मी अविवेकाची
काजळी। फेडूनि विवेक दीपु उजळी।
तैं योगियां पाहे दिवाळी। निरंतर।। -संत ज्ञानेश्र्वर
कालपासून दिवाळीला प्रारंभ झाला. धनत्रयोदशी, नरक चतुर्थी आणि लक्ष्मीपूजन
हे दिवाळीचे मुख्य दिवस! पाडवा आणि भाऊ बीज हे दोन दिवसही महाराष्ट्रात दिवाळी सणाचाच अविभाज्य भाग
मानले जातात. परंतु दिवाळीचा सण
साजरा करण्यासाठी उसना उत्साह आणावा लागतो. हंगाम चांगला आला तर शेतक-यांची दिवाळी.
कामगारांना बोनस मिळाला तरच त्यांची दिवाळी. कर्मचा-यांना पगार आणि बोनसची अदायगी कशी
करायची ह्या काळजीने काळवंडलेली व्यापारी-उद्योगपतींची
दिवाळी! वेगवेगळ्या
ऑफिसमध्ये काम करणा-या बाबूंना मिठाई-सुका मेव्याची पाकिटे अन् घसघशीत गिफ्ट आले, तर
दिवाळी. अन्यथा शिमगा. मंत्रीसंत्री, फार मोठे उद्योगपती ह्यांना परदेशातल्या
कुठल्या तरी हॉटेलचं बुकिंग मिळालं तर आणि तरच त्यांची दिवाळी. शेअरबाजारात
ब-यापैकी नफा झाला तरच गुंतवणूकदारांची दिवाळी. बाकीच्यांना दिवाळी हाय काय..नाय
काय!
आज जगण्याचे संकट गहिरे होत चाललेय्....कोरड्या शुभेच्छांवाचून आज
देण्यासारखे काही राहिलेले नाही. देशात अन्नधान्य भरपूर पिकते. पण रोज लागणारे
धान्य, डाळी महाग आहेत. देशात भाजीपाला, दुग्धोत्पादने आणि फळांची रेलचेल झाल्याची
सरकारी आकडेवारी सांगते. रेल्वे, बसच्या नित्याच्या प्रवासाचा खर्च आता
बहुसंख्यांच्या आटोक्यात राहिलेला नाही. रेल्वेने अधिकृत एजंट नेमले, परंतु काळ्या
बाजारातूनच तिकीट खरेदी केले तरच तिकीट मिळते किंवा प्रिमियम दराने तिकीट घ्यावे
लागते. प्रिमियम दर म्हणजे रेल्वेचा अधिकृत काळा बाजार! मॉलमधील थिएटर्समध्ये मराठी सिनेमे लागतात.
परंतु थिएटर्स क्वचितच हाऊसफुल्ल होतात. ह्या चित्रपटांवरील चर्चांना सामाजिक
माध्यमात अलीकडे ऊत येतो. नाटकांच्या
प्रयोगांची स्थिती वेगळी नाही. नाटकांना, गाण्याच्या कार्यक्रमांना स्पॉन्सर
शोधावे लागतात. नावाला शंभर रुपयांचे तिकीट घ्यावे लागते. तेही घेतले नाही तरी
चालते. पुढे येऊन बसा, असे आवाहन आयोजक करणारच असतात. नाटक वा गाण्याच्या कार्यक्रमासाठी
आलेली बहुतेक मंडऴी फुकट पासावर आलेली आहेत हे लपून राहत नाही.
घरांच्या जाहिराती आणि मोबाईलच्या जाहिरातींनी वर्तमानपत्रे खच्चून
भरलेली असतात. दोनतीन पाने उलटल्यावर बातम्या वाचायला मिळतात! जगोत बिचारे
सुखाने! रूबाबदार पोषाखात
टीव्ही चॅनेलचे निवेदक त्यांची नेहमीची
कामगिरी बजावत असतात. त्यांच्या कष्टाला तोड नाही. त्यांना अनेक शब्द रोज नव्याने
माहित होतात. त्या शब्दांचा अर्थ पाहण्यासाठी ऑफिसात डिक्शनरी आहे की नाही ह्याबद्दल
शंका आहे. डिक्शनरी असली तर ती पाहायला त्यांना वेळ नाही. कार्यक्रमाचे प्रक्षेपण
होतेय् ना, बास झालं! स्क्रोलिंग सुरू असेल तर बातम्या दिसणारच ना! आणखी काय पाहिजे? अनेक कारखाने
कामगार कितीही कुशल असला तरी त्याला उचित पगार देऊ शकत नाहीत. अर्धकुशल कामगारांची
कुरघोडी मालकांप्रमाणे सहकारी कामगारांनाही सहन करावी लागते! सर्वत्र गधा-घोडा
एक बराबर हीच विपरीत समता!
असो. माझ्या सर्व मित्रांना शुभेच्छा! विवेकबुध्दी शाबूत ठेवून वागता आले तरच आयुष्यात
निरंतर दिवाळी! सव्वासातशे
वर्षांपूर्वी अविवेकाची काजळी फेडून विवेकदीप पेटवा, असे ज्ञानेश्र्वरमाऊली सांगितले.
विवेकाला माऊलीने दिलेली दिव्याची उपमा किती अर्थगर्भ आहे! दिवाळीच्या शुभेच्छा
ह्यापेक्षा वेगळ्या असू शकत नाही.
पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा!
रमेश झवर
www.rameshzawar.com