Sunday, April 29, 2018
भगवान बुध्द
भगवान बुद्धाच्या इतिहासातील महत्त्वाच्या गोष्टींचा कालनिर्णयासंबंधी संशोधकात खूप मतभेद होते. परंतु त्या शेवटी बहुमान्य संशोधनानुसार त्याचा जन्म शुक्रवार दि. 4 एप्रिल इसवीसन पूर्व 557 ह्या दिवशी झाला ह्याबद्दल एकवाक्यता झाली. इसवीसन पूर्व 529 मध्ये बुधवार दि. 22 जून रोजी त्याने घर सोडले. त्यानंतर इसवीसन पूर्व 522 मध्ये त्याला ज्ञानप्राप्ती झाली. त्याचे महापरिनिर्वाण मंगळवार इसवीसन पूर्व दि. 1 एप्रिल 478 रोजी झाले.
बौद्ध संप्रदायाचा प्रसार चांगल्या रीतीनें समजण्यासाठी त्याचे वास्तविक स्वरूप कळणे अवश्य आहे. आपले मत व्यक्त करून बुध्द थांबला नाही. त्याच्या मतांना झपाट्याने संप्रदायाचे स्वरूप प्राप्त झाले. बुद्धाचा संप्रदाय आणि परंपरागत वैचारिक इतिहास यांचा परस्परसंबंध हा विस्तृत चर्चेचा विषय आहे. ईश्वरस्वरूप किंवा वैदिक वाङ्मय यांविषयी बुध्दाने मुळीच विवेचन केले नाही. ईश्वरविषयक कल्पनांपेक्षा सद्गुणांच्या जोपासनेस त्याने महत्त्व दिले. इंद्रादि देवतांच्या अस्तित्वाविषयी त्याची अस्तिक्यबुद्धि असावी असे अनेक विद्वानांना वाटते. स्वर्ग, पाताळ, नरक इत्यादि बाबतींत त्याची मते वेगळी होती की नव्हती हे महत्त्वाचे नाही. मानवी जीवनात शाश्वत सुखासाठी त्याग, करूणा, आचरणशुध्दता मह्त्वाची आहे नव्हे. 'आत्मअनात्म'च्या काथ्याकुटापेक्षा गुणांना त्याने महत्त्व दिले. म्हणूनच वैष्णव संप्रदायाच्या अनुयायांतही तो प्रिय झाला.
बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर थोड्या दिवसांनी महाकाश्यप नांवाच्या त्याच्या एका शिष्याने राजगृह येथे भिक्षूंची एक सभा भरविली. बुद्धाच्या आज्ञा नीट समजावून देणे हा या सभेचा उद्देश होता. या पहिल्या धर्मसभेने संघासंबंधाच्या कडक नियमात व आचारात पुष्कळ सुधारणा केल्या. परंतु वेळोवेळी धर्मशास्त्रातल्या वचनांच्या स्पष्टीकरणासंबंधी कित्येक प्रश्न उपस्थित होत असत. म्हणून पहिल्या सभेनंतर १०० वर्षांनीं वैशाली येथे दुसरी धर्मसंगीति भरविण्यात आली. बौद्धांची तिसरी धर्मसभा प्रसिद्ध बौद्ध राजा अशोक याच्या कारकीर्दीत पाटलीपुत्र येथे भरली. सम्राट अशोकाच्या काळात केवळ भारतभरातच नव्हे तर आशिया खंडातील अनेक देशात बौध्दधर्माचा प्रसार झाला. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माचा स्वीकार केल्यानंतर स्वातंत्रोत्तर भारतात पुन्हा एकदा बौध्दधर्माचा बोलबोला सुरू झाला आहे.
रमेश झवर
www.rameshzawar.com
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment