Friday, May 31, 2019

मोदींची नवी कारकीर्द

गेल्या निवडणुकीपेक्षाही ह्या निवडणुकीत विरोधकांशी तुफानी संघर्ष करत सत्ता काबीज करण्यात यशस्वी झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांची दुसरी कारकीर्द काहीशा भारावलेल्या वातावरणात सुरू झाली. गेल्या खेपेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या पायरीवर मत्था टेकला होता. ह्या खेपेला शपथविधीनंतर नरेंद्र मोदी जनतेपुढे नतमस्तक झाले. त्यांच्या ह्या अभिवादनाने देशभरातील जनता कितपत भारावली गेली असेल का, हे कळू शकत नाही; परंतु शपथविधीला उपस्थित असलेला निमंत्रितांचा मात्र समूह नक्कीच भारावून गेलेला दिसला.
प्राप्त परिस्थितीत अर्थ, परराष्ट्र, संरक्षण आणि गृह ही 4 महत्त्वाची  खाती योग्य व्यक्तींकडे सोपवण्याच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवलेले राजकीय चातुर्य  दाखवले आहे ह्यात शंका नाही. दुसरे म्हत्त्वाचे म्हणजे काँग्रेस काळात पक्षातल्या वेगवेगळ्या दबाव गटांच्यापुढे पंतप्रधानांना मान तुकवावी लागत असे. भाजपात मोदींच्या बाबतीत त्याप्रकाचा कुठलाही दबाव गट नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाची रचना हा मोदींच्या दृष्टीने यक्षप्रश्न नव्हताच. गेल्या खेपेस अरूण जेटली ह्यांना अर्थखाते आणि सुषमा स्वराज ह्यांना परराष्ट्र खाते मिळाले होते. दोघांनाही प्रकृती अस्वास्थ्याशी सामना करावा लागला. तो करत असताना मंत्रिपदाची कामगिरी बजावताना अडचणी आल्या ख-या; पण दोघांनीही आजारपणवर मात करून मंत्रिपदाची 'कामगिरी चांगल्या प्रकारे सांभाळली. सुषमा स्वराज ह्यांनी स्वतःहून घरी बसण्याचे पत्करल्यामुळे त्यांना तिकीट मिळाले नाही. अरूण जेटली हे राज्यसभेचे सभासद असल्याने त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची गरजही नव्हती. तरीही मंत्रीपद स्वीकारायला नकार दिल्यामुळे निर्मला सीतारामन् ह्यांना अर्थखाते देण्यात आले तर सुषमा स्वराज ह्यांच्याकडचे परराष्ट्र खाते परराष्ट्रखात्यात विविध पदावर काम केल्याचा अनुभव असलेल्या एस जयशंकर ह्यांना परराष्ट्रमंत्रीपद देण्यात आले. राफेल प्रकरणावरून मोदींविरूध्द उठलेले वादळ समर्थपणे परतून लावण्यासाठी निर्मला सीतारामन् ठामपणे मोदींच्या पाठीशी उभ्या राहिल्या होत्या. निर्मला सीतारामन् ह्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल अर्थमंत्रीपदाचे बक्षीस देणे क्रमप्राप्त होते. अर्थशास्त्राच्या पदवी आणि व्यापारमंत्रालयाचा अनुभव ह्यामुळे त्या आपोआप बक्षीसपात्र ठरतात हा भाग वेगळा!
असेच गृहमंत्रीपदाचे बक्षीस भाजपाध्यक्ष अमित शहांनाही मिळाले! भाजपाला अफाट यश मिळवून देण्यात मोदींइतकाच अमित शहांचाही मोठा वाटा आहे. तो ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना गृहमंत्रीपद दिले. अर्थात हे सगळे करताना मोदींना फार मोठी कसरत वगैरे करावी लागली नाही. निर्मला सीतारामन् ह्यांना अर्थमंत्रीपद दिल्यानंतर राजनाथसिंग ह्यांच्याकडे संरक्षण मंत्रीपद सोपवणे हा खातेवाटपाचा क्रम अत्यंत स्वाभाविक आहे.
अलीकडे महत्त्व प्राप्त झालेले 'भूपृष्ठ वाहतूक' हे खाते मोदींनी नितिन गडकरींकडे कायम ठेवले आहे. त्याखेरीज लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग हेही खाते त्यांच्याकडे सोपवण्यात आले. महामार्ग निर्मितीच्या बाबतीत नितिन गडकरींचनी दाखवलेली कर्तबगारी वादातीत आहे. त्याखेरीज 'रेशीम बागे'शी त्यांची जवळीक आहेच. न बोलता त्यांचे खाते त्यांच्याकडे सोपवण्यात आले ह्यात आश्चर्य नाही. राहूल गांधींना अमेथीतून पराभूत करणा-या स्मृती इराणींचे वस्त्रउद्योग खाते कायम करण्यात आले. काय बोलावे ह्याचे स्मृति इराणींना भान नाही. त्यामुळे त्यांचे खाते बदलण्यात अर्थ नाही असाही विचार मोदींनी केला असावा.
सुरेश प्रभूंना मात्र मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. खरे तर सुरेश प्रभू हे मोदींच्या विश्वासातले. तरीही त्यांना वगळण्यात आले ह्याचा अर्थ त्यांच्यासाठी योग्य ती कामगिरी मोदींनी हेरून ठेवली असावी. योग्य वेळी मोदींचा रोख दिसेलच. पियूष गोयल, अरविंद सावंत, प्रकाश जावडेकर, हंसराज अहिर, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, संजय धोत्रे, ह्या महाराष्ट्रातून निवडून आलेल्या खासदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. तसा बदल करायला मुळी फारसा वाव नव्हताच. प्रकाश जावडेकर ह्यांच्याकडे माहिती आणि प्रसारण तसेच पर्यावरण ही अत्यंत संवेदनक्षम खाती सोपवण्यात आली. ही त्यांना एक प्रकारे बढतीच देण्यात आली असे म्हणायला हरकत नाही. माहिती आणि प्रसारण खात्याची सूत्रे हाती घेताना 'वृत्तपत्र स्वातंत्र्याचा संकोच भाजपाला कदापि मान्य नाही' हे जावडेकरांचे उद्गार आश्वासक आहेत. अर्थात उक्ती आणि कृती ह्यात जावडेकर अंतर पडू देणार नाही अशी आशा बाळगायला हरकत नाही. हा मुद्दा केवळ जावडेकरांनाच लागू आहे असे नाही तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपूर्ण मंत्रिमंडळाला लागू आहे!
अरविंद सावंत ह्यांना मंत्रिपद मिळाले म्हणण्यापेक्षा ते त्यांनी आधीच्या संसदेत बजावलेल्या कामगिरीच्या जोरावर मिळवले असे म्हटले पाहिजे. लोकसभेत चर्चेत भाग घेताना त्यांनी अनेकदा मुद्देसूद भाषणे केली होती. अर्थात अनंत गिते ह्यांच्या पराभवामुळे शिवसेनेच्या कोट्यातले मंत्रीपद त्यांच्याकडे येणे हे क्रमप्रपाप्तच ठरले. बाकी मंत्रिमंडळातली बहुसंख्य खाती त्या त्या मंत्र्यांकडे सोपवण्यात आली. शक्य तेथे बदल करण्यात आला. काहींना त्यांनी मंत्रिमंडळातून वगळले तर काही नव्यांना संधी दिली. मंत्रिमंडळ रचनेचा पंतप्रधानांना असलेला अधिकार मोदींनी एकहाती वापरला असे दिसते. मिळालेल्या खात्यांवरून कुरबुर करण्याचे काँग्रेस काळातले दिवस मात्र संपुष्टात आले  हा स्वागतार्ह बदल! मोदींच्या स्वभावातला कणखरपणा हेच त्यामागचे कारण आहे. हाच कणखऱपणा मोदी राजवटीत वेळोवेळी दिसावा अशी अपेक्षा आहे. मोदी सरकरकडे अफाट बहुमत आहे. तुलनेने विरोधी पक्ष दुर्बळ आहे. ह्या पार्श्वभूमीवर चुकणा-या मंत्र्यावर आणि वेडेवाकडे बोलणा-या खासदारांवर हंटर उगारण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींना करावे लागेल अशी अपेक्षा व्यक्त करावीशी वाटते.
रमेश झवर

Saturday, May 25, 2019

जवाहर मुथांनी वर्तवले मोदींचे भविष्य


ज्योतिष शास्त्र भारतीय जनमानसात किती लोकप्रिय आहे ह्याची कल्पना आताच्या विज्ञाननिष्ठ पिढीला येणार नाही. आधीच्या पिढीत ज्योतिषाला विचारल्याखेरीज काही न करण्याचे धोरण अनेक कुटुंबात होते. ज्योतिषशास्त्र हे वेदांग असून त्याला जगभर मान्यता  आहे. गणित ज्योतिष आणि फलज्योतिष हे ज्योतिषशास्त्राचे ठळक भाग असले तरी दोन्ही भागात पारंगत असलेले ज्योतिषी फार कमी भेटतात. फलज्योतिष जितके लोकप्रिय आहे तितके गणित ज्योतिष लोकप्रिय नाही. इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात गणित ज्योतिषाने फार मोठी कामगिरी बजावली आहे. भगवान श्रीकृष्ण भागवत आणि महाभारत ह्या दोन ग्रंथातले व्यासांनी निर्मिलेले काल्पनिक पात्र ऩाही तर श्रीकृष्ण प्रत्यक्षातली व्यक्ती होती असे गणित ज्योतिष्याचे अभ्यासक म्हणतात. भारताचार्य चिंतामणराव वैद्यांनी तर गणित ज्योतिषाच्या आधारे श्रीकृष्णाची जन्मतिथी आणि मृत्यूतिथी शोधून काढली. श्रीकृष्णाच्या आयुष्यातील घटनांचा तारीखवार ताळा जळवून दाखवला आहे. महाभारतातील 'हा सूर्य हा जयद्रथ' ह्या कथेवरून. महाभारत युध्दाच्या नेमक्या तारखाही मराटी विद्वानांनी शोधून काढल्या आहेत.
बहुतेक मराठी लेखकांच्या चरित्रे-आत्मचरित्रात लेखकाच्या जन्मकुंडलीचा आवर्जून समावेश करण्याची पध्दत होती. ज्योतिषशास्त्राची मराठी लेखक-पत्रकारांनी कितीही टवाळी केली तरी ऑफिसमधील त्यांच्या टेबलाच्या खणात स्वतःची जनमपत्रिका हमखास सांभाळून ठेवलेली असते. एखादा ज्योतिषी भेटला तर त्याला भविष्य विचारण्यासाठी पत्रिका हाताशी असलेली बरी! अनेकांची तर जन्मपत्रिका तोंडपाठ असते. अलीकडे दोन मिनीटात जन्मपत्रिका तयार करणारी सॉफ्टवेअर बाजारात आल्याने पत्रिका बाळगण्याची गरज राहिली नाही. फक्त जन्मवेळ, जन्मवर्ष जन्मगाव माहित असले तरी पुरे. आज चंद्र कुठल्या राशीत आहे हे वर्तमानपत्रात पाहता येते. तसे ते कालनिर्णय वा महालक्ष्मी भिंतीवरील दिनदर्शिकेतही पाहता येते. मुंबई, पुणे, ठाणे डोंबिवली इत्यादि अनेक शहरात ज्योतिषशास्त्राचे क्लासेस धूमधडाक्यने चालतात. पत्रिका पाहून निर्णय घेणा-यांची कितीही टवाळी केली तरी मुलीचे लग्न जमवताना समोरच्या व्यक्तीने पत्रिका जुळवून पाहून मगच पुढची बोलणी असा आग्रह धरणारे भेटले की त्यांचा आग्रह मोडून काढण्यापेक्षा चांगले स्थळ जाऊ हातचे जाऊ द्यायला अनेक जण तयार नसतात. निवडणुकीला यश मिळेल का, उभा राहू का,  लांबच्या प्रवासाला निघायला कुठला काळ चांगला राहील, परदेश प्रवासाचा योग आहे का, तब्येतीला केव्हा आराम पडेल ह्यासारखे प्रश्न सुशिक्षित बुध्दिजीवींच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा उपस्थित होतातच. तत्वनिष्ठ भूमिका घेणारे फार थोडे. पत्रिका पाहण्याच्या 'प्रॅक्टिकल' मार्ग स्वीकारणारे बहुसंख्य असतात.
भविष्य जाणून घेणारे अनेक प्रकारचे लोक आहेत. काही जणांना काम केव्हा होईल हे जाणून घ्यायचे असते तर काहींना एकूण आयुष्याचा काळ कसा जाणार हे माहित करून घ्यायची उत्सुकता असते. क्लाएंटच्या गरजेनुसार प्रश्नकुंडली मांडणारे, कृष्णमूर्ती प्रणालीत अतिशय सूक्ष्तात जाऊन पत्रिकेचे तपशीलवार विश्लेषण करणारे, दशा वगैरे पाहणारे आहेत. भविष्य अनेक प्रकारे पाहिले जाते. अन्य शास्त्रातल्याप्रमाणे ज्योतिषातही मतभेद आहेत. मेदिनीय ज्योतिष वेगळे. पाऊसपाण्याचे भविष्य वेगळे. एखाद्या भूभागाचे भविष्य वेगळे! काही ज्योतिषी फक्त शुभ मुहूर्त काढून देतात. तेवठेच काम हे ज्योतिषी करतात. फलज्योतिषाखेरीज हस्तसामुद्रिक, रमल, टारो, पोपटाकडून कार्ड उचलायला लावून ते वाचून दाखवणारेही ज्योतिषीच. ग्रामीण भागात पंचर्षी, वायुदेव गावात फिरतात. अतिशय गरिब असलेल्या लोकांची ते सेवा करत आले आहे. थोडक्यात, भविष्यकथनाच्या नाना प्रकारच्या पध्दती अस्तित्वात आहेत. कोणते रत्न लाभदायक ठरेल हेही सांगितले जाते. पत्रिका बघून उपाय सुचवणारेही अनेक ज्योतिषी आहेत. ते आंगठ्या खरेदी करतात. खडे खरेदी करतात. काही जणआंना बुवामहाराजांच्या दर्शनाला जाण्याचा सल्लाही दिला जातो. बुवामहाराजांचे आशिर्वाद घेणा-या राजकारण्यांची संख्या खूप मोठी आहे!
ह्या विषयावर मुद्दाम लिहण्याचे कारण असे की लोकसभा निवडणुका जाहीर होताच कोणत्या पक्षाला बहुमत मिळेल, कोणाचे सरकार येईल वगैरे भाकित देशभरात सुरू झाले. पंतप्रधान मोदी ह्यांना दणदणीत यश मिळेल असे भविष्य ख्यातनाम पत्रकार प्रा. जवाहर मुथा ह्यांनी वर्तवल्याची मला आठवण झाली. विशेष म्हणजे त्यांचे भविष्य तंतोतंत खरे ठरले. भविष्यकथन करताना त्यंनी वर्तमानपत्रांच्या माहितीचा उपयोग करण्यऐवजी फक्त पत्रिकेतल्या ग्रह     ता-यांचाच विचार केला. ते पत्रकार आहेत. ज्योतिषाचा अभ्यास हा त्यांचा छंद आहे. भविष्यकथनाची त्यांना आवड आहे. प्रा. मुथा हे किर्लोस्कर मासिकात साह्ययक संपादक होते. किरलोस्करची नोकरी सोडल्यावर नामवंत शिक्षण संस्थात त्यांनी प्राध्यापकाचे काम केले. साहित्य, शिक्षण, राजकारण, पत्रकारिता इत्यादि अनेक क्षेत्रात त्यांनी कार्य केले. नेहरूंच्या दिमतीला काँग्रेसतर्फे जे स्वयंसेवक देण्यात आले होते त्यात एक स्वयंसेवक ह्या नात्याने त्यांनी काम केले. त्य वेळी त्यांना नेहरूंशी बातचीत करण्याचीही संधी मिळाली होती. सामाजिक संस्थात काम करत असताना ओशो रजनीशना स्टेशनवरून मुक्कामाच्या ठिकाणी आणण्याचे काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती! महत्त्वाचा मुद्दा असा की ते चर्तुस्त्र आहेत. अनेक प्रकाची कामे करण्याचा उदंड अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. नगरमध्ये ते स्वतःचे साप्ताहिक चालवतात. महाराष्ट्र ज्योतिष संशोधन केंद्राचे ते अध्यक्षही आहेत.
निवडणूक जाहीर होताच त्यांनी मोदींच्या विजयाचे भाकित केले. मोदींच्या विजयाचे भाकित करताना त्यांनी म्हटले होते, 'लोकसभेच्या देशातील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा 'राहू काल 'होता. आणि 'राहू 'हा ग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रिकेत अतिशय चांगल्या प्रकारे असल्याने तेच भारतातील निवडणुका जिंकतील, याची ग्वाही मी देत आहे.'
हे भविष्य त्यांनी व्टीट केले होते. फेसबुकवरही पोस्ट केले. त्याची लिंक: ttps://m.facebook.com/story.php?story_fbid=2220843818035843&id=100003307382819
रमेश झवर

Thursday, May 23, 2019

भाजपाची विजय पताका


सतराव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणूक युध्दात जुन्यापुराण्या काँग्रेस पक्षाचा पराभव झाला! 135 कोटी भारतीय जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या झोळीत जनादेश का टाकला ह्याची चर्चा देशभर सुरू झाली आहे. ही चर्चा प्रदीर्घ काळ सुरू राहणार आहे. नजीकच्या भविष्काळात तरी ती संपेल असे वाटत  नाही. काँग्रेसविरोधी जनादेश देणा-या 137 कोटी लोकसंख्या असलेल्या देशाच्या मनात काय चालले आहे ह्याचा काँग्रेसलाच काय, देशभरातल्या राजकीय पंडितांनाही पत्ता लागला नाही! जनादेश अतिशय विनम्रपणे स्वीकारण्याखेरीज राहूल गांधी ह्यांना पर्याय उरला नाही.  तसा तो त्यांनी स्वीकारला नसता तर ती त्यांची लोकशाही मूत्यांशी प्रतारणा ठरली असती. 2014 साली  प्राप्त झालेल्या विजयापेक्षा भाजपाची आणि भाजपाप्रणित आघाडीची विजय पताका ह्यावेळी निश्चितच अधिक उंच फडकली आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने घडवून आणलेल्या चमत्कारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचे अंतःकरण सद्गतित झाले नसते तरच नवल होते. 'इस फकीर की झोली भर दी'  ह्या त्यांच्या एकाच वाक्याने त्यांच्या मनातल्या भावनेची जनतेला कल्पना आली असेल. 2014 च्या निवडणुकीतील विजयानंतर त्यांचे मन जेवढे उचंबळून आले त्यापेक्षा ह्यावेळी ते कितीतरी अधिक उचंबळून आलेले दिसले. 'माझ्या हातून चुका होऊ शकतात; परंतु बदइरादा आणि बदनियतचा लवलेश माझ्याकडे नाही' हे त्यांचे वाक्य खूपच बोलके आहे. अनेकांना त्यांचे हे वाक्य नाटकी लिहाजमध्ये उच्चारलेले वाटण्याचा संभव आहे. नाटकातल्या भूमिकेत समरस झालेल्या कसलेल्या नटांच्या भावनाही कधी कधी ख-या असतात. आयुष्याच्या रंगमंचावर  मोदींना मिळालेला विजय हा खराखुरा आहे. तेव्हा, त्यांच्या भावना ख-याखु-या मानल्या पाहिजे!
तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, संयुक्त जनता दलाचे नितिशकुमार आणि राजदाचे लालूप्रसाद यादव आणि त्यांचे कुटुंबीय आंध्रप्रदेशचे  चंद्राबाबू नायडू, बसपाच्या बहनजी, सपाच्या यादव पितापुत्र ह्या सगळ्यांचा अहंकाराचा फुगा मतदारांनी हलक्या हातांनी फोडून टाकला. ह्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या 7-8 जागा वाढल्या असल्या तरी अमेथी मतदारसंघात राहूल गांधींच्या पराभवामुळे काँग्रेसचा विजय डागळलाच. ह्यापूर्वी आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधींनाही पराभव पत्करावा लागला होता. इंदिराजींचा पराभव ही मतदारांनी त्यांना फर्मावलेली शिक्षा होती. राहूल गांधींच्या पराभावामागे  मात्र स्मृती इराणींची 'किलिंग इंस्टिंक्ट' हेच कारण आहे. केरळमधल्या काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघात राहूल गांधी निवडून आल्याने लोकसभा राजकारणात त्यांच्या स्थानाला धक्का लागणार नाही.
प्रदीर्घ काळ विरोधी बाकावर बसलेल्या भाजपाला सत्ता प्राप्त करून देणारा अभूतपूर्व विजय आणि सुमारे 135 वर्षांचे अस्तित्वच संपुष्टात आणणा-या काँग्रेसच्या पराभवाचे विश्लेषण राजकीय पंडित करतीलच. माझ्या मते हा सत्तापालट घडवून आणण्याचे श्रेय काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या भारतीय जनतेला द्यावे लागेल. निवडणूक प्रचारात कोण किती खरे बोलतो, कोण किती खोटे बोलतो हे जनतेला कळत नाही असे नाही. भाजपा आणि काँग्रस ह्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा प्रचार किती खरा किती खोटा हे लोकांच्यालक्षात आले नसेल असे म्हणता येत नाही. सुशिक्षित माणसांशी शक्यतो युक्तिवाद न करण्याचे शहाणपण भारतीय जनतेकडे पुरेपूर आहे. त्या शहाणपणाची प्रचिती अटलबिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी ह्यासारख्या अनेक नेत्यांना आली होती. भारतात 48 राजकीय पक्ष आहेत. त्यापैकी अनेक राजकीय पक्षांचा जन्म केवळ वैयक्तिक महत्त्वाकांक्षेतून झालेला आहे. त्यांचे अस्तित्व जनतेने वेळोवेळी संपवले आहे. ह्याही निवडणुकीत अनेक 'स्वाभिमानी' पक्षांच्या उमेदवारांना मतदारांनी धूळ चारली. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, केंद्रीय मंत्री म्हणून प्रदीर्घ काळ वावरलेले सुशिलकुमार शिंदे आणि मुरली देवरा ह्यांचे चिरंजीव मिलिंद देवरा इत्यादी अनेकांना घरी बसले. अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार ह्यांना तर लोकसभेत जाण्यापासून मतदारांनीच रोखले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, दिवंगत केंद्रीय मंत्री माधवराव सिंदिया ह्यांचे चिरंजीव ह्यांनाही मोदी लाटेने किना-यावर फेकून दिले. ह्या निवडणुकीत भारतीय जनतेने मूकनायकाची भूमिका बजावली असे म्हटले तरी चालेल.
देशाची चौफेर प्रगती घडवून आणण्यासाठी काँग्रेसने कष्ट उपसले हे जनतेला अमान्य नव्हतेच मुळी. मग काँग्रेसचा पराभव का झाला?  गेल्या काही वर्षांपासून 'सर्वधर्मसमभाव' ह्या राजकीय विशेषणावरचा जनतेचा विश्वास हळुहळू उडत चालला. किंबहुना तो उडाल्याखेरीज आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जोर दिल्याखेरीज भाजपाला सत्ता मिळणार नाही हे नव्वदीच्या दशकात भाजपा नेत्यांच्या लक्षात आले. राहूल गांधींच्याही ते लक्षात आले . म्हणून ते मानसरोवराच्या यात्रेला जाऊन आले. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांची सत्ता पंचवीस वर्षे का टिकली ह्याचा अभ्यास केल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय जनता पार्टीच्या मदतीला कुमक धाडायला सुरूवात केली. दरम्यानच्या काळात आयटीसेलने दमदार प्रचाराची आघाडी सांभाळली. मध्यमवर्गीयांची  काँग्रेस काळात झालेली उपेक्षा संघाने आणि आयटी सेलने भाजपा नेत्यांच्या ध्यानात आणून दिली. कनिष्ट मध्मवर्गीयला मतदान करण्यास प्रवृत्त केले तर भाजपाला यश मिळणे अवघड नाही हेही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षात आले. त्यानुसार प्रचारा मोहिमेत मोदींनी बदलही घडवून आणला.  
एकूणच कांग्रेस-विचार नेमका ह्याउलट होता हे अनेक वेळा दिसून आले. नेहरू-गांधींच्या पुण्याईवर पक्ष चालवण्याची सवय लागल्याने नव्या नव्या कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये वाव उरला नाही. निवडणुकीतसुध्दा काम करायला काँग्रेसकडे कार्यकर्ता नामक प्राणी उरला नाही. फक्त ठेकेदारांचे, मध्यस्थांना काँग्रेसमध्ये मान मिळू लागला. गरिबांच्या नावावर राजकारण करणा-या काँग्रेसला धडा शिकवण्याचा विचार जनतेच्या मनात आला नसेल असे म्हणता येत नाही. निवडणुकीच्या राजकारणात नरेंद्र मोदींचे आगमनामुळे काँग्रेसला धडा शिकवण्याची संधी जनतेला मिळाली असे म्हणणे भाग आहे.
वस्तुतः भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काळ हा बदलत असतो. नोटबंदी, बेकारी. आर्थिक दुःस्थिती ह्या मुद्द्यावरून जनतेने तूर्तास मोदींना माफ केले असले तरी येणा-या काळात जनता तसे करीलच ह्याची खात्रा देता येणार नाही. भारतापुढील समस्या सोडवण्याचा जोरकस प्रयत्न भाजपाला करावा लागेल. तसा तो भाजपाने केला नाही तर काँग्रेसच्या मार्गाने जाण्याचीपाळी भाजपावरही आल्याशिवाय राहणार नाही. दणदणीत विजयाचा आनंद होणे स्वाभाविक आहे. पण त्यातून  भाजपात उन्मत्तपणाचा शिरकाव झाला तर आगामी काळात भाजपाची अवस्था काँग्रेससारखीच झाल्याखेरीज राहणार नाही. कारण चुका करणा-या पक्षाला शिक्षा करण्याची प्रवृत्ती नव्याने जनतेत उत्पन्न झाली आहे. थोडक्यात, व्दिपक्षीय लोकशाहीच्या दिशेने देशाचा अपरिहार्य प्रवास सुरू झाला आहे.   
रमेश झवर  

Tuesday, May 14, 2019

कॅग तोफेचा गोळा


पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक्सवरून उडालेला धूरळा विरतो न विरतो तोच देशातील दारूगोळा कारखान्यांकडून लष्कराला पुरवण्यात आलेल्या खराब दारूगोळ्यामुळे लष्कराकडील तोफा खराब होण्याचा धोका उद्भवला आहे. ह्या धोक्याचा इशारा कुणी विरोधी राजकीय नेत्यांनी मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी दिला असता तर समजण्यासारखे होते. परंतु ही वस्तुस्थिती मात्र लष्करानेच संरक्षण मंत्र्यांच्या निदर्शनास आणली आहे. विशेष म्हणजे संसदेला सादर करण्यात आलेल्या कॅगच्या अहवालातही ह्या बाबीला दुजोरा दिला आहे. संरक्षण खात्यात निरनिराळ्या प्रकारच्या तोफा वापरल्या जातात. ह्य तोफांसाठी वेगवेगळ्या प्रकारचा दारूगोळा वापरला जातो. ह्या दारूगोऴ्याची तपासणी करण्यासाठी आर्डनन्स फॅक्टरींचे एक बोर्ड नेमण्यात आले असून देशातील 41 कारखान्यांत तयार होणा-या दारूगोळ्याची प्रत आर्डनन्स फॅक्टरी बोर्डाच्या अधिका-यांकडून तपासली जाते. त्यांच्या पाहणीत उत्कृष्ट ठरलेल्या कच्च्या पदार्थांचा वापर करून दारूगोळ्याचे उत्पादन केले जाते. मग दारूगोळ्यात गडबड कशी झाली? कुठे झाली? ह्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला असता असा तर्क करण्यात येत आहे की, एक तर दारूगोळ्याचे उत्पादन सदोष असू शकते किंवा तयार झालेला दारूगोळा लष्कराच्या वेगवेगळ्या आस्थापनात वाहून नेताना अथवा दारूगोळ्याचा साठा करताना गडबड झालेली असू शकते! ह्या बाबतीत खरेखोटेपणा तपासून पाहण्याची सोय नाही. ह्या बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत त्याला आधारही लषकराने संरक्षण मंत्रालयाला लिहलेल्या पत्राचा आहे.  सर्वात गंभीर बाब म्हणजे गेल्या फेब्रुवारी महिन्यात 40 एमएम तोफांचेच्या सराव करताना एक अधिकारी आणि 4 सैनिक गंभीर जखमी झाले. परिणमी एल 70 हवाई तोफांचा सरावही हवाई दलास थांबवावा लागला.
कॅगच्या अहवालातील तपशील तर ह्याहून अधिक धक्कादायक आहे. 2015 च्या अहवालात म्हटले आहे की, दारूगोळा फॅक्टरीकडून लष्कराला होणा-या खराब दारूगोळ्याच्या पुरवठ्यास आर्डनन्स बोर्ड जबाबदार आहे. 20 दिवस चालणा-या युध्दाला पुरेल इतकताच दारूगोळा लष्कराकडे आहे. चीन आणि पाकिस्तान सीमेवर केव्हाही चकमकी उद्भवतात हे लक्षात घेता 40 दिवसांचा साठा लष्कराकडे नेहमीच तयार ठेवावा लागतो. अलीकडे डोकलाम सीमेवर चीनबरोबर कटकटी उद्भवल्या तेव्हा लष्कराला दारूगोळा वापरावा लागला होता. मुळातच दारूगोळा ठेवायचा कसा साठवून ठेवायचा ही समस्या लष्कराला भेडसावत असताना ह्या खराब दारूगोळ्याच्या त्या समस्येची भर पडावी ही चिंतेची बाबा आहे. खराब दारूगोळ्यांमुळे काही तोफाही खराब झाल्याचेही लष्कराचे म्हणणे आहे.
प्राप्त परिस्थितीत दारूगोळा आयात करण्याचे लष्कराचे 2009 पासून 2013 पर्यंतचे अनेक प्रस्ताव संरक्षण मंत्रालयातल्या लाल फितीत अडकले असून 2017 पर्यंत तरी त्यांना मंजुरी मिळाली नव्हती. 'मेक इन इंडिया' कार्यक्रमाखाली दारूगोळा तयार करून तो निर्यात करण्यची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी  2014 साली केली होती. त्यांची घोषणा योग्यच होती. परंतु त्यांची घोषणा नोकरशाहीच्या जंजाळात अडकली. त्यामुळे उत्पादन नाही आणि आयातही नाही अशी दुहेरी अडचण निर्माण झाली आहे. दारूगोळा आयात करून देशाकडे पुरेसा साठा ठेवण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केल्याशिवाय सध्या तरी अन्य उपाय तज्ज्ञांना सुचलेला नाही. 2019 पासून लष्कराला दारूगोळ्याची कमतरता जाणवू लागणार असे लष्करी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. संख्याबळाचा विचार करता जगात भारतीय लष्कराचा तिसरा क्रमांक लागतो. भारतीय लष्करात 13 लाख सैनिक आहेत. जागतिक शस्त्रखरेदीत भारताचा वाटा 13 टक्के आहे. भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्राचे खासगीकरण करून संरक्षण उत्पादनासा चालना मिळाली तरच भारताला संरक्षण उत्पादन क्षेत्रातकडून निर्यात व्हावी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचे धोरण स्तुत्य आहे. परंतु नुसतेच धोरण ठरवून चालत नाही. ते कसोशीने अमलात आणावेही लागते. दुर्दैवाने मोदी सरकार ह्या बाबतीत कमी पडले असे म्हणणे भाग आहे.  
देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. ह्या निवडणुकीत देशभक्ती, सर्जिकल स्ट्राईक, पाकधार्जिणी मनोवृत्ती इत्यादि विषयांवरून आरोपप्रत्यारोपांची राळ उडवण्यात सर्व पक्षांचे नेते निमग्न आहेत. दारूगोळ्यासारख्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यायला फुरसद कुणाला?  निवडणुकीचा अखेरचा टप्पा बाकी असून 23 मे रोजी जाहीर होणा-या निकालानंतरच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवे सरकार सत्तेवर आलेले असेल. हे नवे सरकार देशभक्तांचे असो की पुरोगाम्यांचे असो, नव्या पंतप्रधानांच्या आणि संरक्षण मंत्र्यांच्या अंगावर कॅग अहवालाचा तोफेचा गोळा पडणारच!
रमेश झवर
rameshzawar.com

Friday, May 10, 2019

युध्दनौकेची सहल

आयएनएस विराट ह्या युध्दनौकेचा दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी ह्यांनी टॅक्सीसारखा वापर केला हा पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी केलेला आरोप तद्दन खोटा असल्याचे भूतपूर्व व्हाईस अडमिरल रामदास ह्यांनी स्पष्टपणे सांगितले हे चांगले झाले. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींवर आरोप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ औचित्याचे भान राहिले नाही एवढेच नाही तर राज्य कसे चालते, कसे चालवायाचे असते हे तरी त्यंना माहित आहे की नाही ह्याबद्दल शंका वाटते. संरक्षण मंत्रालायाचे उच्च अधिकारी, संरक्षण मंत्री, पंतप्रधान संरक्षण उत्पादनमंत्री आणि ज्येष्ठ पत्रकार इत्यादींना संरक्षण दल प्रत्यक्ष कशा प्रकारे काम करते ह्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी मुद्दाम पाचारण केले जाते.
ही प्रथा केवळ भारतातच आहे असे नाही. देशाचे प्रमुखांना सपत्नीक निमंत्रण देण्याचा शिष्टाचार जगभरातल्या लष्करात आणि नौदलात पाळला जातो. अगदी पोपसुध्दा काही शिष्टाचार पाळतात. ते जेव्हा खास विमानाने जागतिक दौ-यावर निघतात तेव्हा विमानात त्यांच्यासमवेत व्हॅटिकनचे ( व्हॅटिकन हे रोमन कॅथालिकांच्या राष्ट्राची राजधानी आहेत. ) उच्च पदाधिकारी तर असतातच शिवाय पत्रकारही असतात. पोपना प्रतिप्रश्न विचारण्याचे धाडसही अनेक ह्या दौ-यात पत्रकार करतात. पोपही त्यांच्या प्रश्नांना सुचेल तशी उत्तरे देतात. ज्यावेळी देण्यासारखे उत्तर वनसते तेव्हा सूचक मौन पाळतात. अनेकांच्या माहितीसाठी सांगतो, ह्याही विमानात पत्रकारांसाठी मद्याची रेलचेल असते!  
लोकांना जास्तीत जास्त माहिती कशी देता येईल ह्यादृष्टीने नेत्यांकडून सातत्याने प्रयत्न केला जातो. 70 वर्षांपूर्वी नवभारतानेही असाच जोरकस प्रयत्न केला होता. सन्माननीय अपवाद वगळता भाजपासकट अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांना राज्य कसे चालवायचे ह्याचे खरोखरच ज्ञान नाही. भान तर मुळीच नाही. उच्चपदावर असलेल्या नेत्यांची ही स्थिती तर सामान्य कार्यकर्त्याची काय स्थिती असेल ह्याची कल्पना केलेली बरी. सामान्य कार्यकर्ते तर बोलूनचालून सामान्य! त्यांची बुध्दी किती बेतासबात असते ह्याचा अनुभव तर मी अनेकवेळा घेतला आहे. त्यातले दोन निवडक अनुभव देण्यासाठी ह्या लेखाचा प्रपंच.
पंतप्रधानांच्या दो-यात सामील होण्याची संधी मिळण्यापूर्वी नौदलाच्या असाईनमेंट करण्याची संधी मला अनेकदा मिळाली. ह्या असाईनमेंट करताना वायझॅग येथे मला 'आयएनएस शलभ'वर दोन रात्र मुक्काम करण्याची संधी मिळाली. शलब हे लॅडिंग टँक शिप वर्गातली युध्दनौका असून ते कुठल्याही किना-याला लावून त्या किना-यालगतच्या प्रदेशात सैन्याची आख्खी तुकडी घुसवता येते. पाहुण्यांसाठी असलेल्या अतिथीगृहांत जागा नसल्यामुळे शलभवरील एका लेफ्टनंच्या खोलीत माझी सोय करण्यात आली होती. वातानुकूलित केबिनमध्ये झोपण्याची सवय नसल्यामुळे मला रात्रभर झोप आली नाही. तरीही शिस्त म्हणून मी बेडवर पडून राहिलो. सकाळी सहा वाजता नौसैनिकांची कवायत होती. ती पाहावी म्हणून मी तयार झालो. लेफ्टनंटला विनंती करताचा त्याने त्याची स्वतःची हाफ पँट मला दिली. टीशर्ट माझ्याकडे होताच. परेडच्या डेकवर मी हजर झालो. माझ्या उपस्थितीमुळे आनंद झाल्याचे कॅप्टनच्या आणि नौसैनिकांच्या चेह-यावर दिसत होते.
ह्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचे दिवसभराच्या कार्यक्रमाच्या शेड्युलमध्ये नव्हते.  तरीही मी कवायतीला उपस्थित राहिलो ह्याचा कॅप्टनला खूप आनंत झाला. 'तुम्ही अडमिरलचे पाहुणे! माझ्यासारख्या कनिष्ट अधिका-याच्या वाट्याला तुम्ही कसे येणार?' ह्या वाक्याने त्याने माझे डेकवर स्वागत केले. संध्याकाळी तर ह्या अधिका-याने मला चक्क वायझॅग शहरात नेऊन व्यक्तिशः त्याच्यातर्फे पार्टीही दिली. दुस-या दिवशी कमांड मेसमध्ये अडमिरल परेरा ह्यांची भेट झाली तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला, How come your boys involved  in a riot with police?
माझ्या प्रश्नावर अडमिरल परेरा संतापले.
माझ्या प्रश्नाला काही दिसांपूर्वी वायझॅगमध्ये पोलिस आणि नौसैनिकांत झालेल्या दंगलीचा संदर्भ होता.
'You thief! You are burgling my house and calling me thief? '  परेरा
'No Sir! I simply want to know who was at fault. I just referred the allegations made in local  newspapers. मी
माझा मुद्दा त्यांच्या ध्यानात येताच दुस-या क्षणी ते शांत झाले. पहिल्यांदा कुणी कुरापत काढली ह्याची अधिकृत माहिती त्यंनी मला दिली. संभाषण चालू असताना हातात असलेला बीयरचा ग्लास तोंडालाही लावायला आम्हाला दोघांना अवसर मिळाला नाही. मुंबईला परत आल्यानंतर विमानतळावरूनटॅक्सी करून सरळ मी ऑफिसला गेलो. सविस्तर लेख लिहून दिला. आमच्या ऑफिसमध्ये काँग्रेस आणि भाजपाचे छुपे होते. 'मस्त दारूबिरू प्यायला मिळाली असेल नाही?' हा चौकस प्रश्न त्यांनी मला विचारला. ह्या प्रश्नाला काय उत्तर देणार!  त्यांना उत्तर न देण्याचे मी ठरवले.
दुसरा एक प्रसंग.
विद्याचरण शुक्ला संरक्षण उत्पादन मंत्री असताना 'आयएनएस व्हेल' ह्या पाणबुडीला भेट देण्याचा योग आला. तेथे व्हेलवर गेल्यानंतर पहिले काम काम होते आमचा पत्ता, टेलिफोन इत्यादि त्यांच्या वहीत नोंदवण्याचे! कशासाठी, असा प्रश्न विचारताच तो अधिकारी म्हणाला, In case if something goes wrong Navy should be able to inform your family members!
त्याचे उत्तर ऐकून माझ्या काळजाचा ठोका चुकलाच!
आयएनएल व्हेलवर पाणबुडी पाण्याखाली कशी जाते आणि ती वर कशी येते ह्याचे प्रायत्यक्षिक रत्नागिरीजवळच्या समुद्र किना-यावर अनुभवायला मिळाले. कॅप्टन आणंदच्या हातात सुकाणू होते. त्यांच्याशी बोलताच त्यांनी मोठ्या हौसेने मला बारीकसारिक माहिती दिली. सुकाणूच्या बाजूलाच सोनार इक्विपमेंट असते. सोनार म्हणजे साऊंड अँड नेव्हिगेशन राडार! राडारच्या स्क्रीनवर पाण्याखालच्या हालचाली टिपल्या जातात. त्यावरून कॅप्टनला शत्रूच्या हलचाली नुसत्या आवाजावरून कळतात. दुसरे म्हणजे पाणबुडी जेव्हा समुद्राच्या पृष्टभागावरून पाण्याखाली जाते  तेव्हा बॅटरीची उर्जा फक्त पाण्याखाली नेण्यासाठीच वापरली जाते. अन्य स्वीच बंद करून उर्जा थांबवली जाते. भयंकर उकाडा सुरू होतो. मासळी पाण्यात सूर मारते तशी पाणबुडी तळाकडे झेप घेते. वर येताना ह्या क्रियेच्या बरोबर उलट क्रिया होते. वेगवेगळे खटके दाबून ही काही मिनटांची प्रक्रिया पाणबुडीवरील निष्णात अधिकारी अतिशय सफाईने पार पाडतात. हे दृश्य बघण्यासारखे होते. आण्विक पाणबुडी आणि स्टोअर्ड बॅटरीवर चालणारी पाणबुडी ह्यात काय फरक असेल तर तो हाच की आण्विक पाणबुडीवरची उर्जा कधीच संपत नाही. पारंपरिक पाणबुडीवरील उर्जेकडे ती संपणार तर नाही ना इकडे लक्ष ठेवावे लागते. भारत-पाक युध्दात आपली पाणबुडी 21 दिवस पाण्याखाली राहिल्याचा रेकॉर्ड आहे! आणिवक पाणबुडी कितीही काळ पाण्याखाली राहिली तरी अमेरिकन नौसैनिकांच्या तुलनेने भारतीय नौसैनिकांची पाण्याखाली राहण्याची क्षमता कितीतरी अधिक आहे असे मला कॅप्टनने सांगितले. ह्या पाणबुडीची किंमत किती असा थेट प्रश्न विचारताच कॅप्टन आणंद हसून म्हणाले, 'पैसा दिया किसने और लिया किसने!'  आपल्याला रशियाकडून मिळालेल्या 8 पाणबुड्या बार्टर सिस्टीमने मिळाल्या होत्या हे त्यांनी मोठ्या खुबीने सूचित केले.
व्हेलला भेट दिल्यानंतर 'अजस्त्र जलचर' ह्या शीर्षकाचा लेख मी रविवार लोकसत्तेत लिहला. व्हाईस अडमिरल मनोहर आवटींनी मला फोन करून माझ्या लेखाचे कौतुक केले. हीच मी माझ्या लेखाची पावती समजतो. मघाशी उल्लेख केलेल्या माझ्या ऑफिसमधील दोन मोठ्या राष्ट्रीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अजस्त्र जलचर हा लेख वाचून पाहण्याचीही तसदी घेतली नाही हे मला खेदाने नमूद करावेसे वाटते. असो.


रमेश झवर
rameshzawar.com

Tuesday, May 7, 2019

भगवान परशुराम

अक्षतृतिया ही भगवान परशुरामाची जयंती! भृगू हे भगवान परशुरामावर आणि त्याच्या अवतारकार्यावर पुराणांतरी अनेक कथा आहेत. पण जगातल्या सा-याच कथावाङ्मयात जो दोष आढळतो त्यातून परशुरामाचे चरित्र आणि अवतारविषयक कार्य सुटले नाही. ज्याच्या अंगी विशेषत्वाने मानवी गुणसमुच्च्य दिसून येतात त्याचे दैवतीकरण करण्याची कथावाङ्मय प्रसवणा-या लेखकाची सर्रास आढळून येणारी प्रवृत्ती हे त्याचे कारण आहे. कथाकारांच्या ह्या प्रवृत्तीमुळे राम आणि कृष्ण ह्या दोघा अवतारी पुरूषांना देवत्तव बहाल केले तसेच ते भगवान परशुरामालही बहाल केले. आर्ष काळात होऊन गेलेल्या माणसांच्या जीवनात दिसून आलेल्या मानवत्वाच्या खुणांकडे वाचकांनी कधीच लक्ष दिले नाही. उलट, रामकृष्ण आणि परशुरामाच्या भजनपूजनात मात्र ते गुंग झाले. महापुरूषांच्या जीवनात घडलेल्या साध्यासुध्या घटनांकडेही केवळ चमत्कार म्हणूनच पाहिले गेले. काळाच्या ओघात तर त्यांचे आयुष्य तर चमत्काराने खच्चून भरून गेले. महापुरूषांच्या आयुष्यातल्या घटना उत्सव बनून गेल्या. हळुहळू ती त्या भूप्रदेशाची संस्कृती होऊन गेली. भगवान परशुरामाचे असेच काहीसे झाले आहे.
कन्हैयालाल मुन्शी आणि रंगराव दिवाकर ह्या दोघा लेखकांनी भगवान परशुरामावर 1951 साली कादंबरी लिहली. भारतीय विद्याभवनने ती 1959 साली दोन भागात प्रसिध्द केली. ह्या कादंबरीत दाशराज्ञ युध्दाची पार्श्वभूमी आली आहे. त्या अनुषंगाने मनुष्य ह्या नात्याने जीवन जगलेल्या परशुरामाच्या आयुष्यातील अनेक अद्भूत प्रसंग लेखकव्दयांनी चितारले आहेत. ही कादंबरी लिहताना दोघा लेखकांनी त्यावेळपर्यंत झालेले संशोधन आधारभूत मानले. कन्हैयालाल मुन्शी हे पुढे केंद्रात मंत्रीही झाले. भारतीय विद्याभवनाच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता. रंगराव दिवाकर तर संशोधक-लेखक म्हणून प्रसिध्द होते. सत्यापलाप होणार नाही ह्याची काळजी त्यांनी वेगवेगळे प्रसंग रंगवताना घेतली. ह्य कादंबरीचा दुसरी आवृत्ती 1965 प्रकाशित झाली. आज मात्र ती कादंबरी दुर्मिळ आहे.
जमदग्नीपुत्र परशुरामाचा काळात दाशराज्ञयुध्द झाले. परंतु सप्तसिंधूत झालेल्या दाशराज्ञयुध्दात दिवोदासपुत्र सुदासच्या सेनेचे नेतृत्व वसिष्ठाने केले तर सुदासविरोधी सेनेचे नेतृत्व विश्वामित्राने केले. ह्या युध्दात सामील झालेले अनेक आर्य आणि दस्यू राजे तसेच दोन्ही बाजूंचे ऋषी मारले गेले. विश्वामित्रही युध्दात मारला गेला. वसिष्ठाचा मुलगा शक्तीही त्यात मारला गेला. अनेक ऋषी मारले गेले. हे युध्द रामरावण युध्दानंतर 200 वर्षांनी आणि महाभारतयुध्दाच्या 600 वर्षांपूर्वीवर्षे आधी घडले. परशुरामाने त्या युध्दात भाग घेतला नव्हता. कारण युध्द झाले त्यावेळी तो नर्मदातीरावरील सहस्त्रार्जुनाच्या अनुपदेशात होता.
विशेष म्हणजे दाशराज्ञयुध्द राज्यसंपादन करण्यासाठी झाले नव्हते. दस्युंना आर्यत्व बहाल करण्यावरून वैदिक काळातल्या आर्य ऋषींच्या दोन गटात उसळलेल्या वैचारिक संघर्षाची परिणती दाशराज्ञयुध्दात झाली. कशावरून उसळला होता हा संघर्ष? ह्या संघर्षाचे मूळ होते दस्युकन्येबरोबर विश्वामित्राने केलेल्या विवाहाचे निमित्त. अर्थात ऋषी लोपामुद्राचा विश्वामित्राला पाठिंबा होता. लोपामुद्राच्या मते, आर्य आणि अनार्य ह्यांच्यात फरक करण्याचे मुळी काही  कारणच नाही. गायत्री मंत्रावर ज्याची असीम निष्ठा असेल तोच खरा आर्य, असे लोपामुद्राचे मत होते. आपल्या मताचा तिने सतत पुरस्कार केला होता. अगस्त्य आणि वसिष्ठ ह्या दोघा भावांचा मात्र लोपामुद्राला विरोध होता. घटनाक्रमाला मजेशीर वळण लागले. लोपामुद्राचे मनोमन अगस्त्य ऋषींवर प्रेम होते. लोपामुद्रा आणि अगस्त्य ह्या दोघांची जेव्हा आमनेसामने भेट झाली तेव्हा लोपामुद्राने अगस्त्यला आव्हान दिले!  