अक्षतृतिया ही भगवान परशुरामाची जयंती! भृगू हे भगवान परशुरामावर आणि त्याच्या अवतारकार्यावर
पुराणांतरी अनेक कथा आहेत. पण जगातल्या सा-याच कथावाङ्मयात जो दोष आढळतो त्यातून
परशुरामाचे चरित्र आणि अवतारविषयक कार्य सुटले नाही. ज्याच्या अंगी विशेषत्वाने
मानवी गुणसमुच्च्य दिसून येतात त्याचे दैवतीकरण करण्याची कथावाङ्मय प्रसवणा-या
लेखकाची सर्रास आढळून येणारी प्रवृत्ती हे त्याचे कारण आहे. कथाकारांच्या ह्या
प्रवृत्तीमुळे राम आणि कृष्ण ह्या दोघा अवतारी पुरूषांना देवत्तव बहाल केले तसेच
ते भगवान परशुरामालही बहाल केले. आर्ष काळात होऊन गेलेल्या माणसांच्या जीवनात
दिसून आलेल्या मानवत्वाच्या खुणांकडे वाचकांनी कधीच लक्ष दिले नाही. उलट, रामकृष्ण
आणि परशुरामाच्या भजनपूजनात मात्र ते गुंग झाले. महापुरूषांच्या जीवनात घडलेल्या
साध्यासुध्या घटनांकडेही केवळ चमत्कार म्हणूनच पाहिले गेले. काळाच्या ओघात तर
त्यांचे आयुष्य तर चमत्काराने खच्चून भरून गेले. महापुरूषांच्या आयुष्यातल्या घटना
उत्सव बनून गेल्या. हळुहळू ती त्या भूप्रदेशाची संस्कृती होऊन गेली. भगवान परशुरामाचे
असेच काहीसे झाले आहे.
कन्हैयालाल मुन्शी
आणि रंगराव दिवाकर ह्या दोघा लेखकांनी भगवान परशुरामावर 1951 साली कादंबरी लिहली. भारतीय
विद्याभवनने ती 1959 साली दोन भागात प्रसिध्द केली. ह्या कादंबरीत दाशराज्ञ युध्दाची
पार्श्वभूमी आली आहे. त्या अनुषंगाने मनुष्य ह्या नात्याने जीवन जगलेल्या परशुरामाच्या
आयुष्यातील अनेक अद्भूत प्रसंग लेखकव्दयांनी चितारले आहेत. ही कादंबरी लिहताना दोघा
लेखकांनी त्यावेळपर्यंत झालेले संशोधन आधारभूत मानले. कन्हैयालाल मुन्शी हे पुढे
केंद्रात मंत्रीही झाले. भारतीय विद्याभवनाच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता.
रंगराव दिवाकर तर संशोधक-लेखक म्हणून प्रसिध्द होते. सत्यापलाप होणार नाही ह्याची
काळजी त्यांनी वेगवेगळे प्रसंग रंगवताना घेतली. ह्य कादंबरीचा दुसरी आवृत्ती 1965 प्रकाशित
झाली. आज मात्र ती कादंबरी दुर्मिळ आहे.
जमदग्नीपुत्र
परशुरामाचा काळात दाशराज्ञयुध्द झाले. परंतु सप्तसिंधूत झालेल्या दाशराज्ञयुध्दात दिवोदासपुत्र
सुदासच्या सेनेचे नेतृत्व वसिष्ठाने केले तर सुदासविरोधी सेनेचे नेतृत्व
विश्वामित्राने केले. ह्या युध्दात सामील झालेले अनेक आर्य आणि दस्यू राजे तसेच दोन्ही
बाजूंचे ऋषी मारले गेले. विश्वामित्रही युध्दात मारला गेला. वसिष्ठाचा मुलगा शक्तीही
त्यात मारला गेला. अनेक ऋषी मारले गेले. हे युध्द रामरावण युध्दानंतर 200 वर्षांनी
आणि महाभारतयुध्दाच्या 600 वर्षांपूर्वीवर्षे आधी घडले. परशुरामाने त्या युध्दात
भाग घेतला नव्हता. कारण युध्द झाले त्यावेळी तो नर्मदातीरावरील सहस्त्रार्जुनाच्या
अनुपदेशात होता.
विशेष म्हणजे दाशराज्ञयुध्द
राज्यसंपादन करण्यासाठी झाले नव्हते. दस्युंना आर्यत्व बहाल करण्यावरून वैदिक काळातल्या
आर्य ऋषींच्या दोन गटात उसळलेल्या वैचारिक संघर्षाची परिणती दाशराज्ञयुध्दात झाली.
कशावरून उसळला होता हा संघर्ष? ह्या संघर्षाचे मूळ
होते दस्युकन्येबरोबर विश्वामित्राने केलेल्या विवाहाचे निमित्त. अर्थात ऋषी
लोपामुद्राचा विश्वामित्राला पाठिंबा होता. लोपामुद्राच्या मते, आर्य आणि अनार्य
ह्यांच्यात फरक करण्याचे मुळी काही कारणच
नाही. गायत्री मंत्रावर ज्याची असीम निष्ठा असेल तोच खरा आर्य, असे लोपामुद्राचे
मत होते. आपल्या मताचा तिने सतत पुरस्कार केला होता. अगस्त्य आणि वसिष्ठ ह्या दोघा
भावांचा मात्र लोपामुद्राला विरोध होता. घटनाक्रमाला मजेशीर वळण लागले.
लोपामुद्राचे मनोमन अगस्त्य ऋषींवर प्रेम होते. लोपामुद्रा आणि अगस्त्य ह्या
दोघांची जेव्हा आमनेसामने भेट झाली तेव्हा लोपामुद्राने अगस्त्यला आव्हान दिले! त्याचीच
परिणती पुढे दोघांच्या विवाहात झाली. लोपामुद्राला असलेला अगस्त्य ऋषींचा विरोध अर्थात
गळून पडला. वरूण, सवितृ इत्यादि देवता मंत्रसामर्थ्याच्या जोरावर पृथ्वीतलावर
अवतारतात. मानवी जीवन उजळून टाकण्याचे सामर्थ्य त्या उजळून टाकतात असा विश्वामित्राचा
ठाम विश्वास होता. त्याची प्रचितीही त्याने घेतली होती. परशुरामालाही त्याची प्रचिती
आली होती. किंबहुना प्रचितीविण ज्ञानाला काडीची किंमत नाही असा विश्वमित्राचा
सिध्दान्त होता. आर्यत्व हे खरे प्रचितीतच असल्याचे त्यांचे स्पष्ट मत होते. वर्ण,
रूप रंग, नाकडोळे वगैरे हे काही ख-या आर्यत्वाचे लक्षण नाही अशी त्यांची धारआण होत
गेली. म्हणूनच गायत्रीवर ज्याची निष्ठा आहे त्याला आर्यत्व बहाल करण्यास काहीच
प्रत्यवाय असू नये असे त्यांचे मत होते. त्यातूनच आर्य-अनार्यांचे ऐक्य प्रस्थापित
होऊन वैमन्यस्याची भावना नष्ट होणार असे त्यांना वाटत होते. तसे पुढे घडलेही. आज
दक्षिण भारतात ब्राह्मणवर्ग पसरलेला दिसतो त्याचे काऱणही विश्वामित्राची आणि
परशुरामाची भूमिकाच कारणीभूत ठरली.
रेणुकाचा शिरच्छेद करण्याचा
आदेश जमदग्नीने का दिला ह्याचा कथाभाग कादंबरीत अर्थातच आला आहे. परशुराम अनुपदेशात
गेलोला असतानाच्या काळात माहेरी गेलेली रेणुका परत येताना गंधर्वाच्या राज्यात रममाण
झाली हे जेव्हा जमदग्नीला कळले तेव्हा तो भयंकर संतापला. परशुराम जेव्हा परत आला
तेव्हा त्याला आईचा शिरच्छेद करण्याचा जमदग्नीने आदेश दिला. पित्याची आज्ञा पाळलीच
पाहिजे ह्या निर्धाराने परशुराम गंधर्व राज्यात गेला. तेथे त्याला वेगळेच चित्र
दिसले. गंधर्वराजासह सगळी गंधर्वांची वसती कुष्ठरोगाने पीडित झालेली त्याने
पाहिली. रेणुकेने त्याला स्पष्ट सांगतितले, मला तू खूशाल ठार मार. कारण तुझ्या
पित्याचा आदेश न जुमानता मी गंधर्व राज्यात राहात आहे. परंतु मी गंधर्वांची
सेवाशुश्रुषा करण्यासाठी इथे थांबले हो कोणालाच माहित नाही. मौजमजा करण्यासाठी मी
ह्या सराज्यात रेंगाळले नाही. तिच्या उत्तराने परशुरामाच्या मनात अजिबात व्दंव्द
उभे राहिले नाही. रात्र होताच त्याने गंधर्वनगरातल्या प्रत्येकाला ठार मारले.
कुष्ठपीडितांच्या सेवेतून रेणुकामातेला मुक्त करण्याचा कर्तव्यकठोर अनोखा मार्ग त्याने
पत्करला! दुस-या दिवशी आईला घोड्यावर बसवून तो
तृत्सूग्रामला घेऊन आला. जमदग्नीच्या पुढ्यातच मातेचा शिरच्छेद करण्याचा निर्धार
त्याने केलेला होता. त्यानुसार त्याने सगळी तयारी केली. पण ऐनवेळी सहस्रार्जुनाचे
जमगद्नीच्या आश्रमावर आक्रमण झाले. त्यामुळे चिरच्छेदाचा प्रसंगच टळला. परशुरामाने
जमदग्नीलाही दोन गोष्टी सुनवायला कमी केले नाही. 'तुम्ही
अहंकाराच्या आहारी गेला आहात. आर्यावर्ताचा सर्ववनाश ओढवून घेणा-या दाशराज्ञ युध्दास
तुमच्यासारख्या ऋषीमुनींचा अहंकारदेखील कारणीभूत आहे, असे त्याने जमदग्नीस
सुनावले.
परशुरामावरील
कादंबरीत असे अनेक प्रसंग मुन्शींनी चितारले आहेत की ज्यात परशुरामाच्या आयुष्यातील
मानवत्वाच्या खुणा दिसतात! स्थालभावी मी इथे एकाच प्रसंगाचा उल्लेख केला
आहे. पुढेमागे जमलं तर ह्या कादंबरीचे स्वैर मराठी रुपान्तर करण्याचा माझा विचार
आहे.
रमेश झवर
rameshzawar.com
No comments:
Post a Comment