युक्तिवाद ठीक आहे. पण किती वर्षे हा
युक्तिवाद करणार? काँग्रेसच्या
हातातून भाजापने सत्ता हिसकावून घेतली हे लोकशाही चौकटीचा विचार करता ठीक आहे. काँग्रेसला
भाजपा हा तितकाच लायक पर्याय आहे असे मात्र अद्याप सिद्ध झालेले नाही. पण मोदी आणि
त्यांचे अन्य सहकारी काँग्रेसविरोधक ह्या जुन्याच आविर्भावात मश्गुल राहू इच्छितात.
सत्तेच्या माध्यमातून नवभारत घडवण्यात भाजपाने मुसंडी मारली असे चित्र निर्माम
होणे आवश्यक आहे. पात्र व्यक्तीपर्यंत अर्थसाह्य पोहचवण्याच्या योजना, नमो गंगा,
स्वच्छ भारत, जनधन योजना, डिजीटल भारत वगैरे कार्यक्रमांच्या घोषणा
आकाशवाणी-दूरचित्रवाहृन्यावरून सध्या जोरात चालू आहे. हे सगळे कार्यक्रम काँग्रेसच्या
सत्ता काळात सुरू झाले होते. त्यांची नावे बदलून ते पुन्हा धडाक्याने सुरू करण्यात
आले. त्याचे ठोस परिणाम अजून दिसायचे आहेत. मह्त्त्वाचे म्हणजे भारत शक्तीशाली देश
म्हणून उभा झालेला दिसायचा आहे. कार्यकारिणीच्या बैठकीत ह्या विषयांत पुढे कशी
प्रगती करता येईल ह्या विचारावर खल व्हावा अशी अपेक्षा होती. किंबहुना अधिक पुढे
कसे जाता येईल ह्यावर विचारमंथन अपेक्षित होते. पण ह्या सा-या अपेक्षा फोल ठरल्या.
रमेश झवर
www.rameshzawar.com
No comments:
Post a Comment