त्याचीच परिणती पुढे दोघांच्या विवाहात झाली. लोपामुद्राला असलेला अगस्त्य ऋषींचा विरोध अर्थात गळून पडला. वरूण, सवितृ इत्यादि देवता मंत्रसामर्थ्याच्या जोरावर पृथ्वीतलावर अवतारतात. मानवी जीवन उजळून टाकण्याचे सामर्थ्य त्या उजळून टाकतात असा विश्वामित्राचा ठाम विश्वास होता. त्याची प्रचितीही त्याने घेतली होती. परशुरामालाही त्याची प्रचिती आली होती. किंबहुना प्रचितीविण ज्ञानाला काडीची किंमत नाही असा विश्वमित्राचा सिध्दान्त होता. आर्यत्व हे खरे प्रचितीतच असल्याचे त्यांचे स्पष्ट मत होते. वर्ण, रूप रंग, नाकडोळे वगैरे हे काही ख-या आर्यत्वाचे लक्षण नाही अशी त्यांची धारआण होत गेली. म्हणूनच गायत्रीवर ज्याची निष्ठा आहे त्याला आर्यत्व बहाल करण्यास काहीच प्रत्यवाय असू नये असे त्यांचे मत होते. त्यातूनच आर्य-अनार्यांचे ऐक्य प्रस्थापित होऊन वैमन्यस्याची भावना नष्ट होणार असे त्यांना वाटत होते. तसे पुढे घडलेही. आज दक्षिण भारतात ब्राह्मणवर्ग पसरलेला दिसतो त्याचे काऱणही विश्वामित्राची आणि परशुरामाची भूमिकाच कारणीभूत ठरली.
रेणुकाचा शिरच्छेद करण्याचा आदेश जमदग्नीने का दिला ह्याचा कथाभाग कादंबरीत अर्थातच आला आहे. परशुराम अनुपदेशात गेलोला असतानाच्या काळात माहेरी गेलेली रेणुका परत येताना गंधर्वाच्या राज्यात रममाण झाली हे जेव्हा जमदग्नीला कळले तेव्हा तो भयंकर संतापला. परशुराम जेव्हा परत आला तेव्हा त्याला आईचा शिरच्छेद करण्याचा जमदग्नीने आदेश दिला. पित्याची आज्ञा पाळलीच पाहिजे ह्या निर्धाराने परशुराम गंधर्व राज्यात गेला. तेथे त्याला वेगळेच चित्र दिसले. गंधर्वराजासह सगळी गंधर्वांची वसती कुष्ठरोगाने पीडित झालेली त्याने पाहिली. रेणुकेने त्याला स्पष्ट सांगतितले, मला तू खूशाल ठार मार. कारण तुझ्या पित्याचा आदेश न जुमानता मी गंधर्व राज्यात राहात आहे. परंतु मी गंधर्वांची सेवाशुश्रुषा करण्यासाठी इथे थांबले हो कोणालाच माहित नाही. मौजमजा करण्यासाठी मी ह्या सराज्यात रेंगाळले नाही. तिच्या उत्तराने परशुरामाच्या मनात अजिबात व्दंव्द उभे राहिले नाही. रात्र होताच त्याने गंधर्वनगरातल्या प्रत्येकाला ठार मारले. कुष्ठपीडितांच्या सेवेतून रेणुकामातेला मुक्त करण्याचा कर्तव्यकठोर अनोखा मार्ग त्याने पत्करला! दुस-या दिवशी आईला घोड्यावर बसवून तो तृत्सूग्रामला घेऊन आला. जमदग्नीच्या पुढ्यातच मातेचा शिरच्छेद करण्याचा निर्धार त्याने केलेला होता. त्यानुसार त्याने सगळी तयारी केली. पण ऐनवेळी सहस्रार्जुनाचे जमगद्नीच्या आश्रमावर आक्रमण झाले. त्यामुळे चिरच्छेदाचा प्रसंगच टळला. परशुरामाने जमदग्नीलाही दोन गोष्टी सुनवायला कमी केले नाही. 'तुम्ही अहंकाराच्या आहारी गेला आहात. आर्यावर्ताचा सर्ववनाश ओढवून घेणा-या दाशराज्ञ युध्दास तुमच्यासारख्या ऋषीमुनींचा अहंकारदेखील कारणीभूत आहे, असे त्याने जमदग्नीस सुनावले.
परशुरामावरील कादंबरीत असे अनेक प्रसंग मुन्शींनी चितारले आहेत की ज्यात परशुरामाच्या आयुष्यातील मानवत्वाच्या खुणा दिसतात! स्थालभावी मी इथे एकाच प्रसंगाचा उल्लेख केला आहे. पुढेमागे जमलं तर ह्या कादंबरीचे स्वैर मराठी रुपान्तर करण्याचा माझा विचार आहे.

रमेश झवर
rameshzawar.com