Wednesday, July 24, 2019

लोकशाहीची ‘कानडा’ शैली

एक आठवडाभर चाललेले कर्नाटकातले लोकशाहीचे नाटक अखेर मंगळवारी संपले. ह्या नाटकाला जनता दल सेक्युलर, काँग्रेस आणि भाजपा ह्या तिन्ही पक्षांच्या आमदारांनी मिळून आपल्या देशातल्या लोकशाहीला कानडा शैलीची आगळीवेगळी डूब दिली. सर्वोच्च न्यायालयाचे हुकूम, राज्यपालांचे आदेश, फुटीर आमदारांचा मुंबईत व्यवस्थित मुक्काम, कर्नाटक विधानसभेला लाभलेला खमक्या अध्यक्ष ह्या सगळ्यांमुळे हेच दिसून आले की भारतीय लोकशाहीची मूल्ये कमालीची तकलादू आहेत!  सभागृह चालवण्यासंबंधी घटनेत कितीही भक्कम तरतुदी केल्या आहेत. त्या तरतुदी कर्नाटकात राजकारण्यांनी फोल ठरवल्या. राजीव गांधींच्या काळात संमत करण्यात आलेला पक्षान्तरविरोधी कायद्याचेही तीनतेरा वाजवता येतात हे कन्नडवीरांनी दाखवून दिले!  त्याचप्रमाणे दिल्लीच्या इशारावर चालणा-या राज्यांच्या नेत्यांचे दिवस काँग्रेस राजवटीबरोबर संपुष्टात आले हाही समज दिल्लीत सत्तेवर असलेल्या पार्टी वुथ डिफरन्स हे बिरूद मिरवणा-या भाजपाने खोटा ठरवला. खरे तर, रंगभूमी ही महाराष्ट्राची समृध्द परंपरा तर यक्षगान ही कर्नाटकची परंपरागत शैली! नाटक आणि यक्षगान ह्या दोन्ही शैलीत जमेल तसे नाटक कर्नाटकात रंगले. त्या नाटकाचे स्क्रीप्ट दिलीतल्या पक्षश्रेष्ठींना लिहावे लागले नाही. त्यांनी फक्त निर्मितीसाह्य केले! खरे तर हे नाटक कर्नाटकात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने चलाखी करून जनता दल एसला पाठिंबा तर दिला त्याचवेळी लिहले गेले. शिवाय कुमारस्वामींना मुख्यमंत्री करण्यासही काँग्रेसने पाठिंबा दिला तेव्हाच फोडाफोडीचा प्रसंग निश्चित झाला असावा. तेव्हाच ह्या नाटकाची संहिता येडीरप्पा ह्यांनी लिहायला घेतली. संहिता लिहायला सुरूवात केली. १७ दिवसांपूर्वी काँग्रेसच्या १३ आणि जनता दल एसच्या ३ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजिनामा सादर केला तेव्हा हे नाटक सुरू झाले. ह्या नाटकाचा शेवट काय होणार ह्याची त्याच वेळी संबंधितांना कल्पना होती.
कर्नाटकातले नेते कुठल्याही पक्षाचे असले तरी ते कच्च्या गुरूचे चेले नाहीत. सिध्दरामय्या असो वा येडीरप्पा, हे दोघेही शेवटपर्यंत जिद्दीने लढाणारे नेते आहेत! कुमारस्वामींचे सरकार पाडायचे ठरवल्यानंतर त्यासाठी कोर्टबाजी, सभागृहात करायच्या सर्व हालचाली, राज्यापालांचे आदेश वगैरे सगळ्या भानगडी पध्दतशीर पार पाडण्यास सत्ताबाज येडीरअप्पांनी अगदी सुरूवातीपासून तरबेज आहेत. काँग्रसवाले फुटून बाहेर पडलेल्या आमदारांना पुन्हा माघारी खेचण्याचा प्रयत्न कुमारस्वामी अँड कंपनी निश्चितपणे करणार हे त्यांना माहित असावे. म्हणूनच मुंबईत हॉटेलात मुक्काम ठोकून बसलेल्या आमदारांना भेटण्यासाठी आलेल्या कर्नाटकच्या नेत्यांना मुंबई पोलिसांच्या मदतीने आणि हॉटेल व्यवस्थापनाच्या मदतीने यशस्वीरीत्या पिटाळून लावले.
पोलिसांच्या मदतीखेरीज आमदारांचा राजिनामा स्वीकारण्यास विधानसभाध्यक्षांना भाग पाडणारा निकालही सर्वोच्च न्यायालायकडून मिळवला. त्यावर मात करण्यासाठी काँग्रेसनेही विधानसभाध्यक्षांच्या अधिकाराची लढाई सर्वोच्च न्यायालयात नेली. हे प्रयत्न अपुरे ठरण्याचा संभव ध्यानात घेऊन ठराविक वेळात सभागृहाचे कामकाज संपवा असा आदेश राज्यपालांकडून दोन वेळा देववला. विधानसभा अध्यक्षांनी तो दोन्ही वेळा धुडकावून लावला. काय घडणार आणि ते कसे उलटवायचे हे सगळे कुमारस्वामींना माहित होते. भाजपात गेलेल्या आमदारांना अपात्र ठरवण्याची कारवाई अध्यक्ष रमेशकुमारना करता यावी ह्यासाठी त्यांनी स्वतःसह सगळ्यांची भाषणे लांबवली. ठरवल्यानुसार रमेशकुमारना अवधी मिळवून देण्यात त्यांना यशही मिळाले. मिळालेला अवधी अध्यक्ष रमेशकुमारनीही पुरेपूर सार्थकी लावला असे म्हणता येईल. पक्षान्तर  करणा-या आमदारांना अपात्र ठरवण्याचे काम अध्यक्ष रमेशकुमारनी अजूनपर्यंत केलेले नाहीच. कदाचित आज दिवसभरात ते काम पुरे करतीलही. अपात्रतेची पाचर ते निश्चितपणे मारून ठेवतील. अर्थात आमदारांना अपात्र ठरवण्यात आले तरी भाजपाचे पुढचे रस्ते बंद होणार नाही. कोर्टबाजी सुरूच राहणार. कोर्टबाजीबरोबर राष्ट्रपती राजवट पोटनिवडणुकांची तयारीही सुरू राहणारच.
हे सगळे घडत असताना काँग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांनी लोकशाहीची मूल्ये बाजूला सारून कमालीचा धीर आणि अजोड धैर्य दाखवले. फरक इतकाच की काँग्रेस नेत्यांचा धीर आणि धैर्य सत्ता टिकवण्यासाठी होते तर भाजपा नेत्यांचे ते कुमारस्वामींच्या हातातली सत्ता हिसकावून घेण्यासाठी आणि स्वतः सत्तेवर येण्यासाठी होते. राजिनामा प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने दुस-या दिवसापर्यंत तहकूब केल्यानंतर खरे तर, कुमारस्वामींच्या आशा मावळल्या आणि त्यांनी मतविभाजनाच्या मार्गातली आडकाठी त्यांनी काढून घेतली. अजूनही पक्षान्तर करणा-या आमदारांना अपात्र ठरवण्याच्या दृष्टीने काँग्रेस आणि जनता दल एस ह्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ते स्वतः सत्तेवरून गेलेले असले तरी स्वस्थ बसणार नाही. कारण स्वस्थ बसणे त्यांच्या रक्तातच नाही. भाजपाला सहजासहजी राज्य करू द्यायचे नाही ह्यादृष्टीने अनेक खटपटी लटपटी ते सतत करत राहतील हे निश्चित.
काश्मीरमध्ये निवडणका घेण्याच्या प्रश्नाला केंद्र सरकारला अजून हात घालता आला नाही. त्यापूर्वी कर्नाटकात पोटनिवडणुक घेण्याचे गाठोडे केंद्र सरकारसमोर येऊन पडले आहे. लोकसभेत प्रचंड बहुमताचा प्रश्न सोडवणा-या भाजपा नेत्यांना आता ह्यापुढील काळात निरनिराळ्या राज्यांत उपस्थित होणा-या प्रश्नांना तोंड द्यावे लागणार. अर्थात भाजपा नेत्यांची त्याला तयारी आहे. सत्ता हा लोण्याचा गोळा नाही की जो हातात आला की सहज मटकावता येईल. सत्ता ही लोण्याचा गोळा आहे!  शिवाय राजकीय आघाडीवर यश मिळाले तरी ते पुरेसे नसते. बेकारी, महागाई, शेती, उद्योग इत्यादीशी संबंधित प्रश्न कुठल्याही सरकारच्या कोंडी करू शकतात. सध्या सरकारला आर्थिक आघाडीच्या चिंतेने घेरले असून अजून तरी त्यातून सुटका दृष्टीपथात नाही.
रमेश झवर

Tuesday, July 23, 2019

चांद्रयान-२ चे यश

बावीस जुलै २०१९ रोजी अंतराताळात चंद्राच्या दिशेने झेपावलेले रॉकेट ही निव्वळ चांद्रयान-२ मोहिम दोन नाही. चंद्रभूमीच्या गर्भात काय काय दडलेले आहे ह्याविषयीची शक्य तेवढी जास्तीत माहिती गोळा करून ते काही मिनटातच पृथ्वीवरील श्रीहरीकोटा अंतरळकेंद्रावर वाट पाहात बसलेल्या शास्त्रज्ञांकडे पाठवण्याची कामगिरी विक्रम ह्या उपग्रहाकडे सोपवण्यात आली आहे. आतापर्यंत सर्वात जास्त म्हणजे ३८५३ किलो वजनाचे ओझे अंतराळाकडे नेणा-या ह्या भल्या मोठ्या रॉकेटला चंद्राच्या कक्षेत सुखरूप पोहचवण्याची जबाबदारी शास्त्रज्ञांची आहे. चंद्रभूमीच्या दक्षिण ध्रुवावरील भागाचे संशोधन करण्यासाठी लागणारी सगळी उपकरणे विक्रम उपग्रहात आहेत. ती उपकरणे स्वयंचलित आहेत. चांद्रयान-२ मोहिमेत विक्रम उपग्रह योग्य ठिकाणी आणि योग्य वेळ पाहून उतरवण्याचे आणि संशोधनाची स्वयंचलित उपकरणे चंद्रभूमीवर अलगदपणे टेकवणे सोपे व्हावे हे अपेक्षित आहे. त्यासाठी अंतराळात झेपावल्यापासून ते चंद्राच्या कक्षेत पोहोचेपर्यंत रॉकेटला १५ वेळा इष्ट ते वळण लावण्याचे काम श्रीहरीकोटा संशोधन केंद्रावरचे शास्र्त्रज्ञ करणार आहेत. प्रत्यक्ष चंद्रभूमीवर योजून दिलेली कामगिरी कशी पार पाडायाची ह्याविषयी उपकरणांना संपूर्ण स्वायत्त्ता देण्यात आली आहे. ती तशी द्यावीच लागणार हे उघड आहे! कारण चंद्राचा भूपृष्टभाग उबडखाबड आहे का आणखी कसा आहे हे पाहूनच उपकरणे उतरवली जाणार आहेत. चंद्राचा पृष्टभाग, चंद्रावर असलीच तर तेथील हवा, वातावरण वगैरेचा अभ्यास करणे हाच तर मुळी चांद्रमोहिमेचा हेतू असमुळे काहीही गृहित न धरता प्रसंग पाहून उपकरणे उतरवणे, ती कार्यन्वित करणे इत्यादि बाबी स्वयंचलित, नव्हे स्वयंशासित ठेवण्यात आली आहेत.
पहिली चंद्रमोहिम यशस्वी केल्यानंतर हवामान ढगाळ असूनही काल सुरू केलेल्या दुस-या चंद्रमोहिमेचा कामगिरी निश्चित करण्यात आली आहे. अर्थात ती ठरताना नेमकी कुठली कामगिरी बजावावी ह्याचा कार्यक्रम भारतीय संशोधकांनी विचारपूर्वक ठरवला. अर्थात् चीन, अमेरिका आणि रशिया हे तिन्ही देश नेमके काय करणार आहेत हेही भारताने जाणून घेतले असणारच. आवश्यक वाटली तेव्हा त्यांच्याशी भारतीय शास्त्रज्ञांनी चर्चाही केलेली असू शकते. अशा चर्चा करण्यासाठी बैठका घेण्याची जरूर नाही. अशा चर्चा ई-मेल, इंटरनेट, फोन ह्यावर नेहमीच होत असतात. ह्या चर्चा विमानतळाच्या लाऊंजमध्ये किंवा विमानप्रवासात अथवा प्रत्यक्ष भेटीत कुठेही आणि केव्हाही होतच असतात. शीतयुध्दाच्या काळात रशिया आणि अमेरिका ह्यांच्यात अंतराळ संशोधनाच्या बाबतीत कारण नसताना स्पर्धा झाली होती! अंतरळामोहिमांचा छुपा उद्देश हेरगिरी करण्याचा किंवा रासायनिक अस्त्रांचा मारा करण्यासाठीच असल्याचा समज रशिया आणि अमेरिका ह्या दोन्ही देशांनी एकमेकांविषयी करून घेतला होता. रशियाने अंतराळात फिरती प्रयोगशाळा पाठवली तर अमेरिकेने मनुष्यच चंद्रावर उतरवला. ह्यापुढील काळात मात्र कोणताही देश कोणाशीही स्पर्धा करणार नाही. किंवा इतरावर कुरघोडी करण्याचा विचारदेखील मनात आणणार नाही. उलट औपचारिक बैठका न घेता असे ठरले असावे की अंतराळ संशोधनाचा लाभ आता पृथ्वीवासियांना मिळण्याची वेळ आली आहे. तूर्तास आगामी पन्नास वर्षांत चंद्र हे एक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करायचे असे जणू करारच सगळ्यांनी केला असावा!
चंद्रावर फेरफटका मारण्यासाठी जाणा-यांचा चंद्रप्रवास सुखरूप होऊन चंद्रावर पृथ्वीवासी पर्यटकांची बडदास्त ठेवण्यासाठी शास्त्रज्ञांना आणि तंत्रज्ञांना मात्र वरचेवर चंद्रावर जाऊनयेऊन राहावे लागणार. एका चीनी शास्त्रज्ञाच्या मतानुसार चंद्रावर कोठल्याही देशाची वकिलात स्थापन करण्याचा प्रश्न नाही. ह्याचा सरळ अर्थ असा की चंद्रावर ना कुठल्या सरकार असेल ना त्या सरकारचे इमिग्रेशन डिपार्टमेंट’! पासपोर्ट जारी करणारे ऑफिस सुरू करण्याचा प्रश्नच येत नाही! म्युनिसिपालिटी किंवा पोलिस स्टेशन सुरू होण्याची गोष्ट तर फारच लांब राहिली. उत्तर ध्रुवाच्या प्रदेशातल्या एका गुहेतल्या मानवाला ऋतची प्राप्ती झाली असे वैदिक काळावर संशोधन करणा-यांचे मत आहे. त्यांच्या मते, ज्याला ऋतची प्राप्ती झाली होती तोच भृगू ऋषी! उशना कवी म्हणून ज्याचा गीते उल्लेख आहे तो उशना कवी हाच भृगू ऋषी! चंद्रावरील मानव हा पृथ्वीवरून आलेला पर्यटक असल्यामुळे त्याला ऋतची प्राप्ती वगैरे होण्याची भानगड नाही. त्याला ऋत आधीच माहित असल्यामुळेच तर तो चंद्रावर पोहोचू शकला.
भारताप्रमाणे रशिया, अमेरिकाआणि चीन ह्या तिन्ही देशांनी चांद्रमोहिमा आखल्या असून २०२४ ते २०३० ह्या काळात चारी देशांच्या मोहिमा परिपूर्ण झाल्या असतील. अमेरिकेला मंगळ यानाच्या प्रवासात लागणारे स्टेशन म्हणून चंद्राचा वापर करायचा आहे तर काही अमेरिकन कंपन्यांना चंद्रावर रिझार्टटाईप सुखसुविधा असलेली हॉटेले काढायची आहेत. तत्पूर्वी चंद्राचे सभोवताली किंवा प्रत्यक्ष चंद्रावर जंक्शन स्टेशन करण्यासाठी उद्योजकांनी एखादी कंपनी स्थापन करण्याच्या दृष्टीने पुढाकार घ्यावा असे आवाहन नासा प्रमुखांनी अलीकडे नॅसडॅकवर केले होते.
सॉफ्टवेअर क्षेत्रात भारत पुढे असल्याने आगामी काळात अंतराळ प्रवासाला लागणा-या सॉफ्टवेअर सेवा पुरवण्याचा धंदा यशस्वी होईल ह्यात शंका नाही. सॉफ्टवेअर सेवा हा टॅलेंट कवडीमोलाने विकण्याचा धंदा भारतीय कंपन्यांना चांगला जमला. त्यांना अंतरळायुगात हा नवा धंदा मिळेल ह्यात शंका नाही. ४८ दिवसांच्या चांद्रयान-२ मोहिमेने सॉफ्टवेअरखेरीज अनेक संशोधनशाखात भारताची गती उत्कृष्ट असल्याचे भारताने सिध्द करून दाखवले. विशेषतः क्रायोजेनिक तंत्रज्ञान हाताळण्याच्या बाबती आपल्या शास्त्रज्ञांनी कमालीचे यश मिळवले. त्या सर्वांना पद्म पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करणे योग्य ठरेल. क्रायोजेनिक इंजिनातली गळती श्रीहरीकोटातल्या शास्त्रज्ञांना थांबवता आली नसती तर कालचे रॉकेट उड्डाण यशस्वी झाले नसते हे सत्य देशाने लक्षात घेतलेले बरे.
रमेश झवर  

Monday, July 15, 2019

सोळा जुलैचा दिवस!

१६ जुलै १९६९ रोजी माझ्या वृत्तपत्रीय आयुष्यात उगवलेला महत्त्वाचा दिवस! हा दिवस मी कधीही विसरणार नाही. आचार्य अत्र्यांच्या मराठाच्या न्यूजडेस्कवर उपसंपादक म्हणून माझी उमेदवारी सुरू झाली होती. उमेदवारी सुरू होऊन जेमतेम वर्ष झाले असेल! मोठ्या अपेक्षा बाळगून मी जळगाव सोडले होते. पत्रकारिता करण्यासाठी १९६६ साली मी कायमचा मुंबईला आलो    होतो. पत्रकारितेखेरीज अन्य काही करायचे नाही असा मी निर्धार केला होता. वर्तमानपत्रात प्रवेश कसा मिळणार हा यक्षप्रश्न मनात थैमान घालत होता. त्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते. आईवडिलांच्या पंखाखालचे उबदार जीवन सोडून मी भलतेच साहस करायला निघालो होतो. मुंबई शहरात आणि पत्रकारितेत प्रवेश मिळण्याची माझी इच्छा आणि व्यावहारिक वस्तुस्थिती ह्यात छत्तीसचा आकडा होता. जाहिराती वाचून अर्ज करण्याचे ते दिवस होते. अप्लाय अप्लाय अँड नो रिप्लाय ह्या दाक्षिणात्यांचा मंत्राचा विलक्षण अनुभव मला रोज येत होता. पण माझे नशिब जोरदार असल्याने दोन ऑफिसना वळसा घातल्ल्यानंतर मला शेवटी मराठात प्रवेश मिळाला होता.
प्रवेश तर एकदा मिळाला पण वृत्तपत्रीय करीअरमध्ये नेमणुकीचे महत्त्व फक्त नोकरी मिळण्यापुरतेच असते. चांगल्या बातम्या देण्याची संधी मिळाल्याखेरीज आणि स्वतःचे आणि वृत्तपत्राचे नाव गाजले नाहीतर पत्रकाराच्या आयुष्याला काडीचेही महत्त्व नाही. एकही धाव न काढता तंबूत परत फिरणा-या क्रिकेटपटुसारखी आणि सिनेमात जमावाच्या सीनमध्ये एक्स्ट्रा म्हणून काम मिळण्यासारखेच त्याचे आयुष्य! मी न्यूजडेस्कवर उपसंपादक होतो. पण मला फिल्डींग वगैरेची संधी मिळाली एवढेच. बॅटिंग किंवा बॉलिंग करण्याची संधी मिळून त्या संधीचे चीज करून दाखवले तरच क्रिकेटपटुचे जीवन सार्थक होते अन्यथा नाही. वर्तमानपत्राच्या नोकरीचेही असेच असते. कर्तृत्व दाखवण्याची संधी केव्हा हाती लागेल ह्याची चिंता मला सतावत होती.
पण माझे नशीब इतके काही सो सो नव्हते. कर्तृत्व दाखवण्याची संघी अचानकपणे समोर आली. सांज मराठाच्या संपादक महिन्याभराच्या रजेवर गेले. उद्यापासून तुम्ही सांज मराठाच्या ड्युटीला या, असे न्यूज एडिटर मनोहर पिंगळेंनी फर्मावले. सांजच्या ड्युटीत फक्त पहिले पान करायचे असते. बाकीची पाने अधीच तयार करण्यात आलेली असत. बरोबर १० वाजता पान मशीनला गेले पाहिजे. त्यानंतर दुस-या दिवशीचा अग्रलेख लिहून सांजचा संपादक घरी जायला मोकळा असे. कामाचे हे स्वरूप मला न्यूजएडिटरने दोन वाक्यात समजावून सांगितले. मी मान डोलावली.
नाही म्हटले तरी मला थोडे टेन्शन आलेच.  टेन्शन येण्याचे कारण होते. दुस-या दिवशीची तारीख होती १६ जुलै १९६९. जगाच्या इतिहासात सर्वात मोठी बातमी ह्या दिवशी घडणार हे घरी जाण्यापूर्वी पेपर चाळताना माझ्या लक्षात आले. ते न्यूटएडिटर पिंगळे ह्यांच्या लक्षात आले नसावे. कदाचित ते त्यांच्या लक्षात आले असते तर माझ्याऐवजी दुस-या अनुभवी उपसंपादकाला त्यांनी सांजची ड्युटी लावली असती. दुस-या दिवशी गुरूचंद्र युती असावी. म्हणून मला ही संधी मिळाली असा निष्कर्ष मी काढला. त्या काळात माझा फलज्योतिषावर उदंड विश्वास होता! दुस-या क्षणी माझेच मला हसू आले. मनुष्य चंद्रावर उतरणार ह्या संपूर्णपणे वैज्ञानिक घटनेची विलक्षण बातमी लिहायला निघालो असताना चंद्र कुठल्या राशीत आहे ह्याची विवंचना माझ्या मनात सुरू होती! ही नक्कीच हसण्यासारखी गोष्ट होती. मनुष्य चंद्रावर उतरणार हे जितके सत्य तितकेच कशाबद्दल तरी काळजी करत राहणे हा मानवी स्वभाव आहे हेही तितकेच सत्य!  प्रत्येक घटनेचा भाग्याशी संबंध जोडण्याची सामान्य प्रवृत्ती हेही त्या काळाचे वैशिष्टय होते. त्याला मी तरी कसा अपवाद असणार?
मराठात १५-२० सबएडिटर होते. त्ती बातमी लिहायची संधी इतर कोणालाही न मिळता मला एकट्याला आणि एकट्यालाच ती मिळाली ह्याला मी तरी भाग्य समजून चाललो होतो. त्या संधीचा अर्थ कोणाला कळला की नाही हे मी सांगू शकत नाही. पण एवढे मात्र नक्कीच सांगू शकतो की मंत्र्यांचे राजिनामे, एकाएकी धरण फुटून मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानि झाल्याच्या बातम्या खळबळजनक असतात. खळबळजनक बातम्या रोज घडत नाही हे खरे. पण प्रत्येक रिपोर्टरला वर्षांतून एकदा तरी खळबळजनक बातम्या देण्याची संधी मिळते. ती बातमी मी कशी चतुराईने मिळवली वगैरे रसभरित गप्पा रिपोर्टर मंडळी पुढे अनेक वर्षे मारत असतात.  अशी संधी मला मिळण्याचा प्रश्नच नव्हता. कारण पत्रकार असलो तरी रिपोर्टर नव्हतो. आम जनतेच्या लेखी फक्त संपादक आणि बातमीदार हे दोघेच पत्रकार!
मनुष्य चंद्रावर उतरणार ही पृथ्वीच्या इतिहासातील अभूतपूर्व घटनेची बातमी कशी लिहायची ह्याची जुळवाजुळव अमेरिकन पत्रकार मनातल्या मनात नक्कीच करत असावे. प्रेस ट्रस्टचे फॉरेन डेस्क रात्री उशिरा सुरू व्हायचे. पीटीआयच्या बातमीवरून डौलदार मराठीत इंट्रो कसा लिहायचा ह्याचा मी मनातल्या मनात सराव सुरू केला. पाटिल-फर्नांडिस केसच्या सुनावणीच्या बातम्या लिहीत असताना डौलदार मराठीत कसे लिहायचे ह्याची टीप मला साक्षात् आचार्य अत्र्यांकडूनच मिळाली होती. मी कशी बातमी लिहली ती वाचून पाहायला आचार्य अत्रे मात्र तेव्हा हयात नव्हते. महिन्यांपूर्वीच त्यांचे निधन झाले होते.
समनुष्य चांद्रयानातून मनुष्य चंद्रावर उतरणार ह्या घटनेचे वैशिष्ट म्हणजे भारतातल्याच काय, जगातल्या कुठल्याही पत्रकाराला चंद्रावर मनुष्य उतरत असल्याची घटना घडत असताना प्रत्यक्ष अंतराळातल्या घटनास्थळी हजर राहून वृत्तांकित करता येणार नव्हती. काही तासांनी घडण-या घटनेवर विचार करत माझ्या महालक्ष्मी देवळाच्या कंपाऊंडमधल्या चाळीच्या खोलीत मी कॉटवर पहुडलो.
विचार करता करता माझ्या लक्षात आले की बातमीवर माझे नाव नसणार म्हणून खंतावण्याचे खरे तर काहीच कारण नाही. आखणीपासून ते प्रत्यक्ष अपोलो यान अंतरिक्षात पाठवण्याच्या मोहिमेत अनेक शास्त्रज्ञ-तंत्रज्ञ सहभागी झाले आहेत. मोहिमेच्या रेकार्डमध्ये सर्वांची नावे असली तरी चांद्रयान मोहिमेचे श्रेय कुण्या एकट्याचे नाही. मनुष्य चंद्रावर उतरला ह्याचे श्रेय तर अवघ्या विश्वाला द्यायला हवे!  नवे शास्त्रीय संशोधन आपल्याला कितीही नवे वाटत असले तरी त्या संशोधनाची मदार कुठे ना कुठे मागील संशोधनावर आधारलेली असते. गुरूत्वाकर्षणाचा नियम न्यूटनने शोधून काढला नसता तर पुथ्वीचे गुरूत्वाकर्षण भेदून अंतरिक्षात यान पाठवण्याची कल्पना रशियन आणि अमेरिकन शास्त्रज्ञांना सुचली असती का? नाही! त्या काळात रशिया आणि अमेरिका ह्यांच्यात शीतयुध्द सुरू होते. साहजिकच अंतराळ संशोधनाच्या बाबतीत रशिया पुढे की अमेरिकेच्या पुढे अशी जोरदार चर्चा सर्वत्र होती. १९५७ साली तर रशियाने स्पुटनिक हा पहिला ग्रह अंतराळात पाठवला होता. त्यानंतर रशियाने समनुष्य अंतराळायान अंतराळात पाठवून निश्चितच आघाडी गाठली होती. ह्या पार्श्वभूमीवर लौकरच अमेरिकेचा अंतरळवीर चंद्रावर उतरणार अशी घोषणा अमेरिकेच अध्यक्ष केनेडी ह्यांनी केली. त्यांच्या घोषणेमुळे अमेरिका-रशिया ह्यांच्यातल्या अंतराळ स्पर्धेच्या चर्चांना ऊत आला.

कॉटवर पडल्या पडल्या मला ती सगळीच चर्चा खुळचटपणाची वाटू लागली. इतकेच नव्हे तर चांद्रमोहिमेची बातमी देणारा अंक काढण्याचे श्रेय मला मिळणार नाही म्हणून माझ्या मनात सुरू असलेली खळखळ एकदम थांबली. मला शांत झोप केव्हा लागली ते कळलेच नाही. सकाळी लौकर उठून ७ वाजताच ऑफिसला जाऊन क्रीडचा डोंगर उपसण्याचे मी ठरवले होते. ठरवल्याप्रमाणे मला लौकर जाग आली. तयार व्हायला सुरूवात केली तेव्हा माझ्या लक्षात आले की माझ्याकडच्या वातीच्या स्टोव्हमध्ये रॉकेल नाही. चरफडत मी चाळीच्या सार्वजनिक नळाखाली आंघोळ केली. महालक्ष्मीजवळ असलेल्या वरळीच्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी चालत निघालो.

माझ्या खुर्चीत बसताच शिपायाने भराभर क्रीड फाडून माझ्यापुढे चळत ठेवली. मला न विचारताच त्याने कॅंटिनमध्ये जाऊनही चहाही सांगितला. तो स्वतःच चहा घेऊन आला. त्याच्यासाठीही चहा आणायला मी त्याला पुन्हा कँटिनमध्ये पाठवले. क्रीड सॉर्ट करत असताना मध्येच मशीनवर आलेली एकुलती एक बातमी त्याने फाडून आणून दिली. नील आर्मस्ट्रांग हा नियोजित वेळेपेक्षा २० मिनीटे उशिरा चंद्रावर उतरणार होता. त्याची उतरण्याची वेळ लांबल्यामुळे १० वाजता पानावर सही करून ते मशीनला देण्याचे लांबण्याची शक्यता निर्माण झाली. परंतु अशा प्रकारच्या शक्यता वर्तमानपत्रात नेहमीच निर्माण होतात. ही तर मानवी इतिहासातील पहिलीवहिली घटना! ती कशी घडणार ह्याबद्दल काहीच सांगता येणार नव्हते. अंतराळ मोहिमात अनेकवेळा अपघात घडल्याच्या घटना त्यापूर्वी घडलेल्या होत्या. अशी वेळी बातम्या लिहणा-याची कसोटी असते. प्राप्त परिस्थितीत बातमीचा जोड भाग आधीच लिहून कंपोज करून घेण्याचा मार्ग पत्करायचा असतो. हा नेहमीचा मार्ग मीही पत्कारला. कंपोजिंग फोरमननेही त्याची नेहमीची कामाची पध्दत बदलून दर ५ मिनीटांनी तो स्वतः काप्या घ्यायला माझ्याकडे यायचा. दोनतीन वाक्यांची कॉपी असली तरी तो तीही नेत असे. जगावेगळी हेडलाईनची बातमी कंपोज करण्याचे काम एकाच कंपोझिटरला सोपवण्याऐवजी ते त्याने सर्व कंपोझिटरना सोपवले होते.

हे सगळे करत असताना मशीनची घंटी वाजू लागली. मशीनवर नवी बहुप्रतिक्षित एका वाक्याची बातमी आली, सन ऑफ मदर अर्थ स्टेप्ड ऑन मून. ती बातमी फाडून घेऊन मी कागदावर वाक्य खरडले, पृथ्वीपुत्र नील आर्मस्ट्राँग ह्याने चंद्रभूमीवर पाऊल ठेवले. फोरमन माझ्या पुढ्यात उभाच होता. त्याच्या हातात कागद सोपवला. त्याला विचारले, कुठल्या टायपात तू इंट्रो कंपोज करणार?
टू लाईन पायका.`
नाईक, टू लाईनपेक्षा मोठा घेता येणार नाही का?`
`पण इंट्रोला मोठा टाईप वापरला तर वरच्या हेडिंगला आणि बॅनरला सिस्कलाईनपेक्षा मोठा लाकडी  फाँटचा टाईप घ्यावा लागेल. गेटअप बरा दिसणार नाही.
ठीक आहे.
फोरमन धावतच कंपोज खात्याकडे निघाला. मी त्याच्या मागोमग निघालो. एवढ्यात फोन आला. शिपायाने रिसिव्हर उचलून माझ्या हातात दिला.

मी मधु दंडवले बोलतोय्....
मनात म्हटलं आता ह्यांना का बोलायचंय्! जगातल्या यच्चयावत् घटनांवर प्रतिक्रिया देण्याची समाजवाद्यांची खोड कधी जाणार? मनातला विचार बाजूला सारून मी म्हटले, `बोला. बहुधा माझ्या मनात आलेला विचार त्यांनी ओळखला असावा. ते म्हणाले, `मी फिजिक्सचा प्राध्यापक ह्या नात्याने प्रतिक्रिया देतोय्. लिहून घ्याल?’
झक मारत लिहून घ्यावेच लागणार, असं मनातल्या मनात म्हणत मी लिहून घेण्याचे नाटक केले. मधु दंडवते बोलत होते, चंद्रा, तुझं एकाकीपण संपले. भावी काळात आम्ही तुझ्या जमिनीवर वस्ती करायला येणार आहोत. वगैरे वगैरे. माझ्या सहनशीलतेची मर्यादा संपली होती. मला पहिल्या पानावर सही करायला जायचे होते. शेवटी मला त्यांना तसे सांगावे लागले तेव्हा कुठे त्त्यांनी फोन ठेवला. मी घाईघाईने दोन वाक्यांची बातमी लिहली. हेडिंग दिले, चंद्रा तुझे एकाकीपण संपले!

दीनवाण्या नजरेने विनंती करत बातमी फोरमनच्या हातात ठेवली.
अहो आता मी पान लॉक करायला घेतलंय्... ही बातमी कंपोज केव्हा करणार आणि पानात टाकायला जागा कुठून आणणार?’

मी त्यावर काहीच बोललो नाही. परंतु फोरमनच्या मनात काय आले कोण जाणे! त्याने हेडिंग सिक्सलाईन टायपात कंपोज केले आणि मास्टहेडच्या वर स्कायलाईन टाकली. अगदी तळाच्या बातमीवर त्याने न विचारताच कापाकाप केली आणि प्रतिक्रियेची बातमी दिली. दहा मिनीटात मशीनर पान गेले. मशिनमन स्वतः सांजच्या प्रती घेऊन वर आला. माझ्या हातात अंक ठेवला तेव्हा त्याचा चेहरा खुशीने उजळून गेला होता.

मनुष्य चंद्रावर गेला ह्याचा अमेरिकनांना जेवढा आनंद झाला असेल त्यापेक्षा कितीतरी आनंद मला झाला होता. अंक बाजारात गेला तेव्हा फोन सुरू झाले. त्या प्रश्नांचा एकच मुद्दा.

बरोबर! मराठा हा कम्युनिस्टांचा पेपर! तेव्हा तुम्ही अमेरिकचा अंतराळवीर चंद्रावर उतरला हे तुम्ही कसं लिहणार? ‘

मी कपाळाला हात मारून घेतला.

त्याला फोनवर बोलताना मी एवढंच म्हणालो, हे बघा! एका ग्रहावरचा माणूस जेव्हा दुस-या ग्रहावर जातो तेव्हा तो रशियाचा असत नाही की अमेरिकेचा असत नाही. तो पृथ्वीचा असतो. नील आर्मस्ट्राँग हा अमेरिकेचा अनुभवी अंतराळवीर असल्याचं पुढं बातमीत लिहलेलं आहेच बातमी जरा नीट वाचा!
पृथ्वीपुत्र नील आर्मस्ट्राँग ह्याने चंद्रभूमीवर पाऊल ठेवले हे माझे वाक्य मूळ टेक्स्टला तर धरून होतेच, त्याखेरीज ते सुटसुटीत आणि डौलदारही होते.

आज अंतराळ संशोधान क्षेत्रात काम करण्यासाठी जगातील सुमारे ७० देश एकत्र आले आहेत. त्याखेरीज अनेक देशात त्यांचे स्वतःचे संशोधन सुरू आहे. चंद्राच्या आणि मंगळाच्या टूरिझमसाठी आणि अंतराळ स्थानकात मुक्काम करण्यासाठी सोयीसुविधा पुरवण्यासासाठी नासाने नुकतीच कंपनी स्थापन करण्याची घोषणा नॅस्टॅक एक्सचेंजवर केली. त्यासाठी देकार मागवले आहेत. भारतानेही अंतराळ सेवा पुरवण्यासाठी महामंडळ स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तशी घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. ह्या सा-या घडामोडींचा अर्थ इतकाच की चंद्र किंवा मंगळावर सफर करण्याचा योग ज्याच्या पत्रिकेत असेल ती कुठलीही धनिक व्यक्ती चंद्रावर जाऊ शकेल, मग ती कुठल्या का देशाची असेना का!

रमेश झवर


Friday, July 5, 2019

अर्थसंकल्पाची गरूडझेप

अर्थसंकल्पाच्या संकल्पना बदलत चालल्या आहेत. अलीकडे अर्थसंकल्पात आकडेवारी, मागील ५ वर्षांत काय केले, काय झाले ह्याला अजिबात महत्त्वा नाही! मागील वर्षांत काय झाले ह्याचा अर्थसंकल्पपूर्व स्वतंत्र अहवाल पूर्वीच सादर करण्यात आला आहे. अर्थसंकल्पाच्या पुस्तकातील ग्राफ वगैरे पाहून ज्यांना काथ्याकूट करायचा आहे तो त्यंनी खूशाल करावा. हिशेबी वृत्तीने घर चालवण्याची वाईट खोड ज्यांना लागली आहे त्यांनी कृपा करून आपली सवय बदलावी. चालू वर्षात भारताची अर्थव्यवस्था दोन सव्वादोन लाख कोटींच्या घरात आहे. ( किती रुपयांचा डॉलर होतो हे इंटरनेटवर पाहणे जास्त चांगले. तेवढाच डिजिटल एक्सपिरियन्स! ) येत्या ५ वर्षांत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सच्या घरात जाईल ह्याची खूणगाठ मनाशी पक्की बांधून ठेवणे महत्त्वाचे आहे. ५ ट्रिलियन डॉलर्स म्हणजे पाचावर किती शून्य असला फाल्तू प्रश्न विचारत बसण्यापेक्षा डिक्शनरीत ट्रिलियनचा अर्थ शोधा! जुन्या काळात Egalitarian Society वगैरे भाषा राज्यकर्ते हमखास बोलत असत. भारतीय समाज  किती इगलटरियन आहे किती नाही हे माहित नाही; पण निर्मला सीतारामन् ह्यांनी सादर केलेला २०१९-२०२० वर्षाचा अर्थसंकल्प मात्र सरकारची नक्कीच गरूडझेप आहे!  
आकाशात उंच झेपावलेला पक्षीराज गरूड पुढे कुठे जातो हे केवळ पक्षीतज्ज्ञच सांगू शकतील. आपल्याकडे फक्त हिमालयात गरूड पक्षी पाहायला मिळतो. ते जाऊ द्या. तूर्त इतकेच लक्षात ठेवायचे की लीस्ट गव्हमेंट, मोअर गव्हर्नन्स’!  सरकार को कहो रामराम, खुद संभालो अपना काम!! अशा ह्या विशाल अर्थव्यवस्था असलेल्या देशाचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन् ह्यांनी खेड्यापाड्यात प्रत्येक घरी नळाचे पाणी पुरवण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. जमिनीवरच्या ह्या प्रश्नाइतकेच अंतराळविषयक प्रश्नही मोदी सरकारला महत्त्वाचे वाटतात. म्हणूनच ह्या अर्थसंकल्पात अंतराळ सेवा पुरवणारे महामंडळ स्थापन करण्याची घोषणा निर्मला सीतारामन् ह्यांनी व्यक्त केली.
२०१९ वर्षात सरकारची सर्व मिळून जमा होणारी रक्कम २७३५२९०.३२ लाख कोटी आहे. गेल्या वर्षी ती २४१६०३४.१० लाख कोटी होती. ह्याचा अर्थ कर्ज, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराचे उत्पन्न, उधा-या, निर्गुंतवणुकीच्या रकमा वगैरे मिळून यंदा सरकारची आवक वाढणार आहे. भावी वर्षातील खर्चाचा विचार केला तर असे लक्षात येते की यंदा २७८६३४९ लाख कोटी रुपयांएवढा खर्च होणार आहे. गेल्या वर्षी हाच आकडा २४५७२३५ लाख कोटी रुपये होता. एवढ्या कमी रकमेत शेतक-यांना दुप्पट उत्पन्न, गरीब दुकानदारांना पेन्शन, दुर्बळ समाजघटकांना अर्थसहाय्य, वगैरे नेहमीच्या कुळांसाठी ठरलेला खर्च करण्याच्या बाबतीत निर्मला सीतारामन् ह्यांनी हयगय केलेली नाही! आकड्याच्या जंजाळात न शिरता असे म्हणता येईल की स्वच्छ भारत योजना असो की, घरबांधणी, निर्मला सीतारामन् ह्यांनी कुठेही हात आखडता घेतलेला नाही. हे सगळे करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रकमा उभाराव्या लागणार आहेत. पण चिंता नको. योजना साकार करण्यासाठी लागणारा पैसा ठेकेदारांकडून, जागतिक सावकारांकडून कर्ज वा गुंतवणूक अशा कुठल्याही स्वरूपात उभारण्यात येतो हे अनेकांना माहित आहे.
अर्थसंकल्पात श्रीमंतांनाही थोडा चिमटा काढयचा असतो. श्रीमंत कंपन्यांना भराव्या लागणा-या आयकरावर उपकर भरायला लावण्याच्या दृष्टीने आयकर कायद्यात बदल करण्यात आला आहे. काळा पैशाचे उच्चाटण करण्यासाठी आधीच्या ५ वर्षांत केलेले प्रयत्न अपुरे होते म्हणून १ कोटीपेक्षा अधिक रोकड बँकेतून काढणा-यालाही कर भरण्याचा उपया अर्थसंकल्पात सुचवण्यात आला आहे. सोने खरेदीवर कर तर मोदी सरकारच्या पहिल्याच कारकिर्दीत बसवून झाला होता. ह्या वेळी सोन्यावर सीमाशुल्क वाढवण्यात आला आहे. सोन्यावरील वाढीव सीमाशुल्काची स्मगलर नोंद घेतीलच. मात्र आयातीत सोन्याचे दागिने घडवून ते निर्यात करणा-या उद्योजकांना ह्या करातून वगळण्यात आले आहे.
गरीब कंपन्यांना म्हणजे ४०० कोटींची उलाढाल करणा-या कंपन्यांना आयकर अजिबात भरावा लागणार नाही. जगभर असलेल्या पर्यावरवरणवाद्यांचा आरडाओरडा मोदी सरकारने लक्षात घेतला आहे. म्हणून २०२० मध्ये काराखान्यातून बाहेर पडणा-या इलेक्ट्रिक कारवर एक्साईज कर घटवण्यात आला. मोटार कारखानदार आणि नित्य नव्या कारखरेदीची आस बाळगणारा धनिकवर्गही खूश ! देशात कारप्रवासाची हौस बाळगणारा आणखी एक वर्ग आहे. त्यांनी मात्र पेट्रोलसाठी आणि पार्किंगसाठी जास्त पैसे मोजण्याची तयारी ठेवावी. हौसेला मोल नाही हे त्यांनी लक्षात ठेवलेले बरे!
४५ लाख रुपयांपर्यंत घर मिळत असेल तर कर्ज काढून खुशाल घर खरेदी करावे. घरखरेदी कर्जावरील व्याजावर करसवलत आहे. मात्र, त्यासाठी मुंबई सोडून बदलापूर, कर्जतला राहायला जाण्याची मनाची तयारी करावी. मुंबईत घर खरेदी करायचे तर ६० ते ८० लाख रुपये मोजण्याची तयारी ठेवावी. तशी तयारी नसेल तर झोप़पट्टीत राहायला जाण्यास तयार राहा.
डिजिटलचा वापर हे खूळ समजू नका. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या डिजिटल साक्षर योजनेखाली तुम्ही शिकून घ्या. मध्यमवर्यांनी बिचकण्याचे कारण नाही. मुलगा भले बीए-एमे किंवा बेकाम वुईथ एमबीए अथवा बीई असेल. त्याचे नाव स्कील डेव्हलेपमेंट कोर्ससाठी नोंदवा. त्याला पगार आणि नोकरी मिळणारच. कामगार कायदे बदलण्यासाठी चार प्रकारच्या संहिता संमत करण्यात येणार आहेत. विदेशी गुंतवणूक, खुली अर्थव्यवस्था, ५९ मिनटात १ कोटी कर्ज ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवा. नोकरी मिळवण्यासाठी खटपट करत बसण्यापेक्षा ५९ मिनटात १ कोटी कर्ज मिळवून काम धंद्याला लागणे आवश्यक आहे. ह्याउप्परही बेकार राहायचे असेल तर खुशाल बेकारी पत्करा. मात्र, अमेरिकेत बेकारभत्ता मिळतो त्याप्रमाणे बेकारभत्त्याची मागणी करून स्वतःचे हसे करून घेऊ नका. मुख्य म्हणजे अंबानी-अदानींचा दुस्वास करू नका. त्यांना कर भरावा लागतो तसा तुम्हाला भरावा लागतो का? त्यांना कर चुकवावा लागत नाही. कारण विक्रीची रक्कम तुमच्याकडून डिपाझिट म्हणून स्वीकारलेली असते. डिपाझिटवर कर नसतो हे लक्षात घ्या. लेबर न विकता मालकांकडून पगाराऐवजी नॉन रिफंटेबल डिपाझिट मागण्याचा विचार करायला हरकत नाही.
नेहमीप्राणे सिगरेटवर कर वाढवण्यात आला आहे. साबण, काडेपेटी, कार्डपाकिटे, रेल्वेची भाडेवाढ असल्या गोष्टी अर्थसंकलापतून जाहीर करण्याचे दिवस आता संपले. अप्रत्यक्ष कराचाही बाऊ नको. अप्रत्यक्ष करात केव्हा सूट द्यायची, केव्हा तो वसूल करायचा हे आता खासदारांनी सुचवण्याचे कारण नाही. कारण तो विषय जीएसटी मंत्रीपरिषदेकडे सुपूर्द करण्यात आला आहे. पेट्रोल-डिझेलवर उत्पादनशुल्क १ रुपयाने वाढवले. त्यावर आधीच उत्पादनखर्चापेक्षा उत्पादनशुल्क अधिक आहे. १ रुपया वाढवल्याने काही आकाश कोसळणार नाही. भाजीपाल वगैरे महागणार असला तरी त्याची चिंता करण्यात अर्थ नाही. ‘पराधीन पुत्र मानवाचा’ हे गदिमांचे वचन गरीब माणसाने विसरून कसे चालेल? शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची, स्टॉकमार्केट, बाँडमार्केट इत्यादी भांडवली समस्या सोडवण्यासाठी काही घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यात समाधान माना. कार्य सिध्दीस नेण्यासाठी श्री समर्थ आहे.
कॉर्पोरेट कंपन्यासाठी व्यवसाय सुलभता आणण्यात येत असताना सामान्य नागरिकांसाठी जीवन जगण्याचे सुलभीकरण करण्याचा संकल्प निर्मला सीतारामन् ह्यांनी उच्चारला आहे. फक्त काबाडकष्ट करण्याचे त्यांनी टाळले पाहिजे ही साधीसुधी अपेक्षा अर्थमंत्री निर्मला सीतारामन् बाळगून आहेत. भाषणात त्यांनी उद्धृत केलेल्या अभिजात तामिळ भाषेतल्या काव्यपंक्तींचा अर्थ समजून घेण्यासाठी तामिळेतर देशवासियांनी तामिळ भाषा अवश्य शिकून घ्यावी. त्याचबरोबर आकडे समजून घेण्याचा आग्रहच असेल तर बजेटचे भले थोरले पुस्तक चाळा. भारतमाला आणि सागरमाला म्हणजे काय, असा वाह्यातपणाचा प्रश्न विचारू नये. हे नवे शब्द म्हणजे नवभारताची भाषा आहे. संरक्षणावर किती खर्च करणार आहात, उच्च शिक्षणावर किती कोटी रुपयांची तरतूद आहे असले पांचट प्रश्न खासदारांनी विचारू नये. सरकार नक्कीच पैसा खर्च करणार ह्यावर विश्वास ठेवा. कारण, पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपचा वसा मोदी सरकारने घेतला आहे, तरच निर्मला सीतारामन् ह्यांच्या भाषणातील शब्दार्थात गुंफलेला अर्थसंकल्प’ सहज समजेल!
रमेश झवर

Thursday, July 4, 2019

बिर्ला परंपरेतला दुवा निखळला!

बिर्ला समूहाचे भीष्माचार्य बसंतकुमार बिर्ला ह्यांनी वयाच्य ९८ व्या वर्षी ह्या जगाचा निरोप घेतला. बिर्ला उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा कुमारमंगलम् बिर्ला हे बीके बिर्लांचे नातू असून कुमारमंगलम् बिर्लांना घडवण्यात बीके बिर्लांचा मोठा वाटा होता. कुमारमंगलम् बिर्ला हे बीके बिर्ला उद्योगसमूहाचे आणि त्यांचे वडिल आदित्यविक्रम बिर्ला ह्यांनी स्वतंत्रपणे स्थापन केलेल्या आदित्यविक्रमबिर्ला गटाचे वारसदार आहेत. 1995 साली वडिल आदित्यविक्रम बिर्ला ह्यांचे अकाली निधन आणि बीके बिर्लांचा वार्धक्यकाळ ह्यामुळे दोन्ही समूहांची जबाबदारी कुमारमंगलम् बिर्ला ह्यांच्यावर येऊन पडली. बसंत कुमार बिर्ला हे घनःश्यामदास बिर्लांचे सगळ्यात कर्तृत्वान पुत्र. बिर्ला समूहातील १ लक्ष २० हजार कर्मचारी बोलताना बसंत कुमार बिर्लांचा उल्लेख बीकेबाबू असाच करतात!  गेल्या वर्षापर्यंत दोन्ही गटांचे मिळून बाजारमूल्य ४४.३ अब्ज डॉलर्सच्या घरात होते. बीके आणि आदित्या बिर्ला उद्योगसमूह ३५ देशात विखुरला असून अल्युमिनियम, कागद, सिमेंट, रसायने, पीटर्स इंग्लंड शर्ट, व्हिसकॉस फिलामेंट यार्न आणि त्यापासून बनवलेले सुटाचे कापड, कार्बनब्लॅक, रसायने, टायर्स, सूती कापड, वित्तीय सेवा, टेलिकॉम, बीपीओ, माहितीतंत्रज्ञान इत्यादि क्षेत्रात हा समूह आघीडवर आहे. नॉनफेरस मेटल आणि सिमेंट ह्या दोन क्षेत्रात जागतिक आघाडी गाठण्याची महत्त्वाकांक्षा कुमारमंगलम् बिर्ला बाळगून आहेत.
उद्योगाचा पसारा वाढवणे एवढेड साधे ध्येय बीके बिर्ला उद्योगसमूहाने कधीच ठेवले नाही. काळाच्या ओघात आध्यात्मिकतेकडून आधुनिक शैक्षणिक संस्था स्थापन करण्याकडे बीके बिर्ला समूहाचा प्रवास सुरू झाला. आधीच्या पिढीने देवळे आणि धर्मशाळा बांधल्या तर बीके बिर्ला समूहाने पिलानी ह्या त्यांच्या मूळ गावी इंजिनियरींग शिक्षणासाठी स्वतंत्र संस्था स्थापन केली. अलीकडे ह्या संस्थेला स्वायत्त्त संस्थेचा दर्जा मिळाला आहे. त्याखेरीज कल्याण येथेही ह्या समूहाने एक महाविद्यालय सुरू केले. खुद्द कुमारमंगलम् बिर्ला ह्यांच्यातही आजोबांचे गुण उतरले आहेत. नव्याजुन्यांचा संगम असलेली आधुनिक जीवनशशैली त्यांना बीकेंइतकीच प्रिय आहे. त्यांच्या घरात मुलांना संगीत शिकवण्यासाठी प्रसिध्द गायक मिलिंद इंगळे ह्यांच्या वडिलांची नेमणूक करण्यात आली होती. आपल्या समूहातील कंपन्यांच्या प्रमुखांना वर्षातून एकदा भोजनास पाचारण करण्याचा बीकेंचा प्रघात होता. ह्या सा-या कंपनीप्रमुखांना बीके बिर्ला दांपत्य स्वतः आग्रहपूर्वक वाढत असत.
सामान्यतः कर्तृत्ववान माणसाची मुले बापाएवढी कर्तृत्वान निघत नाही असा सार्वत्रिक समज आहे.  ह्या कारणामुळेच अनेक उद्योगघराणी संपुष्टात आलेली दिसतात. बिर्ला कुटंब मात्र ह्या सार्वत्रिक समजुतीला अपवाद आहे. ह्यांचा अर्थ त्यांच्या कुटुंबात हिस्सेवाटीवरून भांडणे नाहीत असा नाही. कुटुंबातली भांडणे हा उद्योगघराण्यांना शाप आहे. बिर्ला कुटुंब त्ला अपवाद नाही. माधवप्रसाद बिर्लांच्या कुटुंबात मृत्यपपत्रावरून भांडण उपस्थित होताच स्वार्थी विचार बाजूला सारून मृत्यूपत्राला विरोध करण्यासाठी जिवाचे रान करा, असा आदेश बीकेंनी त्यांच्या कुटुंबातील नव्या पिढीला दिला होता. मोठे उद्योग आणि राज्यकर्ते ह्यांच्यातले संबंध हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. परंतु ह्यासंबधी बीके बिर्लांचे धोरण स्पष्ट होते. सरकारी परवान्यांसाठी जमेल तिथपर्यंतच प्रयत्न करायचे, अन्यथा सरळ प्रस्ताव मागे घ्यायचा. जनसंपर्क आणि राजकीय नेत्यांशी घसट हा विषय हाताळणे हा विषय तसा किचकट. ह्याही बाबतीत बीके बिर्लांनी आपल्या समूहाच्या सीमारेषा निश्चित केल्या आहेत. ना दोस्ती ना दुष्मनी हे बिर्ला समूहाच्या धोरणाचे सूत्र आहे. एकीकडे वरिष्ठतम अधिका-यांना भरपूर अधिकार देत असताना दुसरीकडे घोडचुका करणा-याला घरचा रस्ता दाखवण्य बीकेंनी कमी केले नाही. हेच धोरण कामगार चळवळी आणि तंत्रज्ञांच्या नेमणुकांच्या बाबतीत अवलंबले. सेंच्युरी मिल बंद करताना स्वेच्छा निवृत्ती घेणा-या प्रत्येकाला ठरल्यानुसार रक्कम हातात दिली जाईल हे त्यांनी कसोशीने पाह्यले.
डाव्या पक्षांनी बिर्ला समूहावर सातत्याने टीका केली. केरळात डाव्यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर सरकारने बिर्लांकडे आपल्या राज्यात कारखाना काढण्याचा आग्रह धरला तो बीकेच्या काळातच! मारवाडी हा देशभर टिंगलटवाळीचा आणि कुचेष्टेचा विषय! परंतु अशा प्रकारच्या टिंगलटवाळीला अजिबात भीक न घालण्याचे माहेश्वरी समाजाचे जन्मसिध्द धोरण. बीकेबाबूंचेही धोरणही असेच जन्मसिध्द धोरण होते. कल्याणजवळील शहाड येथे बिर्ला कुटुंबाना दिल्लीप्रमाणे लक्ष्मीनारायण मंदिर बांधायचे होते. विठ्ठल हे महाराष्टाराचे आराध्य दैवत. शहाडला विठ्ठल मंदिर हवे असे कुणीतरी बिर्लांना ऐनवेळी सुचवले. ही सूचना मान्य करून बीके बिर्लांनी लक्ष्मीनारायणाच्या जोडीने विठ्ठलाचीही प्रतिष्ठापना केली. म्हणून हे मंदीर विठ्ठल मंदिर म्हणूनच ओळखले जाते. दरवर्षी आषाढीला पंढरपूरप्रमाणे शहाडच्या विठ्ठल मंदिरातही दर्शनासाठी भलीमोठी रांग लागते. रेल्वेप्रवासीही गाडीतून मंदिराच्या शिखराचे दर्शन घेतात!
कुठल्याही वादात न पडता आपल्या मनात जे योजले असेल तेच निर्धारपूर्वक तडीस नेणा-या परंपरेतला मोठा दुवा बीके बि.र्लांच्या निधनाने निखळला!
रमेश झवर