Friday, June 8, 2018

रेशमबागेत प्रणववेद!


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतिय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ह्यांनी संघस्वयंसेवकांसमोर केलेले भाषण म्हणजे आधुनिक भारताचा प्रणववेदच ठरला! देशाच्या हरेक क्षेत्रात वावरणा-या श्रेष्ठ व्यक्तींचा परिचय करून द्यावा लागत नाही. त्यांचे विचार हाच त्यांचा परिचय!  ह्याउलट समाजकारण, अर्थकारण, राजकारण, धर्मकारण इत्यादि अनेकविध क्षेत्रात वाटचाल करणा-यांच्या बाबतीत मात्र असे म्हणता येणार नाही. केवळ खटपटीलटपटी करून किंवा योगायोगाने उच्च पदापर्यंत पोहचतात. ही माणसे कितीही हुषार असली तरी त्या सा-याच महाभागांना अक्कल असतेच असे नाही. त्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे सौहार्द, परमतसहिष्णुता, धर्मविचार आणि प्रयत्नपूर्वक रूजवलेली लोकशाहीमूल्ये निकालात निघतात की काय अशी स्थिती गेल्या काही वर्षांत निर्माण झाली हे नाकारता येणार नाही. प्रचलित राजकारणातले हे नेमके वास्तव हेरून भूतपूर्व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ह्यांनी संघाच्या व्यासपीठावर मतभिन्नता मान्य करून संवाद कायम ठेवण्याचे आवाहन केले.
हे आवाहन करताना प्रणवादांनी कुठेही अपशब्द, टिंगलटवाळी किंवा अकारण वावदूकपणा केला नाही. 137 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात 7 धर्म आहेत. ह्या धर्मांच्या अनेक वर्षांपासून एकजीव होत आलेल्या परंपरा आणि संस्कृतीतूनच भारत राष्ट्र साकार झाले आहे. भारतात सप्तसिंधूतील खो-यात आर्य आणि आर्येतरात संघर्ष जरूर झाले. त्यानंतर अनेक आक्रमकांशी येथल्या राजांनी लढाया केल्या. परंतु एकीकडे संघर्ष सुरू असताना दुसरीकडे संस्कृती-संगम होत गेल्याचे चित्र दृष्टीस पडले!  म्हणूनच केवळ हिंदूत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व असे मानता येणार नाही. वारंवार अनुभवायला येणा-या सत्यावर प्रणवदांनी आपल्या भाषणावर बोट ठेवले.
ब्रिटिश काळातच डाव्या चळवळीची बीजे रोवली गेली. ब्रिटिश शासन काळात कम्युनिस्टांवर  घालण्यात आलेली बंदी पं. जवाहरलाल नेहरूंनी उठवली आणि कम्युनिस्टांना मतपेटीचाय मार्गाने सत्तेवर येण्याचा मार्ग खुला झाला. बंगालमध्ये तर ज्योति बसूंच्या नेतृत्वाखाली डाव्यांनी सत्ताही हस्तगत केली. डाव्यांनी काँग्रेसला सत्तेवरून बाजूला सारले आणि सत्ता काबीज केली तरी काँग्रेसच्या राजकारणात प्रणवदांचे स्थान कायम राहिले.  ते तसे का राहिले हे राजकारणाचा वरवर अभ्यास करणा-यांच्या लक्षात येण्यासारखे नाही. त्याचे कारण अनेक बंगाली तरूणांप्रमाणे प्रणव मुखर्जींच्या विचारांची बैठक स्वामी रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंदांच्या विचारसरणीवर आधारलेली राहिली. अजूनही त्यांच्या विचारांची बैठक कायम आहे. स्वपक्षाची व्यक्ती राष्ट्रपती झाल्यावर पंतप्रधानांचे आणि राष्ट्र्पतींचे मतभेद झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती असतानाच्या काळात सत्तांतर होऊऩ नरेंद्र मोदी सत्तेवर आले;  मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी भिन्न विचारधारेचे असूनही त्यांच्यात आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ह्यांच्यात कधीच मतभेदाची ठिणगी उडाली नाही. ह्याचे कारण प्रणव मुखर्जी धार्मिक मनोवृत्तीचे असूनही धर्मनिरपेक्ष आहेत. दिल्लीचे राजकारण बाजूला सारून ते कुटुंबातल्या दूर्गापूजेच्या उत्सवाला ते हजेरी लावत आले आहेत. राजकीय आयुष्यात पडता काळ आला तेव्हा विवेकानंदांच्या जीवनावरील नाटकात प्रणवदांनी रामकृष्ण परमहंसांची भूमिका केली!  जातीपातीच्या राजकारणाला आणि फाल्तू धार्मिक विचारांना थारा न देण्याचे त्यांचे संस्कार होते. आजही आहेत. डाव्यांचे आक्रमक राजकारण झेलत, अवतीभवतीच्या क्षुद्र राजकारण्यांचा उपद्रव सहन करत शेवटपर्यंत काँग्रेसच्या राजकारणात त्यांची संयमी आणि सहिष्णू वाटचाल सुरू राहिली. त्यांचे हे समग्र व्यक्तिमत्त्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भाषणात प्रतिबिंबित झाले.
त्यांच्या भाषणाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बुरसटलेली मनोवृत्ती, विशेषतः प्रतिपक्षांच्या मतांची खिल्ली उडवत विरोधकांचे ट्रोलिंग करण्यातच धन्यता मानणा-या असहिष्णू मनोवृत्ती बदलण्यास कितपत उपयोग होईल हा भाग अलाहिदा!  संघाचे अपत्य असलेले नरेंद्र मोदी आणि अमित शहा ह्यांच्यासह भाजपाचे अनेक नेते सत्तेवर आल्यापासून गांधीनामाचा जप करताना दिसतात तर त्यांचे चेलेचपाटे नाधूराम गोडसेंचा उदोउदो करताना दिसतात. पण ही सगळी ह्या मंडळींची निव्वळ स्ट्रॅटेजी आहे. शहाणपण नाही. गांधींजींनी आयुष्यभर पुरस्कार केलेल्या जीवनमूल्यांचाही भाजपा नेत्यांचा काहीएक संबंध नाही. सत्य आणि अहिंसा ह्यावर प्रगाढ विश्वास हाच ख-या हिंदूत्वाचा पाया आहे हे महात्मा गांधींनी ओळखले होते. किंबहुना हिंदूत्ववादाची ध्वजा फडकावणा-यांच्या हिंदूंपेक्षा महात्मा गांधी जास्त हिंदूत्ववादी होते. 'वैष्णव जन ते तेणे कहिये पीर परायी जाणे रे'  ह्या भजनाचा गांधींवर अधिक संस्कार झाला आणि ते खरेखुरे वैष्णववीर ठरले! म्हणून मागासलेल्या वर्गाबद्दलची आणि गरीबांबद्दलची गांधीजींची करूणा भगवान बुध्दांच्या स्पर्धा करताना दिसली. गांधींचा हाच वारसा काँग्रेसकडे आला. तोच वारसा आधुनिक भारताच्या राज्यघटनेतही प्रतिबिंबित झाला. फरक एकच करण्यात आला. वेदोपनिषदांचा उल्लेख न करताही 'सर्वे सुखिन: संतु सर्वे संतु निरामय:' ह्या ध्येयाला  लोकशाही मूल्यांची जोड देण्यात आली. भारतवर्षांत नांदत असलेले औदार्य कायम टिकवण्याचे ध्येय भारतीय राज्यघटनेनेही बाळगले. काँग्रेस नेत्यांनी धर्मनिरपेक्षतेची बडबड केली असेल, पण प्रत्यक्षात बहुतेक नेते व्यक्तिशः मनोवृत्तीने धार्मिक होते. मुस्लीमधार्जिणे धोरण आणि मुस्लिमांचा अनुयय हा आरोप वेळोवेळी सहन करत त्यांनी देशाचा कारभार चालवला. कारभार चालवताना शक्यतो धर्म आड येणार नाही ह्याची काळजी त्यांनी घेतलीच. प्रणव मुखर्जींच्या भाषणाला ही काँग्रेसच्या व्यापक राजकारणाची अर्थगर्भ पार्श्वभूमी आहे.
'सत्यं ब्रूयात मा ब्रूयात सत्यमप्रियम्' असे ह्या भाषाणाचे स्वरूप आहे. त्यांनी 'वंदे मातरम्' का म्हटले? किंवा संघ संस्थापक हेडगेवार ह्यांच्या समाधीच्या दर्शनाला जाण्याची त्यांना काय गरज होती?  बरे गेले तर गेले हेडगेवारांना त्यांनी 'महान् सुपूत्र' का म्हणावे ह्यासारखे प्रश्न उपस्थित करणे हे क्षुद्र मनोवृत्तीचे द्योतक आहे. काँग्रेसजन आणि संघ स्वयंसेवक हे बौध्दिकदृष्ट्या तळागाळातच आहेत असा त्याचा अर्थ होतो. अशा अर्धवट काँग्रेसजनांना किंवा मठ्ठ संघस्वयंसेवकांना प्रणवदांच्या भाषणाचे मर्म उलगडणार नाही. कडीकुलूपात बंद असलेले वेद आणि उपनिषदांचे जे रहस्य घनपाठी वैदिक विद्वानांनाही उघडता आले नाही ते  ज्ञाननोबातुकोबा,  तुलसीदास-रईदास कबीर, विवेकानंद ह्यांच्यासारख्यंनी सहज उघडून दाखवले. देशी भाषेच्या माध्यमातून केवळ रामायण आणि गीताभागवताच्या जोरावर सामान्य माणसास सुखी करण्याचा मार्ग ह्या सगळ्यांनी शोधून काढला. संतांच्या प्रेरणेनेच स्वातंत्र्य लढा सुरू झाला. तो यशस्वीदेखील झाला! स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसच्या रूपाने धार्मिक उदारमतवादास लोकांनी साहजिकच औदार्यपूर्वक सत्ता दिली.
ज्यांनी ज्यांनी सत्तेचा दुरूपयोग केला त्या सर्वांना भारतीय जनमानसाने सत्तेवरून खाली खेचले आहे. मोदींचे सरकार खाली खेचले जाण्याचा धोका दिसू लागला. कारण, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्यासह सरकारमधील अनेक मंत्र्यांनी परमतसहिष्णुतेच्या शाश्वत तत्त्वाची बूज राखली नाही. व्देष आणि मत्सर ह्या विचारांना राजकारणातही थारा मिळत नाही ह्याचे त्यांना भार राहिले नाही. परमतसहिष्णुताच शेवटी विजयी ठरते हा इतिहास आहे!  सुदैवाने संघचालक मोहन भागवतांना ह्या वस्तुस्थितीची सूक्ष्म जाणीव झाली असावी. म्हणून तिस-या शिक्षा समारंभात प्रणवदांना बोलावण्याचा घाट भागवतांनी घातला. काँग्रेसवाल्यांच्या टिकेला न जुमानता प्रणवादांनीही संघाला होकार दिला. सकृतदर्शनी का होईना प्रणवदांचा कार्यक्रम यशस्वी झाला असे म्हटले पाहिजे.

रमेश झवर
www.rameshzawar.com

No comments: