Thursday, January 4, 2018

भिमथडीची ठिणगी

पेशव्यांची सत्ता उखडून फेकण्यासाठी पुण्यावर चालून आलेल्या इंग्रज सैन्यात सामील झालेल्या 500 महार सैनिकांनी गाजवलेल्या शौर्याचे स्मारक भिमा कोरेगाव येथे आहे. त्या स्मारकापुढे मस्तक झुकवण्यासाठी 1927 साली बाबासाहेब आंबेडकर कोरेगावला गेले होते. त्या आधीपासून महार समाजाच्या शूरवीरांना भाववंदना देण्यासाठी प्रतिवर्षी दि. 1 जानेवारी रोजी दलित मंडळी तेथे जमत असत. भिमा कोरेगावपासून जवळच असलेल्या पाबळ येथे कधी काळी झालेल्या युध्दात महावीराचे शिर पडले होते अशी आख्यायिका आहे. त्यामुळे पाबळही जैनांचे फार मोठे तीर्थक्षेत्र मानले जाते. भिमेच्या तीराला लागून असलेला हा परिसर शेतीच्या दृष्टीने संपन्न आहे तर एमआयडीमुळे कोरेगावचा परिसर औद्योगिक प्रगतीच्या दिशेने पुढे झेप घेत आहे. त्याखेरीज पीएमटीच्या बसमुळे पुणे शहराशी कोरेगावच्या लोकांचा सतत संपर्कही आहे. अशा ह्या कोरेगाव परिसरातील शूर पूर्वजांच्या समारकाला सालाबादप्रमाणे यंदा 1 जानेवारी 2018 रोजी दलित मंडळी जमली होती. यंदा शौर्य दिनाला 200 वर्षे पुरी झाल्याचे निमित्त साधून नेहमीपेक्षा जरा जास्तच मोठा जनसमुदाय तेथे उपस्थित झाला.
राज्यात काँग्रेस आघाडीची सत्ता जाऊऩ भाजपा आघाडीची सत्ता आल्यानंतर भिमा कोरेगावला जमणा-या दलितांना धडा शिकवण्याचे मनसुबे शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे आणि हिंदू एकता परिषदाचे मिलिंद एकबोटे ह्यांनी ठरवले असावे. कोरगावात दंगल पेटली ह्यावरूनच दंगलीमागे दोघांचे स्ट्रॅटेजी प्लॅनिंग असल्याचे सिध्ध होते. दंगलीत वाहनांची नासधूस करण्यात आली. एक तरूणही ठार झाला. आता दंगल घडवून आणण्याचे भिडे आणि एकबोटे ह्या दोघांनी एकत्र येऊन ठरवले की स्वतंत्रपणे ठरवले हे कळण्यास मार्ग नाही. त्यांच्याविरूध्द गुन्हा नोंजवण्यात आला असला तरी ते अद्याप फरारी आहेत. दरम्यान ह्या घटनेची हायकोर्टाच्या न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. चौकशी नेमण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली ते ठीक आहे. परंतु ह्या चौकशी आयोगाच्या संदर्भकक्षाही व्यवस्थित ठरवण्याची गरज आहे. एवढे सगळे शिजले, घडले तरी पोलिस खात्याला त्याची कुणकुण कशी लागली नाही आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना रिपोर्ट का केला नाही हा मोठा प्रश्न आहे.
यंदा शौर्यदिनाला दलितांशी जवळिक साधण्यासाठी गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी आणि त्यांचे सहका-यांनीही पुणे परिसरात हदेरी लावली. महाराष्ट्रातील दलितांच्या तापलेल्या मनावर फुंकर घालत असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्चस्वाविरूध्द लढा उभारण्याची तयारी करण्याचा उद्देश मेवाणी बाळगून आहेत. दलित आणि संघ स्वयंसेवक विरूध्द दलित ह्यात कोरगावच्या कार्यक्रम प्रसंगी हिंसक प्रकार होण्याची शक्यता आकार घेत होती. घडलेही तसेच. काय घडू शकते ह्याचा पोलिसांना अंदाज आला नाही असे सकृतदर्शनी तरी दिसते. बंद पाळताना शांततेने पाळण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केले होते. जेव्हा प्रत्यक्षात दंगली झाल्या तेव्हा त्यांनी स्वतःवरची जबाबदारी झटकली आणि ती मुख्मंत्र्यवर ढकलली. अजूनही आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. गंमतीचा भाग म्हणजे आंबेडकर आणि फडणवीस हे दोघे दलित उद्रेकाच्या संदर्भात एकमेकांवर करत असलेल्या आरोपांचा आशय एकच आहे, दोघेही एकमेकांवर ठपका ठेऊ इच्छितात.
भिमथडीला पडलेल्या ठिणगीचे रूपान्तर महाराष्ट्र बंदच्या घोषणेत झाले. बंदच्या दिवशीची जाळपोळ, बसेसवर करण्यात आलेली दगडफेक हे सगळे पाहिल्यावर राज्यात वणवा पेटायचेच काय ते बाकी राहिले होते. मुख्यमंत्र्यांनी कोरेगावच्या हिंसक घटनेप्रकरणी चौकशी करण्याची घोषणा लगेच केली. त्याचवेळी भारिपचे प्रकाश आंबेडकर ह्यांनीही राज्यव्यापी शांततामय बंदची घोषणा केली. भारिपचा बंद आणि तोही राज्यव्यापी बंद हे अतिशयोक्तीचे उदाहरण वाटले. परंतु त्यांनी केलेली राज्यव्यापी बंदची घोषणा खरी ठरली. प्रत्यक्षात सकाळी शिवसेनास्टाईल लोकल गाड्या अडवण्याचे सत्र सुरू झाले तेव्हा हा बंद साधासुधा नाही ह्याची लोकांना कल्पना येऊन चुकली. हा बंद साधासुधा नव्हताच. बेस्टच्या 173 आणि एस्टीच्या 187  बसेसची नासधूस झाली. बंदोबस्तासाठी 30 हजार पोलिस असूनही खासगी वाहनांना आगी लावण्यात आल्या. दंगलखोरांवर लाठीमार किंवा गोळीबार करण्याचे पोलिसांनी नुसते टाळलेच नाही तर, शहरात जाऊ इच्छिणा-यांना माघारी फिरण्याची विनवणी ते करत होते.  ह्याचा अर्थ असा होते की दंगल कशी हाताळायची ह्याबद्दल त्यांना नीट मार्गदर्शन करण्यात आले असावे असेच एकूण चित्र दिसले.
दलित विरूध्द संघ किंवा उजव्या राजकारणाकडे झुकलेल्या मराठा संघ विरूध्द दलित असा संघर्ष पेटू देऊ नका, असा सल्ला भाजपा श्रेष्ठींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस ह्यांना दिल्याचे वृत्त आहे. हे वृत्त 'सांगते कळते'  स्वरूपाचे असल्यामुळे त्या बातमीला किती महत्त्वा द्यायचे हे तारतम्यपूर्वक ठरवावे लागेल. उत्तरप्रदेश गोरक्षकांनी रान पेटवले तसे महाराष्ट्रात रान पेटवणे शक्य नाही हे लक्षात येताच दलितांच्या राजकारणाला शह दिला की महाष्ट्रातही हवा तसा वणवा पेटवता येऊ शकतो हे ब्रिगेडी मंडळीच्या लक्षात आले असावे. परंतु हे सगळे करून झाल्यावर त्यातून काय निष्पन्न होईल हे सांगता येत नाही. एक मात्र सांगता येईल की, 'सबका साथ सबका विकास' ह्यासाठी मोदींच्या राजकारणाला निश्चित खिळ बसेल. आगामी निवडणूक तशी जवळ येऊन ठेपली आहे हे लक्षात घेता राहिलेल्या वेळेचा जास्तीत जास्त 'क्वालिटी' उपयोग करून घेण्याचे सत्ताधारी आणि विरोधकांनी ठरवलेले आहे हे स्पष्ट आहे.
भिमथडीला पेटलेली ही ठिणगी विझवण्यात सत्ताधारी पक्षाला यश येते की ठिणगीचा वणवा करण्यात विरोधकांना यश येते ह्यावर 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे यशापयश अवंलबून राहणार हे उघड आहे. यशापयशाचा मुद्दा बाजूला ठेवला तरी देशाचे ऐक्य आणि समाजस्वास्थ्य ह्या दोन्ही दृष्टीने असा वणवा पेटू न देणे शहाणपणाचे ठरेल. अन्यथा आगीशी सुरू केलेला खेळ सर्वांनाच भाजून काढल्याशिवाय राहणार नाही.

रमेश झवर
www.rameshzawar.com

वाचा 'पेशवाईचा अस्त कसा झाला?'
फोडिले भांडार पानावर

No comments: