Friday, May 10, 2019

युध्दनौकेची सहल

आयएनएस विराट ह्या युध्दनौकेचा दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी ह्यांनी टॅक्सीसारखा वापर केला हा पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी केलेला आरोप तद्दन खोटा असल्याचे भूतपूर्व व्हाईस अडमिरल रामदास ह्यांनी स्पष्टपणे सांगितले हे चांगले झाले. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींवर आरोप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ औचित्याचे भान राहिले नाही एवढेच नाही तर राज्य कसे चालते, कसे चालवायाचे असते हे तरी त्यंना माहित आहे की नाही ह्याबद्दल शंका वाटते. संरक्षण मंत्रालायाचे उच्च अधिकारी, संरक्षण मंत्री, पंतप्रधान संरक्षण उत्पादनमंत्री आणि ज्येष्ठ पत्रकार इत्यादींना संरक्षण दल प्रत्यक्ष कशा प्रकारे काम करते ह्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी मुद्दाम पाचारण केले जाते.
ही प्रथा केवळ भारतातच आहे असे नाही. देशाचे प्रमुखांना सपत्नीक निमंत्रण देण्याचा शिष्टाचार जगभरातल्या लष्करात आणि नौदलात पाळला जातो. अगदी पोपसुध्दा काही शिष्टाचार पाळतात. ते जेव्हा खास विमानाने जागतिक दौ-यावर निघतात तेव्हा विमानात त्यांच्यासमवेत व्हॅटिकनचे ( व्हॅटिकन हे रोमन कॅथालिकांच्या राष्ट्राची राजधानी आहेत. ) उच्च पदाधिकारी तर असतातच शिवाय पत्रकारही असतात. पोपना प्रतिप्रश्न विचारण्याचे धाडसही अनेक ह्या दौ-यात पत्रकार करतात. पोपही त्यांच्या प्रश्नांना सुचेल तशी उत्तरे देतात. ज्यावेळी देण्यासारखे उत्तर वनसते तेव्हा सूचक मौन पाळतात. अनेकांच्या माहितीसाठी सांगतो, ह्याही विमानात पत्रकारांसाठी मद्याची रेलचेल असते!  
लोकांना जास्तीत जास्त माहिती कशी देता येईल ह्यादृष्टीने नेत्यांकडून सातत्याने प्रयत्न केला जातो. 70 वर्षांपूर्वी नवभारतानेही असाच जोरकस प्रयत्न केला होता. सन्माननीय अपवाद वगळता भाजपासकट अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांना राज्य कसे चालवायचे ह्याचे खरोखरच ज्ञान नाही. भान तर मुळीच नाही. उच्चपदावर असलेल्या नेत्यांची ही स्थिती तर सामान्य कार्यकर्त्याची काय स्थिती असेल ह्याची कल्पना केलेली बरी. सामान्य कार्यकर्ते तर बोलूनचालून सामान्य! त्यांची बुध्दी किती बेतासबात असते ह्याचा अनुभव तर मी अनेकवेळा घेतला आहे. त्यातले दोन निवडक अनुभव देण्यासाठी ह्या लेखाचा प्रपंच.
पंतप्रधानांच्या दो-यात सामील होण्याची संधी मिळण्यापूर्वी नौदलाच्या असाईनमेंट करण्याची संधी मला अनेकदा मिळाली. ह्या असाईनमेंट करताना वायझॅग येथे मला 'आयएनएस शलभ'वर दोन रात्र मुक्काम करण्याची संधी मिळाली. शलब हे लॅडिंग टँक शिप वर्गातली युध्दनौका असून ते कुठल्याही किना-याला लावून त्या किना-यालगतच्या प्रदेशात सैन्याची आख्खी तुकडी घुसवता येते. पाहुण्यांसाठी असलेल्या अतिथीगृहांत जागा नसल्यामुळे शलभवरील एका लेफ्टनंच्या खोलीत माझी सोय करण्यात आली होती. वातानुकूलित केबिनमध्ये झोपण्याची सवय नसल्यामुळे मला रात्रभर झोप आली नाही. तरीही शिस्त म्हणून मी बेडवर पडून राहिलो. सकाळी सहा वाजता नौसैनिकांची कवायत होती. ती पाहावी म्हणून मी तयार झालो. लेफ्टनंटला विनंती करताचा त्याने त्याची स्वतःची हाफ पँट मला दिली. टीशर्ट माझ्याकडे होताच. परेडच्या डेकवर मी हजर झालो. माझ्या उपस्थितीमुळे आनंद झाल्याचे कॅप्टनच्या आणि नौसैनिकांच्या चेह-यावर दिसत होते.
ह्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचे दिवसभराच्या कार्यक्रमाच्या शेड्युलमध्ये नव्हते.  तरीही मी कवायतीला उपस्थित राहिलो ह्याचा कॅप्टनला खूप आनंत झाला. 'तुम्ही अडमिरलचे पाहुणे! माझ्यासारख्या कनिष्ट अधिका-याच्या वाट्याला तुम्ही कसे येणार?' ह्या वाक्याने त्याने माझे डेकवर स्वागत केले. संध्याकाळी तर ह्या अधिका-याने मला चक्क वायझॅग शहरात नेऊन व्यक्तिशः त्याच्यातर्फे पार्टीही दिली. दुस-या दिवशी कमांड मेसमध्ये अडमिरल परेरा ह्यांची भेट झाली तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला, How come your boys involved  in a riot with police?
माझ्या प्रश्नावर अडमिरल परेरा संतापले.
माझ्या प्रश्नाला काही दिसांपूर्वी वायझॅगमध्ये पोलिस आणि नौसैनिकांत झालेल्या दंगलीचा संदर्भ होता.
'You thief! You are burgling my house and calling me thief? '  परेरा
'No Sir! I simply want to know who was at fault. I just referred the allegations made in local  newspapers. मी
माझा मुद्दा त्यांच्या ध्यानात येताच दुस-या क्षणी ते शांत झाले. पहिल्यांदा कुणी कुरापत काढली ह्याची अधिकृत माहिती त्यंनी मला दिली. संभाषण चालू असताना हातात असलेला बीयरचा ग्लास तोंडालाही लावायला आम्हाला दोघांना अवसर मिळाला नाही. मुंबईला परत आल्यानंतर विमानतळावरूनटॅक्सी करून सरळ मी ऑफिसला गेलो. सविस्तर लेख लिहून दिला. आमच्या ऑफिसमध्ये काँग्रेस आणि भाजपाचे छुपे होते. 'मस्त दारूबिरू प्यायला मिळाली असेल नाही?' हा चौकस प्रश्न त्यांनी मला विचारला. ह्या प्रश्नाला काय उत्तर देणार!  त्यांना उत्तर न देण्याचे मी ठरवले.
दुसरा एक प्रसंग.
विद्याचरण शुक्ला संरक्षण उत्पादन मंत्री असताना 'आयएनएस व्हेल' ह्या पाणबुडीला भेट देण्याचा योग आला. तेथे व्हेलवर गेल्यानंतर पहिले काम काम होते आमचा पत्ता, टेलिफोन इत्यादि त्यांच्या वहीत नोंदवण्याचे! कशासाठी, असा प्रश्न विचारताच तो अधिकारी म्हणाला, In case if something goes wrong Navy should be able to inform your family members!
त्याचे उत्तर ऐकून माझ्या काळजाचा ठोका चुकलाच!
आयएनएल व्हेलवर पाणबुडी पाण्याखाली कशी जाते आणि ती वर कशी येते ह्याचे प्रायत्यक्षिक रत्नागिरीजवळच्या समुद्र किना-यावर अनुभवायला मिळाले. कॅप्टन आणंदच्या हातात सुकाणू होते. त्यांच्याशी बोलताच त्यांनी मोठ्या हौसेने मला बारीकसारिक माहिती दिली. सुकाणूच्या बाजूलाच सोनार इक्विपमेंट असते. सोनार म्हणजे साऊंड अँड नेव्हिगेशन राडार! राडारच्या स्क्रीनवर पाण्याखालच्या हालचाली टिपल्या जातात. त्यावरून कॅप्टनला शत्रूच्या हलचाली नुसत्या आवाजावरून कळतात. दुसरे म्हणजे पाणबुडी जेव्हा समुद्राच्या पृष्टभागावरून पाण्याखाली जाते  तेव्हा बॅटरीची उर्जा फक्त पाण्याखाली नेण्यासाठीच वापरली जाते. अन्य स्वीच बंद करून उर्जा थांबवली जाते. भयंकर उकाडा सुरू होतो. मासळी पाण्यात सूर मारते तशी पाणबुडी तळाकडे झेप घेते. वर येताना ह्या क्रियेच्या बरोबर उलट क्रिया होते. वेगवेगळे खटके दाबून ही काही मिनटांची प्रक्रिया पाणबुडीवरील निष्णात अधिकारी अतिशय सफाईने पार पाडतात. हे दृश्य बघण्यासारखे होते. आण्विक पाणबुडी आणि स्टोअर्ड बॅटरीवर चालणारी पाणबुडी ह्यात काय फरक असेल तर तो हाच की आण्विक पाणबुडीवरची उर्जा कधीच संपत नाही. पारंपरिक पाणबुडीवरील उर्जेकडे ती संपणार तर नाही ना इकडे लक्ष ठेवावे लागते. भारत-पाक युध्दात आपली पाणबुडी 21 दिवस पाण्याखाली राहिल्याचा रेकॉर्ड आहे! आणिवक पाणबुडी कितीही काळ पाण्याखाली राहिली तरी अमेरिकन नौसैनिकांच्या तुलनेने भारतीय नौसैनिकांची पाण्याखाली राहण्याची क्षमता कितीतरी अधिक आहे असे मला कॅप्टनने सांगितले. ह्या पाणबुडीची किंमत किती असा थेट प्रश्न विचारताच कॅप्टन आणंद हसून म्हणाले, 'पैसा दिया किसने और लिया किसने!'  आपल्याला रशियाकडून मिळालेल्या 8 पाणबुड्या बार्टर सिस्टीमने मिळाल्या होत्या हे त्यांनी मोठ्या खुबीने सूचित केले.
व्हेलला भेट दिल्यानंतर 'अजस्त्र जलचर' ह्या शीर्षकाचा लेख मी रविवार लोकसत्तेत लिहला. व्हाईस अडमिरल मनोहर आवटींनी मला फोन करून माझ्या लेखाचे कौतुक केले. हीच मी माझ्या लेखाची पावती समजतो. मघाशी उल्लेख केलेल्या माझ्या ऑफिसमधील दोन मोठ्या राष्ट्रीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अजस्त्र जलचर हा लेख वाचून पाहण्याचीही तसदी घेतली नाही हे मला खेदाने नमूद करावेसे वाटते. असो.


रमेश झवर
rameshzawar.com

No comments: