काँग्रेस अध्यक्षपदी राहूल गांधी आल्यानंतर
प्रथमच झालेल्या काँग्रेस अधिवेशनात 2019 मध्ये होणा-या निवडणूक-युध्दाचे शंख फुंकले
गेले! शंख फुंकले गेले असे म्हणण्याचे कारणः की राहूल
गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, अर्थमंत्री पी चिंबरम, नुकतेच काँग्रेसमध्ये
प्रवेश केलेले नवजोत सिध्धू तसेच अनेक नव्याजुन्या नेत्यांच्या भाषणात भाजपाचा
पराभव करण्याचा निर्धार ओसंडून वाहताना दिसला. प्रत्येकाच्या भाषणात भाजपावर
फेकायचा दारू गोळा ठासून भरला होता. समारोपाच्या भाषणात सत्यासाठी लढणारी काँग्रेस
आणि सत्तेसाठी लढणारी भारतीय जनता पार्टी अशी तुलना करून राहूल गांधी ह्यांनी केली.
ती करताना काँग्रेसला पांडवांचा पक्ष तर भाजपाला कौरवांचा पक्ष अशी भारतीय जनमानसाला
सदैव भावलेली उपमाही त्यांनी दिली. कोणीतीही उपमा ही पूर्णोपमा नसते. राहूल गांधी ह्यांनी
दिलेली उपमाही पूर्णोपमा नाही! काँग्रेसचे संख्याबळ
आणि 2019 च्या लोकसभा निवडणुका जिंकून पुन्हा जमेल तितका काळ सत्तेवर राहण्याची भाजपाची
प्रबळ इच्छा हे दोनच मुद्दे राहूल गांधींना अभिप्रेत असावेत. मिडियानेही काँग्रेस
अधिवेशनास पहिल्या 'विनाकरार' पानावर
भरपूर प्रसिध्दी दिली.
ह्या भाषणात 2014 पासून आजपर्यंत मोदींनी
केलेल्या प्रचारात्मक भाषणांना त्यांच्याच पातळीवर उतरून राहूल गांधींनी तोडीस तोड
उत्तर दिले. मोदींनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाला राहूल गांधींनी भ्रष्टाचाराच्या
आरोपानेच उत्तर दिले. ह्या भाषणानंतर मौन पाळणे भाजपा शक्य नव्हते. त्याच दिवशी
भाजपाने काँग्रेसवर पलटवार केला! युध्दासाठी जमलेल्या दोन्ही सैन्यांचे वर्णन करताना ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने
उंच भरारी घेतली आहे. 'भेरी, निशाण, मादळ।शंख टीविला भोंगळ। आणि
भासुर रणकोल्हाळ। भटांचे' असे ज्ञानेश्वरांनी
ज्ञानेश्वरींच्या पहिल्या अध्यायात निरनिराळ्या वाद्यांचा कल्लोळ कसा उठला ह्याचे
बहारदार वर्णन केले आहे. 2019 साली जेव्हा प्रत्यक्ष 'लोकसभा
युध्द`सुरू होणार तेव्हा दोन्ही पक्षातल्या युध्दवीरांची
भाषणे कशी असतील ह्याची झलक जनतेला अधिवेशनानिमित्त पाहायला मिळाली. झलक पाहायला
मिळाली ते ठीक आहे. पण ह्या संदर्भात देशभर राजकीय बलाबलाची स्थिती कशी आहे हे
तपासून पाहणे जरूरीचे ठरेल. ही स्थिती आजपासून रोज पालटत राहील हेदेखील लक्षात ठेवले पाहिजे.
सोळाव्या लोकसभेत काँग्रेसला अवघ्या 44
जागा मिळाल्या होत्या. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, आणि बिहार ह्या राज्यातील 168 पैकी
111 जागा भाजापाने जिंकल्या. त्यामुळे लोकसभेत बहुमताचे पारडे भाजपाच्या बाजूने
झुकले होते. तामिळनाडू, आंध्रप्रदेश, ओडिशा, केरळ आणि तेलंगण ह्या राज्यात 166
पैकी अवघ्या 5 जागा भाजपाच्या पदरात पडल्या. राज्यसभेत बहुमत मिळाले तर भाजापाला संसदीय
राजकरणात भाजपाला दमदार पावले टाकता आली असती. परंतु ते भाजपाला शक्य झालेले दिसले
नाही. 2014 नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकात भाजपाला यश मिळाले; पण फार मोठे यश मिळाले नाही. गुजरात विधानसभा निवडणुकात भाजपाला सत्ता
मिळाली, पण भाजपा क्षीण झालेला दिसला तर उत्तरप्रदेशातही दिमाखदारपणे सत्तेवर आला.
आसामात सत्ता मिळाली. त्रिपुरातही सत्ता मिळाली. महाराष्ट्र,जम्मू-काश्मीर आणि बिहारमध्ये
भाजपा सत्तेच्या भागीदारीत आहे. तिथे कटकटींना तोंड देत भाजपा सत्तेवर टिकून
राहिला एवढेच. पण सत्ता टिकवण्याच्या नादात भाजपानेदेखील कमीअधिक प्रमाणात सत्व
गमावून बसला हे नाकारता येणार नाही!
दक्षिणेकडील राज्यात तेलगू देशमसारखा
प्रबळ मित्रही भाजपाने नुकताच गमावला. लोकसभेत तेलगू देशमने आणलेल्या
अविश्वासाच्या ठरावच्या वेळी किती मित्र तेलगू देशमच्या बाजूला उभे राहतात हे
पाहण्यासारखे आहे. तामिळनाडू आणि केरळ राज्याच अद्याप भाजपाची डाळ शिजू शकली नाही.
उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यात झालेल्या पोटिनवडणुकांचा निकाल भाजपाच्या विरोधात
गेला हे खरे असले तरी त्यामुळे तूर्त तरी भाजपाला फारसा फरक पडला नाही. कर्नाटक,
राजस्थान आणि मध्यप्रदेश ह्या चार राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत.
त्या राज्यांत कोणाची सत्ता येते ह्यावर खरे भाजापचे भावी यशापयश ठरणार आहे. पश्चिम
बंगाल आणि ओडिशा ह्या राज्यात भाजपाला फक्त सत्तेची स्वप्नेच पडतात! तृणमूल काँग्रेस, बिजू जनता दल अण्णा द्रमुक आणि द्रमुक ह्या पक्षांची
ताकद संपवणे काँग्रेसलादेखील फारसे जमलेले नव्हते. तेव्हा, भाजपाला हे पक्ष दाद
देतील असे मानणे हे एक स्वप्नरंजनच म्हणायला पाहिजे. समाजवादी पार्टी आणि
मायावतींची बहुजन समाज पार्टी ह्यांची अलीकडे युती झाली असून ते युतीच्या शोधात हे
दोन्ही पक्ष राजदाकडे जोगवा मागतील. बदलत्या परिस्थितीत तो त्यांना मिळेलही!
सध्याचे बलाबल कसेही असले तरी ते
कॅलिडिओ स्कोपप्रमाणे प्रत्येक वेळी ते बदलत राहील. अर्थात भाजपा आणि काँग्रेस हे
दोन्ही पक्ष हे जाणून आहेत. त्यादृष्टीने वाटेल ते करण्याची दोन्ही पक्षांची कायावाचेमनेकरून
तयारी आहे.
राजकीय बलाबलाप्रमाणे वैचारिक मुद्द्यांचाही
विचार करावा लागतो. पण ह्या लढाईतले ख किती आणि खोटे किती हे जनसामान्यांना समजत
नाही. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग ह्यांनी भाजपाला 'भारतीय
जुमला पार्टी' संबोधून भाजपावर तडाखेबंद हल्ला चढवला. त्यांचे
नोटबंदी आणि घाईघाईने अमलात आणलेला जीएसटी कायदा हे दोन प्रश्न काँग्रेसच्या
टिकेचे लक्ष्य स्पष्ट करणारे आहेत. मोदी-शहांवर भ्रष्टाचाराच्या आरोपाची तोफही
ह्या अधिवेशनात डागण्यात आली. लोया मृत्यू प्रकरणाच्या आधारे अमित शहांवर खुनाचा
आरोप करण्यात आला. लोया प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कसाही लागला तरी अमित शहा
आणि राहूल गांधी ह्यांच्याकडून येत्या काळात केल्या जाणा-या संभाव्य राजकीय आरोपप्रत्यारोपांत
फारसा फरक पडणार नाहीच.
महाभारत युध्दामागे हक्काचे राज्य मिळवणे हा
पांडावांचा उद्देश होता तर मिळालेले राज्य काय म्हणून सोडायचे अशी कौरवांची भूमिका
होती. 2019 मध्ये होणा-या 'लोकसभा युध्दा'त गेलेली सत्ता पुन्हा हस्तगत करणे हा काँग्रेसचा हेतू! गेलेली सत्ता पुन्हा मिळवणे आणि
मिळालेली सत्ता टिकवणे ह्यात लोकशाही राजकारणाचा विचार केल्यास काही गैर नाही. सत्ताप्राप्ती
हा प्रधान हेतू आहे. तो असलाही पाहिजे. फक्त सत्ता हे 'सबका
साथ सबका विकास' हे ध्येय साध्य करून दाखवण्याचे साधन म्हणून
वापरायची की दीनदलितांच्या कल्याणासाठी वापरायची हा आगामी लोकसभा निवडणुकीचा मुख्य
मुद्दा राहणार आहे. आता ह्या महाभारतात मध्यमवर्ग आणि गरीबवर्ग ह्या युध्दात कोणती
भूमिका पार पाडतील ह्यावरच हे युध्द निर्णायक ठरणार हे उघड आहे. गेल्या खेपेला सोशल
मिडिया मॅनेजमेंटचे तंत्र मोदींनी वापरले होते. ( खरे तर, अण्णा हजारेंच्या दिल्लीतल्या
उपोषणापासूनच काही कारण नसताना लाईव्ह क्वहरेज देऊन मेन स्ट्रीम मिडिया भाजपाला
अनुकूल झाला होता. ) ह्या खेपेस काँग्रेसनेही सद्यकालीन मिडियाचे स्वरूप जाणून घेण्याचा
जोरकस प्रयत्न केला. कुमार केतकरांना राज्यसभेवर निवडून आणून काँग्रेसनेही मिडियातले
वास्तव जाणून घेण्यासाठी चर्चा आयोजित केली. चर्चेतून तथ्य जाणऊन घेऊन त्याचा
यथायोग्च उपयोग काँग्रेसने करून घेतला तर लोकसभेचे महाभारत युध्द जिंकण्यास
काँग्रेसला मदत होणार हे निश्चित!
रमेश झवर
www.rameshzawar.com
No comments:
Post a Comment