Saturday, August 19, 2017

नारायणा, आता धाव!

गेल्या वर्षा दीडवर्षांत देशातील कॉर्पोरेट क्षेत्राला जणू काही ग्रहणच लागले आहे. एक लाखात नॅनो कार देण्याचे आणि टाटा स्टील कंपनीस जगातील पोलाद उद्योगाताल जगातली अग्रगण्य कंपनी करण्याचे स्वप्न उधळून लावण्याचा प्रयत्न करणा-या सायरस मिस्त्रींना टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून रतन टाटांनी हटवले होते. आता इन्फोसिस ह्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन नंबरच्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का ह्यांच्याविरूध्द कंपनीचे सहसंस्थापक नारायण मूर्ती ह्यांनी उभे केलेल्या वादळामुळे विशाल सिक्का ह्यांनी सरळ राजिनामा देऊन टाकला. आपल्या स्वप्नांचा चक्काचूर करणारे धोरणच सायरस मिस्त्री राबवत होते असा रतन टाटांचा आक्षेप होता तर भागधारकांना जबाबदार असलेल्या कंपनीचा कारभार हाकण्यासंबंधीचे सर्व संकेत विशाल सिक्का ह्यांनी पायदळी तुडवले आहेत असे नारायण मूर्तींचे म्हणणे. आपल्याला पद, पैसा किंवा अधिकार ह्यापैकी काहीएक नको असेही नारायण मूर्ती ठासून सांगत आहेत!
उधळपट्टीचे, चुकीचे निर्णय घेण्याचे ज्याच्यावर आरोप आहे त्याने आरोपांच्या चौकशीचे काम वकिली फर्मला देऊन स्वतःला निर्दोष सिध्द करून घेतले, असा नारायण मूर्तींचा दावा आहे. भागधारकांच्या हितासाठीच आपण सारे निर्णय घेतल्याचा दावा सायरस मिस्त्री हेही करत होते. नारायण मूर्तीही भागधारकांचे मूर्तीमंत कैवारी. सॉफ्टवेअर क्षेत्रात होणा-या बदलांकडे लक्ष देऊन व्यावसायिक धोरणात बदल केले नाही तर कंपनीच्या भवितव्याला निश्चतपणे धोका उत्पन्न होईल असे विशाल सिक्कांचे म्हणणे आहे. संचालक मंडळातील अनेक संचालकांचा त्यांना पाठिंबा आहे. विशाल सिक्कांनी राजिनामा द्यायला नको होता, असे कंपनीचे अध्यक्ष आर शेषशायी ह्यांना वाटते. सिक्कांच्या जागी बाहेरून लायक व्यक्ती जरी आणली तरी त्या व्यक्तीला कंपनी चालवताना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागणार. मुख्य म्हणजे नारायण मूर्तींच्या सासूबाईछाप स्वभावाला कसे तोंड द्यायचे ही समस्या नव्या मुख्य कार्यकारी अधिका-यालाही भेडसावल्याखेरीज राहणार नाही! खुद्द शेषशायींच्या मनातही कंपनीचे अध्यक्षपद सोडण्याचा विचार तीन वेळा येऊन गेला होता.
इन्फोसिसमध्ये कोण बरोबर कोण चूक हे ठरवणे इतके सोपे नाही. एकीकडे नारायण मूर्तींसारख्या खंद्या संस्थापकाने उपस्थित केलेले मुद्दे तर दुसरीकडे आयटी क्षेत्रातील जिवघेण्या स्पर्धेत पुढे जाण्यासाठी जे काही करावे लागेल ते जिद्दीने करण्याची मनाची तयारी ठेवणारा कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांच्यात सुरू असलेली रस्सीखेच थांबवायची कशी? माहितीक्षेत्रात कंपनी स्थापन करून ती नावारुपाला आणण्याच्या बाबतीत नारायण मूर्तींचा सिंहाचा वाटा होता हे तर वादातीत आहे. परंतु कंपनीतले नवी विटी नवे राज्य शांतपणे पाहत बसणे त्यांना शक्य नाही हेही खरे आहे. ह्या सगळ्याचा एक निश्चित परिणाम संभवू शकतो आणि तो म्हणजे कंपनीचे तीनतेरा वाजण्याचा! नव्वदच्या दशकात स्थापन झालेल्या तंत्रज्ञानात्मक सेवा देणा-या कंपनीच्या जीवित्वाला निर्माण झालेला हा अभूतपूर्व धोकाच म्हणावा लागेल. आजवर पिढी आणि जुनी पिढी ह्यांच्यात संघर्ष, व्यवस्थापनातली खाबूगिरी, तंत्रज्ञांचा अहंकारी स्वभावामुळे कंपनीच्या कारभारावरील पकड सुटणे, राजकारण्यांकडून होणारा उपद्रव, भाऊबंदकीसारखे ताणतणाव, लोभी कामगार संघटनांच्या मनमानी मागण्या इत्यादींमुळे बंद पडलेल्या अनेक कंपन्या भारतातल्या कॉर्पोरेट जगताने पाहिल्या आहेत. आता कार्पोरेट जगावर कुणीच मालक नसलेले कंपनीचे संस्थापक आणि कंपनीचे नवे वारसदार ह्यांच्यात उद्भवलेला संघर्ष पाहण्याची वेळ आली आहे. इन्फोसिसमधला संघर्ष हा मालकी हक्कावरून उद्भवलेला नाही. संघर्ष उसळला आहे तो कंपनीचालनावरून. तीव्र मतभेदामुळे इन्फोसिसच्या अस्तित्वाला लगेचच धोका उत्पन्न होणार नाही हे मान्य. परंतु सामान्य भागधारकांना त्याचा फटका बसला हे नाकारता येत नाही. इन्फोसिसमध्ये गेली दीड वर्षे सुरू असलेल्या संघर्ष विकोपाला गेल्यावर कंपनीचे भागभांडवल शुक्रवारी 10 टक्क्यांनी खाली आले. रुपयात मोजायचे तर ह्या संकटाची शुक्रवारपर्यंतची किंमत 22500 कोटी रूपये आहे. अजून किती खाली येणार ह्याबद्दल अंदाज बांधता येणार नही. ह्या संकटाला नारायण मूर्तींचा अहंकार कारणीभूत आहे की अगदी स्वाभाविकपणे दिसून येणारी जनरेशन गॅप अधिक कारणीभूत आहे ह्यावर मतप्रदर्शन करणे सोपे नाही. परंतु ही परिस्थिती वेगळ्या प्रकारे धोकादायक ठरणारी आहे. न संपणारे मतभेद आणि त्यातून कंपनीच्या मूळावर येऊ शकणारा राजिनामा हे व्यापक लोकहिताच्या दृष्टीने योग्य नाही. कॉर्पोरेट जगात  उद्भवलेल्या ह्या धोक्याला अनेक परिमाण आहेत. कंपनीचे एक संचालक आणि कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांच्यातील संघर्षाची परिणती शेअर बाजाराचा उत्साह संपवणारी आहे. मार्केट कोसळणे नवे नाही. परंतु ज्या कारणामुळे मार्केट कोसळले ते नवे आहे. झाली. मार्केट कोसळणे  हा झाला एक भाग. त्याखेरीज सॉफ्टवेअर निर्यात क्षेत्राच्या अब्रूचे धिंडवडे निघणार ते वेगळेच. सेवाक्षेत्रावर थोडेफार अवलंबून असलेल्या वित्तक्षेत्राची हानीदेखील ठरलेलीच!
नारायणा, आता धाव! इन्फोसिसमधील सगळ्यांना सन्मती दे.

रमेश झवर

No comments: