Thursday, October 27, 2016

सायरस मिस्त्रींचा खुलासा

टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री ह्यांची हकालपट्टी केल्यानंतर रतन टाटा  ह्यांनी केलेल्या निवेदनास देशभर भरमसाठ प्रसिध्दी मिळाली. त्या निवेदनात सायरस मिस्त्रीविरोधी मुद्द्यांनाच जास्त प्राधान्य मिळणे क्रमप्राप्त होते. परंतु एखाद्या व्यक्तीने दुस-या व्यक्तींविरूध्द केलेल्या निवेदनास एकतर्फी प्रसिध्दी देणे हे न्यायदृष्ट्या चुकीचे ठरते. म्हणूनच आज रतन टाटांच्या निवेदनास सायरस मिस्त्रींनी दिलेल्या उत्तराचा समाचार घेणे योग्य ठरेल. त्यांचे निवेदन काळजीपूर्वक वाचल्यास हेच लक्षात येते की गेल्या तीन वर्षांच्या काळात सायरस मिस्त्रींची कामगिरी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर थाटाची होती! वस्तुतः आपल्यानंतर टाटा समूहाचे नेतृत्व करण्यासाठी पॅशन म्हणून सुरू केलेले नवे प्रकल्प पुढे चालवण्यासाठी धडाडी  मिस्त्री दाखवतील अशी रतन टाटांची अपेक्षा होती. सायरस मिस्त्री आणि रतन टाटा ह्या दोघांच्या भूमिकेतले हे अंतर मोठे आहे. परंतु समूहाचे नेतृत्व करणे वेगळे आणि स्वतःला पगारी चीफ एक्झिक्युटिव्ह समजून काम करणे वेगळे! सायरस मिस्त्रींच्या बहुधा हे लक्षात आले नसावे.   
टाटा स्टील, टाटा केमिकल, टाटा मोटर, टाटा पॉवर  इंडियन हॉटेल ( ताजमहाल हॉटेल ह्याच कंपनीच्या मालकीचे आहे. ), टाटा टेलिसर्व्हिसेस, एअर एशिया सिंगापूर एअरलाईन्स ह्या कंपन्यात टाटांनी फार मोठे भांडवल गुंतवल्यामुळे मूळ गुंतवणूदकार कंपनी ह्या नात्याने टाटा सन्सही कंपनीदेखील अडचणीत सापडली. ह्या परिस्थितीत शेअरधारकांना काय जबाब द्यावा ह्या  काळजीने सायरस ह्यांना ग्रासले असावे. एक लाख रुपयात नॅनो कार देण्याचा संकल्प रतन टाटांनी सोडला आणि संकल्पाची पूर्तता टाटा मोटरने करूनही दाखवली. सामान्य माणसासाठी स्वस्त मोटारगाडी देण्याचे स्वप्न खूप वर्षांपासून रतन टाटा पाहात होते. सामान्य माणसासाठी   मोटार तयार झालीदेखील. परंतु ती एक रुपये लाख किमतीत देणे टाटा मोटरला शक्य झाले नाही हा भाग वेगळा! ती मोटार टाटांनी दीड ते सव्वादोन लाखांना विकली. अशा प्रकारची स्वस्त मोटार देण्यासाठी स्केल ऑफ एकॉनॉमीच्या तत्त्वाचा अवलंब करावा लागेल आणि सेल्स डिपार्टमेंटलाही उत्पादित गाड्या धडाक्याने विकाव्या लागतील हे रतन टाटांनी गृहित धरले असावे. कारखान्यात जास्तीत उत्पादन काढणे ही प्रॉडक्शन विभागाच्या जनरल मॅनेजरची जबाबदारी तर उत्पादित करण्यात आलेल्या सागळ्याच्या सगळ्या मोटारी भराभर विकणे ही विक्री विभागाच्या जनरल मॅनेजरची जबाबदारी!  हे सांगायला सोपे परंतु; करून दाखवायला अत्यंत अवघड! देशातील अनेक कारखान्यातले वातावरण मात्र अगदी विपरीत आहे. अनेक कारखान्यात दोन्ही विभागात खडाष्टक सुरू असते. त्याचे किस्सेही नित्य ऐकायला मिळतात! नॅनो मोटारच्या बाबतीत टाटा मोटरमध्ये नेमके हेच घडले असेल का? तसे असेल तर ते रोखण्याची प्रत्यक्ष जबाबदारी सायरस मिस्त्रींची नाही हे खरे; परंतु टाटा मोटर्सच्या अध्यक्षांना प्रेमाचा सल्ला देणे हे सायरस मिस्त्रींना  मात्र नक्कीच शक्य होते. टाटा मोटरच्या प्रमुखांना  मिस्त्रींनी वेळोवेळी प्रेरित केले असते तर चित्र निश्चितपणे बदलले असते.
जेआरडी टाटा नेहमी जमशेदपूरला भेट देत आणि टिस्कोचे अध्यक्ष रूसी मोदी ह्यांच्याशी संवाद साधत असत. म्हणूनच टिस्कोचे उत्पादन टिस्कोच्या क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक व्हायचे. पोलाद विक्रीच्या बाबतीतही टिस्कोच्या विक्री विभागाने धडाका लावला होता. अर्थात पोलाद हा अत्यावश्यक माल तर मोटार हा अजूनही स्वप्नरंजनाचा विषय! पोलाद हा गरजेचा माल असल्यमुळे टिस्कोला कधी मागे पाहावे लागले नाही. उलट, टिस्कोच्या यशामुळेच रतन टाटांच्या मनात पोलाद क्षेत्रात जगात अव्वल स्थान मिळवण्याची आकांक्षा पल्लवित झाली असावी.  वातावरण अनुकूल होताच इंग्लंडमध्ये बंद पडलेले पोलाद युनिट टेक ओव्हर करण्याचा निर्णय रतन टाटांनी घेतला. त्याच सुमारास चहा उत्पादनातही आघाडी गाठावी हे त्यांच्या मनात होते, म्हणून त्यांनी टेटले ही सुप्रसिध्द कंपनी टेक ओव्हर केली. फोर्डची बंद पडलेली जग्वार लँड ग्रोव्हरही रतन टाटांनी घेतली. आता ह्या टेक ओव्हरच्या खटाटोपामुळे टाटा सन्सवर कर्जाचा बोजा अफाट वाढला असेल तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. जागतिक मंदीमुळे हा बोजा सायरस मिस्त्रींसारख्या पगारी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर  संस्कृतीत मुरलेल्या व्यक्तीला कर्जाचा बोजा जरा जास्तच वाटला असेल!
बाप-मुलगा, मेव्हणा-शालक, मोठे बंधू-धाकटे बंधू अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संघर्षांनी आपल्याकडे अनेक कंपन्या ग्रासलेल्या आहेत. काही कंपन्यातले संघर्ष तर इतके प्रभावी ठरले की सरळ सरळ उद्योग समूहाच्या हिस्सेवाटण्या झाल्या! राजा बलदेवप्रसाद बिर्लांच्या नंतर बिर्ला समूहाचे सहा गट अस्तित्वात आले तर बजाज समूहाची तीनचार गटात विभागणी झाली. राहूल बजाज ह्यांनी तर त्यांच्या दोन्ही मुलांसाठी वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून मार्ग काढला. दोन्ही मुलांच्या दोन कंपन्यांना भांडवल पुरवणा-या वेगळ्या होल्डिंग कंपनीची सूत्रे राहूल बजाजनी स्वतःकडे घेतली. राजेश बजाजला ( राहूल ह्यांचे मोठे चिरंजीव ) न पटणारा युक्तिवाद करण्याची खोड लागली आहे, असे एकदा राहूल बजाज ह्यांनी टीव्ही चॅनेलवर मुलाखत देताना सांगितले होते. अजूनही कंपनी कामकाज समजून घेणा-याला हे अंतर्प्रवाह समजून घ्यावेच लागतात. टाटा सन्सचे जास्तीत भाग भांडवल हे टाटा ट्रस्टकडे आहे. त्यामुळे ट्रस्टमधील अंतर्प्रवाह समजून न घेताच कर्जनिवारणासाठी कंपन्या विकण्याचा तर काही बिझनेस बंद करण्याचा निर्णय सायरस मिस्त्रींनी घेतला असावा!
बडा उद्योग समूह वेगळा आणि लहान दुकान वेगऴे असे बहुसंख्य मंडळी डोक्यात ठेवून चालतात. पण ते खरे नाही. अनेक यशस्वी निपुत्रिक मारवाडी-गुजराती दुकानदार आपल्या पश्चात व्यवसाय चालू राहावा अशी इच्छा बाळगून असतात. त्यासाठी गावाकडील एखाद्या मुलास दत्तक आणण्याचा विचार ते सर्वप्रथम त्यांच्या डोक्यात येतो. त्यासाठी लागणारे सारे कायदेशीर सोपस्कार पार पाडण्याची त्यांची तयारी असते. तरीही दत्तकपुत्राच्या हातात कारभार सोपवल्यानंतर निराश होण्याची पाळी अनेकांवर येते. दत्तक आलेल्या मुलावरही निराश होण्याची पाळी येते. दोघांच्या आशेनिराशेच्या खेळात दत्तक मुलावर परत जाण्याची पाळी आल्याची उदाहरणे शेकड्याने आहेत! वडिलांची पॅशन तर दत्तक मुलाची बिझीनेसलाईक वर्तणूक  ह्या कात्रीत अनेक कुटुंबे सापडतात. संघर्ष विकोपाला गेले की दत्तकविधान रद्द करण्याची कारवाई सुरू होते.
कर्ज निवारणाचा प्रयत्न सुरू करण्यापूर्वी सायरस मिस्त्रींनी रतन टाटांचा सल्ला घेऊन मगच पावले टाकली असती तर अध्यक्षपदावरून उचलबांगडी होण्याची पाळी आली नसती. टाटा सन्सच्या बोर्ड मेंबरांवर रतन टाटांचा प्रभाव आहे असेही विधान सायरस मिस्त्रींनी केले. खरे तर, बोर्ड मेंबरांच्या निष्ठा रतन टाटांवर अधिक राहतील हे सायरस मिस्त्रींनी गृहित धरायला हवे होते. जीवनातला अनुभव असा आहे की जुन्या पिढीतल्या मंडळीशी वागताना नव्या दमाच्या एक्झिक्युटिव्हना आपला तोरा काही वेळ बाजूला ठेवावा लागतो. हा अलिखित नियमच आहे म्हणा ना! ह्या नियमाचा सायरस मिस्त्रींना विसर पडलेला दिसतो. जी समस्या सायरस मिस्त्रींना सतावत होती ती समस्या रतन टाटांना एके काळी सतावली नसेल काय? वस्तुस्थिती अशी आहे की जेआरडींना मानणारी जुनी खोडं रतन टाटांना सुरूवाती सुरूवातीला मानत नव्हतीच मुळी!
कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या टाटा समूहाला बाहेर काढण्यासाठी कंपन्या विकून टाकणे हा एकमेव मार्ग नाही. त्या कंपन्या जोमाने चालवून कर्जफेड करण्याचाही मार्ग असतो. तो प्रामाणिकपणे चोखाळूनही कंपनी कर्जातून बाहेर पडत नसेल तर अन्य मार्गांचा विचार करायचा असतो. त्यासाठी मित्र समजून रतन टाटांशी सल्लामसलत करण्याचा मार्ग त्यांना मोकळा होता. त्यातही यश मिळाले नसते तर सोडून जाण्याचा व्हेटो बजवायचा मार्ग सायरस मिस्त्रींना मोकळा होताच. ते त्यांनी केले असते तर त्यांच्यावर आज उभा राहिलेला अन्याकारकप्रसंग आला नसता. संघर्ष आणि त्यातून मैत्रीपूर्णसहकार्य हाच मार्ग नेहमी जास्त प्रशस्त ठरतो. परंतु आता टाटा आणि मिस्त्री ह्या दोघांचेही मार्ग बंद झाल्यात जमा आहे. सायरस मिस्त्रींना घालवताना टाटा समूहाने भरपूर तांत्रिक चुका केल्या असतील. परंतु त्यावर भर देऊन सायरस मिस्त्री कोर्टकचे-या करायला सिध्द झालेले दिसतात. एखाद्या बाबतीत त्यांना न्यायालयीन यशही मिळू शकते. तथापि सायरस मिस्त्री ही व्यक्ती मनातून उतरलेली म्हणजे उतरली! रतन टाटांच्या मनात त्यांना पुन्हा पूर्वीचे स्थान मिळणे कठीणच!
काल रतन टाटांचा दणका!’ ह्या माझ्या पोस्टवर भरपूर प्रतिक्रिया आल्या. त्यातल्या ब-याच प्रतिक्रिया माझ्या संकेतस्थळावर जाऊन मूळ पोस्ट न वाचता व्यक्त करण्यात आल्या आहेत. म्हणूनच मी सहसा प्रतिक्रियांची दखल घेत नाही. प्रकाश रेड्डी ह्यांनी माझी पोस्ट बकवास असल्याचे म्हटले आहे. त्याबद्दल मला राग नाही. माझे दिवंगत मित्र जीएल रेड्डी ह्यांचे प्रकाश हे चिरंजीव आणि शशी प्रधान ह्यांचे भाचे. सध्या ते काय करतात हे मला माहित नाही. परंतु त्यांची प्रतिक्रिया वाचल्यावर त्यांचा अभ्यास अपुरा आहे हे ध्यानात आल्यावाचून राहात नाही. पठडीबाज कम्युनिझमच्या पलीकडे चिंरजीव प्रकाशची मजल अजून गेलेली नाही! कदाचित् म्हणूनच माझ्या लेखात ओघाने आलेली टाटा समूहाची माफक स्तुती त्यांना आवडली नाही. असो. सायरस मिस्त्री आणि रतन टाटा ह्या दोघांना माझ्या शुभेच्छा!  

रमेश झवर
www.rameshzawar.com 

No comments: