Thursday, January 11, 2018

ट्रंप एक 'व्यक्ती' आणि 'वल्ली'!

पत्रकार  मायकेल वोल्फ
 डोनाल्ड ट्रंप ह्यांच्या अध्यक्षपदाचे एक वर्ष पुरे झाले त्यानिमित्त पत्रकार मायकेल वोल्फ ह्यांनी ट्रंपच्या वर्षभराल्या एकूण कारभारावर 'फायर अँड फ्युरी' नावाचे पुस्तक लिहीले आहे. त्या पुस्तकातील ट्रंप ह्यांचे अनेक किस्से गेल्या आठवड्यात वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रसिध्द झाले. अध्यक्ष ट्रंप ह्यांनी निवडणूक प्रचारसभातून 'यंव करू त्येव करू' अशी भाषणे केली. परंतु अध्यक्षपदाची सूत्रे हाती आल्यानंतर ट्रंपना अनेक धोरणांतले बारकावे समजत नाहीत असे व्हाईट हाऊसमधील अनेक   अधिका-यांचे मत झाले. अध्यक्षीय अधिकारानुसार ट्रंपनी व्हाईट हाऊसमध्ये अनेक अधिका-यांच्या नेमणुका केल्या ख-या; पण त्यांच्याशी कसे वागावे ह्याचे ज्ञान त्यांना नसल्याचे दिसून आले.

नेमणुका करताना त्यांनी जाणत्या मित्रांचा सल्ला घेतला खरा; पण त्यांना तो पटला नाही. शेवटी जे करायचे तेच त्यांनी केले. निवडणूक मोहिम सुरू होण्याच्या सुमारास फॉक्स न्यूजचे अध्य़क्ष रॉजर एल्स ह्यांना तुम्ही मला प्रचार मोहिमेत मदतीला या, अशी विनंती केली. परंतु ट्रंप कोणाचा सल्ला ऐकत नाही,  हे एल्सना माहित असल्यामुळे ते प्रचार सहभागी झाले नाही. व्हाईट हाऊसमध्ये शपथविधीनंतर त्यांनी पुन्हा एल्स ह्यांच्याशी संपर्क साधला. चीफ ऑफ स्टाफ पदावर कोणाला नेमले पाहिजे ह्याबद्दल सल्ला मागितला. एल्स त्यांना म्हणाले, यू नीट अ सन ऑफ बिX हू नोज वॉशिंग्टन! एल्सनी त्यांना स्पीकर बोहनर ह्यांचे नाव सुचवले. कोण बोहनर? अशी पृच्छा म्हणे ट्रंपनी केली. बोहनर ह्यांना ते चांगले ओळखत होते. पण ट्रंपनी असं भासवलं की आपण बोहनरना ओळखत नाही. ज्यांना ते व्यक्तिशः ओळखत नव्हते अशा अनेकांच्या नेमणुका कोणाच्या तरी सांगण्यावरून त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये केल्या.
रिपब्लिकन पार्टीच्या देशव्यापी मध्यवर्ती समितीचे प्रमुख रीन्स प्रिबस ह्यांची ट्रंपनी स्ट्रॅटेजिस्ट पदावर नेमणूक केली. जॉन बोल्टन ह्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नेमणूक करण्याचा विषय ट्रंप ह्यांच्याकडे निघाला तेव्हा ते म्हणाले, त्यांच्या मिशा मला आवडत नाही. हा माणूस व्हाईट हाऊसचा हिस्सा होऊ शकत नाही. हे सगळे बनॉन ह्यांनी सांगितल्याचे मायकेल ह्यांनी पुस्तकात म्हटले आहे. मायकेल वोल्फ ह्यांच्या पुस्तकात असा भरगच्च मसाला आहे. ही आणि अशी अनेक उदाहरणे देताना त्यांनी बनॉन ह्यांच्याशी केलेल्या वार्तालापाचा हवाला दिला आहे.
नवनिवार्चित अध्यक्षांनी अध्यक्षपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी व्हाईट हाऊसच्या परिसरात असलेल्या 'ब्लेअर हाऊस' ह्या अतिथीगृहात मुक्कामाला यायचे असते. परंतु ह्याला ट्रंप तयार नव्हते. ट्रंप इंटरनॅशनल हॉटेलमध्ये मुक्काम करून शपथविधीच्या दिवशी त्यांना सकाळी व्हाईट हाऊसमध्ये यायचे होते. ज्य दिवशी त्यांचा शपथविधी झाला त्या दिवशी त्यांची पत्नी मेलनिया ह्यांच्याशी कशावरून तरी भांडण झाले. लेडी मेलनियांच्या डोळ्यात अश्रू तरळायचे काय ते बाकी राहिले. व्हाईट हाऊसमध्ये वैयक्तिक सेवेत असलेल्या कर्मचा-यांच्या मनात नेहमीच गोंधळ उडत असे. खाली पडलेला त्यांचा शर्ट एका कर्मचा-याने उचलून त्यांच्या हातात दिला तेव्हा 'माझ्या वस्तुला तू हात लावलाच का,' असं सांगून आपल्या 'टूथब्रशलासुध्दा हात लावायचा नाही' असे ट्रंपनी त्याला बजावले.
अनेकदा त्यांना काय हवे आहे हे अधिका-यांना समजत नसे. एखाद्या लहानमुलाला काय हवे आहे हे प्रयत्नपूर्वक समजून घ्यावे लागते तसे त्यांना काय हवे आहे हे अधिकारीवर्गाला समजून घ्यावे लागायचे. त्यासाठी अधिकारीवर्गाला तारेवरची कसरत करावी लागायची. हे सगळे किस्से बनॉन ह्यांच्याबरोबर झालेल्या संभाषणाचा हवाला देऊन मायकेलनी दिले आहेत. अमेरिकेच परराष्ट्र सचिव रेक्स टिलरसन ह्यांनी ट्रंपना 'मोरोनट हे विशेषण बहाल केल्याचे प्रसिध्द झाले आहे. मरोन ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला कळते असा आव आणून दुस-यावर इंप्रेशन पाडणे!  ट्रंप ह्यांना एकदोघांनी 'इडियट'देखईल म्हटले तर काहींनी त्यांची संभावना 'डोप' अशी केली. पुलंच्या भाषेत बोलायचे तर ट्रंप ही एक वल्ली आहे असे म्हणता येईल.
हे पुस्तक प्रसिध्द होऊ नये ह्यासाठीची खटपट ट्रंपच्या लोकांनी सुरू केली आहे. प्रकाशक हेन्री होल्टविरूध्द अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची तयारी ट्रंपनी चालवली. अमेरिकेच्या मानहानिविषयक कायद्याचा आढावा घेण्याची वेळ आली आहे. मायकेल ह्यांचे पुस्तक अमेरिकी शिष्टाचारात बसणारे नाही, असे ट्रंप ह्यंनी सांगितले. दरम्यान अध्यक्ष ट्रंप ह्यांचा बचाव करण्यासाठी व्हाईट हाऊसचे मुख्य अधिकारी स्टीफन मिलर आणि ट्रंपच्या पत्नी मेलनिया पुढे सरसावले आहेत. व्हाईट हाऊसमध्या कारभार हाकून देश चालवण्यासाठी अध्य़क्ष ट्रंप हे खंबीर आहेत,  असे स्टीफन मिलर ह्यांनी सीएनएनवर बोलताना सांगितले. फर्स्ट लेडी मेलनिया ह्यांनी वार्ताहर परिषद घएतली.
अध्यक्ष ट्रंप ह्यांना कारभार करण्याची 'नॅक' नाही, असाच मायकेल ह्यांच्या पुस्तकाचा एकूण आशय आहे. ओबामा ह्यांच्या अनेक धोरणांचे ट्रंप ह्यांनी निवडणूक प्रचारसभातून वाभाडे काढले. पण प्रत्यक्ष कारभार हाकताना तपशिलात जाण्याची वेळ आली तेव्हा ट्रंप ह्यांची फ्या फ्या उडाली असा मायकेलच्या पुस्तकाचा सारांश आहे. 
व्हाईट हाऊसचे भूतपूर्व मुख्य अधिकारी स्टीफन के. बनॉन ह्यांना अध्यक्ष ट्रंप ह्यांनी काढून टाकले म्हणूनच  स्टीफन बनॉन बरळताहेत, असे ट्रंप ह्यांचे म्हणणे आहे. असंतुष्ट अधिका-यांबरोबरच्या बैठकाही स्टीफन ह्यांनीच ठरवून दिल्या, असा तपशील व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने पुरवला. 'स्टीफन बॉनची नोकरीही गेली आणि मनही था-यावर राहिले नाही,' अशी प्रतिक्रिया ट्रंप ह्यांनी व्यक्त केल्याचेही प्रवक्त्यांनी सांगितले.
निवडणूक प्रचाराच्या दरम्यान ह्याच बनॉननी ज्युनियर ट्रंप आणि रशियन वकील ह्या दोघांची भेट घडवून आणली होती असे मायकेलने पुस्तकात सूचित केले आहे. पुस्तकाचा हा रोख अध्यक्षीय निवडणुकीत झालेल्या रशियन ढवळाढवळीसंबंधीच्या आरोपाशी निगडित आहे. त्यमुळे ह्या पुस्तकाचे गांभीर्य वाढले आहे.

रमेश झवर
 www.rameshzawar.comPost a Comment