Tuesday, October 17, 2017

अविवेकाची काजळी फिटू दे!

मी अविवेकाची काजळी। फेडूनी विवेकदीपु उजळी। तैं योगिया पाहे दिवाळी। निरंतर।। - ज्ञानेश्वर
मंगळवारी धनत्रयोदशीच्या दिवशी पावसाळी हवा असूनही यंदाच्या दिवाळीने प्रवेश केला! आणि देशभर दिवाळी साजरी होत आहे. दुर्दैवाने ह्यावेळी दिवाळीचा उत्साह उसना आहे! परंतु विवेकसंपन्न योगियाच्या जीवनात प्रत्येक क्षणी जणू दिवाळीच असते हे विसरून चालत नाही! सर्वसामान्य माणसे मात्र दिवाळीची सांगड मात्र धनधान्य, चांगल्या हंगामाची ग्वाही देणारी जोमाने आलेली काळ्या मातीतली पीके, व्यापारधंद्यातली बरकत ह्यांच्याशी घालतात! अर्थात त्यात चुकीचे काही नाही. वस्तुतः प्रत्येकाच्या अंतःकरणात तेवत असलेली सद्बुध्दीची लहानशी ज्योत आयुष्य उजळून टाकत असते. एका अर्थाने तीही दिवाळीच. म्हणून सद्बुध्दीच्या ह्या ज्योतीला धाकटे म्हणता येत नाही!
देशातल्या लहानातल्या लहान माणसाच्या अंतकरणात हजारों वर्षांपासून सद्बुध्दीची ज्योत तेवत आली आहे. ही ज्योत नेमकी केव्हापासून तेवत आली हे सांगता येणार नाही. परंतु स्थूल मानाने असे सांगता येईल की सरस्वती नदीच्या काठी बहरत गेलेल्या आपल्या प्राचीन संस्कृतीच्या जन्मापासून ती तेवत आहे. गेल्या 5 हजार वर्षांत प्रलंयकारी पूर, भूस्खलन, त्सुनामी इत्यादि नाना प्रकारची संकटे आली. इसवी सनाच्या आधी तिस-या शतकापासून ते अठराव्या शतकापर्यंत अनेक वेळा परचक्रे आली. वैरभावनेमुळे देशातल्या बहुसंख्यंची बुध्दी गढूळ होण्याचे प्रसंगही आले. परंतु त्याच्या अंतःकरणात सद्बुध्दीची ज्योत फडफडत राहिली. त्या जोरावरच भारतवर्ष पुन्हा पुन्हा दिमाखाने उभा राहिला! ह्याचे श्रेय कुणा एकाला देता येत नाही. त्याचे कारण 'राजा कालस्य कारणम्' हे पुस्तकी वचन बाजूला पडून काळच राजांचे कारण झाला.
सरस्वती नदीच्या शांत प्रवाहाकडे पाहात काहींना ऋचा स्फुरल्या तर काहींना स्वसंरक्षणसाठी हाती धनुष्य घेण्याची प्रेरणा झाली. त्यांच्या आगमनापूर्वी इथे नांदत असलेल्या भिन्न संस्कृतीतल्या लोकांशी जेत्यांच्या संस्कृतीतील लोकांचे मनोमीलन आणि शरीरमीलनही घडले! अर्थात हे मीलन इतके सहज घडले नाही. मनोमिलनाचच्या आणि शरीरमीलनाच्या प्रवासात अनेक संघर्ष उद्भवले. त्या संघर्षातूनही त्याग, करूणा आणि अहिंसाधर्माचा उदय झाला. भारतीय संस्कृतीचा प्रवाह निरंतर वाहात राहिला. नदीच्या प्रवाहात मोठमोठाले वृक्ष,काटेकुटे, प्रेते, मृत पावलेले आणि कसेबसे जीवंत राहिलेले प्राणी वाहात येतात. त्याप्रमाणे संस्कृतीच्या प्रलय प्रवाहात अनेक वंश उदयास आले आणि वाहूनही गेले! पुनरपि जननम् पुनरपी मरणम् हा न्याय कायम राहिला. कालाचा हा प्रवाह विलक्षण मोठाच म्हटला पाहिजे. धर्म श्रेष्ठ ठरला. परंतु धर्मासकट सा-याला कवेत घेणारी अनुभूती धर्माहून श्रेष्ठ ठरली
युध्दात जेते ठरलेल्या राजांचे सूतकवींनी गायलेल्या पोवाड्यांची आणि ऋषींच्या मुखातून निघालेल्या उत्स्फूर्त उद्गारांची महाकाव्ये झाली. पाहता पाहता ही महाकाव्ये इथल्या सांस्कृतिक जीवनाचे अंग होऊऩ बसली. वैदातल्या ऋचांपासून प्रेरणा घेत भिन्न भिन्न मीमांसकांनी भिन्न भिन्न मीमांसा उभ्या केल्या. परंतु झाडून त्या सर्व मीमांसांतलं फोलपणही लक्षात येत गेले. वेदबाह्य विचारधारांचे प्रवाहदेखील त्या फोलपणापासून मिळालेली देणगी मानयला हवी. नंतरच्या काळात वाघिणींच्या दूध-प्राशनाने नव्या प्रेरणा मिळालेल्यांनी वेगवेगऴ्या मीमांसावर आधारित तथाकथित संस्कृतीवर जोरदार हल्ले चढवले. हे हल्ले विचारशस्त्रांचे होते. विचारस्वातंत्र्य विचारस्वातंत्र्य म्हणातात ते हेच! अजून तरी त्या विचारस्वातंत्र्याचीच सरशी झाल्यासारखी दिसते.
विचारांची लढाई जोपर्यंत सांस्कृतिक क्षेत्रापुरती मर्यादित होती तोपर्यंत ठीक होते. पण गेल्या काही वर्षांपासून परिस्थिती बदलून विचारांची लढाई वाणिज्य क्षेत्रात पसरली. त्यामुळे आजीवेकचे स्त्रोत आटतील की काय ह्या हभीतीने सामान्य माणसाचे जीवन झाकोळले गेले. अनेकांचा रोजगार बुडाला. उपजीविकेचे साधनच नाहीसे होत असताना कसली दिवाळी न् कसले काय! अवघे जग अनिश्चिततेच्या भोव-यात सापडले. लोकांचे स्वराज्य जाऊन व्यापा-यांचे स्वराज्य आले. म्हणून विश्वव्यापाराच्या भाषेला आळा घालावा असा विचार बळावू लागला आहे. विश्वव्यापाराची भाषा पुन्हा एकदा स्थानिक वळणावर उभी झाली आहे! सागर विशाल नाही असे कोणी म्हणत नाही. खाडीपलीकडे काही दिसेनासे झाले असेल तर विशाल सागराचे अस्तित्व कसे मान्य करावे? सामान्य माणूस पुन्हा एकदा अस्वस्थ झाला आहे. त्या अस्वस्थेमुळे त्याच्या अंतःकरणातली सद्बुध्दीची ज्योत विझते की अशी भीतीदेखील वाटू लागली आहे.
सध्याची परिस्थिती कशीही असली तरी वैराने वैर शमत नाही हेही लक्षात आले हे केवढे तरी सुदैव! प्रत्येकाच्या अंतःकरणात वसत असलेल्या सद्बुध्दीच्या जोरावर अस्वस्थेचे हेही दिवस जातील!
अविवेकाची काजळी फिटू दे. बहुता तेजाते प्रकट करणारी सद्बुध्दीची ज्योत प्रकाशित राहू दे. त्या प्रकाशात समंजस सामरस्याचे राज्य दिसू दे.. हीच दिवाळीनिमित्त शुभेच्छा!

रमेश झवर
www.rameshzawar.com

No comments: