Thursday, May 23, 2019

भाजपाची विजय पताका


सतराव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणूक युध्दात जुन्यापुराण्या काँग्रेस पक्षाचा पराभव झाला! 135 कोटी भारतीय जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या झोळीत जनादेश का टाकला ह्याची चर्चा देशभर सुरू झाली आहे. ही चर्चा प्रदीर्घ काळ सुरू राहणार आहे. नजीकच्या भविष्काळात तरी ती संपेल असे वाटत  नाही. काँग्रेसविरोधी जनादेश देणा-या 137 कोटी लोकसंख्या असलेल्या देशाच्या मनात काय चालले आहे ह्याचा काँग्रेसलाच काय, देशभरातल्या राजकीय पंडितांनाही पत्ता लागला नाही! जनादेश अतिशय विनम्रपणे स्वीकारण्याखेरीज राहूल गांधी ह्यांना पर्याय उरला नाही.  तसा तो त्यांनी स्वीकारला नसता तर ती त्यांची लोकशाही मूत्यांशी प्रतारणा ठरली असती. 2014 साली  प्राप्त झालेल्या विजयापेक्षा भाजपाची आणि भाजपाप्रणित आघाडीची विजय पताका ह्यावेळी निश्चितच अधिक उंच फडकली आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने घडवून आणलेल्या चमत्कारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचे अंतःकरण सद्गतित झाले नसते तरच नवल होते. 'इस फकीर की झोली भर दी'  ह्या त्यांच्या एकाच वाक्याने त्यांच्या मनातल्या भावनेची जनतेला कल्पना आली असेल. 2014 च्या निवडणुकीतील विजयानंतर त्यांचे मन जेवढे उचंबळून आले त्यापेक्षा ह्यावेळी ते कितीतरी अधिक उचंबळून आलेले दिसले. 'माझ्या हातून चुका होऊ शकतात; परंतु बदइरादा आणि बदनियतचा लवलेश माझ्याकडे नाही' हे त्यांचे वाक्य खूपच बोलके आहे. अनेकांना त्यांचे हे वाक्य नाटकी लिहाजमध्ये उच्चारलेले वाटण्याचा संभव आहे. नाटकातल्या भूमिकेत समरस झालेल्या कसलेल्या नटांच्या भावनाही कधी कधी ख-या असतात. आयुष्याच्या रंगमंचावर  मोदींना मिळालेला विजय हा खराखुरा आहे. तेव्हा, त्यांच्या भावना ख-याखु-या मानल्या पाहिजे!
तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, संयुक्त जनता दलाचे नितिशकुमार आणि राजदाचे लालूप्रसाद यादव आणि त्यांचे कुटुंबीय आंध्रप्रदेशचे  चंद्राबाबू नायडू, बसपाच्या बहनजी, सपाच्या यादव पितापुत्र ह्या सगळ्यांचा अहंकाराचा फुगा मतदारांनी हलक्या हातांनी फोडून टाकला. ह्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या 7-8 जागा वाढल्या असल्या तरी अमेथी मतदारसंघात राहूल गांधींच्या पराभवामुळे काँग्रेसचा विजय डागळलाच. ह्यापूर्वी आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधींनाही पराभव पत्करावा लागला होता. इंदिराजींचा पराभव ही मतदारांनी त्यांना फर्मावलेली शिक्षा होती. राहूल गांधींच्या पराभावामागे  मात्र स्मृती इराणींची 'किलिंग इंस्टिंक्ट' हेच कारण आहे. केरळमधल्या काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघात राहूल गांधी निवडून आल्याने लोकसभा राजकारणात त्यांच्या स्थानाला धक्का लागणार नाही.
प्रदीर्घ काळ विरोधी बाकावर बसलेल्या भाजपाला सत्ता प्राप्त करून देणारा अभूतपूर्व विजय आणि सुमारे 135 वर्षांचे अस्तित्वच संपुष्टात आणणा-या काँग्रेसच्या पराभवाचे विश्लेषण राजकीय पंडित करतीलच. माझ्या मते हा सत्तापालट घडवून आणण्याचे श्रेय काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या भारतीय जनतेला द्यावे लागेल. निवडणूक प्रचारात कोण किती खरे बोलतो, कोण किती खोटे बोलतो हे जनतेला कळत नाही असे नाही. भाजपा आणि काँग्रस ह्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा प्रचार किती खरा किती खोटा हे लोकांच्यालक्षात आले नसेल असे म्हणता येत नाही. सुशिक्षित माणसांशी शक्यतो युक्तिवाद न करण्याचे शहाणपण भारतीय जनतेकडे पुरेपूर आहे. त्या शहाणपणाची प्रचिती अटलबिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी ह्यासारख्या अनेक नेत्यांना आली होती. भारतात 48 राजकीय पक्ष आहेत. त्यापैकी अनेक राजकीय पक्षांचा जन्म केवळ वैयक्तिक महत्त्वाकांक्षेतून झालेला आहे. त्यांचे अस्तित्व जनतेने वेळोवेळी संपवले आहे. ह्याही निवडणुकीत अनेक 'स्वाभिमानी' पक्षांच्या उमेदवारांना मतदारांनी धूळ चारली. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, केंद्रीय मंत्री म्हणून प्रदीर्घ काळ वावरलेले सुशिलकुमार शिंदे आणि मुरली देवरा ह्यांचे चिरंजीव मिलिंद देवरा इत्यादी अनेकांना घरी बसले. अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार ह्यांना तर लोकसभेत जाण्यापासून मतदारांनीच रोखले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, दिवंगत केंद्रीय मंत्री माधवराव सिंदिया ह्यांचे चिरंजीव ह्यांनाही मोदी लाटेने किना-यावर फेकून दिले. ह्या निवडणुकीत भारतीय जनतेने मूकनायकाची भूमिका बजावली असे म्हटले तरी चालेल.
देशाची चौफेर प्रगती घडवून आणण्यासाठी काँग्रेसने कष्ट उपसले हे जनतेला अमान्य नव्हतेच मुळी. मग काँग्रेसचा पराभव का झाला?  गेल्या काही वर्षांपासून 'सर्वधर्मसमभाव' ह्या राजकीय विशेषणावरचा जनतेचा विश्वास हळुहळू उडत चालला. किंबहुना तो उडाल्याखेरीज आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जोर दिल्याखेरीज भाजपाला सत्ता मिळणार नाही हे नव्वदीच्या दशकात भाजपा नेत्यांच्या लक्षात आले. राहूल गांधींच्याही ते लक्षात आले . म्हणून ते मानसरोवराच्या यात्रेला जाऊन आले. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांची सत्ता पंचवीस वर्षे का टिकली ह्याचा अभ्यास केल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय जनता पार्टीच्या मदतीला कुमक धाडायला सुरूवात केली. दरम्यानच्या काळात आयटीसेलने दमदार प्रचाराची आघाडी सांभाळली. मध्यमवर्गीयांची  काँग्रेस काळात झालेली उपेक्षा संघाने आणि आयटी सेलने भाजपा नेत्यांच्या ध्यानात आणून दिली. कनिष्ट मध्मवर्गीयला मतदान करण्यास प्रवृत्त केले तर भाजपाला यश मिळणे अवघड नाही हेही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षात आले. त्यानुसार प्रचारा मोहिमेत मोदींनी बदलही घडवून आणला.  
एकूणच कांग्रेस-विचार नेमका ह्याउलट होता हे अनेक वेळा दिसून आले. नेहरू-गांधींच्या पुण्याईवर पक्ष चालवण्याची सवय लागल्याने नव्या नव्या कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये वाव उरला नाही. निवडणुकीतसुध्दा काम करायला काँग्रेसकडे कार्यकर्ता नामक प्राणी उरला नाही. फक्त ठेकेदारांचे, मध्यस्थांना काँग्रेसमध्ये मान मिळू लागला. गरिबांच्या नावावर राजकारण करणा-या काँग्रेसला धडा शिकवण्याचा विचार जनतेच्या मनात आला नसेल असे म्हणता येत नाही. निवडणुकीच्या राजकारणात नरेंद्र मोदींचे आगमनामुळे काँग्रेसला धडा शिकवण्याची संधी जनतेला मिळाली असे म्हणणे भाग आहे.
वस्तुतः भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काळ हा बदलत असतो. नोटबंदी, बेकारी. आर्थिक दुःस्थिती ह्या मुद्द्यावरून जनतेने तूर्तास मोदींना माफ केले असले तरी येणा-या काळात जनता तसे करीलच ह्याची खात्रा देता येणार नाही. भारतापुढील समस्या सोडवण्याचा जोरकस प्रयत्न भाजपाला करावा लागेल. तसा तो भाजपाने केला नाही तर काँग्रेसच्या मार्गाने जाण्याचीपाळी भाजपावरही आल्याशिवाय राहणार नाही. दणदणीत विजयाचा आनंद होणे स्वाभाविक आहे. पण त्यातून  भाजपात उन्मत्तपणाचा शिरकाव झाला तर आगामी काळात भाजपाची अवस्था काँग्रेससारखीच झाल्याखेरीज राहणार नाही. कारण चुका करणा-या पक्षाला शिक्षा करण्याची प्रवृत्ती नव्याने जनतेत उत्पन्न झाली आहे. थोडक्यात, व्दिपक्षीय लोकशाहीच्या दिशेने देशाचा अपरिहार्य प्रवास सुरू झाला आहे.   
रमेश झवर  

No comments: