Thursday, August 10, 2017

मराठा लाँग मार्च

आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्रभऱ विखुरलेला लाख मोलाचा मराठा समाज बुधवारी राजधानीत एक झाला! राज्याच्या अनेक शहरात शिस्तबध्द मोर्चे काढण्याचा उपक्रम यशस्वी करून दाखवल्यानंतर मुंबई शहरात हा मोर्चा आयोजित करण्यात आला. मराठावर्गातर्फे काढण्यात आलेल्या ह्या मोर्चाने कधी काळी चीनमध्ये पीपल्स पार्टीतर्फे काढण्यात आलेल्या काढण्यात आलेल्या ऐतिहासिक लाँग मार्चची आठवण करून दिली. मराठा समाजातर्फे काढण्यात आलेल्या ह्या मोर्चाला मराठा लाँग मार्च संबोधलेले कदाचित स्वतःला राजकीय तज्ज्ञ म्हणवून घेणा-यांना आवडणार नाही. त्यांना हे वर्णन अप्रस्तुत वाटेल. चीनमध्ये काढण्यात आलेल्या ऐतिहासिक लाँगमार्चच्या उद्दिष्ट्यांप्रमाणे मराठा मोर्चाची उद्द्ष्ट्ये भले मोठमोठाली नसतील; परंतु जी काही उद्दिष्ट्ये मोर्चासाठी निश्चित करण्यात आली ती सुस्पष्ट असून त्यात नेमकेपणा आहे. म्हणूनच मोर्चेक-यांना आणि मोर्चाच्या नेत्यांना वापरून घेण्याचा प्रयत्न राजकारण्यांना करता आला नाही. मुंबईत आजवर निघालेल्या हजारों मोर्चांचा ज्याप्रमाणे राजकीय फायद्यासाठी उपयोग घेण्यात आला त्याप्रमाणे मराठा मोर्चाचा राजकीय फायद्यासाठी कोणाला उपयोग  करून घेता येणार नाही. असा फायदा करून घेता येईल ह्या विचाराने मोर्चात घुसलेल्या शेलार आणि राणे ह्यांना मोर्चेक-यांनी खड्यासारखे बाजूला काढले. मुख्य म्हणजे मोर्चा ज्या कारणाने हमखास अपेशी ठरत आला आहे त्या हिंसाचाराला, बेशिस्तीलाही ह्या मोर्चात स्थान मिळाले नाही. संयम हे मोर्चाचे बलस्थान असते. हा संयम मराठा मोर्चात सुरूवातीपासून शेवटपर्यंत पाळण्यात आला. विशिष्ट जातीसमूहाच्या उन्नतीसाठी हा मोर्चा काढण्यात आला तरी जातीयवादाने हा मोर्चा डागाळला नाही. मराठा समाजाचा मोर्चा म्हणून हा मोर्चा ओळखला गेला तरी मराठा हा जातीपेक्षा वर्गसमूह म्हणूनच जास्त ओळखला गेला आहे.
महाराष्ट्राचा इतिहास पर्यायाने आपापासातल्या लढायांचा, फाटाफुटीचा इतिहास आहे! आपापसातले वैमनस्य बाजूला सारण्यात मराठा समाज यशस्वी झाला. राजकीय सत्तेसाठी मराठा मंडळी एकत्र आल्याची इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. आपल्या मागण्या राज्याच्या सर्वोच्च नेत्याच्या कानी घालण्यासाठी मोर्चा नेणे हे तसे राजकीय हत्यारच! नोक-यात आरक्षण मिळण्यात काही कायदेशीर अडचणी आहेत म्हणून आरक्षणाची मागणी वगळता बाकी बहुतेक मान्य राज्याच्या सत्ताधा-यांना मान्य कारव्या लागल्या. त्यादृष्टीने सरकारकडून पावलेही पडली आहेत. परंतु अनेक मागण्या मान्य झाल्या तरी त्या मागण्यांची जोपर्यंत समाधानकारक निष्पत्ती होत नाही तोपर्यंत मागण्या मान्य झाल्या असे म्हणता येत नाही. म्हणूनच रेटा मागे न घेण्याचा निर्धार मोर्चाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. आंदोलनाचे मराठावर्गाने उपसलेले  हत्यार आता सहजासहजी म्यान होणार नाही हे स्पष्ट आहे.
मराठा मोर्चाची टवाळी करणारी कुजबूज मात्र अजून थांबलेली नाही. मराठा समाजातील अनेक नेते सत्तेवर असूनही मराठा समाज मागे कसा असा एक सवाल उपस्थित केला जातो. मुळात हा प्रश्न राजकीय गुगली आहे. एखाद्या समाजाचा नेता मंत्री आहे ह्याचा अर्थ घटनेची, कायद्याची आणि राजकीय चौकट ओलांडून वाट्टेल तसा कारभार करण्याची त्याला मुभा नाही. घटनाविरोधी निर्णयही त्याला घेता येत नाही. गेल्या साठ-पासष्ठ वर्षांत मागासवर्गीय, अन्य मागासवर्गीयांच्या आणि आदिवासींच्या नेत्यांनी राजकारण्यांवर दबाव आणून आपापल्या समाजाची उन्नती करण्यासाठी जे जे काही करता येणे शक्य होते ते करण्यासाठी सरकारला भाग पाडले. ब्राह्मण आणि शहाण्णव कुळी मराठा समाजाने मात्र असा प्रयत्न करून पाहिला नाही. हे दोन्ही समाज तसे अल्पसंख्यच. परंतु विशाल राजकारणाचा आभासात अडकल्याने आणि खोट्या अहंकाराच्या जाळयात सापडल्यामुळे इतरांनी जे सामान्य लाभ पदरात पाडून घेतले तेही त्यांना पदरात पाडून घेता आले नाही. सवलती मिळण्यासाठी आर्थिक मागासलेपण ही त्यांची मागणी रास्त खऱी;  पण त्यासाठी जो राजकीय इच्छाशक्ती आणि रेटा लावण्यासाठी चे खंबीर नेतृत्त्व लागते ते  राजकारणतरबेज मराठा आणि ब्राह्मणसमाजाकडे नव्हते. स्वार्थी राजकारणामुळेही त्यांना सत्यस्थितीचे आकलन झाले नाही.
शिक्षण आणि नोकरीत आरक्षण ही मराठा समाजाची प्रमुख मागणी आहे. ही मागणी सहजासहजी मान्य होण्यासारखी नाही हे मराठा समाजाला माहित नाही असे मुळीच नाही. मराठा मोर्चामुळे आरक्षणाच्या मुद्द्यांवर न्यायालयीन आणि संसदीय व्यापीठावर विचारमंथन सुरू करण्याखेरीज देशापुढे पर्याय उरणार नाही. ह्या विचारमंथनातून आर्थिक मागासलेपणचा निकष निष्पन्न होऊन त्यावर राजकीय सहमती होण्यासारखी आहे. एकतर मराठा समाजाला आरक्षण द्या अथवा सगळेच आरक्षण सरसकट काढून टाकून आर्थिक मागासलेपणाच्या निकषावर आधारित आरक्षण मान्य करा, हे नवे परिमाण आरक्षणाच्या प्रश्नाला प्राप्त होण्यासारखे आहे. कदाचित हे परिमाण प्राप्त होईल किंवा होणार नाही. मराठा आरक्षणाची मागणी मान्य होऊन बाकींच्याचे आरक्षण आपोआपच निर्र्थक ठरू शकेल.
राजकारणधुरंधर मराठा समाजाच्या मोर्चाचे फलित काय असा फाल्तू प्रश्न विचारण्यात अर्थ नाही. मराठा समाजाची दुःसाध्य एकजूट, स्वार्थप्रेरित राजकारण्यांना अटकाव, निरर्थक पक्षीय राजकारण करणा-यांना चाप इत्यादी अनेक बाबी ह्या मोर्चाच्या निमित्ताने पुढे आल्या आहेत. जनता आयी है सिंहासन खाली करो ह्यासारख्या भंपक घोषणांचा जमाना संपला हेही  मोर्चाचे फलित आहे. सार्वत्रिक भल्याचे राजकारण करा अन्यथा खुर्ची सोडा हा लोकशाहीचा मूलमंत्र पुनरज्जीवित होण्याचा दिवस लांब नाही.

रमेश झवर
www.rameshzawar.com

No comments: