Thursday, March 15, 2018

स्टिफन हॉकिंग


विश्वतत्त्वाच्या निर्मितीची 'बिग बँग' थिअरी  कृष्णविवराची कल्पना, कृष्णविवरातून सुरू झालेली उर्जा आणि एकूणच 'थिअरी ऑफ एव्हरीथिंग' हा स्टिफन हॉकिंगच्या जीवनभर चाललेल्या संशोधनाचे सारांश सांगता येईल. स्टिफन हॉकिन्सच्या विश्वनिर्मितीविषयक संशोधनातली कामगिरी जगन्मान्य नसेल, परंतु विश्वनिर्मितीचे संशोधकांना पडणा-या प्रश्नांचे उत्तर शोधणे म्हणजे देवाचा शोध घेण्यासारखेच आहे ह्या त्यांच्या मताशी जगातली सर्वसामान्य माणसे नक्कीच सहमत होतील!  त्यांना नोबेल पारितोषिक मिळू शकले नाही.  मिळू शकणारही नव्हते. कारण,  निरीक्षणान्ती सिध्द झालेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक दिले जाते. काळाचा वेध घेणा-या स्टिफन हॉकिन्स ह्यांचा संशोधनाचा विषय निरीक्षणाचा, प्रयोगाचा नव्हताच मुळी!  ब्रह्मांड जन्माला घालणा-या तत्त्वाचे संशोधन हा त्यांचा विषय  असल्यामुळे त्यांना नोबेल पुरस्कार मिळण्याचा प्रश्नच येत नाही!
आमच्या ऋषीमुनींना हे पाच हजार वर्षांपूर्वी माहित होते अशा बढाया मारण्याचा सध्याचा काळ आहे. ऋषींना सत्य स्फुरलेले असेलही. परंतु त्यांना स्फुरलेले सत्य प्रयोगान्ती तपासून पाहावेसे तुम्हाला वाटले नाही!  स्टिफन्स हॉकिन्सला वयाच्या एकविसाव्या वर्षी 'मोटर न्यूरॉन' रोगाने पछाडले होते. तरीही कॉम्प्युटरच्या मदतीने त्यांनी शारीरिक व्याधीवर मात केली. आणि सुरू केलेल्या संशोधनात खंड पडू दिला नाही. संशोधन करत असताना कृत्रिम बुध्दिमत्तेच्या मर्यादा त्यांना सतत जाणवल्या असाव्यात. म्हणूनच त्यांनी कृत्रिम बुध्दिमत्तेपासून मानवजातीला धोका होऊ शकतो असा इशारा दिला.  त्याचबरोबर जीवन कितीही वाईट दिसत असले तरी तुम्ही निश्चितपणे काही करू शकता, ह्या त्यांच्या उद्गारात आसक्ती आणि अनासक्ती ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी अधोरेखित होतात. वादात हार झाली तरी त्यांना त्याचे काही विशेष वाटले नाही. हेही नकळतपणे काळाची श्रेष्ठता मान्यता करण्यासारखे आहे.
काळाची कल्पना अनादि काळापासून मानवजातील सदैव आव्हान ठरत आलेली आहे. 'कालोहम् असे उद्गार श्रीकृष्णाचे गीतेत काढले आहेत तर काळ नावाचा भौतिक पदार्थ मुळात नाहीच असे वर्धमान महावीराला वाटते. Change denotes time! असा महावीराचे काळासंबंधीचे निरीक्षण आहे. 1988 साली प्रसिद्ध झालेल्या 'अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम'  ह्या पुस्तकात स्टिफन हॉकिंगने काळाचा धांडोळा घेतला. विशेष म्हणजे ह्या पुस्तकाच्या चाळीस भाषात मिळून 1 कोटी प्रती संपल्या. मात्र, त्यांनी घेतलेला काळाचा धांडोळा लाखो लोकांच्या डोक्यावरून गेला.
 स्टिफन हॉकिन्सच्या संशोधनाचा विषयच असा आहे की त्याच्या संशोधनाची भारतीय तत्त्वज्ञानाशी तुलना करण्याचा मोह अनेकांना व्हावा. परंतु पाश्चात्य संशोधक आणि ऋषीमुनींच्या शास्त्रार्थात एक महत्त्वाचा फरक आहे. तो म्हणजे पाश्चात्य संशोधन प्रणालीत प्रयोग आणि निरीक्षणास जसे महत्त्व दिले जाते तशा प्रकारचे महत्त्व भारतीय शास्त्रार्थात दिले जात नाही. पाश्चात्य संशोधन प्रणाली 'डिडक्टिव्ह लॉजिक'वर उभी आहे तर भारतीय शास्त्रांची उभारणी पूर्णतः 'इंडक्टिव्ह लॉजिक'वर उभी आहे हा मूलभूत फरक ध्यानात घेतल्यास अवघी तुलना अप्रस्तुत ठरते. पाच हजार वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी विश्वनिर्मितीचा शोध घेतला नाही असे नाही. परंतु त्यांच्या शोधाचे परिमाण भिन्न आहे. देहान्तर्गत वा आध्यात्मिक जगाबाबतचा प्रश्न आणि सभोवताली दिसणा-या जगाचा प्रश्न हे दोन परिमाण उपनिषदात स्पष्ट आहेत. समोर भासणारे वा सभोवतालच्या जगाचे भासणारे हे 'भातिसिध्द' जग! ( हेच आधिदैविक जग. दिव् म्हणजे प्रकाशित होणारे ) ह्याउलट देहान्तर्गत वा आध्यात्मिक जग हे प्रकाशित होत नसले तरी ते पूर्णतः 'स्वसंवेद्य' असलेले जग. स्वसंवेद्य जग 'स्वप्रकाशित'ही आहे. म्हणजेच हे जग 'सत्तासिध्द' असा फरक उपनिषदात करण्यात आला आहे. विश्वनिर्मितीचे कर्तृत्त्व ईश्वराशी जुळवून विश्वनिर्मितीचा विषय संपवून टाकत ऋषीमुनींनी 'भातिसिध्द' जगाचा आणि 'सत्तासिध्द' जगाचा अतूट संबंधावर लक्ष केंद्रित केले. तो संबंध ऋषीमुनींनी प्रश्नोपनिषदाच्या  माध्यमातून तपासून पाहिला तर तो पाश्चात्य जगाने प्रयोग, निरीक्षणाच्या माध्यमातून तपासायला सुरूवात केली. न्यूटन, आईनस्टाईननंतर स्टिफन हॉकिंगनी आणि अन्य अनेक संशोधकांनी मात्र विश्विनर्मितीचे कोडे सोडवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. स्टिफनची उर्जास्रोताची कल्पना आपल्याकडील अध्यात्मातील बहुमान्य चैतन्यशक्तीची जुळणारी आहे असे म्हणता येईल.
सध्या 'बिग बँग थिअरी'बरोबर 'डीएनए'चेही जगभर संशोधन सुरू आहे. विशेष म्हणजे ह्या दोन्ही प्रकारच्या संशोधनात भारतातल्या संशोधकांचाही सहभाग आहे. म्हणूनच भारत भेटीचे निमंत्रण स्टिफन हॉकिन्सने स्वीकारले असावे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये झालेल्या त्यांच्या भाषणाच्या आठवणी त्यांच्या निधनानंतर जाग्या झाल्या! इंग्रजी साहित्यात 'नॉलेज' ह्या शब्दाआधी 'दि' हे पद लागले की त्याचा अर्थ ईश्वर असा होतो हे अभिजात इंग्रजी साहित्याच्या वाचकांना माहित आहे. सामान्य लोक मात्र जास्तीत जास्त माहितीलाच 'नॉलेज' समजतात!  दि नॉलेज शब्दाच्या ख-या अर्थाने स्टिफन हॉकिन्सची ज्ञानजीज्ञासा ज्ञानमय ब्रह्माशी जुळणारी ठरते!  मृत्यूची भीती नाही, मरण्याची घाई नाही ह्या त्यांच्या वाक्यातून आसक्ती आणि अनासक्तीच दिसून येते. त्यांच्या निधनाने एका ज्ञानसाधनेचा अंत झाला!
रमेश झवर
www.rameshzawar.com

No comments: